लोकसंख्यावाढीवर काही उपाय आहे का?
जगभर 11 जुलै हा लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. जगाची सतत वाढणारी लोकसंख्या हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय होऊन गेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने तो विषय जागतिक पातळीवर आणला आणि 1989 पासून लोकसंख्या दिवस मानण्याचे आवाहन केले. लोकसंख्या विस्फोटाचा विचार करत असताना कुटुंब नियोजन, स्त्री-पुरुष समानता, मानवाधिकार, आरोग्याचा हक्क आणि नवजात बालकांचे आरोग्य या पाच बाबींचा विचार प्रामुख्याने करावा लागतो. भारतासारख्या विकसनशील देशात बालविवाह आणि प्रजननक्षम वयातील स्त्रियांचे कुपोषण यांचाही विचार उचित ठरतो. स्त्री-आरोग्याचे सर्व प्रश्न वाढत्या लोकसंख्येशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निगडित आहेत. म्हणूनच, 2019 च्या जागतिक लोकसंख्या दिनाचे दिशादर्शक वाक्य होते - शाश्वत विकास साधण्याचा असेल तर प्रजननसंस्थेचे आरोग्य आणि लिंगसमभाव अत्यावश्यक आहे.