सारेच अविवेकी


सारेगमप

सारेच अविवेकी

- विदुर महाजन

‘लिटिल चॅम्पस्’ ही मुले म्हणजे मराठी भाषिक माणसांचे हिरो झालेले आहेत! आपल्या मुलांचे भविष्य त्यांच्यासारखे व्हावे असे वाटणारे लाखो पालक असणार आहेत.

टीव्हीवरील ‘सारेगमप’ ह्या कार्यक्रमातून लहान मुलांना दिली जाणारी संधी आणि त्या कार्यक्रमाचे स्वरूप, त्याला दिले जाणारे अवास्तव महत्त्व, हे सगळे पाहताना, ऐकताना, अनुभवताना कुठेतरी काहीतरी चुकतेय असे, कदाचित माझ्याप्रमाणे अनेकांच्या मनात येत असेल; पण कार्यक्रमाची लोकप्रियता एवढी प्रचंड आहे, की आपण त्याविषयी वाईट काहीतरी बोलणे,  टीका करणे म्हणजे आपल्याकडेच समाज विचित्र नजरेने पाहील अशी भीती सर्वत्र असावी. या जाणिवेपोटी कदाचित कुणी त्याविषयी टीकात्मक बोलण्यास धजावत नसेल. खासगी संभाषणांमध्ये या विशिष्ट मुलांबद्दल कौतुक असले व सर्वांना कार्यक्रमाचे सादरीकरण आकर्षक वाटत असले तरी कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी कठोर चिकित्सा मी सतत ऐकली आहे.

विदुर महाजनत्यामुळे या कार्यक्रमाविषयी जे वाटते ते व्यक्त करणे ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाची आहे. हा कार्यक्रम अजिबात पाहवत नाही, ऐकवत नाही अशी माझी भावना आहे. त्यामुळे मी तो पाहात नाही. अर्थात ही टिप्पणी लिहिण्याइतपत मी तो पाहिलेला आहे.

सर्वप्रथम मुद्दा येतो तो सगळ्याच मालिकांप्रमाणे पल्लवी जोशीच्या मराठी बोलण्याचा. ती एकही वाक्य शुध्द मराठीत बोललेली मी ऐकलेले नाही. तिचे मराठी ऐकवत नाही.

कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून काम करणारे जे आहेत, ते ‘ब’ दर्जाचे कलाकार आहेत. त्यांचे संगीताला मूलभूत स्वरूपाचे फार मोठे योगदान मुळीच नाही; शास्त्रीय ढंगात तर नाहीच पण सुगम संगीतातही नाही. ते सर्व लोकप्रिय आहेत हे सत्य. ही मंडळी कुठल्याशा एखाद्या रिमिक्स गाण्यामुळे किंवा एखाद्या गाण्यामुळे ‘एका रात्रीत’च्या चालीवर ‘एका गाण्यात’ प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेली आहेत.

मुले ही लहान असतात. आई-वडील आणि जवळची नातलग मंडळी यांना त्यांचे कौतुक असावे. गणेशोत्सवासारख्या उपक्रमांत, सोसायटी-कॉलनीतल्या कार्यक्रमांतून त्यांना वाव मिळावा, हे सारे त्यांच्या कलागुणांना वाव देणारे निश्चित आहे. त्यातून हळुहळू, वयाबरोबर घडत जाणारे कलाकार पुढच्या आयुष्यात काहीतरी भरीव काम करणारे निघू शकतात.

या क्षेत्रातही घराणेशाहीच्या बाहेर जी नवी मंडळी पुढे आली, त्यांनी प्रयत्न, रियाज, कष्ट, चिकाटी, संधीचा शोध आणि प्रतिभा या सगळ्या मार्गांनी जाऊनच यश मिळवले आहे.

जे यश प्रतिकूलतेच्या मार्गाने जाऊन मिळते ते शाश्वत असते असेही काही वेळा वाटते. लायकीपेक्षा खूप जास्त प्रसिद्धी मिळालेले अनेक जण तात्पुरत्या लोकप्रियतेनंतर कुणाच्या स्मरणातही राहत नाहीत. अशी उदाहरणे कितीतरी देता येतील. या वर्षीच्या दहावीच्या निकालासारखे; नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवणा-या प्रत्येकाला आपण किती हुशार असे वाटून, स्वत:च्या क्षमतेविषयी भलत्या कल्पना निर्माण होऊन पुढे अकरावीत अनेक जण मागे पडतील, तेव्हाच ह्या मार्कांचा फोलपणा स्पष्ट होईल.

जी गाणी लिटिल चॅम्पस् गातात ती बरीचशी प्रतिभावंत संगीतकारांची, कवींची एकेकाळची लोकप्रिय गाणी असतात. चाळीशी आणि त्या पुढचे जे लोक आहेत, त्यांनी ही ‘ओरिजिनल गाणी’ ऐकलेली आहेत. ते नकळतपणे त्या दर्ज्याशी तुलना करणार आणि मग ते गाणे दहा वर्षांच्या चिमुरड्या(डी)च्या तोंडून ऐकताना त्यांना ते मुळात भिडणार नाही, पण त्या लहानग्याचे कौतुक वाटणार. यात कोठले आले आहे संगीत संवर्धन?

ज्यांना पूर्वीची ही गाणी माहीत नाहीत अशा नव्या पिढीस पुरेशी शब्दसाधना, स्वरसाधना, जीवनानुभव नसलेल्या so-called little champs च्या तोंडची गाणी ऐकून ते त्याचं कौतुक करणार. ह्यात ‘दर्जा’ हा विचार येतच नाही. मग जे प्रथम दर्जाचे नाही तेही लोकप्रिय होते याचे भान न राहता, या मुलांचे कौतुक होते. यात कला, नवनिर्मिती, मुलांची क्षमता यांसारखा विचार नाहीच.

आपण सगळे एक विनोदी प्रसंग ह्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मूर्खासारखे पाहत असतो. तो म्हणजे गाणे सुरू झाले रे झाले, की कवायत सुरू झाल्याप्रमाणे उपस्थित श्रोत्यांनी हात हलवणे आणि डोलणे! यात मला ‘फासिझम’चा भास होतो... ‘मिडिओक्रसी’चा फासिझम! हा त्यांच्यावरचा संगीताचा उत्स्फूर्त परिणाम नसतोच; सगळे जण ‘आपण असे करायचे’ म्हणून करत असतात.

जगातले सारे संगीत, मग ते कोणत्याही प्रकारचे असो- त्यात सात सूर आहेत (विकृत रूपे धरून बारा श्रुती बावीस वगैरे असले तरी). या पलीकडे सप्तक संपते. ह्याला भौतिकशास्त्राचाही आधार आहे. २+२=४ इतके ते स्पष्ट, शास्त्रीय आहे. असे असताना ह्या सगळ्या ‘लिटिल चॅंम्पस्’च्या गाण्यांच्या सीडीला आठवा स्वर असे संबोधणे हा तर उद्दामपणा व मूर्खपणा यांचा कळस आहे.

वाद्यवृंद, लाईटिंग, पोशाख, पद्धतशीर शिक्षण देऊन करायला लावलेले त्यामुळे कृत्रिम वाटणारे हातवारे आणि केवळ कानांनी ऐकणे आणि मनाला भिडणे असे न राहता, सादरीकरणाचा हा सगळा प्रकार आपल्याला ख-या संगीतानंदापासून लांब नेतो.

सगळे आयुष्यभर स्वरसाधना करूनही वयाच्या नव्वदाव्या वर्षी ‘कुछ सुरीला पन लाने की कोशिश कर रहा हू!’ म्हणणारे बिस्मिला खाँ ह्यांना ‘स्वर’ कसा दिसला व भावला असेल?

किंवा सुगम संगीतातल्या-जे प्रामुख्याने शब्दसंगीत आहे, ज्यात शब्द+स्वर एकत्र येतात त्यातल्या -ज्येष्ठ गायकाला शब्दाचा भावार्थ आणि स्वरार्थ जीवनानुभवातून किती खोलवर जाणवत असेल आणि त्यातून निर्माण होणारे भावगीत किती परिणाम करत असेल हा नुसता विचार करायला लावणे, नव्याने कलासाधना करणा-याला महत्त्वाचे नाही का?

‘जीनियस’ युगातून एखादा निर्माण होतो. ‘कलाकार’ लाखात एखादा असतो. तोही  वयाने कधीतरी लहान असतो, पण 'कलाकार' घडायचा असेल तर त्याच्यासमोर योग्य मूल्ये, दर्जा या गोष्टी समाजानेच ठेवल्या पाहिजेत. टीव्हीसारख्या प्रभावी माध्यमाच्या साहाय्याने ‘चांगले ते लोकप्रिय’ करता येत असताना आजचा समाज मात्र ‘लोकप्रिय ते चांगले’ असा समज पसरवत चालला आहे.

यात खरे चांगले टिकणार कसे? नव्याने निर्माण होणार कसे?

स्पर्धकांना मार्क देताना सुद्धा ‘म’, ‘प’, वरचा ‘सा’ अशा स्वरांचा उल्लेख करणे ह्याचा स्वरसाधना करणा-या कुठल्याही साधकाला किती त्रास होत असेल असा विचारही कुणाच्या मनात  येत नाही?

लहान मुलांच्या कलागुणांना वाव जरूर  द्यावा, त्यांना प्रोत्साहित करावे; पण त्यांना चांगल्याचे भानही द्यायला हवे. अभिजात म्हणजे काय याची जाणीव द्यायला हवी. असे ‘लेक्चर’ प्रत्येक परीक्षक प्रत्येक कार्यक्रमात देतही असतो, पण संगीताचा व्यवसाय करणारी ही मंडळी तशी व्यवस्था कशी निर्माण होऊ शकेल हे बोलत नाही; कृती दूरच!

कला हे व्रत आहे. कलाकार होणे ही साधना आहे. कला हे मानवी जीवन – आपल्याबरोबर इतरांचेही सुंदर करणारे माध्यम आहे. हे संस्कार मुलांवर झाले तर ख-या अर्थाने त्यांच्यातील क्षमता अधिक चांगल्या दर्जाने/प्रकारे बाहेर येईल. ह्या मुलांमध्ये ती क्षमता आहे – पण प्रतिभावान कलाकार होण्यासाठी क्षमता असलेल्या एखाद्या चिमुरड्याल्या ‘लिट्स चॅम्पस्’चे बोन्साय करण्याचा हा प्रकार अविवेकी आहे.

पैसा, प्रसिद्धी आणि यश ह्या गोष्टी योग्य मार्गाने, योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी मिळाव्यात असे वाटते.

- विदुर महाजन

भ्रमणध्वनी : 9822559775

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.