साने गुरूजींना प्रेरणा कोठून मिळाली?


     ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबसाइटने ‘सानेगुरुजी डॉट नेट’ नावाची वेबसाइट सुरू केली आहे. त्या निमित्ताने साने गुरुजींच्या काही आठवणी संकलित करून मांडत आहेत गीता हरवंदे.

-गीता हरवंदे

  • ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबसाइटने ‘सानेगुरुजी डॉट नेट’ नावाची वेबसाइट सुरू केली आहे. त्या निमित्ताने साने गुरुजींच्या काही आठवणी संकलित करून मांडत आहेत गीता हरवंदे.
  • साने गुरुजींच्या वाड्मयनिर्मितीचे बीज त्यांच्या कॉलेजजीवनातील एका प्रसंगात दिसते, ते असे.
  • गुरूजी 1918 ते 1922 पर्यंत न्यू पूना कॉलेजमध्ये (सर परशुरामभाऊ कॉलेज) होते. कादंबरीकार हरी नारायण आपटे त्या वेळी पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्यांनी पुण्यातील साक्षर आणि निरक्षर लोकांची खानेसुमारी करण्याची योजना काढली होती. त्यांना स्वयंसेवकांची गरज होती. तेव्हा गुरुजींनी आणि त्यांच्या मित्राने- रामने आपली नावे स्वयंसेवक म्हणून नोंदवली. त्या दोघा मित्रांना मंडईच्या पाठीमागच्या बाजूची शंभर घरे मोजणीसाठी दिलेली होती. त्या कामातून गुरुजींना अज्ञान, दारिद्र्य, रुढी, मानवी स्वभाव यांचे सामाजिक दर्शन घडले.
  • नगरपालिकेतर्फे सर्व स्वयंसेवकांना न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अल्पोपहार देण्यात आला. त्यावेळी हरिभाऊ आपटे यांनी भाषण केले. ते म्हणाले, की “नुसते शाब्दिक आभार मानून काय उपयोग? ‘बोलाचीच कढी, बोलाचाचि भात! जेवूनिया तृप्त कोण झाला?’ असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. ते लक्षात घेऊन आणि तुम्हा मुलांचा स्वभाव लक्षात घेऊन थोडे च्याऊम्याऊ ठेवले आहे. तुटून पडा आणि मोठे झालात म्हणजे आपल्या देशातील अपरंपार अज्ञानावरही असेच तुटून पडा.”

हरीभाऊंच्या शेवटच्या वाक्याने गुरुजींचे हृदय हलले आणि त्यांनी समाजसेवेचा वसा उचलला. भावनाशील वृत्ती हा त्यांचा स्थायिभाव होता आणि तितकीच भावओली लेखणी हे त्यांचे हत्यार होते. गुरूजींची ही भावगंगा जोपर्यंत जगात ‘आई’ हे नाते आहे तोपर्यंत वाहत राहणार आहे. कारण गुरूजींनी मानवजातीचा एकच धर्म सांगितला आहे, तो म्हणजे ‘प्रेम’. सार्‍या गोष्टींपाठी प्रेम आहे, पण निर्मळ नि नि:स्वार्थी प्रेम फक्त ‘आई’ या नात्यात आहे आणि ते आईचे नाते म्हणजे साने गुरूजी. ते म्हणतात, गुरूजींच्या सार्‍या जीवनाकडे आणि वाडमयाकडे पहिल्यास ते जिथे तिथे आढळते. खरा तो एकची धर्म I जगाला प्रेम अर्पावे II

गुलाबफुलाचा जन्मोत्सव

  • निसर्गावर-सृष्टीवर पुत्रवत प्रेम करावे हे म्हणणे आणि तसे करणे हे फक्त साने गुरूजी करू शकतात.

     गुरुजींची छात्रालयाची इमारत व तिच्या आजुबाजूचा परिसर रुक्ष, ओसाड होता. तिथे साप-विंचवांची वस्ती होती. म्हणून मुले त्याला ‘अंदमान’ म्हणत असत. गुरुजींनी या अंदमानाचे आनंदभुवन करण्याचे ठरवले. ओसाडीत बगीचा फुलवण्याची योजना आखली. सुट्ट्यांच्या दिवशी काही मित्रांसमवेत फुलझाडे लावली. गुरुजी तर रात्री विहिरीवरून पाणी आणून गुलाबाच्या रोपट्याला घालत. गुलाबाला कळी आली. काही दिवसांतच कळीचे गुलाबफूल झाले, त्या रात्री गुरुजींनी मुलांसोबत बगीच्यात बसून गुलाबाच्या फुलाचा जन्मोत्सव साजरा केला. रोपट्याला रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांनी सजवले. फुलांच्या माळांनी आजुबाजू नटवली. गाणी म्हटली, बासरी वाजवली.

प्रेमाचा प्रत्यय

     कवी सोपानदेव चौधरी खानदेशात एका खेडेगावातील रस्त्याने चालले होते. समोरून साने गुरुजी मान खाली घालून येत होते. खेड्यातील काही बायका त्या रस्त्यावरून डोक्यावर ओझे घेऊन चालल्या होत्या. त्यांतील एका स्त्रीने गुरुजींना पाहिल्याबरोबर आपल्या डोक्यावरील बोजा चटकन खाली ठेवला, गुरुजींच्या तोंडावरून प्रेमादराने हात फिरवला, आपल्या कानावर बोटे मोडली; नि शुभ चिंतले. त्या स्त्रीला आपल्या मनातील भावना व्यक्त्त करण्याची उत्स्फूर्त उर्मी आली, कारण समोरचे (साने गुरुजींचे) तितकेच निर्मळ प्रेम तिच्या प्रत्ययाला आलेले असणार!

संभाषणातील संकोच

     माजी काँग्रेस आमदार कै. शरयू ठाकूर यांनी त्यांचे सासरे दादोबा ठाकूर आणि पती गोविंद ठाकूर या पितापुत्रांच्या आठवणी पुस्तकरूपात संकलित केल्या आहेत. त्यामध्ये साने गुरुजींबाबतचा एक प्रसंग नमूद आहे. तो त्यांच्या कॉलेजजीवनाच्या काळातला आहे. त्या व त्यांच्या भगिनी लेखिका वसुमती धुरू स्वातंत्र्यसंग्रामाच्या वातावरणाने भारल्या गेल्या होत्या. तशात ‘साधना’ साप्ताहिक सुरू झाले व त्या साप्ताहिकाचा त्यांच्यावर फार प्रभाव पडला. त्या साने गुरूजींकडे आकर्षल्या गेल्या. आपणही साप्ताहिकासाठी काही काम करावे असे वाटून त्या दोघी बहिणी साने गुरूजींकडे गेल्या.

     साने गुरूजी फार संकोची. त्यांना मुलींशी तर अजिबात बोलता येत नसे. ठाकूर-धुरू त्यांना भेटल्या व ‘काही काम द्या’ असे म्हणाल्यावर साने गुरुजी लाजून चूर झाले. त्यांना काही बोलताच येईनासे झाले. त्यांनी कसेबसे शब्द उच्चारत त्या दोघींना भाऊसाहेब नेवाळकर यांच्याकडे पाठवले. नेवाळकरांनी दोघींना काम दिले.

     शरयू ठाकूर लिहितात की व्यक्त्तिगत संभाषणात संकोचाने मुका होणारा हा माणूस जाहीर सभेत मात्र खणखणीत बोलत असे आणि त्यांची वाणी रसवंती असल्यासारखी स्निग्धतेने श्रोत्यांवर बरसत असे. त्यामुळे साने गुरुजींच्या प्रेमात आणखीनच पडणे होई.

संदर्भ :‘अमृतपुत्र साने गुरुजी’ लेखक राजा मंगळवेढेकर

दिनांक - 31.05.2011

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.