बॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र

प्रतिनिधी 18/01/2010

कर्नाटक आणि आंध्र या प्रांतांमधे एकीकरणाच्या चळवळींनी आधीपासून जोर धरला होता. त्यामानाने महाराष्ट्रात एकीकरणाची चळवळ उशिरा सुरू झाली आणि धिम्या गतीने पुढे सरकत राहिली.

महाराष्ट्र एकीकरणाच्या चळवळीतली शिथिलता त्यावेळच्या ब-याच मंडळींना खटकत होती, पण त्यासाठी धडाडीने पुढे येण्याचा प्रयत्न विशेष असा कोणी केला नाही. फाजल अली कमिशनचा अहवाल प्रसिध्द झाल्यावर मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोम धरला. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीने 1955 नंतर लढ्याची तीव्रता वाढवली, ती आचार्य अत्रे यांच्यामुळे, पण ती पुढची गोष्ट.

महाराष्ट्र एकीकरण चळवळीतली शिथिलता व तिची धिमी गती यावर विचार करण्यासाठी 'ज्योत्स्ना' मासिकाने निवडक चाळीस पुढा-यांना आणि लेखकांना एक प्रश्नावली पाठवली, त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या सारांशावर आधारित अहवाल प्रकाशित केला. हा सगळा उद्योग 'ज्योत्स्ना' मासिकाचे कर्ते ग.वि.पटवर्धन यांच्या कल्पकतेतून घडून आला. ते वर्ष होते 1938 किंवा 1939! त्या अहवालानुसार महाराष्ट्र एकीकरणाच्या चळवळीत सर्वप्रथम महाविदर्भाच्या निर्मितीला प्राधान्य द्यावे असा सूर मध्य प्रांत-व-हाडतल्या अनेक नेत्यांनी काढला.

डॉ.ना.भा.खरे हे महात्मा गांधींच्या राजकरणाला बळी पडले आणि त्यांना मध्यप्रांताच्या मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा द्यावा लागला. त्यामुळे मध्यप्रांताच्या हिंदी भाषिक नेत्यांच्या वर्चस्वाखाली व-हाड प्रांतातल्या मराठी भाषिकांना राहवे लागले. त्यामुळे अर्थातच गोंधळात वाढ झाली. त्यातून सुटका होण्यासाठी व मराठी भाषिकांना न्याय मिळावा या उद्देशाने डॉ.ना.भा.खरे, अनसुयाबाई काळे, रामराव देशमुख, नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू तुकाराम जयराम केदार हे मध्यप्रांत-व-हाडातील मराठी भाषिक नेते एकत्र आले.

डॉ.ना.भा.खरे, तुकाराम केदार आदी नेत्यांना महाराष्ट्र एकीकरण चळवळीची पहिली पायरी म्हणून व-हाड-नागपूरच्या आठ जिल्ह्यांचा महाविदर्भ हा स्वतंत्र उपप्रांत निर्मितीसाठी चळवळ हाती घ्यावी असे वाटत होते. त्यातच खानदेश महाविदर्भाला जोडल्याशिवाय महाविदर्भ आपल्या पायावर उभा राहू शकणार नाही असे कुलगुरू केदार यांचे मत होते.

नागपूर-व-हाड प्रांताच्या एकीकरणाला आपला विरोध नसल्याचे न.चिं.केळकरांनी सांगितले, अर्थातच तो शुभशकून मानायला हवा! त्याच सुमारास बॅ.मु.रा.जयकर यांनी मुंबईचा समावेश महाराष्ट्रात करावा असा आग्रह धरला!

थोडक्यात, मुंबई महाराष्ट्रात आहे. ती महाराष्ट्रात राहवी यासाठी जे प्रचंड मोठे आंदोलन झाले, त्या आंदोलनाचे प्रणेते बॅ.मु.रा.जयकर हे आहेत.

महाराष्ट्र एकीकरणाच्या चळवळीत गरज निर्माण झाली होती ती महाराष्ट्राच्या कोकण, मुंबई, देश, विदर्भ, मराठवाडा या भागातल्या लोकांचा परस्परांशी संवाद व स्नेहबंध निर्माण होण्याची त्यासाठी या पाचही प्रांतांचा समावेश असणा-या एखाद्या संस्थेची गरज सर्वाना भासू लागली. त्या दृष्टीने संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्याचा विचार माडखोलकर, नवरे आदी नेत्यांनी मांडला. पाच वर्षांत तीन-चार हजार आजीव सदस्यांची नावनोंदणी करायची आणि संयुक्त महाराष्ट्र परिषद भरवायची असा विचार पुढे आला. 'ज्योत्स्ना' मासिकाचे संचालक ग.वि.पटवर्धन हे संयुक्त महाराष्ट्र सभेच्या अस्थायी समितीचे कार्यवाह होते.

उज्जैन येथील मराठी वाङमय मंडळाचे संमेलन 6 जानेवारी 1940 या दिवशी झाले. संमेलनाचे अध्यक्षस्थान ग.त्र्यं.माडखोलकर यांनी भूषवले होते, माडखोलकर 'संयुक्त महाराष्ट्र' या विषयावर बोलणार हे स्पष्ट होते.

' महाराष्ट्राचे युध्दोत्तर भवितव्य' या विषयावर बोलताना माडखोलकरांनी 'महाराष्ट्र राज्य' याबद्दलचे विचार मांडले. ते म्हणाले, ''नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेला सारा मुलुख एका राजकीय सत्तेच्या, एका मध्यवर्ती विद्यापीठाच्या आणि एका सर्वव्यापी राष्ट्र संस्थेच्या छत्राखाली आणायचा, महाराष्ट्रातील एका रक्ताच्या आणि एका भाषेच्या लोकांचे मुलताईपासून मडगावपर्यत एकसंघ राष्ट्र निर्माण करायचे हे ध्येय आपण इर्ष्येने वाढीला लावले पाहिजे.''

Last Updated On -  May 2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.