आमचा रामशास्त्री – न्या. अभय ओक


-heading-न्यायमूर्ती अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक मे 2019 मध्ये झाली. आम्ही त्यांच्या बंगलोरमधील शपथविधी समारंभास उपस्थित राहिलो. मी शिक्षक म्हणून ठाणे येथील मो.ह. विद्यालयातून निवृत्त झालो; त्यालाही अठरा वर्षें उलटून गेली. अनेक विद्यार्थी दहावी/बारावी होऊन माझ्या कारकिर्दीच्या तीस वर्षांच्या काळात शाळेतून बाहेर पडले. ते त्यांच्या आवडीनुसार विविध शाखांतून पदवीधर झाले. वेगवेगळ्या व्यवसाय/उद्योगांत स्थिरस्थावर झाले, काहींनी उत्तुंग असे यश मिळवले. मी काही नामवंत शिक्षक नाही आणि मी त्या नामवंतांना शिकवले असे तर मुळीच नाही. पण मी मुलांचे यशाच्या त्या टप्प्यावर अभिनंदन करण्यासाठी मुख्याध्यापकांसमवेत जात असे. मी गुणवंतांना विविध कार्यक्रमांसाठी निमंत्रित करण्यासाठीही संपर्क करत असे. नंतर, माझा त्यांच्याशी पत्रव्यवहार व संवादही होत असे. काही माजी विद्यार्थ्यांचा तर कारणपरत्वे अनेक वेळा संपर्क राहिला आहे. न्यायमूर्ती अभय ओक यांचा समावेश तशा सतत संपर्कात असलेल्या नामवंतांत होतो. त्यांचा स्वभावच शिक्षकांविषयी आदर बाळगणे व तो अगदी सहज व्यक्त करणे असा आहे. त्यामुळे आमचे नाते उभयपक्षी जवळचे व घट्ट होत गेले आहे.

ओक यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली व्यवसायात प्रवेश केला, कारण त्यांचे वडील, कै. श्रीनिवास ओक हे ठाण्याचे प्रसिद्ध वकील. नंतर, ओक यांनी मुंबई उच्च न्यायालयातील ख्यातकीर्त वकील विजय टिपणीस यांच्याबरोबर उमेदवारी केली. अभय यांचा उत्तम व अभ्यासू वकील म्हणून लौकिक अल्पावधीतच झाला. त्यांना त्यांच्यातील गुणवत्तेमुळे न्यायमूर्तीपदासाठी देकार आला. त्यांच्यासाठी ऐनभरात उत्तम आर्थिक लाभ असलेली वकिली सोडण्याचा व न्यायाधीशपद स्वीकारण्याचा निर्णय सोपा नव्हता, पण कुटुंबीयांनी त्यांच्या त्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांची मुंबई उच्च न्यायालयातील पंधरा वर्षांची कारकीर्द हे एक सोनेरी पानच आहे. नामवंत वकिलांनाही ओकसाहेबांच्या समोर दावा चालणार असेल तर कमालीचे दडपण येत असे. ओक यांनी समोर जो दावा येणार असेल त्याचा उत्तम गृहपाठ केलेला असे. त्यामुळे तशा खटल्यांमध्ये सुनावणीच्या कामकाजात अगदी नामवंत वकिलांचीही ओक यांच्या स्पष्ट व खणखणीत प्रश्नांना उत्तरे देताना भंबेरी उडत असे. ओक कामकाज योग्य रीतीने चालेल याची काळजी घेत व दावे निकाली काढत असत.

त्यांचा लौकिक जनहित याचिकांवर जनहिताचे निर्णय देणारे न्यायमूर्ती असा आहे. ते प्रसंगी शासनासही फटकारत असत. त्यामुळे कोणा वकिलाला काही तरी करून ‘तारीख पे तारीख’ हा सिलसिला शक्य होत नसे. त्यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य योग्य रीतीने, पण प्रकरण निकालात काढणे हे असे. त्यांनी पंढरपूर वारीत वर्षानुवर्षें होणारी घाण लक्षात घेता त्या काळात शौचालयांबाबत कृती करण्यास शासनास भाग पाडले. ओक यांचे गणपती, दहीहंडी या वेळी होणाऱ्या आवाजाचे प्रदूषण व फ्लेक्समुळे होणारे विद्रूपीकरण या विषयांवरील निवाडे सर्वश्रुत आहेत. कोणी तरी ‘आरटीआय’ (Right to Information) खाली उच्च न्यायालयातील न्यायाधीश किती काम करतात? अशी माहिती मागवली होती. तेव्हा ओक हे इतर न्यायाधीश जितकी प्रकरणे ठरावीक काळात निकालात काढतात त्याच्या तिप्पट प्रकरणे निकालात काढतात असे आढळून आले. अशा ओक यांची नेमणूक कर्नाटकच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून झाली ती स्वाभाविक होय. आम्हा ठाणेकरांना, विशेषत: मो.ह. विद्यालयाशी संबंधीत सर्वांना फार आनंद झाला. आमच्यासाठी, म्हणजे मी व माझी पत्नी नंदिनी यांच्यासाठी तर घरच्या माणसाचाच गौरव झाला होता. 

ओक यांना मुंबई उच्च न्यायालयाने 4 मे 2019 ला ‘निरोप’ दिला. उपस्थितांपैकी अनेकांनी सांगितले, की त्यांनी इतका भावपूर्ण निरोप गेल्या वीस-पंचवीस वर्षांत कोणाचा झालेला पाहिलेला नाही.

अभय ओक कर्नाटकच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शुक्रवार, 10 मे 2019 रोजी शपथ ग्रहण करणार असल्याचे समजले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पंधरा वर्षांपूर्वी शपथ घेतली तेव्हा मी त्या समारंभास उपस्थित होतो. त्यावेळी मी अभय यांचे बाबा अण्णा ओक यांना म्हणालो होतो, की ‘मी सर्वोच्च न्यायालयातही शपथविधीला जाईन.’ त्या अगोदर कर्नाटकचा हा टप्पा आला! त्यामुळे आमचे बंगलोरला शपथविधीसाठी जाणे स्वाभाविक ठरले. मी शपथविधीच्या दिवशी पहाटे तीन वाजता बंगलोर विमानतळावर पोचलो. आमच्या नावाचा बोर्ड घेऊन एक व्यक्ती तेथे उभीच होती. ते सेवक आम्हास ‘अरायव्हल’च्या लाऊंजमध्ये थोडा वेळ थांबवून बंगलोरच्या शासकीय विश्रामधामात घेऊन गेले. आम्ही विमानतळावर परत येईपर्यंत एक सेवक, एक गाडी व ड्रायव्हर आमच्या सेवेला होते. आम्हाला अशा आदरातिथ्याची सवय नसल्याने थोडे अस्वस्थ व्हायला झाले व थोडे छानही वाटले!

आम्ही बंगलोरच्या राजभवनात 10 मे 2019 रोजी सकाळी दहा वाजता पोचलो. तेथे कडक सुरक्षा व्यवस्था होती, पण बरोबर असलेल्या ‘सेवक’ व्यक्तीमुळे प्रवेश सर्वत्र सहज होत होता. राजभवनाचा कित्येक एकराचा तो परिसर गच्च झाडीने वेढलेला आहे. शपथविधी ‘ग्लास हाऊस’ या भव्य सभागृहात योजला होता. मंडळी हळुहळू येत होती. बंगलोरमधील व कर्नाटकाच्या इतर शहरांतील न्यायाधीश दिसत होते. ‘सिटिंग जज्जेस’ मुंबईहून तर पंधरा-वीस आले होते. सुप्रीम कोर्टातून, विशेषत: निवृत्त न्यायाधीश आले. बाकी, अनेक वकील मुंबईहून आले होते.

उत्सवमूर्ती साडेदहा वाजता आली. चार-पाचशे जणांच्या त्या सभागृहात उंच, गोरेपान असे तरुण न्यायमूर्ती अभय ओक देखण्या राजपुत्रासारखे दिसत होते. केवळ ते जवळचे आहेत म्हणून तसे वाटत होते असे नाही. अगदी त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहिले तरी ते तसेच दिसत होते. उच्च न्यायालयात पोचेपर्यंत बहुतांश ज्येष्ठ झालेलेच असतात. त्यांच्यात ओक तरुण म्हणून जास्तच उठून दिसत होते. अनेक जण त्यांना त्यांच्या जवळ जाऊन, योग्य अंतर राखून शुभेच्छा देत होते. काही ज्येष्ठ जे अगदी जवळचे होते ते प्रसन्न मुद्रेने हस्तांदोलन करत होते. दोन-चार जण त्यांना अगदी जवळ घेऊन पाठीवर शाबासकी देत होते, ते अर्थातच ज्येष्ठ होतेच व ओक यांच्या कायम संपर्कातील होते.

काही बसण्याचे कोच एकेका व्यक्तीसाठी असलेले कोचांच्या पहिल्या रांगेत होते. त्यावर अभय, त्यांच्या पत्नी - अनुजा व मातोश्री- वासंतीताई बसले होते. तो क्षण गांभीर्याचा व तेवढाच आनंदाचा होता. ओक यांच्या -caption-1मुद्रेवरील भावाच्या विविध छटा पाहण्यास मिळाल्या- औपचारिक रीत्या शुभेच्छा देणारे आले, की मुद्रेवरील गांभीर्य ठेवूनही किंचित स्मित तेथे उतरे. व्यक्ती अगदी परिचयातील असल्यास प्रसन्न हास्य. मधूनच कोणाशी तरी बोलताना कमालीचे गांभीर्य दिसे. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी तर त्यांचे जवळचे मित्र. दोघे तेवढ्या गर्दीतही काही वेगळ्या संदर्भात बोलताना दिसले. उपस्थितांच्या मुद्रेवर अभय यांच्याविषयी असलेला नितांत आदर व प्रेम सहज कळत होते. मधूनच कोणी अधिकारी जवळ येई, काही विचारे, काही सांगत असे. त्यावेळी अभय यांची मुद्रा गंभीर दिसे. ते त्या अधिकाऱ्याला नेमके काही विचारत असत.

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला व मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी 10.50 वाजता आले. त्यांनी अभय यांच्याजवळ जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मुद्रेवरही अभय यांच्याविषयी असणारा आदर दिसत होता.

राज्यपाल व मुख्यमंत्री महोदय व्यासपीठावर गेले. सर्व सभागृहाने त्यांना मानवंदना उभे राहून दिली. ‘मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांना आता मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेण्यास निमंत्रित करत आहोत’ अशी उद्घोषणा होताच अभय ओक व्यासपीठाकडे निघाले. त्यांनी विशिष्ट प्रकारचा गाऊन व्यासपीठावर जाण्यापूर्वी अंगावर चढवला. त्यांनी व्यासपीठावर पाऊल ठेवताच टाळ्यांचा कडकडाट झाला. राज्यपाल महोदयांनी शपथ दिली. त्यावेळी त्यांनी ‘मी सदसद्विवेक बुद्धीस स्मरून शपथ घेत आहे’ म्हणून शपथ घेतली. पुन्हा टाळ्यांचा गजर! ओक यांनी खुर्चीवर आसनस्थ होऊन स्वाक्षरी केली. त्यांची शपथ घेतानाची मुद्रा, बसल्यावर रजिस्टर पुढे केल्यावर ते ठेवणाऱ्या व्यक्तीकडे एक कटाक्ष व मजकुरावर एक कटाक्ष, एक जागरूकता... हे सारे पाहताना छान वाटले. मनात विचार आला, मी एक सर्वसामान्य हितचिंतक. ते ज्या शाळेत शिकले तेथील निवृत्त शिक्षक. तरी माझे मन आनंदाने, विस्मयाने भरून आले! सभागृहात उपस्थित त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, ब्याऐंशी वर्षांचे मामा व प्रत्यक्ष माता यांना किती आनंद व अभिमान वाटला असेल! त्या लोकांच्या मुद्रांवरील आनंद पाहणे हाही त्या समारंभातील आगळा अनुभव होता! वंदे मातरम् झाले व तो दहा मिनिटांचाच कार्यक्रम संपला. राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी न्यायमूर्तींना हस्तांदोलन करून, त्यांच्या हाती भलामोठा गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

हे ही लेख वाचा - 
क्षण कृतज्ञतेचा, अविनाश बर्वे सरांच्या पंच्याहत्तरीचा...!
अविनाश बर्वे – उत्स्फूर्त उपक्रमशीलता

ओक व्यासपीठावरून खाली उतरल्यावर अनेकांनी त्यांना त्यांच्याजवळ जाऊन शुभेच्छा दिल्या. पण सामान्यत: बहुतांश न्यायाधीश थोडे दूर उभे राहून, आदरपूर्वक अभिनंदन करताना दिसले. ‘चीफ जस्टिस’ही त्यांच्या मित्रांना येऊन भेटत होते. त्यांनी माझ्या बाजूने थोड्या अंतरावर आल्यावर, कोणाला तरी माझा निर्देश करून ‘माझे शिक्षक आहेत’ असे सांगितले. कोणाही शिक्षकाचा यापेक्षा मोठा सन्मान तो कोणता! खरे नाते, मी त्यांच्या शाळेतील त्यांचा केवळ एक शिक्षक एवढेच!

सभागृहातून बाहेर आल्यावर चहापानाच्या भागाकडे जाताना बँड पथकाने मुख्य न्यायमूर्तींना सलामी दिली. ते दोन-तीनशे मीटर मार्गावरील संचलनही आगळे होते. अभय यांच्या पत्नी मागून थोड्या अंतरावरून येत होत्या. माझ्या मनात सहज विचार आला... त्यांच्या मनात पंचवीस-तीस वर्षांपूर्वी सप्तपदी चालताना काही कोमल भावना उमटल्या असतील आणि आज त्यांच्या मागे चालताना केवढा आनंद, अभिमान वाटला असेल! केवळ पदोन्नती होऊन ते पद मिळणे व साऱ्या वाटचालीत गुणवत्ता हाच खरा निकष ठेवून वरच्या पदावर जाणे वेगळे!

अभय ओक एका मोठ्या टेबलाशी बसले, त्यांच्या शेजारी राज्यपाल महोदय बसले. चार-पाच खुर्च्या सोडून पलीकडे मुख्यमंत्री बसले. त्या पाच मिनिटांत राज्यपाल महोदयांशी काही संवाद झाला असेल. मग त्यांनी पुन्हा उभे राहून शुभेच्छा दिल्या व निरोप घेतला!

स्त्री-पुरुष न्यायाधीश अधुनमधून जवळ येत. दोन-चार वाक्यांची देवाण-घेवाण. ओकसाहेब मात्र एवढा मोठ्ठा भव्य व गंभीर समारंभ झाल्यावरसुद्धा अगदी सहजपणे वावरत होते. त्यांना मोठेपणाचे भान नव्हते, ते इतरांना मात्र चांगलेच होते!

अभय यांनी त्यांचे जे नातेवाईक व जो मित्रपरिवार त्या कार्यक्रमासाठी आला होता, त्या सर्वांना या निमित्ताने मेजवानीचे आयोजन केले होते. मेजवानी हायकोर्टाच्या दालनात होती. त्यामुळे आम्हाला हायकोर्टाची भव्य वास्तू पाहता आली. साहेब कुटुंबीय व मित्र यांच्याशी संवाद करत भोजन घेत होते. आम्ही दिसताच त्यांचे ‘सर, आम्ही वाट पाहत होतो!’ हे शब्द ऐकून थक्क झालो. आम्हाला गेस्ट हाऊसमधून तेथे पोचण्यास थोडा उशीर झाला असेल, पण तेवढ्या वेळात त्यांनी मुलाला दोन वेळा ‘सर का आले नाहीत, पाहा’ असे सांगणे, असे म्हणणे... त्यांनी ती गोष्ट सहज केलेली असणार, पण त्या पदावरील व्यक्ती त्या दिवशी असे वागण्याची शक्यता, खरे तर, असत नाही!

-caption-2नंतर ओक यांच्या मुलाने आम्हाला ‘चीफ जस्टीस’ची चेंबर व कोर्टरूम दाखवली. भव्यता, स्वच्छता, टापटीप व आगळा डौल... सारे पाहताना मन भारावून गेले नसते तरच नवल! मला तरी ते दालन राष्ट्रपती अथवा पंतप्रधान यांच्या चेंबरसारखेच वाटले!

‘सर, संध्याकाळचे भोजन बंगल्यावर आहे, या!’ असे निमंत्रण जस्टीससाहेबांनी दिले. तो भव्य बंगला पाहण्यास मिळाला! कोर्ट असो, राजभवन अथवा बंगला... गच्च झाडी हे बंगलोरचे वैशिष्ट्य डोळ्यांत भरते! त्या सर्व वास्तूंना शाही डौल आहे! ओक कुटुंबीय व आम्ही चार-पाच जण एवढेच लोक भोजनास होतो. सगळा बंगला फिरून पाहिला. दोन भव्य दालनांत बैठक व्यवस्था होती. एकीकडे मित्र तर दुसरीकडे कुटुंबीय. अभय दोन्हींकडे जाऊन-येऊन गप्पा मारत होते- जणू रूटीनमधील एक सामान्य दिवस व आलेल्या व्यक्तींशी सहज गप्पा. आजुबाजूला नियोजित सूनबाई व त्यांचे कुटुंब होते. ओक यांनी माझा त्यांच्याशी परिचय करून देताना, त्यांना ‘सरांची अगदी आदर्श अशी ‘घरकुल’ म्हणून संस्था आहे’ हे आवर्जून सांगितले! मतिमंदांसाठी कार्यरत माझ्या संस्थेशी ओक यांचा संबंध पंधरा वर्षांचा आहे व त्यांना संस्थेविषयी आस्था आहे. तेपण माझ्याशी स्नेहबंध असण्याचे कारण असू शकेल.

आम्ही भोजनानंतर भरल्या पोटाने, मनाने ओक कुटुंबाचा निरोप घेतला. जस्टीससाहेबांनी रात्री विमानतळावर सोडण्याचीही शाही व्यवस्था केली होती.

रामशास्त्री बाण्याचा आमचा हा न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयात जाईल हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिष्याची गरज नाही!                 

- अविनाश बर्वे 9869227250
avinash.d.barve@gmail.com 

लेखी अभिप्राय

आम्हा ठाणेकरांसाठी अत्यंत आनंदाची तसेच अभिमानाची बाब आहे. शब्दांकनदेखील खूपच छान!

CA Subhahash Shah29/06/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.