अनेक वर्षांनी निखळ आनंद देणारे विनोदी नाटक पाहिले


विद्यासागर अध्‍यापक लिखीत आणि लता नार्वेकर निर्मित ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकाचा प्रयोग मी गुरूवार दिनांक 19 मे 2011 रोजी पाहिला. या नाटकाचे दिग्‍दर्शन चंद्रकांत कुळकर्णी यांनी केले आहे. अनेक वर्षांनंतर इतका स्‍वच्‍छ आणि आणि मोकळ्या विनोदाचा अनुभव मी घेतला.

     गेली 5-6 वर्षे समीक्षक या नात्‍याने जी विनोदी नाटके मी पहात होतो, त्‍यातल्‍या बहुसंख्‍य नाटकांना बहुसंख्‍य प्रेक्षक का हसतात, हेच मला कळत नव्‍हते. त्‍यामुळे त्‍या उगाचच हसणा-यांच्‍या गर्दीत मी एक अडाणी व मुर्ख प्रेक्षक ठरत होतो. याची कारणमिमांसा मी शोधून काढली आणि मला असे आढळले की, आजचा प्रेक्षक पूर्वीसारखा एकाच पातळीवरचा नाही. त्‍यात भिन्‍न गट निर्माण झाले आहेत. काही प्रेक्षकवर्ग असा आहे ज्‍यांना विनोदाची जाण नाही, चांगले विनोद कळण्‍याची क्षमता नाही. त्‍याबाबतची जी एक विशिष्‍ट संस्‍कृति लागते आणि नाटक पाहण्‍याची जी पार्श्‍वभूमी लागते त्‍याचा पूर्णपणे अभाव असलेला हा प्रेक्षकवर्ग होता. पूर्वी कोणत्‍याही मराठी मराठी नाटकाला विशिष्‍ट बौद्धिक पातळीवरचा एक प्रेक्षकवर्ग लाभायचा, तशी परि‍स्थिती आता राहिलेली नाही. म्‍हणूनच फुटकळ, यमक जुळवणा-या विनोदांना हसणारे आणि खरोखरच काही बौद्धिक आनंद देणा-या विनोदाला हसणारे असे प्रेक्षकांचे दोन वर्ग आजमितीला पडतात.

     ‘आधी बसू...’ चा जो प्रयोग मी पाहिला तो बौद्धिक आनंद आणि निखळ विनोद यांचा आस्‍वाद देणारा होता. कोणत्‍याही प्रकारचा अतिरेक नाही, विडंबनाची टोकाची गाठलेली पातळी नाही, अश्‍लीलसूचक किंवा कंबरेखालचे विनोद नाहीत. नाट्यांतर्गत घडणा-या घटना वास्‍तवपूर्ण होत्‍या. चंद्रकांत कुळकर्णी यांची दिग्‍दर्शनातील सफाई वाखाणण्‍याजोगी आहे. कलाकारांच्‍या अभिनयातून स्‍वच्‍छ हास्याची निर्मिती होत होती. खूप दिवसांनी एक प्रसन्‍न आणि मोकळ्या विनोदाचे स्‍वच्‍छ नाटक पाहिल्‍याचा अनुभव मिळाला.

- कमलाकर नाडकर्णी
नाट्यसमीक्षक

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.