म्हैसगावचा रामहरी फ्रान्समध्ये!


म्हैसगाव कुर्डुवाडीपासून दहा किलोमीटर दूर आहे. म्हैसगावसारख्या सात-आठ हजार लोकवस्तीच्या गावातील दोन मुले उच्च शिक्षण घेत आहेत! ही कहाणी आहे गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात झालेल्या शैक्षणिक प्रगतीची. म्हैसगावात चंद्रकांत कुंभार नावाचे गृहस्थ राहतात. कुंभारकाम हा त्यांचा व्यवसाय. कुंभार यांचा थोरला मुलगा रामहरी फ्रान्समध्ये पीएच.डी. करत आहे व दुसरा मुलगा, नामदेव मुंबई विद्यापीठात पत्रकारितेतील पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे.

रामहरी सांगतो, तो लहान असताना, म्हैसगावातील एकंदर वातावरण चांगले नव्हते. राजकारण बरेच होते व त्याचे पडसाद घराघरात जाणवत. घरांमध्ये भांडणे होत असत. शिवीगाळ चालू असे. गावातील मुलांच्या शिक्षणाकडे कोणी लक्ष देत नसे.

परंतु कुंभाराचे घर त्याला अपवाद होते. रामहरी म्हणाला, की वडिलांना कोठली डिग्री नव्हती, पण आयुष्याच्या शाळेत ते खूप काही शिकले होते. त्यांच्या मुलांनी शिकून मोठे व्हावे असे त्यांना वाटत असे. त्यासाठी ते स्वत: कष्ट करून पै-पै वाचवत. तो पैसा आमच्या शिक्षणासाठी खर्च करत व आम्हाला सतत प्रोत्साहन देत. शाळेतील आमच्या शिक्षकांकडून, आम्हा दोन्ही मुलांच्या अभ्यासातील प्रगतीविषयी जाणून घेत. वेळप्रसंगी धोपटूनही काढत आम्हाला! रामहरीने त्याला उपमा फार छान दिली. मडके बनवताना कुंभार कसा आतून एका हाताचा आधार देतो व वरून त्या मातीला आकार देण्यासाठी मारतो. अगदी तसेच, वडील आमच्या बाबतींत करत होते! घरातून मिळालेले चांगले संस्कार हे शिक्षणामागचे महत्त्वाचे कारण आहे असे रामहरीने आदराने नमुद केले.

म्हैसगावचे मल्लिकार्जुन मंदिर


सोलापूरच्‍या माढा तालुक्‍यातील म्‍हैसगावात मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे. ते अंदाजे दोन हजार वर्षे जुने आहे. त्याचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पोचण्यासाठी दोन-तीन पायऱ्या उतरून जावे लागते. तेथे पूर्ण अंधार आहे - टॉर्च घेतल्याशिवाय जाता येत नाही, गाभाऱ्यात भलेमोठे दगडी शिवलिंग आहे.

मंदिराची देखभाल, पूजा ‘वास्ते’ या परिवारातील लोक करतात. मंदिराशेजारी असलेल्या एका घरात वास्ते परिवारातील लोक राहतात. त्यास मठ असे म्हणतात, सध्या तेथे सुशिला मच्छिंद्र वास्ते या एकट्याच राहतात (सिनियर सिटिझन). त्यांची ही तेविसावी पिढी आहे.

हा मल्लिकार्जुन मठ आहे. तेथेही मल्लिकार्जुन यांचा पितळी मुखवटा, एका गाभाऱ्याप्रमाणेच जागेत ठेवलेला आहे. गाभाऱ्याबाहेर/ खोलीबाहेर कुंड आहे. त्या कुंडात दर पौर्णिमेला होम करतात.

मल्लिकार्जुन मुखवट्याची पालखी वर्षातून तीन वेळा निघते. एक महाशिवरात्रीला, दुसरी कार्तिकी द्वादशीला व तिसरी दसऱ्याला.

त्याच मठात आत्मचैतन्य महाराजांचा फोटो आहे. त्यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. आत्मचैतन्य महाराज असताना, सुशिलाबाईंच्या नातवाला त्या गादीवर बसवले गेले. तेव्हा तो दोन वर्षांचा होता. त्याचे नाव ह.भ.प. श्रावणमहाराज असे आहे. तो सहावीत शिकत आहे. आळंदी येथे आत्मचैतन्य महाराजांचा म्हणून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. तीन दिवस त्यानिमित्ताने कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम असतात. त्यासाठी मठाबाहेरील मोकळ्या जागेत मंडप घातला जातो.

म्हैसगावचा सॅक्सोफोन वादक – कालिदास कांबळे


कालिदास हा मूळचा म्हैसगावचाच. त्याचे शिक्षण दहावी पास झाले आहे – तेही म्हैसगावातील शाळेतच. कालिदास म्हणाला, की म्हैसगावात बरीच कलाकार मंडळी आहेत. कालिदासच्या बालपणी म्हैसगावचा बँड होता आणि कालिदासचे वडील शिवाजी कांबळे हे त्या बँडमध्ये ट्रम्पेट वाजवत. ते गावातील बँडव्यतिरिक्त कुर्डुवाडीजवळील आरपीएफ येथेही ट्रम्पेट वाजवायला जात. शिवाय, त्यांची घरची शेती होती. घरची शेती कालिदासच्या बालपणापासूनच, त्याच्या कानावर हे संगीत/वाद्यसंगीत पडत होते. म्हैसगावातील सूर्यभान खारे काका पेटी वाजवतात, ते पेटीवादनाच्या कार्यक्रमाला जाताना, लहान कालिदासला, त्यांच्या बरोबर नेऊ लागले. लहानग्या कालिदासची बोटे की बोर्डवर फिरू लागली. तो वडिलांकडून ट्रम्पेटही वाजवण्यास शिकला.

त्याने दहावी झाल्यानंतर वादक म्हणून व्यवसाय करण्याचे ठरवले. कालिदासने की बोर्ड, ट्रम्पेट यांच्या जोडीला ‘बाजा’ वाजवण्यास सरुवात केली. कालिदासची बँडमध्ये वाद्ये वाजवून कमाई होऊ लागली.

कालिदासला 2001 साली, पुण्याच्या इंडियन एअरफोर्स बँडमध्ये, की बोर्ड, ट्रम्पेट वादकाची नोकरी मिळाली. सकाळी परेड असायची तेव्हा या बँडपथकाला वादनाचे काम असे. त्यानंतर रात्री, मोठ्या अधिकाऱ्यांच्या डिनर पार्ट्या असायच्या, त्यावेळी बँडपथकात वादनाचे काम असे. ती नोकरी कालिदासने 2003 सालापर्यंत केली. ती नोकरी सोडून तो म्हैसगावला परत गेला. पुण्यातील तीन वर्षांच्या काळात, कालिदासने त्यावेळचे पोलिस सबइन्स्पेक्टर यासिन खान, जे. पठाण यांचे सॅक्सोयफोन वादन एकले होते. त्याला त्या वाद्याची ओढ तयार झाली. यासिन खान त्यावेळी बडोद्याला राहत होते – नोकरीनिमित्त. म्हणून 2004 साली कालिदास बडोद्याला गेला व यासिन खान यांच्याकडेच राहून – गुरुकुल पद्धतीने - सॅक्सोफोन वाजवण्यास शिकू लागला. तो दोन वर्षे बडोद्यात होता.