संयुक्त महाराष्ट्रासाठी देवांनी स्वीकारला पराभव

प्रतिनिधी 22/01/2010

शंकरराव देवांचा पक्षश्रेष्ठींवर पूर्ण विश्वास होता, पण काँग्रेसश्रेष्ठी त्या विश्वासास अजिबात पात्र ठरले नाहीत. श्रेष्ठी देवांविषयी नाराज होते व देवांची त्यांच्या विषयीची समजूत चुकीची होती. याची प्रचीती 1950 साली नाशिक इथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आली.

संयुक्त महाराष्ट्राची, विशेषत; 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ' काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी होऊन बसली होती. स.का.पाटील यांच्यापासून सरदार पटेलांपर्यंत सर्वांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला विरोध होता. हा विरोध त्यावेळी तरी छुपा होता.

काँग्रेसचे अधिवेशन नाशिक इथे 1950 साली भरले होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी शंकरराव देव उभे होते. निवडणुकीत सरदार पटेलांचा पाठिंबा मिळवण्यासाठी शंकरराव देवांनी प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही.

'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा आग्रह सोडून दिला तरच आपला पाठिंबा देवांना मिळेल' असं सरदार पटेलांनी त्यांना स्पष्ट सांगितले.
शंकरराव देवांना एकदा स्वीकारलेल्या कार्यातून माघार घेणे मान्य नव्हते. शंकरराव देवांनी सरदार पटेलांची अट मान्य करण्यापेक्षा, अध्यक्षपदाच्या निवडणुकीतला दणदणीत पराभव पत्करला. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न
वाटाघाटीच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न शंकरराव देवांनी 1955 च्या अखेरीपर्यंत चालूच ठेवला.

शंकरराव देवांना विरोध करणारे अनेक काँग्रेस नेते त्यावेळी महाराष्ट्रात होते. संयुक्त महाराष्ट्राबाबत चर्चा अथवा वाटाघाटी करण्यासाठी काँग्रेसश्रेष्ठी शंकरराव देवांना बोलावून घेत असत, हे ब-याच काँग्रेसजनांना खटकत असे.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सनदशीर व वाटाघाटींच्या मार्गाने 1955 सालापर्यंत चालली होती. फाजल अली कमिशनचा अहवाल प्रसिध्द झाल्यावर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले. त्यातून 'मोरारजींच्या पोलिसांनी' जे अमानुष अत्याचार घडवले त्यातून संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन म्हणजे 'संयुक्त महाराष्ट्रवादी विरूध्द काँग्रेस' असा उघड उघड लढा सुरू झाला.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईच्या समावेशाचा प्रश्न अधिक तीव्र झाला. काय वाटेल ते झाले तरी चालेल पण मुंबई महाराष्ट्राला मिळू द्यायची नाही असा चंग काँग्रेस नेत्यानी बांधला होता; उलट, महाराष्ट्र घेऊच तर मुंबईसह, अशा ईर्ष्येने पेटून संयुक्त महाराष्ट्राचे नेते एकजुटीने लढत होते. महाराष्ट्रातले सर्व विरोधी पक्ष-नेते संयुक्त महाराष्ट्राच्या झेंड्यांखाली एकत्र आले आणि त्या एकजुटीपुढे काँग्रेसला नमावे लागले.
समाजवादी, प्रजासमाजवादी, कम्युनिस्ट, शेतकरी-कामगार पक्ष, हिंदुत्ववादी आणि आचार्य अत्र्यांसारखे स्वतंत्र या सगळयांनी एकत्र येऊन हा लढा दिला.

या आंदोलनाचे वैशिष्टय म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी महाराष्ट्रातली जनता होती. काँग्रेसला आर्थिक सत्तेचे पाठबळ होते. त्यामुळे विशेषत: इंग्रजी व मोठी मराठी वृत्तपत्रे काँग्रेसचीच तळी उचलून धरत असत. संयुक्त महाराष्ट्राची बाजू 'नवाकाळ','प्रभात' ही वृत्तपत्रे आणि साप्ताहिक 'नवयुग' यांच्या मार्फतच लोकांसमोर मांडली जाऊ लागली. पुढे, आचार्य अत्रे यांना 'मराठा' सुरू करावा लागला. 'दैनिक मराठया'चा जन्म ही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची, चळवळीची, लोकभावनेची फलश्रुती होय.

Last Updated On - 1 May 2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.