शब्दनिधी


-heading-shabdanidhiतुकारामाने म्हटले आहे : ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’. भाषेकडील या रत्नांचा खजिना म्हणजेच शब्दनिधी. कोणत्याही नैसर्गिक भाषेकडील तो खजिना कधी कमी होत नाही, तो सतत वाढत असतो. माणसाला शब्दांची गरज, घडणाऱ्या घटना-वाटणाऱ्या भावना-विचार इत्यादी इतरांना सांगण्यासाठी भासत असते. आणि ते शब्दच त्याच्या भाषेत उपलब्ध नसतील तर तो नवीन शब्द घडवतो, अन्य भाषांतून आयान करतो, किंवा जुने शब्द नव्या अर्थाने वापरतो. म्हणून भाषेतील शब्दनिधी नुसता अक्षय असतो असे नाही; तर तो सतत बदलता, वाढता असतो. त्यामुळे भाषेतील शब्दांची नेमकी संख्या सांगणे शक्य नसते. मात्र एखाद्या विशिष्ट वेळी भाषेत किती शब्द आहेत यांची मोजदाद करणे संगणकामुळे शक्य झाले आहे.

मराठीतील शब्दांची ज्ञात असणारी पहिली मोजणी मोल्सवर्थच्या शब्दकोशामुळे झाली. त्या वेळी, म्हणजे 1857 साली, मराठीतील शब्दांची संख्या साठ हजार होती. ओल्ड इंग्लिश (किंवा अँग्लोसॅक्शन) भाषेतही इसवी सन 700 ते 1100 त्या काळात साठ हजारच शब्द असावेत असे तज्ज्ञ मानतात. पण नंतरच्या सुमारे एक हजार वर्षांत इंग्रजीतील शब्दसंख्येने दहा लाख शब्दांचा टप्पा पार केला आहे. हार्वर्ड विद्यापीठ व गूगल यांनी 2010 मध्ये केलेल्या संयुक्त मोजणीत ती संख्या दहा लाख बावीस हजार असल्याचे आढळले. म्हणजे इंग्रजीत दर वर्षी सुमारे एक हजार शब्दांची भर पडत गेली (एकट्या शेक्स्पीयरने इंग्रजीत सतराशे शब्दांची भर घातली!)

मराठीतही    1857 ते 1932या पंच्याहत्तर वर्षांत सुमारे सत्तर हजार शब्दांची भर पडली. य.रा. दाते आणि चिं.ग. कर्वे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र शब्दकोश’च्या आठ खंडांतील (प्रसिद्धी 1932-38) शब्दसंख्या आहे एक लाख तीस हजार सहाशे सत्तर. त्या काळातील इंग्रजी शिक्षणाचा प्रसार, व्यापार व उद्योगांतील वाढ, वृत्तपत्रे व भाषांतरे यांची सुरुवात, स्वातंत्र्य चळवळ, पहिले महायुद्ध अशा घटनांमुळे शब्दसंख्येत भर पडणे साहजिक आहे. पण दाते/कर्वे यांच्या शब्दकोशानंतर सुमारे पंच्याहत्तर वर्षांनी म्हणजे 2013 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सहा खंडांच्या शासकीय कोशातील शब्दांची संख्या आहे फक्त एक लाख बारा हजार! म्हणजे पंच्याहत्तर वर्षांत मराठीची शब्दसंख्या वाढण्याऐवजी घटली! त्या पंच्याहत्तर वर्षांत दुसरे महायुद्ध झाले, अणुबाँब स्फोट झाला, भारत स्वतंत्र झाला, महाराष्ट्र राज्य स्थापन झाले, शिक्षणाचा समाजाच्या तळागाळापर्यंत प्रसार झाला, माणूस चंद्रावर पोचला, ग्रामीण, दलित, आदिवासी समूह लिहू लागले. प्रचंड शास्त्रीय प्रगती झाली – पण मराठी भाषेतील शब्दांची संख्या मात्र कमी झाली!

भाषेत शब्द जितके जास्त तितकी ती भाषा संपन्न, प्रगत. म्हणूनच इंग्रजी भाषा मराठीपेक्षा अधिक संपन्न समजली जाते. पण भाषेच्या समृद्धीचे, वैभवाचे आणखी एक परिमाण आहे. एकाच संकल्पनेसाठी भाषेत असणाऱ्या शब्दांची संख्या हे ते परिमाण! ‘बर्फ’ या संकल्पनेसाठी मराठीत तीन शब्द आहेत: बर्फ, हिम आणि गारा. कारखान्यात तयार होतो तो दगडासारखा घट्ट बर्फ. आकाशातून पावसासारखा भुरुभूरू पडणारा बर्फ म्हणजे हिम आणि आकाशातून पावसाबरोबरच पडणारा कमीअधिक आकाराचा बर्फ म्हणजे गारा. त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा बर्फ मराठीला माहीत नाही. मराठी माणूस गरज पडेल तेव्हा अन्य शब्दांची जोड देऊन त्याचे काम भागवतो. उदाहरणार्थ, बर्फाचा चुरा, किंवा बर्फाचा कीस, बर्फाचा गोळा, बर्फाचा खडा. त्यांना आपण सामासिक शब्द बनवून मराठीतील शब्दसंख्या वाढवू शकतो. उदाहरणार्थ, चुरा बर्फ, कीस बर्फ, गोळा बर्फ, खडा बर्फ इत्यादी. एस्किमो लोकांच्या भाषेत बर्फासाठी‘डझनावारी नाही तर अक्षरश: शेकडो शब्द आहेत’ असे विधान फ्रान्झ बोझ या मानववंशशास्त्रज्ञाने १९११ साली केले आणि भाषाभ्यासाच्या क्षेत्रात खळबळ माजली. मागासलेल्या एस्किमो लोकांची भाषा इतकी समृद्ध कशी असे कोडे पडलेल्या अनेक भाषाभ्यासकांनी एस्किमो भाषांचा (भाषेचा नव्हे; कारण एस्किमोंची इन्युइट ही भाषा म्हणजे अनेक भाषांचा समूह आहे) अभ्यास केला. त्यांना असे आढळले, की त्या भाषांत मूळ शब्द किंवा धातू कमी आहेत, पण त्यांना लागणाऱ्या प्रत्ययांची संख्या मात्र मोठी आहे! एकाच मूळ शब्दाला वेगवेगळे प्रत्यय लावून त्या मूळ शब्दाशी संबद्ध असलेल्या गोष्टींसाठी, क्रियांसाठी आणि अर्थांसाठी जो शब्दसंग्रह किंवा खजिना तयार होतो, तीच त्या भाषांची श्रीमंती! त्यामुळे कमीत कमी मूळ शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणे हे त्या भाषांचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे.

माणूस आणि त्याच्या भाषेतील शब्दसंग्रह यांच्यामधील संबंध त्रिस्तरीय असतो. तो भाषा बोलतो, लिहितो हा तो आणि त्याची भाषा यांच्यामधील संबंधाचा पहिला स्तर. तो भाषा ऐकतो आणि वाचतो हा त्याचा तिच्याशी असलेल्या संबंधाचा दुसरा स्तर. आणि तो मुद्दाम शब्दकोश उघडून बघतो, त्या वेळी तिच्याशी येणारा संबंध हा तिसरा स्तर. माणसाचा ज्या शब्दांशी त्या तीन स्तरांवर संबंध येतो त्यांची संख्या भिन्न भिन्न असते. सर्वसामान्य माणूस बोलतो आणि लिहितो त्या शब्दांची संख्या फार मर्यादित असते – सुमारे दोन ते तीन हजार. कसलेला वक्ता किंवा लेखक वापरतो त्या शब्दांची संख्या सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त, पण मर्यादित असते – सुमारे चार ते पाच हजार (वेगवेगळ्या लेखकांच्या संदर्भात त्यांनी वापरलेल्या शब्दांची मोजणी करण्याचे संशोधन-प्रकल्प हाती घेता येतील). त्या शब्दनिधीला क्रियावान (अॅक्टिव्ह व्होकॅब्युलरी) म्हणतात. दुसऱ्या स्तरावरील (ऐकल्यावर किंवा वाचल्यावर कळणारी, ओळखू येणारी) शब्दसंख्या त्यापेक्षा बरीच जास्त सहा ते दहा हजारांपर्येत असते (ही शब्दसंख्या व्यक्तीच्या सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमीवर अवलंबून असते). शब्दनिधी या शब्दसंख्येला आकलन शब्दनिधी (पॅसिव्ह व्होकॅब्युलरी) म्हणतात. भाषेतील इतर सर्व शब्दांचा समावेश शब्दनिधीत होतो. भाषेच्या तिन्ही स्तरांवरील शब्द भाषेच्या एकूण शब्दनिधीत समाविष्ट असतात.

एखाद्या भाषेचा विकास आणि त्या भाषकांचा सर्वांगीण विकास परस्परपूरक असतात आणि परस्परावलंबीही! माणसाच्या सर्व भावनिक, सामाजिक, आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्याने त्याच्या भाषेचा वापर केला तरच त्याची भाषा विकसित होते. भाषा विकसित होत जाते. म्हणजे तिचा शब्दनिधी संपन्न होत जातो. संपन्न ऐहिक जीवन जगण्यासाठी संपन्न आर्थिक निधीची गरज असते, त्याचप्रमाणे संपन्न सामाजिक, भावनिक, इतकेच काय आत्मिक जीवन जगण्यासाठी संपन्न शब्दनिधीची गरज असते.

-प्र.ना. परांजपे  9422509638 
pranaparanjpe@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.