चांगल्या चित्रपटांना फिल्म सोसायटी चळवळीचे अधिष्ठान...


28 डिसेंबर 1895 रोजी पॅरीसमधील ऑग्युस्टे व लुईस ल्युमिरे बंधूनी एक-एक मिनिट कालावधीच्या काही चित्रफिती प्रदर्शित केल्या. हाच दिवस चित्रपट कलेचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. यानंतर तीस वर्षांनी लंडनमध्ये जगातील पहिली फिल्म सोसायटी स्थापन झाली. 1932 मध्ये व्हेनीस येथे जगातील पहिला चित्रपट महोत्सव भरला. त्याच वर्षी भारतात भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा भारतातील चित्रपट सोसायट्यांना एकत्र करुन 19 सत्यजित राय यांनी फेडरेशन आँफ फिल्म सोसायटीज् आँफ इंडिया या देशव्यापी संस्थेची स्थापना केली. गेल्या पन्नासवर्षात देशातील फिल्म सोसायट्यांनी चारशेचा टप्पा गाठला असून सध्या श्याम बेनेगल फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. फंडरेशनच्या सुवर्णमहोत्सवाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून 1 मे रोजी पुण्यात फेडरेशनच्या महाराष्ट्र विभागातील फिल्म सोसायट्यांचे एक दिवसाचा मेळावा झाला त्याला राज्यभरातून पन्नास प्रतिनिधी आले होते. मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली, सोलापूर, कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव, नाशिक, लातूर, औरंगाबाद, चिपळूण याठिकाणच्या प्रतिनिधींनी त्यांचे उपक्रम व समस्या याबद्दलची चर्चा करुन आगामी काळात ही चळवळ सर्वदूर पोहचविण्याच्या दृष्टीने काय करता येईल, चळवळीची आगामी वाटचाल कशी असावी याचा विचार विनिमय झाला.

पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु व अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव हे या संमेलनाचे उद्घाटक असल्याने साहजिकच महाविद्यालयांमध्ये फिल्म सोसायटीची चळवळ कशी पोहचवता येईल याचा विचार पुण्यातील संमेलनात झाला. त्यादृष्टीने एक विशेष योजनाही तयार करण्यात आली. आजची महाविद्यालयीन पिढी ज्या काळात लहानाची मोठी झाली त्याच काळात उपग्रहवाहिन्यांचे व त्यापाठोपाठ आलेल्या इंटरनेटचे मोठे अतिक्रमण झाले. पारंपारिक नातेसंबंधांना धक्का देणा-या मालिका, अहोराज चालणारे सिनेमाचे चॅनलस, स्त्री-पुरूष संबंधांचे औगळ दर्शन घडविणा-या साईटस यामुळे मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीला ओहटी लागली. त्या नव्या संस्कृतीला सरावलेल्या तरुण पिढीला जगभरातील उच्च अभिरुची संपन्न चित्रपटांची ओळख व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरले. 

महाविद्यालयांमधील 'कॅम्पस फिल्म क्लब' हा त्याच उपक्रमांचा एक भाग.

'फिल्म अँप्रिसिएशन कोर्स' अर्थात चित्रपट रसास्वाद अभ्यास-क्रमाचे महाविद्यालयांमध्ये आयोजन हा त्यातलाच एक भाग व्यक्ती अभिरुचीसंपन्न होण्यासाठी नुसते अभिजात चित्रपट पाहणे पुरेसे नसते. चित्रपट माध्यम, चित्रभाषा यांचाही परिचय असावा लागतो. त्याशिवाय चित्रकर्त्याला काय सांगायचय आणि त्याने ते कसे सांगितले आहे याचा उलगडा नीट होत नाही. केवळ एक चांगला चित्रपट पहिल्याचे समाधान मिळते. त्यातही कॅमे-याच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर साकारली जाणारी चित्रभाषा ही जर मातृभाषेतून समजावून होत आली तर एरवी दुर्बोध, कंटाळवाणा वाटणारा चित्रपटाचा रचनाप्रकार जाणून घेण्याची मानसिक तयारी होते.

चौथ्या चित्रपट शिबिराचे उदघाटन-सतीश जकातदार, सुधीर नांदगावकर, उदघाटक बी.के.करंजीया अर्काइव्हचे विजय जाधव...फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र विभागा मार्फत मागील चार वर्षांपासन मराठीतून चित्रपट रसास्वाद शिबीराचे आयोजन केले जात आहे. मराठीतील शिबीराचा हा राज्यातील एकमेव उपक्रम असून व्ही. शांताराम फॉऊंडेशन व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय फिल्म अकाइव्हचे त्याला विशेष सहकार्य मिळत असते. चित्रपट माध्यमाचा इतिहास, अभिजात चित्रपटांची तपशीलवार चर्चा, दिग्दर्शकांच्या भेटी आणि निवडक चित्रपट व लघुपटांचा आस्वाद असा सकाळी 9 ते रात्री 9 दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम असतो. याच प्रकारे राज्याच्या सहा विभागांमध्ये तीन दिवसांची चित्रपट आयोजित करण्याचे फेडरेशनचे प्रयत्न आहेत.

चित्रपट रसास्वाद शिबिरांमध्ये सहभागी होणा-यांच्या विचारार्थ चित्रपट माध्यमाच्या अभ्यासक श्यामला वनारसे यांनी एक छोटे टिपण तयार केलयं त्यात त्या म्हणतात, एरवी चित्रपट बघायला काही पूर्व शिक्षणाची गरज आपल्याला जाणवलेली नसते. पण चित्रपटकर्ते जेव्हा एखादी भव्य आणि खोल जाणीव देणारी कलाकृती समोर आणतात.. तेव्हा त्याचा अन्व्य लावायला शिकावे लागते. चित्रपटकर्ता काय आणि कसे सांगतो आहे हे समजावून घेण्यासाठी प्रेक्षकांला स्वत:ची संवेदनशीलता विकसित करावी लागते. या टिपणाच्या अखेरीस श्यामला वनारसे म्हणतात, (चित्रपटाचे) मूल्यमापन करण्यापूर्वी आपण आपली आस्वादाची साधने तयार केली तर चित्रपटाच्या रसास्वादातून समीक्षेकडे जाण्याचा मार्ग तयार होतो. रसास्वादाची ही तयारी आपला चित्रपटाचा अनुभव अधिक समुध्द करते आणि एकूण जीवनानुभवातही कलेचा संस्कार दृढ करते.

सर्वसामान्य प्रेक्षकांची अभिरुची संपन्न होण्यास जसा रसास्वाद शिबीराचा हातभार लागतो त्याचप्रमाणे चित्रपट सोसायटीची चळवळ अधिक बळकट करण्यास अशी शिबिरे उपयुक्त ठरत आहेत. फिल्म फेडरेशनच्या पश्चिम विभागाचे सचिव सतीश जकातदार यासंबंधात म्हणतात व्ही.सी.डी चोविस तास चालणा-या चित्रपटवाहिन्या इंटरनेट, दरवर्षी भरवले जाणारे आंतरराष्ट्रीय महोत्सव यामुळे जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट पाहायला मिळणे ही आता नवलाईची बाब राहिलेली नाही. त्या अर्थाने पाहिले तर चित्रपट सोसायट्यांची उपयुक्तता आता पहिल्या इतकी राहिलेली नाही. म्हणून या सोसायट्यांनी त्यांचा फोकस पॉईंट बदलला पाहिजे. चित्रपटाचा रसास्वाद इंग्रजीपेक्षा मातृभाषेतून घेता येणे हे आता अनिवार्य आहे. चित्रपट सोसायट्यांनी याच दृष्टीने त्यांची उपक्रमशीलता व उपयोगीता वाढवली पाहिजे.

1970 ते 80 या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत समांतर, कलात्मक चित्रपटांची जी लाट उसळली तिला चित्रपट सोसायटीच्या चळवळीचे अधिष्ठान लाभले होते. असे फेडरेशनचे केंद्रीय सचिव सुधीर नांदगावकर यांचे मत आहे. चळवळीच्या सुरुवातीच्या काळात आम्ही 'बेगर' होतो आता आम्ही 'च्युझर' झालो आहोत आपल्या हवे ते चित्रपट जगभरातून मिळवणे सहज शक्य आहे. देशातील प्रत्येक मोठ्या शहरात स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता होऊ लागलाय, यातले निवडक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नेऊन दिग्दर्शक व प्रेक्षकांमध्ये थेट संवाद घडवून आणणे हे आमचे प्रमुख कार्य आहे..

पुण्यातील रसास्वाद शिबिरात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी अशी टिपणी केली आहे की काही वर्षांपूर्वी सर्वमानसिक आजारीसाठी 'वेडा' हा एकच शब्द वापरला जायचा. आता य आजारांचे निदान वेगवेगळ्या वर्गवारीत केले जाते. चित्रपटांचे सुद्धा तसेच आहे. वर्तमानपत्रे बातम्यांमधून मनोरंजन करु लागल्याने त्यांचे लोकशिक्षणाचे काम चित्रपटांना करावे लागत आहे. अशा चित्रपटांना केवळ 'चांगला' 'वाईट' ठरवून चालणार नाही यावर्गवारीच्या पलिकडे जाऊन चित्रपटाचे विश्लेषण करता आले पाहिजे. फेडरेशनच्या पन्नासपैकी पंचवीस वर्षे व्यापणा-या 'आशय'चे प्रयत्न त्यात दिशेने चालू आहेत.

- रमेश दिघे..
  ramesh_dighe@yahoo.in

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.