प्रगती प्रतिष्ठान - आदिवासी विकासासाठी प्रयत्‍नशील


‘प्रगती प्रतिष्ठान’ ही संस्था पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार व मोखाडा तालुक्यांत आदिवासींच्या विकासासाठी काम करते. त्या संस्थेने शिक्षण, अपंगांचे पुनर्वसन, स्वयंरोजगार व ग्रामविकास यांच्या माध्यमातून आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यात मोलाचे कार्य साधले आहे. संस्थेने गावातील लोकांच्या गरजेनुसार विकास आराखडा बनवून ग्रामविकासाला चालना दिली. त्यामध्ये नळपाणी योजना, जलसंवर्धन, शेती विकास, सौरऊर्जा, शेतीला सौर पंपाने पाणी देण्याचे नियोजन या मुख्य गोष्टींना प्राधान्य आहे. तसेच, कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे स्वयंरोजगाराची कवाडे आदिवासींसाठी खुली केली गेली आहेत.

नवदृष्टीचे आदिवासी पाड्यांवरील पोषण


‘नवदृष्टी’ ही ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या आहार, आरोग्य व आर्थिक समस्यांवर प्रत्यक्ष पाड्यावर जाऊन काम करणारी सामाजिक संस्था आहे. संस्था १९९५ पासून या जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व विक्रमगड भागातील एकशेदहा दुर्गम ठिकाणी कार्यरत आहे.

ठाणे जिल्ह्यातील अती दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये (वावर, वांगणी, रुइघर, बांगदरी) १९९४ च्या सुरुवातीला दोन आठवड्यांच्या कालावधीत शेकडो बालकांचे कुपोषणामुळे मृत्यू झाले आणि जव्हार आणि मोखाडा हे दोन तालुके जगाच्या नकाशावर आले. आफ्रिकेतील इथोपिया, युगांडातील कुपोषित मुलांशी तुलना होण्याइतकी त्यांची अवस्था दयनीय झाली होती. त्या अती दूर्गम पाड्यांमध्ये जेव्हा मृत्यूचा संहार चालू होता तेव्हा मुंबईमधील ‘निर्मला निकेतन’ या सामाजिक संस्थेच्या महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांनी तेथे दोन महिने मुक्काम केला. त्यांनी आदिवासींना मदत करून त्‍यांना त्या प्रतिकूल परिस्थितीत पुनश्च जगण्याचे बळ दिले. मुंबईपासून एकशेचाळीस किलोमीटर अंतरावरील त्या गरीब, असहाय्य आदिवासी पाड्यांमध्ये रोगांचे थैमान चालू होते. लोकांना खाण्यास अन्न आणि घालण्यास कपडे नव्हते, अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे या उद्देशातून ते दहा पदव्युत्तर विद्यार्थी पुढे आले होते. त्यांनी गरिबीमुळे गांजलेल्या, पिडलेल्या आदिवासींना नवीन दृष्टी, उमेद, उभारी मिळावी म्हणून १९९५ मध्ये संस्थेची स्थापना केली आणि ‘नवदृष्टी’चा जन्म झाला!