कोकणातील नवान्न पौर्णिमा


navanna_कोकणात घराघरातून साजरा होणारा एक सण म्हणजे ‘नवान्न पौर्णिमा’. नव्याची पौर्णिमा. ‘नवान्न’ म्हणजे नवीन अन्न. त्या दिवसाला नावाप्रमाणेच महत्त्व आहे. नवान्न म्हणजे नवीन तयार झालेले अन्न. ‘नवान्न पौर्णिमा’ निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी साजरी केली जाते. त्या दिवशी घराघरांत ‘नवे’ बांधण्याची परंपरा आहे. आश्विन महिन्यात शरद ऋतू सुरू होतो. आश्विनात पौर्णिमा जर दोन दिवस असेल तर आदल्या दिवशीच्या रात्री ‘कोजागिरी’ आणि दुसऱ्या दिवशी ‘नवान्न’ पौर्णिमा असते. आणि पौर्णिमा एकाच दिवशी येते तेव्हा दिवसा नवान्न पौर्णिमा साजरी करून त्याच रात्री कोजागिरी पौर्णिमेचे दूध प्यायचे असा बेत असतो.

कोकणात भात हे प्रमुख पीक घेतले जाते. त्याबरोबरच नाचणी, वरी ही पिकेही असतात. भात हे पीक गणपती उत्सवानंतर तयार होते. कमी कालावधीत तयार होणार्या् पिकांची कापणी नवरात्रात करण्याची प्रथा आहे. तशा कापलेल्या भाताचे पिक हे ‘उखळा’मधून सडून नवान्न पौर्णिमेला त्याचा भात करायचा; ती नवीन अन्नाची (म्हणजे धान्याची) सुरुवात असते. घर बांधणीत ‘उखळ’ इतिहासजमा झाली आहे. नवीन धान्य गिरणीवरून सडून आणले जाते. मात्र नवीन तांदळाचा पहिला भात पौर्णिमेला शिजवण्याची परंपरा कोकणात पाळली जात आहे. 

कोकणात पूर्वी काही स्थानिक कलाकार बांबूच्या कामट्यांचे ‘नवे’ तयार करून विक्रीला आणायचे. ती वस्तू घराच्या प्रवेशद्वारावर शोभेची अशी बांधण्याची असे. बांबूच्या पट्ट्या काढून, त्यांची नक्षीदार रचना करून, सोनेरी कागदाचा वापर करून कामट्यांमधील ‘नवे’ तयार केले जात असे. ते घराच्या प्रवेशद्वारावर लावले जात असत. त्यासोबतच अन्य महत्त्वाच्या वस्तूंनाही ‘नव्या’त बांधले जायचे. ‘नवान्न पौर्णिमे’ला बांधलेले ‘नवे’ एक वर्ष व्यवस्थित राहायचे. ते पुढील वर्षी नवीन लावताना उतरवले जायचे. कामट्यांचे ‘नवे’ आजकाल दिसत नाही, पण भाताच्या लोंब्या प्रवेशद्वारावर टांगल्या जातात. 

_naveधान्याच्या - भाताच्या लोंबी, आंब्याचे पान, कुरडूचे फूल, झेंडूचे फूल हे एकत्र बांधून ‘नवे’ केले जाते. नवान्न पौर्णिमेला एक ‘नवे’ देवासमोर ठेवून त्याची पूजा केली जाते. नंतर तसेच नवे बांधले जाते. ते धान्याचे कोठार, तुळशी वृंदावन, गुरांचा गोठा, विहीर आदी ठिकठिकाणी बांधले जाते. सर्वत्र भरभराट होऊ दे असा त्यामागील अर्थ असतो. त्या दिवशी नवीन तांदळाच्या भाताबरोबर, नवीन तांदळाची खीरही करतात. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे ‘पातोळे’ करतात. 

‘नव्या’मध्ये बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूला शास्त्रीय महत्त्व आहे. आंब्याचे पान प्रत्येक शुभकार्यासाठी वापरतात म्हणून आंब्याच्या पानातच ‘नवे’ बांधली जाते. कुरडूची फुले ही टिकाऊ आणि औषधी आहेत, म्हणून कुरडूच्या फुलांचा समावेश केला जातो. भात, वरी, नाचणी या नवीन पिकांचे स्वागत आणि पूजन करण्यासाठी त्या पिकांच्या कणसांचा समावेश ‘नव्या’त करण्यात येतो. ‘नवे’ बांधण्याची पद्धत शहरात दसऱ्याला केली जाते. 

- अमित पंडित 9527108522
ameet293@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.