मराठी गझल - अहाहा! टमाटे किती स्वस्त झाले !


चंद्रशेखर सानेकर यांच्या "गझल आणि ‘ग्रामीण गझल’" या लेखाच्या निमित्ताने ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ...

1. चंद्रशेखर सानेकर यांचा (एकूणच मराठी) गजलेच्या ‘सपाटपणा’वरील आक्षेप योग्यच आहे.  2. मराठी गजलची वाढ संख्यात्मक झाली आहे, गुणात्मक दर्जा घसरला आहे ही खंत माजी संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे ह्यांनीही व्यक्त केली होती. 3. त्यातून मार्ग कसा काढायचा ह्यावर मतभिन्नता असू शकते. 4. मी चंद्रशेखर सानेकर यांच्या लेखनावर टिप्पणी करणार नाही, पण ह्या विषयावर काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो.

4.1बहर, काफिया, अलामत, रदीफ ह्या तांत्रिक गोष्टी आल्या म्हणजे गजल ‘जमली’ किंवा ती लिहिणाऱ्याला ‘वश झाली’ हा प्रचंड गैरसमज कार्यशाळांतून पसरला गेला आहे. त्यामुळे गजलीयत किंवा शेरीयत हेच गजलेचे किंवा शेराचे व्यवच्छेदक लक्षण आहे हेच विसरले गेले आहे.
गजलीयत शिकवता येत नाही. तिची व्याख्या करता येत नाही. ‘होसला अफजाई’ किंवा प्रोत्साहन देण्याच्या नादात सुमार किंवा गजलच नाही अशा रचनांना दाद देणे सुरू झाले आहे.

4.2 स्पष्ट बोलणारा माणूस अप्रिय ठरतो. कोणालाच अप्रिय होण्याची इच्छा नसते. 4.3 सुरेश भट यांनी मराठी गजलचे नियम ठरवताना फारसी किंवा उर्दू लिपीचे नियम देवनागरी लिपीवर लादले. परिणामी काफिया हा स्वरसाम्यतेने सिद्ध होतो, व्यंजनसाम्यतेने नाही हे महत्त्वाचे सूत्र हरवले गेले. दिया आणि हवा हे शब्द उर्दूत काफिया होतात. (‘आ’ स्वरसाम्यता) मराठीत मात्र दिया/लिया/गया/नया... असेच हवे किंवा हवा घेतल्यास हवा/नवा/थवा/कारवा... असेच करावे लागते. काफियाची तथाकथित तंत्रशुद्धता सांभाळताना मराठी गजल कृत्रिम होत गेली आहे. शिवाय, कालांतराने, काफियाचे तेच ते संच वापरावे लागल्याने एकसुरी होत गेले आहेत. मराठी गजलेचे मूळ दुखणे हे आहे. (किंवा) वेगळी परिभाषा वापरणे झाल्यास ‘ओरिजिनल सिन’ म्हणू या. तेव्हाच दिया/हवा सारखे स्वरसाम्यतेने सिद्ध होणारे काफिये मान्य केले असते तर आज चित्र वेगळे दिसले असते.

 

-sadanand-dabir4.4 मी माझ्या सुरेश भट यांच्याशी 1984 साली पुण्याला झालेल्या भेटीत तो विषय छेडला होता. त्याकाळी प्रचंड गाजलेली उर्दू गजल ‘हंगामा है क्यों बरपा थोडी सी जो पी ली है डाका तो नही डाला चोरी तो नहीं की है’ ही उद्धृत करून मी शंका विचारली, की ‘है’..हा रदीफ आणि ‘ली’ व ‘की’ हे काफिये आहेत. ते हो म्हणाले. मी विचारले, की हे काफिये कसे चालतात? त्यावर भट म्हणाले, ‘उर्दूत तशी सूट आहे’. मराठी गजलने तशी सूट सुरुवातीच्या काळात घेतल्यास सगळे तसेच लिहू लागतील. म्हणून मी शुद्ध काफिया वापरणार व इतरांनाही शुद्ध काफियाच वापरण्यास लावणार. काही वर्षें गेली, ‘मराठीत गजल रुजली की मग बघू.’

4.5 आम्हाला मराठीत गजलची माहितीच नव्हती. घोर अज्ञान होते. भट यांचा शब्दच अंतिम असायचा. पण त्याकाळी कोणी सुरेश भट यांना सांगितले असते,  की वरील काफिये हे ‘सूट’ नसून योग्य आहेत. कारण उर्दू लिपीत स्वरांसाठी रोमन लिपीप्रमाणे अक्षरे आहेत. देवनागरीत काना-मात्रा-वेलांटी-उकार इत्यादीसाठी चिन्हे आहेत. तर चित्र वेगळे झाले असते.

5. आजही भटप्रणित गजल व गजलची बाराखडी अंतिम मानणारे गजलकार ‘स्वरांच्या काफिया’ला (हा शब्दप्रयोगही चूक आहे. पण असो) मान्यता देत नाहीत. आजची मराठी गजलची दुरवस्था बघून कदाचित भट यांनी दिया/हवा सारख्या काफियांना मान्यता दिली असती. नाही तरी ‘पुढे बघू---’ असे ते म्हणाले होतेच!  

अजून एक मुद्दा आहे गजलच नाही तर सर्वच साहित्याशी संबंधित असा. साहित्य साधारणतः सार्वकालीन किंवा समकालीन असे विभागता येते. तत्कालीन हा समकालीनचा आणखी एक पोटभेद करता येईल.

●सार्वकालीन साहित्य हे अ-क्षर साहित्य असते. ते बहुधा मानवाच्या मूलभूत अस्तित्व-जाणिवांशी संबंधित किंवा पारलौकिक स्वरूपाचे असते.

●समकालीन साहित्य  त्या त्या परिस्थितीतून मर्यादित आकलनातून जन्म घेते. काही पिढ्याच टिकते. उदाहरणार्थ पु.लं.ची बटाट्याची चाळ आज कालबाह्य वाटते तसे.

●तत्कालीन तर फारच अल्पजीवी असते. जसे राजकीय/सामाजिक संदर्भात काही घटना घडल्यास त्यावरील कविता/ साहित्य बहरात येते व लगेच ओसरते.  

5.1फक्त सार्वकालीन साहित्य तेवढेच खरे--असे काही नसते. समकालीन प्रश्नांवरचे साहित्यही आवश्यक असते. काही पिढ्या ते निश्चितच परिणाम करते.

5.2 सार्वकालीन साहित्याचा पेच असा, की वर्तमानात ते तसे असल्याचे ठरवण्याची कोठलीही कसोटी नसते. तो फैसला केवळ काळ करू शकतो. काळाची कसोटी ही एकमेव कसोटी आहे. त्यामुळे कवी-लेखकाच्या हयातीत त्याला तो मान मिळणे अशक्य असते.

5.3 सार्वकालीन साहित्य/कविता/गजल कोठल्याही भाषेत फार क्वचित अवतरतात. असे लिहिणा-या कवीचेही सगळे साहित्य अक्षर नसते. तसा कवीही शतकांतून एखादाच असतो.

5.4 तेव्हा हे निकष समकालीन साहित्याला लावण्याची गल्लत न केलेली बरी.
सुरेश भट यांनीही ‘सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती’ असे लिहून ठेवले आहे.

5.5 समकालीन, क्वचित तत्कालीन साहित्याचे प्रवाह असतात. ते येतात काही काळ चालतात व नंतर बाद होतात. दलित कविता, ग्रामीण कविता, स्त्रीवादी कविता हे तसेच प्रवाह आहेत. ते येतील व जातील. त्यावर कोणाचा काही अंकुश असू शकत नाही. नसावा.

6. सुरेश भट यांनी असेही म्हटले आहे, की वाचला किंवा ऐकला की जो शेर मनात, हृदयात कायमचा वस्तीला येतो तो चांगला शेर. पण तो निकष फसवा आहे. सुमार दर्ज्याच्या पण तत्कालीन संदर्भातील ओळीही लगेच पाठ होतात, पण त्या अभिजात नसतात.

6.1 सर्वसामान्य जनताच कवीचा फैसला करत असते. असेही भट म्हणत. त्यातूनही जे लोकप्रिय ते अभिजात असे चुकीचे समीकरण रुढ होऊ शकते.

6.2 आज नेमके तेच होत आहे. सुमार दर्ज्याबद्दल (शेर/गजलेच्या सपाटपणाबद्दल?) कवीला काही सांगण्यास गेले तर... त्याला त्याच शेराला/गजलेला मुशाय-यात प्रचंड दाद मिळत असते. त्यामुळे त्याला तसे सांगणारा ज्येष्ठ कवीही आवडत नाही- पटत नाही. उलट, तो मनोमन त्याला दाद मिळते म्हणून हे सिनीअर्स त्यावर जळतात असे ठरवून मोकळा होतो. तेव्हा कोणी कोणाला सांगण्यापेक्षा काळावर फैसला सोपवावा हे बरे.

7. शेवटचा मुद्दा, ‘जनतेची जशी योग्यता असते तसे सरकार त्यांना मिळते’ असे एक वाक्य आहे. तेव्हा लोक जर सुमार रचनांना दाद देणार असतील तर तशाच रचना त्यांना मिळणार.

7.1माझा स्वानुभव सांगतो. गोरेगावच्या अत्रे कट्टयावरील गजलविषयक कार्यक्रमात बोलताना मी मुद्दा मांडला की... बहर, काफिया, अलामत, रदीफ सगळे तंत्र सांभाळून लिहिलेल्या दोन ओळी म्हणजे शेर असतोच असे नाही. त्याच दिवशी नेमके भाजी बाजारात टमाटे खूप स्वस्त दहा रुपये किलो झाले होते. मी उदाहरण म्हणून दोन ओळी रचून दाखवल्या.

अहाहा टमाटे किती स्वस्त झाले |
पाहता पाहता कसे फस्त झाले! ||
हा शेर होत नाही. हेच मी सांगितले. खरा धक्का पुढेच आहे. काही महिन्यांनी एका मित्राचा फोन आला.

7.2 तो बदलापूरच्या एका गजलच्या कार्यक्रमाला श्रोता म्हणून गेला होता. त्याने सांगितले, की निवेदकाने माझे नाव सांगून एक शेर वाचला. खूप दाद घेतली! साहजिकच त्याला बरे वाटले. मी खूश होऊन त्याला विचारले, कोठला शेर? तो म्हणाला...
‘अहाहा टमाटे किती स्वस्त झाले!’

मी कपाळावर हात मारून घेतला. तेव्हा जसे लोक, तसे सरकार व तसेच साहित्य असणार. काही बोलणे अरण्यरुदनच!

- सदानंद डबीर  sadananddabir@gmail.com
 

 

लेखी अभिप्राय

उर्दू,हिन्दी,गुजराती व मराठी गजलच्या संदर्भात सांगायचे झाले तर प्रत्येक गजलकाराच्या मते
1 गजल सर्जनात संख्यात्मक वाढ झाली (फक्त मी सोडून)
2 गुणात्मक वाढ मी सोडून इतरांच्या गजलेत झालेली नाही.

Dr.RAM PANDIT02/04/2019

स्वस्त ग़ज़ल पटत नाही म्हणून मी फार लिहितही नाही. अन्यथा शेर म्हणून खोबऱ्याच्या वड्या खूप पाडता येतील. हल्ली कार्यक्रमात एकतर स्वस्त ग़ज़ल सादर केल्या जातात किंवा काही चांगल्या असल्या तरीही त्याच त्याच ग़ज़ल पुन्हा सादर केल्या जातात म्हणून मी कार्यक्रमांनाही जात नाही.
-
आतून पोकळी अन आकार फार मोठा
ही एक लोकशाही की बुडबुडाच आहे ?

अशीच गत मराठी ग़ज़लची होत आहे...

अभिमन्यू य. अळतेकर02/04/2019

आपल्या विचारांशी १००% सहमत.

Santosh Borgaonkar03/04/2019

अहाहा टमाटे किती स्वस्त झाले ।
पाहता पाहता किती ? अस्त झाले!||
ट्रक मधून बघता बघता किती रस्ती आले ।।।

Prakash morey03/04/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.