जय जवान! (Jai Jawan)


   ‘मिंट’ या अर्थविषयक दैनिकाच्‍या ‘लाउंज’ या साप्‍ताहिक आवृत्‍तीत पत्रकार-समाजचिंतक आकार पटेल लेखन करतात. भारतीय जवानांबद्दल त्‍यांनी नुकतेच काही लेखन केले. लालबहादूर शास्त्री यांची ‘जय जवान’ ही घोषणा वर वर उदात्त वाटली तरी आतून कशी दांभिक आहे हे पटेल यांचे लेखन वाचल्यानंतर ध्यानात येते. यामध्‍ये त्‍यांनी काही ऐतिहासीक संदर्भ देत आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. त्‍यांचे या विषयावरील लेखन नक्‍कीच विचारप्रवृत्‍त करणारे आहे.

     ‘मिंट’ नावाचे अर्थविषयक दैनिक ‘हिंदुस्थान टाइम्स’ ग्रूपतर्फे प्रकाशित होते. त्यांची शनिवारी ‘लाउंज’ नावाची साप्ताहिक आवृत्ती असते. त्यामध्ये विचारप्रवर्तक काही स्तंभलेखन प्रसिध्द होते. त्यात आकार पटेल नावाचे पत्रकार व समाजचिंतक फारच बहारीचे लेखन करतात. वेगळे विषय, सखोल अभ्यास, मार्मिक निरीक्षणे आणि वस्तुनिष्ठ विचारपध्दत यांमुळे त्यांचे लेखन वाचनवेधक ठरते.

 

     त्यांनी 9 जुलै 2011 च्या अंकात भारतीय लष्करातील जवानांच्या निमित्ताने लिहिले आहे. लालबहादूर शास्त्री यांची ‘जय जवान’ ही घोषणा वर वर उदात्त वाटली तरी आतून कशी दांभिक आहे हे पटेल यांचे लेखन वाचल्यानंतर ध्यानात येते.

 

      त्यांनी इसवी सनपूर्व 450 पासून भारतीय सैनिक कसकसे आणि कोठे कोठे लढले याचा आढावा घेतला आहे. त्या संबंधातले वेगवेगळे उल्लेख वाचताना भारतीय जवान इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कोठे कोठे जाऊन पोचले आणि लढले हे पाहून अचंबित व्हायला होते. आकार पटेल यांनी ‘मेगॅस्थेनिस’ या प्रवाशाचे इतिहासप्रसिध्द वाक्य उदधृत केले आहे. आपण ते कौतुकाने मिरवत असतो. ते वाक्य असे, की ‘भारताने दुसर्‍या राष्ट्रावर कधीही आक्रमण केले नाही!’ पटेल त्यापुढे जाऊन मेगॅस्थेनिसच्या वाक्याचा उत्तरार्ध उदधृत करतात, ‘कारण भारताचे सैनिक भाडोत्री असत! आणि पर्शियन सेनाधिकार्‍यांनी आक्रमण करण्यासाठी बोलावले, की भारतीय सैनिक धावून जात’. अशा तर्‍हेने भारतीय जवान तुर्की, अफगाण, मोगल, मराठा, शीख, फ्रेंच, पर्शियन, डच, पोर्तुगीझ आणि ब्रिटिश या सर्वांच्या विरुध्द लढले आहेत, परंतु कोणीतरी वेतन आणि रसद दिली म्हणून.

 

     पटेल पुढे नमूद करतात, राजपूत रेजिमेंट चढाई करताना घोषणा देतात, की ‘बोलो बजरंग बली की जय’. त्‍यांची स्थापना 1778 मध्ये झाली आहे.

 

     याप्रमाणे वेगवेगळ्या रेजिमेंट, त्यांच्या घोषणा आणि त्यांचे स्थापनावर्ष बघा हं....

 

1. पंजाब रेजिमेंट, ‘बोले सो निहाल सत् श्री अकाल’, 1761

 

2. मद्रास कॅव्हलरी आणि मद्रास रेजिमेंट, ‘वीर मद्रासी आदी कोल्लू, आदी कोल्लू, आदी कोल्लू’, 1776

 

3. मराठा लाइट इन्फंट्री ,‘बोल, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, 1768

 

4. डोग्रा रेजिमेंट, ‘ज्वाला माता की जय’, 1877

 

5. गोरखा रायफल्स, ‘अयो गोरखाली’, 1824

 

6. जाट रेजिमेंट, ‘जाट बलवान, जय भगवान’, 1795

 

7. शीख रेजिमेंट, 1846. मध्ये उभी राहिली आणि

 

8. कुमाऊ रेजिमेंट, ‘कालिका माता की जय’, 1887

 

9. महार रेजिमेंट, ‘बोलो हिंदुस्थान की जय’. या महार रेजिमेंटने ब्रिटिशांच्या वतीने दुसर्‍या बाजीरावाच्या मराठा सैन्याचा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 रोजी पाडाव केला.

 

     पटेल प्रश्न असा उपस्थित करतात, की फक्त ‘अस्पृश्य’ महारांना देशभक्तीपर घोषणा का? याचे उत्तर त्यांनीच दिले आहे. लढाऊ जातींच्या सिध्दांतानुसार ही रेजिमेंण्ट रद्दबातल करण्यात आली आणि स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावामुळे तिची पुनर्निर्मिती झाली. गंमत अशी, की दुसर्‍या कोणत्याही रेजिमेंटच्या मनामध्ये लढाई करताना भारत देश नसतोच!

 

     भारतीय जवान पहिल्या महायुध्दात एक लाख चौर्‍याहत्तर हजार इतक्या संख्येने तर दुसर्‍या महायुध्दात सत्त्याऐंशी हजार इतक्या संख्येने मारले गेले. त्यांनीही नाझी आणि फॅसिस्ट सैन्यांशीच मुकाबला केला आणि त्यात ते बळी गेले. परंतु, त्यांची नोंद झाली नाही, कारण ते कोणासाठी तरी लढले; स्वत:च्या देशासाठी नव्हे.

 

     आकार पटेल लेखाचा शेवट काहीशा उपरोधाने करतात. ते म्हणतात, की उद्या संयुक्त राष्ट्र संघाने सैन्य उभे करायचे ठरवले आणि पगार डॉलर्समध्ये असेल तर तिथे पहिली धाव भारतीय व पाकिस्तानी जवान घेतील आणि त्या नोकर्‍या पटकावतील. कारण ते शूरवीर असतातच; त्यांची ख्याती शिस्तप्रिय म्हणून आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते निष्ठावान असतात. पण त्यांनी त्या नोकर्‍या घेण्यात गैर काय आहे? कारण आपल्याकडचे सारे बुध्दिवंत संधी मिळताच परदेशात जाऊन चाकरी करत आहेतच ना? आपले देशप्रेम फक्त वानखेडे स्टेडियमवर ऊतू जाते. जवानांना ते कारगील आणि सियाचेन येथे व्यक्त करावे लागते! आपण आपली देशभक्तीची जबाबदारी उदात्त घोषणा देऊन, त्यांच्यावर ढकलून मोकळे होतो!

(संकलित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.