अभिवाचनातला आनंद

5
24

डॉ. प्रिया जामकरजशी मुलं टिव्‍हीसमोर बसून जेवतात तसं आम्ही एकीकडे पुस्तकात डोकं खूपसून जेवायचो. गोष्टीच्या विश्वात रमण्याची ती सुरुवात होती. वाचत असताना शब्द ‘दिसणं’ आणि ‘ऐकू’ येणं हेसुध्दा नकळत घडलं. उदाहरणार्थ बालकवींच्या ‘औदुंबर’ कवितेमधे रंगीबेरंगी चित्र दडलेलं आहे हे कोणी सांगण्याची, शिकवण्याची गरज नव्हती. पाठ्यपुस्‍तकात एक कविता होती, ‘घड्याळबाबा भिंतीवर बसतात, दिवसभर टिक टिक करतात.’ त्‍यातल्या ‘टिकटिक’ ह्या शब्दातील टिकटिक कानाला ऐकू यायची! म्हणजे शब्द दिसतात, ऐकू येतात, थोडक्यात ते मृत नसतात, हे उमजत गेलं. आमच्या गावात वाघमारेसर नावाचे उत्साही गृहस्थ होते. ते साने गुरूजी कथामाला चालवत. त्यामधे मी जायचे. ते तिथं मला गोष्टीचं जाहीर वाचन करायला लावत. ही मुलगी स्पष्ट वाचते, तर सांगू हिला, असा त्यांचा दृष्टिकोन असावा. मला मजा यायची आणि मी वाचायचे. मग ते शाळेतही सुरू झालं. गोडी वाढली.

‘अभिवाचन’ का केलं जातं? या प्रश्नाचं खरं उत्तर हे आहे. मजा येते म्हणून, राहवत नाही म्हणून!! कारण त्यामधे अपार आनंद दडलेला आहे.

कमल देसाईनंतर ‘कथा’ या फॉर्मचा अभ्यास पी.एच.डी.च्या निमित्तानं झाला आणि कथेतील गंमत कळू लागली. पात्रं, त्यांचे स्वभाव, संवाद, त्यातील चढउतार, भावनिक कढ, निवेदक, निवेदकाची जागा-त्याचा ‘टोन’, म्हणजे निवेदकाचा टोन वेगळा आणि पात्रांचा वेगळा यातले बारकावे जसे कळू लागले तशी आणखी मजा येऊ लागली. पण अभिवाचनातला खरा ‘मजा’ किंवा ‘कैफ’च म्हणा ना, कळला तो कमल देसाई यांच्या कथांमुळे! कमलताईंच्या कथा मी त्यांनाच वाचून दाखवायचे, त्या ते वाचन तन्मयतेनं, जणू ती कथा त्यांनी लिहिलेली नसून दुस-याच कोणीतरी लिहिलेली आहे अशा थाटात ऐकत. त्यांच्या ‘माणसाची गोष्ट’ या कथेचं निमित्त झालं. इथं मला एक गोष्ट सांगायला हवी, की मी प्रसिध्द नृत्यांगना शमा भाटे यांच्याकडे कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेत होते. शमाताईंनी लय, ताल यांचे संस्कार तर केलेच, पण त्यांच्यामुळे उत्तम संगीत कानावर पडलं. कमलताईंची ‘माणसाची गोष्ट’ वाचत असताना त्‍या संस्‍कारांचा खूप उपयोग झाला. ‘माणसाची गोष्‍ट’ या कथेमधे सुंदर, अर्थपूर्ण ‘गॅप्स’ आहेत. संगीतामधे, कथ्थक नृत्यातील ‘ठा ठ’ मधे जशा दोन मात्रांच्या, दोन बीट्समधे मोकळ्या जागा असतात तशा, किंवा त्या जातकुळीतील जागा मला त्‍या कथेत जाणवल्या. आणि मग ती कथा वाचण्याचा मला नादच लागला. ही कथा मी ज्या लोकांसमोर वाचत असे ते लोक ती कथा ऐकत. पण मला वाटतं, की ती कथा आपण एकाचवेळी वाचतोही आहोत आणि समोर बसून ऐकतोही आहोत. हा अनुभव परत परत घ्यावा असं वाटू लागलं.

अभिवाचनाच्या बाबत एक असंही समजलं जातं, की अभिवाचन हे काही ठरावीक साहित्यकृतींचं केलं जातं. ज्यात नाट्य असावं, संवाद असावा, असं काही. म्हणजे, जाहीर वाचन करावं अशा साहित्यकृती आणि एकट्यानं, आपल्याशीच वाचाव्यात अशा साहित्यकृती अशी एक सरळ सरळ विभागणी केली जाते. पण ती विभागणी मला अलिकडे फारशी पटत नाही. माझा पूर्वीही हा समज असावा. पण माझ्या समजाला पहिला छेद दिला तो विजय तेंडुलकर यांच्या वाचनानं! अतुल पेठे यांनी एकदा विजय तेंडुलकर यांचे, त्यांना आवडलेले असे वाचन ठेवले होते. आणि तेंडुलकरांनी श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे ‘घंटीवाला’ वाचले. श्रीनिवास कुलकर्णी हे माझे आवडते लेखक! कधीही, कुठल्याही वेळेला ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ पुस्तकांच्या रॅक मधून काढावं आणि त्यात घुसावं. तेंडुलकरांनी जेव्हा त्यांच्या शांत, धीम्या, गंभीर आवाजात ‘घंटीवाला’ असं म्हटलं, तेव्हा मी हरखून जाण्याऐवजी अस्वस्थ झाले. छे! छे! हे जाहीरपणे कसं ऐकायचं बुवा.. असं वाटलं मला. पण तेंडुलकरांच्या पहिल्याच ओळीबरोबर मी ‘आत’ शिरले, स्वतःशी वाचत असताना येते तशी किंवा वेगळीच पण मी त्यावेळी तन्मयता अनुभवली! एखादा संवेदनासमृध्द कलात्मक अनुभव हा वेगवेगळ्या वाटांनी येत असावा, आपण मोकळ्या मनानं त्याला सामोरं जायला हवं हे मला तेंडुलकरांच्या वाचनानं शिकवलं.

एस.एन.डी.टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालय पुणे येथील मराठी विभागाकडून गांधीजयंतीनिमित्त् अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमात संहितावाचन करताना प्रिया जामकरअभिवाचन हा ‘परफॉर्मन्स’ आहे का? याचं उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असं दोन्ही आहे. अभिवाचन या शब्दात ‘वाचिक अभिनय’ अपेक्षित आहे. आवाजातील चढउतार, तप्तता, मृदुता, सर्व छटा येणं अपेक्षित असतं. नुसतं ‘वाचन’ आणि ‘अभिवाचन’ यामधे फरक आहे. त्यामधील सीमारेषा धूसर आहेत, पण त्या आहेत! त्या दिवशी तेंडुलकरांनी जे वाचले ते किंवा कमलताईंनी एकदा मला त्यांचीच ‘अंधारयज्ञ’ कथा वाचून दाखवली होती, किंवा द.भि.कुलकर्णी यांनी एकदा पु.शि.रेगे यांची ‘सावित्री’ ही कादंबरी संपूर्ण वाचली होती… त्‍या तिघांचंही वाचन मी तन्मयतेनं ऐकू शकले, कारण त्यामधे अशा प्रकारच्या वाचनामधे हवी असणारी तन्मयता होती. जी वाचिक अभिनयापेक्षाही महत्‍त्‍वाची आहे.

मी माझ्यापुरतं सांगायचं झालं तर अभिवाचनाकडे ‘परफॉर्मन्स’ म्हणून पाहते. मला ते आवडतं किंवा ती माझी भूक आहे. त्या विशिष्ट कथाविश्वात शिरण्याचा, त्या विशिष्ट पात्रामधे उतरण्याचा जो अनुभव असतो, तो थरारक असतो. मला तो घ्‍यायला, पुन्हा पुन्हा अनुभवायला आवडतं, जिवाला बरं वाटतं. मला वाटतं, की माझ्यातल्या अभिनेत्रीला ते प्रांगण विनासायास मिळालं आहे. आवडलेली कथा घ्यावी, चार ऐकणारे समोर असावेत की झालं! आपण जेव्हा स्वतःशी वाचतो तेव्हा जसे निखळ एकटे असतो, तसे आपण अभिवाचनाच्या वेळी अर्थातच नसतो. एक आभासी विश्व कुणाच्यातरी साक्षीनं आपण प्रत्यक्ष करू पाहात असतो, आपण एकटेच त्या पात्रामधे उतरणार असतो, फक्त ते कुणाच्यातरी साक्षीनं घडणार असतं.

प्राध्यापक या नात्याने मी जेव्हा माझ्या विद्यार्थिनींना साहित्य शिकवते तेव्हा कधी कधी पध्दती-मेथड म्हणून वाचन करते. ते परिणामकारक ठरतं असा माझा अनुभव आहे. उदाहरणार्थ कथेची संरचना समजावी म्हणून उदयप्रकाशांची ‘तिरीछ’ किंवा कधी कधी कथेमधे वातावरण हा घटक नायकाची भूमिका कशी करतो यासाठी शंकर पाटलांची ’वळीव’ ही कथा, अरविंद गोखले यांची ‘कातरवेळ’, ग्रामीण इरसाल नमुन्यांसाठी माडगुळकरांच्या कथा, असं काही वर्गात मुलींसमोर वाचलं जातं. अपेक्षित परिणाम होतोच, शिवाय त्यांना वाचनाची गोडी लागण्याची शक्यताही निर्माण होते. आपण आपलं बालपण आठवलं तर लगेच कळेल, की आजी जी गोष्ट सांगायची त्यातून किती भरभरून मिळत असे… कधीही न संपणारी कापूसकोंड्याची गोष्ट आली कशातून? अखंड गोष्ट ऐकत राहण्याच्या ओढीतूनच ना? गोष्ट ऐकणं ही जशी सहजप्रवृत्ती आहे, तशीच कोणाची तरी गोष्ट वाचून दाखवणं ही सहज(च) प्रवृत्ती असते. ज्यामधे त्या व्यक्तीलाही सुख गवसतं आणि म्हणून इतरांनाही. आणि मग ज्यात सुख आहे ते करावंच की माणसानं…!

डॉ. प्रिया जामकर
मराठी विभागप्रमुख, एसएनडीटी पुणे,
२३ बी, आनंदवन हेरिटेज,
आनंदनगर, सिंहगड रोड,
हिंगणे खुर्द, पुणे – ५१
९४२३२२४३७५
priyajamkar16@gmail.com

About Post Author

5 COMMENTS

  1. ‘ तन्मयता ‘ हा अभिवाचनाचा
    ‘ तन्मयता ‘ हा अभिवाचनाचा प्राण असणे — हे महत्त्वाचे लिहिले आहे !

  2. Khup sunder lekh . Madam
    Khup sunder lekh . Madam abhivachan yaver mala tumchashi bolayala aawadel.

  3. उत्कृष्ट सादरीकरण आणि मांडणी.
    उत्कृष्ट सादरीकरण आणि मांडणी…

  4. खूप छान, उद्बोधक माहिती…
    खूप छान, उद्बोधक माहिती
    धन्यवाद.
    सुभाष मराठे .६ फेब्रुवारी २०१९

Comments are closed.