तुळशीबाग - ऐतिहासिक, आधुनिक, स्मार्ट! (Smart Tulshibaug)
पुण्यातील तुळशीबागेला अडीचशे वर्षांचा जागता इतिहास आहे. तुळशीबागेचे स्वरूप एका जुन्या राममंदिराभोवती उभा राहिलेला बाजार असे आहे. पिन टू पियानो... म्हणाल ती संसारोपयोगी वस्तू तेथे विकत मिळते. पेशवेकालीन मॉल असे त्याचे वर्णन रास्त होईल. ते देऊळ बांधले तेव्हा देवपूजेला लागणाऱ्या सहाण-खोडे, फुले अशा वस्तू विकण्यास तेथे ठेवत. म्हणजे संकल्पना ती होती, पण आता त्या तुळशीबागेच्या बाजाराला जे अजस्र आणि अवाढव्य रूप आले आहे त्यात मूळ मंदिर कोठल्या कोठे हरवून गेले आहे! तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेकडे नोंदलेले तीनशे दुकानदार आणि तीनशे पथारी व्यावसायिक आहेत. त्यांनी एक एकरातील राम मंदिर वेढून टाकले आहे. ते मंदिर तुळशीबागवाले यांच्या खासगी ट्रस्टकडे आहे. त्याभोवती पुरंदरे-पंड्या-सम्राट अशी जुनी चालत आलेली ट्रस्टकडील भाड्याची पाच-सहा दुकाने आहेतच. त्या जुन्या दुकानांना व वाडाटाइप रहिवासी घरांना रूपडे इतिहासकालीन आहे. त्यांचे आणि बाहेरच्या दुकानदारांचे काही संबंध नसावे. आतील ती दुकाने तर पडिक वाटतात.