तुरटीचा ‘श्री गणेश’ !

3
43
रमेश खेर
रमेश खेर

गेली काही वर्षे आपल्याकडे गणेशोत्सवाची चाहूल लागली की हा उत्सव प्रदूषणविरहित व कोलाहलमुक्त होण्याची कशी गरज आहे, याची चर्चा सुरू होते. या चर्चेत रहदारीस अडथळा आणणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या देखावे-मंडपांच्या आकारमानापासून तेथे दिवसरात्र वाजणा-या कर्कश्श, कंठाळी संगीतापर्यंत आणि आगमन-विसर्जन मिरवणुकांत गुलालासारख्या अनारोग्यकारक वस्तूंच्या होणा-या अतिवापरापासून गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे होणा-या पाण्याच्या प्रदूषणापर्यंत अनेक मुद्यांचा अंतर्भाव असतो.

गणेश मूर्ती तयार करण्यासाठी विविध रंग व रसायने वापरली जातात. मूर्ती प्रामुख्या्ने ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’पासून तयार केल्या जातात. त्यांच्या विसर्जनानंतर रसायने विरघळल्यामुळे विहिरी, तलाव व नद्यांचे पाणी खराब होते. तो धोका टाळण्यासाठी काही उपाययोजना झाल्याही आहेत. घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन त्या त्या घरातल्या बादली वा टबमध्ये करून ते पाणी दुस-या दिवशी झाडांना घालण्याचा पायंडा काही मंडळी अनुसरताना दिसतात. मात्र त्यामुळे सार्वजनिक विहिरी, तलाव व नद्यांचे पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाण कितपत घटते हा प्रश्नच आहे.

घातक रंग आणि रसायनांपासून तयार केलेल्या मूर्ती पाण्यात सर्रास विसर्जीत केल्या जातातगणेश विसर्जनामुळे होणा-या पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न पुण्यातील रमेश खेर यांनाही भेडसावत होता. याकरता ते इको फ्रेंडली गणपती म्हणून शाडूच्या मातीच्या गणेशाची स्थापना घरी करू लागले. मात्र तो गणपती पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही, असे खेर यांच्या ध्यानात आले. त्यानंतर त्यांनी शाडूच्या मूर्तीच्याच जागी इतर कोणत्या प्रकारच्या मूर्ती वापरता येऊ शकतील याची चाचपणी सुरू केली. याप्रकारे गुळाच्या अथवा साखरेच्या गणपतीचा त्यांनी विचार केला. मात्र त्या दोन्ही गोष्टी टिकाऊ नाहीत. तसेच, गणपती पावसाळ्यात येत असल्यामुळे त्या पदार्थांना सुटणारे पाणी आणि त्यांच्याकडे आकर्षित होणारे मुंग्यांसारखे किटक असे प्रश्न उद्भवतात. गणपती तयार करण्यासाठी ‘मटेरिअल’चा विचार करत असतानाच त्यांच्या डोळ्यांसमोर ‘तुरटी’ हे नाव आले. तुरटीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. तुरटी ही पाणी शुद्ध करण्यासाठी तसेच अॅण्टिसेप्टिक म्हणूनही वापरली जाते. तुरटी दिसायला थोडीफार संगमरवरासारखी असल्याने त्यात घडवलेले गणपती चांगलेही दिसतील, अशा एकत्रित विचाराने त्यांनी तुरटीचा गणपती घरी बसवण्याचे ठरवले. अर्थात अशी मूर्ती मिळणार कोठे आणि बनवणार कोण, हा प्रश्न होताच. ती अडचण दूर केली ती विवेक कांबळे या शिल्पकाराने.

शिल्पकार विवेक कांबळेविवेक कांबळे यांना रमेश खेर यांच्या कल्पनेचे महत्‍त्‍व पटल्याने त्यांनी या उपक्रमात त्यांना सोबत करण्याचे ठरवले. त्यांनी खेर यांना तुरटीच्या दगडापासून पाच-सहा गणपती तयार करून दिले आहेत. ते म्हणतात, की तुरटीचा गणपती हा शंभर टक्के इको फ्रेंडली आहे. तो पाण्यात पूर्णपणे विरघळतो. त्यामुळे पाणी शुद्ध होण्‍यास मदत मिळते. आम्ही या गणपतीसाठी वापरलेले रंग हे ‘खाण्याचे रंग’ आहेत. त्यामुळे या मूर्तीच्या विसर्जनानंतर कोणतेही प्रदूषण होत नाही. तुरटीचा दगड हा वरवर कठीण वाटला तरी तो ठिसूळ असतो. त्यात गणेशमूर्ती घडवणे हे संगमरवरी कलाकृती तयार करण्याइतके नाजूक कलाकुसरीचे काम आहे. तुरटीच्या दगडाला एकजीवपणा नसतो. त्यामुळे या दगडावर एका ठिकाणी केलेल्या कोरीव कामामुळे अनेकदा दुस-या ठिकाणचा टवका उडतो. म्‍हणून तुरटीचा गणपती घडवताना खूप काळजी घ्यावी लागते.
2009 सालापासून खेर स्वतःच्या घरी तुरटीचा गणपती पूजतात. रमेश खेर म्हणतात, की मी आता बाहत्त‍र वर्षांचा आहे. गेली पन्नास-पंचावन्न, वर्षे मी शाडूच्या मातीच्या मूर्तीची स्थापना करत होतो. मात्र आता मी दरवर्षी तुरटीच्या गणेशाची स्थापना करतो.
 

विवेक कांबळे यांनी घडवलेला तुरटीचा गणपतीखेर पुढे सांगतात, की अनेक ठिकाणी सोन्या -चांदीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्या मूर्ती किमती असतात. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी एका भांड्यात पाणी घेऊन त्या‍त ती मूर्ती बुडवली जाते आणि पुढील वर्षी तीच मूर्ती पुन्हा वापरली जाते. मीदेखील माझ्याकडचा तुरटीचा गणपती कायमचा विसर्जित करण्या‍ऐवजी त्याप्रकारे बादलीत बुडवून काढतो. त्यामुळे बाजारात विकल्या जाणा-या गणपतीची मागणी मी एका संख्येने कमी करतो, घरी विसर्जन केल्यामुळे बाहेरच्या गर्दीतील पाच-सहा माणसे कमी करतो आणि सगळ्यात महत्वाचे म्‍हणजे विसर्जनासाठी येण्या-जाण्यात आणि खुद्द विसर्जनात होणा-या प्रदूषणाची पातळी एका संख्येने कमी करतो.

विवेक कांबळे यांनी अल्प खर्चात तुरटीचा श्रीगणेश आकारास आणला! सात इंच उंचीच्या आणि पाच इंच रूंदीच्या या गणपतीचे वजन दोन ते सव्वादोन किलोपर्यंत आहे. आणि तो गणपती तयार करण्यासाठी खर्च येतो केवळ पंधराशे रूपये.

दरवर्षी पुण्या –मुंबईतून परदेशात हजारोंच्या संख्येने गणपती निर्यात केले जातात. त्या प्रत्येक मूर्तीची किंमत सुमारे पाच हजारांपर्यंत असते. मात्र परदेशात पर्यावरणासंबंधी कायदे कडक असल्यामुळे त्या मूर्तींचे विसर्जन करताना मनात भीती असते. जर तुरटीचे गणपती परदेशात निर्यात होऊ लागले तर त्या गणपतींना प्रत्येकी सात हजार रूपयांपर्यंत किंमत देण्यास लोक तयार होतील, असा विश्वास रमेश खेर यांना वाटतो. खेर यांनी 2010 साली तुरटीच्या गणपतीचे पेटंट मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.
 

रमेश खेर,
कला-वसंत, 808,
भांडारकर रोड, पुणे – 4110004.
फोन – 020 5659226
ई मेल – anjukher@yahoo.com

प्रदीप दीक्षित, pradeep@csf.org.in

Last Updated On – 9th September 2016
 

About Post Author

3 COMMENTS

  1. खूपच सुंदर कल्पना आहे
    खूपच सुंदर कल्पना आहे

Comments are closed.