तिबेटमध्ये मराठी माणूस!


     सॅन होजेचे रवी आपटे सध्या विशेष खुषीत आहेत, कारण त्यांनी त्यांचे तिबेटमध्ये भ्रमंती करण्याचे स्वप्न गेल्या वर्षी पूर्ण केले! ते चांगले आठ दिवस तिबेटच्या तिन्ही भागांत फिरले, तेथील लोकांशी बोलले, बाराशे डॉलर खर्च करून व्हॉंयोलिनसारखे तिबेटी लोकांचे पारंपरिक वाद्य मुलासाठी घेऊन आले.

अमेरिकेच्या आपट्यांचा अनुभव

     सॅन होजेचे रवी आपटे सध्या विशेष खुषीत आहेत, कारण त्यांनी त्यांचे तिबेटमध्ये भ्रमंती करण्याचे स्वप्न गेल्या वर्षी पूर्ण केले! ते चांगले आठ दिवस तिबेटच्या तिन्ही भागांत फिरले, तेथील लोकांशी बोलले, बाराशे डॉलर खर्च करून व्हॉंयोलिनसारखे तिबेटी लोकांचे पारंपरिक वाद्य मुलासाठी घेऊन आले.

     त्यांनी व त्यांच्या पत्‍नी सुषमा यांनी अलिकडेच महाराष्ट्राची सफर केली. ते त्यांच्या व त्यांच्या पत्‍नीच्या मुंबई-पुणे गावांत विसावले, पण त्यांनी कोकण-कोल्हापूर-नरसोबाची वाडी-जेजुरी अशी एक सहल करून मंदिरे-देवस्थाने पाहिली आणि तृप्त झाले.

     आपटे पती-पत्‍नी व त्यांचे मित्र दांपत्य अशा चौघांनी अमेरिकेतून निघून बीजिंगमार्गे तिबेटमध्ये प्रवेश मिळवला. तिबेट उंचावर असल्याने रवी आपटे यांच्या सहप्रवाशांना श्वसनाचा त्रास झाला, परंतु आपटे यांना स्वत:ला तो जाणवला नाही.

     ते म्हणाले, की तिबेटवर चीनचे पूर्ण नियंत्रण आहे. आम्ही अमेरिकन नागरिक असल्याने तेथे मोकळेपणाने वावरू-फिरू शकलो, बंधन कोणतेच जाणवले नाही, परंतु अधिकार्‍यांची नजर आमच्यावर, एकूणच परदेशी पर्यटकांवर सतत असावी असे जाणवत असे. आम्ही चीनच्या बाजूने भारतीय सीमेच्या वीस किलोमीटर इतके जवळ आलो होतो. तिबेटमध्ये भारतीय सीमेपर्यंत रस्तेबांधणी व अन्य विकासकामे जोरात चाललेली जाणवतात, खुद्द ल्हासापर्यंत रेल्वे येते. त्यामधून चिनी लोकांचे लोंढे येतात व सर्व तर्‍हेचा चिनी माल तिबेटमध्ये उतरत असतो.

     आपटे यांना भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब वाटली; विशेषत: भारताने दलाईलामांना आश्रय दिलेला असल्याने चीन भारतावर डाफरूनच राहणार असे आपटे म्हणाले.

     आपटे यांचे मूळ घर सातार्‍याचे, पण ते म्हणण्यापुरते! ते म्हणाले, की माझ्या वडिलांचा जन्म तिथला, इतकेच. वडील पुढे चॅरिटी कमिशनर झाल्यामुळे त्यांच्या बदल्या होत. माझा जन्म मुंबईत झाला. मी हाजीअलीला गव्हर्नमेंट कॉलनीत वाढलो. आर्यन शाळेत गेलो. एलफिन्स्टनमध्ये एक वर्ष काढले. मुंबई आयआयटीत गेलो व तेथून अमेरिकेत मिसुरी येथे जाऊन पदव्युत्तर शिक्षण आणि डलसला चिप डिझाइनमध्ये पीएच.डी.!लगेच ह्युलिट- पॅकार्डमध्ये उत्तम नोकरी. तेथून निवृत्ती घेतल्यावरही, त्यांचे एका चिनी मालकाबरोबर ‘आयसी चिप’मध्ये काम चालू आहे, पण अधिक भर आयुष्यातील बाकी स्वप्ने पूर्ण करण्यावर आहे.

     आपटे म्हणाले, की चीनने जगातील सर्वात उंच ट्रेन तिबेटमध्ये बांधल्याचे वाचल्यापासून तिथे जाण्याची इच्छा होती. आम्ही जाताना ल्हासात विमानाने उतरलो व तेथून परतलो ते त्या ट्रेनने! ल्हासामध्ये छोटा विमानतळ आहे. आमचे पन्नास सीट्सचे विमान ल्हासाच्या एअरपोर्टवर एकुलते एकच दिसले. विमानतळ ब्रह्मपुत्रा नदीच्या अगदी शेजारी आहे. उतरल्या-उतरल्याच हिंदू धर्मातल्या एका पवित्र नदीचे दर्शन घडल्याच्या कल्पनेने आम्हा सर्वांना मजा वाटली. शिवाय ब्रह्मपुत्रेचा कैलास-हिमालयाशी गहिरा संबंध!

     तिबेटमध्ये जाण्यासाठी चिनी सरकारचे ‘स्पेशन परमिट’ काढावे लागते. तेथे ठिकठिकाणी सैनिक दिसतात, ल्हासाच्या मध्यवर्ती जागेत प्रत्येक दोनशे फुटांवर चौकी दिसते व तिची राखण मशीनगनधारी चार सैनिक करत असतात.

     ल्हासात तिबेटी खूप कमी दिसतात. सर्वत्र चिनी असतात, त्यांच्याच हाती अर्थव्यवहाराच्या व अन्य नाड्या आहेत हे जाणवते. तिबेटी लोक गरीब बिचारे वाटतात; आपल्याला भारतात दिसतात, तसेच.

     बौद्ध मंदिरे व मठ मात्र सर्वत्र दिसतात आणि ते तिबेटी लोकांनी व्यापलेले असतात. पर्यटक युरोपमधून जास्त आलेले दिसतात, मात्र त्यांना उंचावरील पदभ्रमणात अधिक रस असतो.

     तिबेटींचे दोन पंथ आहेत: एक रेड हॅट व दुसरा यलो हॅट. दलाई लामांचा मठ भव्य व झकास आहे. तिबेटी लोक तीन बुद्ध मानतात. त्यांपैकी दोन बसलेल्या पुतळ्यांतून दाखवले जातात. तिसरा भविष्यकालीन बुद्ध. त्याचा पुतळा खुर्चीवर बसलेला असतो. तेथील वेगवेगळ्या स्थानांची व बुद्धांची नावे संस्कृतोद्भव आहेत हे लगेच जाणवते – उदाहरणार्थ करुणेचा बुद्ध, दयेचा बुद्ध. चिनी गाइडच्या तोडून येणारी अपभ्रष्ट शब्द रूपे प्रथम कळत नाहीत, पण नंतर त्यांचे संस्कृत मूळ कळते व अर्थ उलगडत जातात.

     ल्हासाची वस्ती पाच लाख आहे. तिथे याकचे दूध-लोणी-मटण मिळते.

     तिबेटमध्ये तीन तलाव महत्त्वाचे मानतात. त्यात मान सरोवराचा समावेश आहे. ते हिंदू धर्मीयांचे पवित्र स्थान असल्याने तेथपर्यंत भारतातून जाता येते. तिबेटच्या पश्चिम भागात पंचेन लामा राहतात. ते असतात संन्यासी, पण आयुष्य उपभोगणारे – मजा करणारे! आपटे यांना पूर्व भागात एका तिबेटी साधूच्या गुहेत जाता आले ते त्यांच्या पत्नीच्या हातात असलेल्या फोल्डिंग छत्रीमुळे. ती छत्री एका तरुण शिष्याला आवडली. आपटे म्हणाले, की आम्ही ती अमेरिकेतून आणली असली तरी ती असणार चिनी बनावटीची. परंतु त्या छ्त्रीच्या ओढीने (त्याला वाटले की ती अमेरिकेत किंवा भारतात तयार झालेली आहे) तो शिष्य या चौघांना गुहेत घेऊन गेला. त्याने आतील अभ्यासाची जागा, गुरूची प्रवचनाची जागा असा सर्व भाग दाखवला, झारीतून तीर्थ प्यायला दिले. तो शिष्य अठरा वर्षे त्याच गुरूबरोबर शिकत आहे. तिबेटी लोकांना भारतीयांबद्दल आदर व कौतुक आहे हे आपटे यांना तिथेही जाणवले.

     तिबेटचे मध्यवर्ती, पश्चिम व पूर्व हे भाग विस्तृत आहेत. रस्त्यावरील प्रवासाला पाच ते आठ तास लागतात. पण तिथे सर्वच रस्त्यांची व अन्य सोयींची कामे चालू आहेत.

     आपटे म्हणाले, की एका मठात एक तिबेटी गिटार वाजवत होता. माझा मुलगा अमेरिकेत म्युझिक फिल्डमध्ये असतो. त्याच्यासाठी तसे गिटार मिळवताना बरीच यातायात करावी लागली. पक्की माहिती कुठेच मिळाली नाही. भारतासारखीच ही अवस्था! अखेरीस, योगायोगाने एक चिनी पत्रकाराने दिलेल्या माहितीवरून एक गिटार विकत मिळू शकले. मुलगा अमेरिकेत त्यावरील सूर जुळवण्याच्या प्रयत्नात सध्या आहे.

     आपटे परत येताना पांडा अस्वलांच्या प्रदेशात गेले. अस्वलांची ही जात नामशेष होणार असे आपटे यांना वाटले होते. त्यामुळे त्यांना औत्सुक्य होते, परंतु पांडांची संख्या वाढवण्याचे, तेथे चालू असलेले प्रयत्न पाहून आपटे थक्क झाले. हाच प्रांत चिनी शेजवान अन्नपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.

     रवी आपटे यांना अमेरिकेत फार झकास छंद आहे. ते तो गेली बारा वर्षे जोपासत आहेत. आपटे अमेरिकेत ऑन लाइन मराठी पुस्तके विकतात व ग्रंथालय चालवतात. हा सारा व्यवहार संगणकाच्या माध्यमातून होतो. त्यांना पुण्याच्या सुनीता देसाई पुस्तके पुरवतात. ते म्हणाले, की अमेरिकेत मराठी वाचणारे सारे माझ्या वयाचे लोक आहेत. तिशीतला एखादा तरुण वाचणारा मिळाला तर! त्यामुळे पुल. खांडेकर अशीच पुस्तके जास्त विकली जातात. क्वचित कोणी अभ्यासक खास पुस्तके मागवतो व ती मिळवून त्याला पुरवण्यात आनंद होतो.

     आपटे यांनी अलिकडचा एक प्रसंग सांगितला. "एका महिलेला आनंदीबाई जोशींचे जुने चरित्र हवे होते. ते इतिहास संशोधक मंडळाकडून मिळवून त्यांना देताना मला व सुनीता देसाईना अपार आनंद झाला.

     आपटे स्वत: वाचक असल्याने त्यांना या आनंदाची लज्जत कळते.

- प्रतिनिधी
आपटे यांचा ईमेल पत्ता - <ravi.rasik.apte@gmail.com>

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.