ध्येयासक्तदांपत्य – नंदिनी-सुधीर थत्ते


समाजात काही व्यक्ति अशा असतात की त्या विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील रहातात. समाज आणि देश अशाच काही मोजक्या व्यक्तींवर पुढे जातो. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे थत्ते दांपत्य – नंदिनी आणि सुधीर थत्ते. सुधीर हा विज्ञानातील पदण्युत्तर शिक्षण घेतलेला त्यांत उच्च पदवी म्हणजे पीएच.डी घेतलेला एक वरिष्ठ वैज्ञानिक असून, मुंबईतल्या प्रसिद्ध भाभा अणुसंशोधन केंद्रात बहुशाखीय प्रकल्पात कार्यरत आहे तर त्याची धर्मपत्नी-अर्धांगी नंदिनी, पदवी प्राप्त गृहिणी आहे. समाज कार्याची ओढ असणारे हे दांपत्य असून याच समाज कार्यातून त्यांची ओळख-देख झाली, त्यांतून प्रेमाचे बीज रोवले गेले आणि त्याचे रुपांतर लग्न गाठीत झाले. आपण ज्या समाजात वाढलो, ज्या मातीत खेळलो-बागडलो त्या मातीचे व समाजाचे ऋण फेडणे आपले परमकर्तव्य आहे याच भावनेतून त्यांचं (एकत्र) सहजीवन सुरु झाले ते आजतागायत अहर्निश सुरु आहे. हे दांपत्य म्हणजे (Made for each other)  मेड फॉर इच अदर या तत्वाने बांधले गेले आणि हेत तत्व त्यांनी ‘नोबेल नगरीतील नवल स्वप्ने.’ ही पुस्तक मालिका लिहीतांना स्वीकारले, ते आजतागायत हे पुस्तक कथेच्या रूपातून नोबेल पारितोषिक प्राप्त संशोधन आणि त्या संशोधनाचे मानकरी म्हणजेच संशोधक यांची ओळख सामान्य वाचकांना करुन देणारे गोष्टीरुप पुस्तक म्हणजेच “ नोबेल नगरीतील नवल स्वप्ने ” या कथा केवळ वाचकांनाच भावल्या किंवा विद्यार्थांना आवडल्या असे नव्हे तर प्रत्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ ज्यांच्या संशोधनावर व ज्यांच्यावर या कथेचे कथा बीज अवलंबून आहे खुद्द त्या संशोधकांनाही भावाल्या यांतच या पुस्तकाचे यश दडले आहे.

1996 पासून या पुस्तकाचे लेखन प्रकाशन सुरु झाले, 25 डिसेंबर 2009 ला या कथारुप पुस्तक मालिकेतले चौदावे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केले. एवढे असामान्य कार्य करीत असलेल्या दांपत्याची ओळख आमच्या वाचकांना करुन द्यावी या साठी मी, नंदिनी-सुधीर च्या घरी गेलो. पूर्वीची ओळख होतीच, शिवाय त्यांच्या बरोबर ‘कणाद’च्या कार्यात कर्तव्य यात्रेत गाडी बरोबर नळ्याची यात्रा भूमिका बजावत असल्याने, आम्हाला एकमेकांची ओळख करुन-घेण्याची किंवा देण्याची गरज नव्हती. या वेबसाईटसाठी तुमची मुलाखत हवीय म्हटल्यावर त्यांनी कोणतेच आढेवेढे घेतले नाहीत.

कथारूपातून हे नोबेल संशोधन कां द्यावेसे वाटले आणि अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीचे संशोधन कथा रुपातून सादर कसे करता त्यावेळी दोघांनाही आळीपाळीने, तू-तू; मी-मी न करता जी माहिती सांगितली ती मी शब्दबद्ध करतोय. माहिती सांगताना सुद्धा कुठे अडथळा नाही – अगदी स्वच्छ चित्र त्यांनी उभे केले.

साधारणपणे आँक्टोबरच्या दुस-या आठवड्यापासून नोबेल पारितोषिकांची घोषणा व्हायला सुरुवात होते. ती घोषणा झाल्यानंतर, त्या संशोधनाची व संशोधकाची सखोल माहिती- मग ते भौतिक असो, रसायनशास्त्र असो की वैद्यकशास्त्र, ती सगळी इत्थंभूत माहिती सुधीर गोळा करणार. वाच-वाचून त्याचं चर्वण तो करणार, त्यांचा अर्थ माहित करणार, त्यांच्यावर मनन-चिंतन करणार. सोप्या भाषेत ती माहिती तो नंदिनीला सांगणार. पहिल्या सांगण्यांतून नंदिनीला ती माहिती कळली तर उत्तमच अन्यथा, त्या संपूर्ण माहितीचे आकलन होईपर्यंत ते समजेल या स्थितीला येईपर्यंत ती सुधीरला अनेक प्रश्न विचारेल. त्या प्रश्नांच्या उत्तरातून तिचे समाधान होईल तेव्हांच तिची प्रश्नांची सरबत्ती संपेल आणि नंतरच त्या अवघड कार्यातून सुधीरची मुक्तता होईल. सुधीरकडून माहितीचा चेंडू नंदिनीच्या कोर्टात गेल्यानंतर सुधीरचे कार्यक्षेत्र संपले. पुढचे कार्य नंदिनीचे मिळालेली शास्त्रीय माहिती, मग नंदिनी आपल्या कल्पकतेने, शब्द गुच्छात गुंफणार, तो शब्दगुच्छ मग कथारुपात साकारणार, हे लिहीतांनाच माझा शब्दसाठा संपला असे मला वाटतेय. नंदिनीला तर कथेत गोवायचे होते. त्या शब्दांना महत्वाचे म्हणजे कथाबीजातील थोडाही अर्थ बदलू नये याची तिला काळजी घ्यावी लागायची. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी नवीन कथा तिला जन्माला घालायची असते. उपलब्ध कथेत कथाबीज/कथासूत्र बसवायचे नव्हते. बरे कालावधी किती कमी जेमतेम दोन महिने या काळात नवीन कथा सुचणे त्या कथेत ते कथाबीज चपखल बसवणे खरे तर तारेवरची कसरत परंतु नंदिनी त्यांत इतकी तरबेज झालेली आहे की वाचकांना पुढे अनेक वर्षे नवनवीन कथा वाचायला मिळतील असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे अवघड माहिती सोपी करुन सांगणारा सुधीर आणि त्या वैज्ञानिक माहितीला कथेचे कोंदण देणारी नंदिनी दोघेही खरोखरच अजब मेंदूचे वल्ली म्हणावे लागतील. माहिती गोळा करण्यापासून वाचनीय मनोरंजक कथेत रुपांतरीत होई पर्यंतच्या कालखंडाला सुधीर-नंदिनी ने फलित अँड्या पासून मोहक फुलपाखरु यांत रुपांतरीत होण्याचीजी प्रक्रिया आहे. त्यांच्याशी तुलना केली आहे. नोबेल पारितोषिक साहित्य, म्हणजे अंडी, त्याचे वाचन करुन ते सोपे सुटसुटीत करणे म्हणजे अळी किंवा स्थिती, आणखी सोपे, कथारुपात बसवण्यासाठी शब्द रचना-स्थित्यंतर म्हणजे कोषावस्था आणि सहजसुदर शब्दात साकारणारी कथा म्हणजे मोहक –रंगीबेरंगी उडणारे फुलपाखरु. कल्पनाच अप्रतिम आहे. म्हणून म्हणतो कधी कधी मला वाटते की त्यांच्या मेंदूतील जीवरसायनाचे विश्लेषण करुन पहावे म्हणजे कळेल की त्यांचा मेंदू एवढा तल्लख कां?

इतक्या संस्कारातून बाहेर पडलेले पुस्तक वाचनीय, मनोरंजक न झाले तरच नवल, ही सारीच पुस्तके इतकी प्रसिद्ध झाली की समाजातील प्रत्येक घटकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांना तर ते आवडलेच परंतू शिक्षकांनी ही त्याची उपयुक्तता विषद केली भरपूर कौतुक केले, व्यवसायाने इंजिनियर असलेल्या वाचकाने पत्र लिहून लेखकद्वयाची स्तुती केली. राज्य सरकारचे उत्कृष्ठ वाड्गमाचे पारितोषिक तीन वेळा सलग प्राप्त झाले. या पेक्षा जास्त वेळा देत येत नाही याचा खेदहि परीक्षा मंडळाने व्यक्त केला अन्यथा दरवर्षी त्यांना पारितोषिक हमखास मिळाले असते. स्वत: नोबेल पारितोषिक विजेते जॉन वॉकर आणि पॉलनर्स यांनी त्यांचे अभिनंदन केले. जॉन वॉकर तर म्हणाले, आमच्या संशोधनास अस्सल महाराष्ट्रीय उपमा, कथारूप देण्यांत झाले. पॉल नर्स यांनी तर “ माझे संशोधन तात्काळ मराठीत उपलब्ध करुन दिल्याबद्दल नंदिनी-सुधीरचे अभिनंदन” पॉल नर्स 2002 साली भारतात आले होते, 2001 चे त्यांना वैद्यकातले नोबेल पारितोषीक मिळाले होते. एवढ्या लवकर माझे संशोधन मराठीत उपलब्ध करुन दिल्या बद्दल लेखकांचे कौतूक त्यांनी केले.  एवढेच नव्हे तर आश्चर्य व्यक्त केले.

वर्लमान पत्रांनी या कार्याची दखल घेतली. टाइम्स ऑफ इंडिया, एशियन एज, फ्री प्रेस जर्नल, या सारख्या इंग्रजी दैनिकांनी, तर औटलूक सारख्या नियतकालिकाने त्यांच्या कार्याचे कौतूक केले. दूरदर्शनने मुलाखत घेतली. केवळ देशातील वर्तमान पत्रांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असे नव्हे तर भारताबाहेरुन डॅग ब्लॅगेट हा स्वीडीश प्रतिनिधी, खास भारतात आला आणि त्याने नंदिनी-सुधीरची मुलाखत घेतली ऑफिशियल गेटवे या स्वीडनच्या वर्तमानपत्रातून त्यांच्यावर एक विशेष लेख प्रसिद्ध केला. आपल्या कडील काही वर्तमानपत्रांनी तर आवडलेले काही परिच्छेद जशास तसे प्रसिद्ध केले. एखादे कार्य मनापासून केल्या नंतर त्याचे फलित काय होते ते आपल्या समोर आहे.

वास्तव आयुष्यात नंदिनी, सुधीरची अर्धांगी आहे. त्याच स्वरुपाची भूमिका नंदिनी-नोबेल नगरीची... पुस्तकाच्या लेखनाच्या बाबतीत स्वीकरली, पार पाडली. असेच म्हणावे लागेल. केवळ कथा आवडतात आणि त्याच स्वरुपात त्या सुरुवातीच्या काही पुस्तकात केवळ कथाच प्रसिद्ध करण्यांत आल्या परंतु वाचकांच्या अपेक्षा वाढल्या मग त्यांनी काही सूचना केल्या. त्या योग्य वाटल्या म्हणून लेखक व प्रकाशकांनी ‘नोबेल नगरीतील नवलस्वप्ने’मध्ये नवीन माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला. कथा सोबत, टीपा देणे सुरु झाले. शास्त्रज्ञांची माहिती द्यायला सुरुवात केली. कोणीतरी सुचवलेकी रंगीत चित्रे टाका, त्या प्रमाणे कार्यवाही करण्यांत आली. आणि आता प्रसिद्ध होणा-या पुस्तकांतून त्यांचा समावेष करण्यांत आला. ग्रंथाली दरवर्षी त्यांच्या वाचक दिनी म्हणजेच 25 डिसेंबरला या पुस्तकाचे प्रकाशन करते त्यामुळे लेखकांबरोबरच ग्रंथालीचाही हा उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा आहे यांत तीळमात्र शंका नाही.

‘नोबेल नगरीतील नवलस्वप्ने’ हे कथारुप पुस्तक लिहून प्रकाशित करायला त्यांनी सुरुवात केली ते 1996 पासून परंतु या दोघांचाहि पहिला लेख प्रसिद्ध झाला. तो त्यांच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या कार्याला खरीगती मिळाली ती, ‘कणाद विज्ञान प्रतिष्ठान’ ही संस्था स्थापन केल्यापासून संस्था पंजीकृत झाली ती 80 च्या दशकात परंतु त्यापूर्वी पाच वर्षे ते लेखन करत होते. ग्रामीण भागातील जी वृत्तपत्रे आहेत, खास करुन जिल्हा ठिकाणाहून प्रसिद्ध होणा-या वर्तमानपत्रांना ते विज्ञान लेखन पाठवायचे, काही वर्तमानपत्रे ते लेख छापायचे, ‘कणाद’च्या लेखकांना काही वर्तमानपत्रे श्रेय द्यायची, कधी नाही. तरीही नाऊमेद होता ते लेखन पाठवायचे, नंतर नंतर ती वर्तमानपत्रे लेख छापायची परंतु श्रेय नाही, मोबदला नाही. अशा स्थितीत मग त्यांना लेख पाठवणे अशक्य झाले आणि काही काळ नंतर हा उपक्रम बंद पडला आपल्या कडील वर्तमानपत्रे मोफत साहित्य प्रसारीत करण्यात पटाईत आहेत. मोबदला तर सोडाच परंतु लेखकांची नाव ही तळटीप मध्ये ते देत नाहीत हे पुन्हा एकदा पटल्या नंतर ग्रामीण भागातील वर्तमानपत्रांना मोफत साहित्य पाठवणे त्यांनी खंडीत केले.

विज्ञान प्रसार झाला पाहिजे, समाजोन्नतीत आपला हातभार असला पाहिजे म्हणून मग कणाद ने मोफत कार्यशाळा सुरु केली ती NTS म्हणजे नॅशनल टॅलेंट सायन्सला बसणा-या विद्यार्थ्यांसाठी त्याला नांव देण्यात आले. रविवार शाळा स्वत: सुधीर NTS शिष्यवृत्ती धारक आहे. ही कार्यशाळा जवळजवळ दोन वर्षे रूईया महाविद्यालयात घेण्यात आली. त्या नंतर ती बंद करण्यांत आली कारण, चालना देण्याचा हेतू सफल झाला होता आणि कमर्शिअल क्लासेस सुरु झाले होते. मात्र NTS मार्गदर्शन बंद नव्हते ते करस पॉ़डन्स पद्धतीने म्हणजे पोस्टाद्वारे सुरु झाले. ज्यांनी नांव नोंदणी केली अशा विद्यार्थ्यांना पोस्टद्वारे दर महिन्याला विशिष्ट साहित्य पाठवण्यांत यायचे. परीक्षा झाल्यावर, परीक्षेत पास झालेल्यांना एकत्र बोलऊन दोन दिवसाचे मुलाखत शिबिर घेतले जायचे.

सुधीर –नंदिनी ‘कणाद’ चा कणा होते, आहेत आणि राहतील महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक वर्षभर त्यांच्या विज्ञान पुरवणीत अऩोख्या स्वरुपाचे लेखन कणादच्या ‘टीमवर्क’ ने केले. त्यांत या दोघांचा मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा होता. दोघांच्याही डोक्यातून अफलातून अशा कल्पना निघायच्या त्यांतलीच एक कल्पना म्हणजे शालेय शिबीर मुलांच्या/विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबीर म्हणजे अफलातून जादूची कांडी होती. या शिबीरात सकाळी प्रवेश करणारा मुलागा/मुलगी, संध्याकाळी शिबीर संपल्यानंतर भाराऊन आणि आनंदी होऊन जायचा, वेडगळ दिसणारा, सुस्त यांतून काय मिळणार अशी मानसीक अवस्था घेऊन येणारा मुलगा/मुलगी चक्क विज्ञान गीत गुणगुणत परतायची अशी शिबीरे कणादने एक वर्षात अनेक ठिकाणी घेतली आणि प्रत्येक शाळा पुन्हा असा कार्यक्रम सादर करण्यासाठी, शिबीर घेण्यासाठी दुस-या वर्षीही निमंत्रीत करत असे. या शिबीराची संपूर्ण संकल्पना, सुधीर नंदिनी आणि शशिकांत धारणे यांची असायची शैक्षणिक मार्गदर्शनाचे शिबीर ही दुसरी संकल्पनाहि त्यांचीच. यां शिबीरात सकाळी प्रवेश केलेला मुलगा/मुलगी एक नवीन आशा, आकांक्षा यांनी प्रेरीत होऊन जायचा. नवीन काहींतरी गवसलं अशीच त्या सा-यांची धारणा असायची कारण व्यवसाय मार्गदर्शन मिळालेले असते. आकाशवाणीसाठी त्यांनी विपूल लेखन केले. नंदिनीने आकाशवाणी मुंबईसाठी ‘परिसर’ लेखन केले. ते श्रोत्यांना इतके भावले की – सुमारे 10-15 वर्षानंतर ते आजही अधून मधून पुन:प्रसारीत केले जाते. त्यांनी विज्ञान विभागासाठी विपूल लेखन केले. संगणकाच्या महाजालाविषयी सुधीरने लिहीलेले रुपक अत्यंत कल्पक आणि मनोरंजक होते. दूरदर्शनवर त्यांनी किलबील कार्यक्रमात नाटक, लोकनाट्य, संगीत नाटक असे प्रकार हाताळले. ते ही कार्यक्रम उत्कृष्ठ दर्जाचे होते. त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देऊन दूरदर्शनने गौरवले.

दिव्याचा विकास, दिवटी, पणती आणि दिवा या स्वरुपात जसा झाला तसे त्यांच्या लेखनाचे व्हावे अशी अपेक्षा नंदिनी-सुधीर व्यक्त करतात. त्यांचे लेखन नव्या माध्यमाशी नाते जोडण्याच्या प्रयत्नात आहे. अँनिमेशन, वेबसाइट हे नवीन प्रकार हाताळण्याचा आणि आपल्या मूर्तकल्पना सामान्य वाचक/श्रोता/प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. आपण त्यांना फक्त शुभेच्छा देऊ. बाकी ते आणि काल दोघे आपोआप कार्यरत होतात हा अनुभव आहे.

- किशोर कुलकर्णी

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.