बारबाला, सायबर सेक्स आणि आम्ही!


आर आर पाटील यांनी ते महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना ‘डान्सबार बंदी’ आणली होती. त्या निर्णयाने मुंबईसह सारा महाराष्ट्र ‘बारबाला’ या विषयावरील चर्चेने घुसळून निघाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात मुंबईतील डान्सबार रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालू ठेवता येतील असा निर्णय दिला. त्यामुळे पुन्हा एकदा बारबाला, त्यांचे शोषण, त्यांच्याकडे जाणारे ग्राहक आणि त्या सगळ्याकडे तटस्थपणे पाहणारा समाज या संदर्भात प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. पूर्वी वेश्याव्यवसायाचे प्रतीक ‘फोरास रोड’ वगैरे होते. तो व्यवसाय सायबरयुगात ऑनलाईन झाला. पण त्या व्यवहारातील पुरुषांची लैंगिक भूक, आंबट शौक, वेश्यांची अगतिकता, कायदा, पोलिसांची संदिग्ध भूमिका आणि समाजाची संवेदना हे घटक फार पूर्वीपासून होते तसेच आहेत. बेकायदा डान्सबारवर कधी तरी धाड पडते आणि सगळी माध्यमे त्यासंबंधीच्या बातम्यांनी दोन-तीन दिवस रंगून जातात. मुळात, प्रसारमाध्यमे अशा नाट्यपूर्ण घटनांची वाटच पाहत असतात! पण लोकांच्या भुवया त्यांच्या शहरात त्यांच्या शेजारी डान्सबार आहेत किंवा वेश्याव्यवसाय सायबर मार्केटसारख्या हायफाय लेव्हलवरूनही चालत असतो अशा भावनेने उंचावल्या जातात; त्यांना काही प्रमाणात अस्वस्थता येते.

खरे तर, त्यात फारसे नवीन काही नाही. त्या व्यवसायाचा इतिहास प्राचीन आहे. ‘मृच्छकटिक’ नाटकातील वसंतसेना असो, की पुराणातील रंभा-अप्सरा असोत, त्यासुद्धा तत्कालीन ‘हायफाय’ गणिकाच होत्या. त्यांचे कार्य इंद्राच्या सभेत नृत्यगायन करून देवांना व कुलीन पुरुषांना शृंगारसुख देणे हे असे. मध्ययुगातील मुस्लिम राजवटीत तर सर्वसामान्य गणिका बादशहाच्या कृपेने बेगम बनत असत. गणिका सरकारी कृपेने प्रथम ‘खवासी दासी’ म्हणून बादशहाच्या नृत्यशाळेत दाखल होत. पुढे, त्यांनी कौशल्य दाखवल्यास त्यांची ‘परी’ या पदावर बढती होई. त्यांपैकी जिचे सौंदर्य व वागणूक यांमुळे राजा आकर्षित होई तिला ‘रखेली’ म्हणून ठेवत. पुढे, तिला राजापासून मुलगा झाला तर तिला ‘महल’ म्हणजे राणी असा किताब मिळे. त्याचा अर्थ हायफाय वेश्यावृत्ती ही प्राचीन आहे. फक्त त्या व्यवसायाची जाहिरात इंटरनेटवरील वेबसाईट्सचा वापर करून करण्याचे प्रकार आधुनिक आहेत. डान्सबारवर छापा अचानक का घातला जातो आणि वेश्यांची कधी कधीच अचानक धरपकड का होते? हा खरा प्रश्न आहे. देहव्यापार खुलेआम करण्यास कायद्याने बंदी असली तरी तो चालूच आहे. माणसाच्या शरीराचा दुखरा अवयव असू शकतो, तो अपरिहार्यपणे सांभाळावा लागतो, तसा देहव्यापार हा समाजरूपी देहाचा भाग झाला आहे. देहव्यापारावर बंदी आणण्याचे कायदे खूप गुतांगुतीचे व क्लिष्ट आहेत. त्यामुळे नेमकी बंदी कशावर आहे आणि कशावर नाही ते समजणे सोपे नसते. मुद्दा असा की तो व्यवसाय करण्यास कायद्याने बंदी असली तरी तो लपूनछपून करण्याला समाजाची मान्यता आहे, असा याचा अर्थ होतो.

सामाजिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांना मात्र वेश्याव्यवसाय हे अन्य सामाजिक प्रश्नांचे एक उत्तर वाटते. डॉ. सुनंदा जोशी यांनी मुंबई विद्यापीठात 1985 च्या सुमारास 1970 ते 1978 या कालखंडातील महिला गुन्हेगारीवर संशोधन केले होते. त्यांचा निष्कर्ष असा, की ‘‘वेश्याव्यवसाय नसता तर देशातील गुन्हेगारीचे प्रमाण व पुरुषांमधील विकृतीचे प्रमाण वाढले असते. वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया अशिक्षित आणि आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या असतात. त्यांना दुसरा पर्यायच नसतो. सुनंदा जोशी यांच्या मते, ‘‘त्या स्वतःच्या इच्छेने पोटापाण्यासाठी जर हा व्यवसाय पत्करत आहेत, तर त्यात सरकारने लक्ष घालण्याचे कारणच काय? त्या धंद्याला आर्थिक भांडवल लागत नाही, शिक्षण लागत नाही. वेश्याव्यवसायच नसता तर त्यांनी दुसरे कोणते काम केले असते? त्यांना पैशासाठी चोऱ्या-घरफोड्या कराव्या लागल्या असत्या. त्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असती! म्हणजे वेश्याव्यवसायामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसला आहे.’’

सुनंदा जोशी यांचा आणखी एक निष्कर्ष असा, की “स्त्रिया जसजशा शिकू लागल्या, तसतशा त्या पुरुषांच्या दास्यातून मुक्त होऊ लागल्या. आर्थिक-मानसिक स्वातंत्र्य आले, समानतेची कल्पना मूळ धरू लागली. पुरुषांची जागा स्त्रियांनी नोकरी, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत घेतली. पण स्त्रीस्वातंत्र्यामुळे ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारी वाढली. स्त्रियांना कर चुकवणे, भ्रष्टाचार, धंद्यात फसवेगिरी, कायद्यातील पळवाटा शोधून सरकारला फसवणे या गोष्टी सहज जमू लागल्या. स्त्रीस्वातंत्र्यामुळे उच्चस्तरीय वेश्या व्यवसायातही वाढ झाली. चांगल्या व उच्च घराण्यातील अनेक स्त्रिया त्यांच्या पतींच्या संमतीनेच केवळ पैशांसाठी, छानछौकीसाठी खुद्द तो व्यवसाय पत्करू लागल्या आहेत. मुंबईसह अनेक मोठ्या शहरांत राहणाऱ्या घरंदाज बायका त्यांची हौस दोन ते पाच हजार रुपये नाईट घेऊन भागवत आहेत.” पण सुनंदा जोशी यांनी स्त्रीशिक्षण, समानता आणि स्वातंत्र्य यांचा संबंध भ्रष्टाचार, स्वैराचार व अनैतिकता यांच्याशी जोडला आहे, तो खरा आहे का?

समाजातील उच्चभ्रू वेश्यावृत्ती या समस्येचे दोन पैलू महत्त्वाचे आहेत. पहिला कायद्याच्या संदर्भातील. कायद्याचा भंग करणाऱ्या वेश्यांना पकडले जाते. तोंड झाकलेल्या वेश्यांना पोलिस चौकीत घेऊन जातानाचे दृश्य नेहमी दिसते (मात्र त्यांच्यासह सापडलेल्या गिऱ्हाइकांचे पुढे काय होते, ते कळत नाही). म्हणजे एवीतेवी समाजात वेश्यावृत्ती वाढत आहे. अधिक उच्च स्वरूप धारण करत आहे; हे कटू असेल, पण सत्य आहे. मग या व्यवसायाला कायदेशीर मान्यता का देऊ नये? नेमका हाच प्रश्न महाराष्ट्राचे राज्यपाल महंमद फजल यांनी मुख्यमंत्र्यांना एका पत्रातून पंधरा वर्षांपूर्वी विचारला होता. त्यावर महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला होता. पण त्याहीपूर्वी, प्रसिद्ध विदुषी व समाजशास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांनाही वेश्याव्यवसाय हा सरकारमान्य व्यवसाय व्हावा असे वाटत होते. दुर्गाबाई तमाशा परिषदेच्या अध्यक्ष असताना त्यांनी वेश्यांचा अभ्यास पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने केलेल्या तमासगिरांच्या जीवनाचा सर्व्हेच्या निमित्ताने 1956 मध्ये केला होता. पुढे, मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’नेही मुंबईतील वेश्याव्यवसायाचा अभ्यास करताना दुर्गाबार्इंचे मत मागितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘युरोपातील जेन काय किंवा आमची जनी काय, दोघी मुळात एकच. त्यांचा अभ्यास करणे झाले तर, वेश्यांकडे जाणाऱ्या पुरुषांचाही सर्व्हे करण्यास हवा. कारण पुरुष वेश्यांकडे जातात, ते केवळ सेक्ससाठी असते असे नाही.’’ दुर्गाबार्इंची ती सूचना टाटा इन्स्टिट्यूटच्या पचनी पडली नाही. दुर्गाबार्इंच्या मते, ‘‘भारतीय समाजातील सेक्शुअॅलिटीचे प्रश्न फार जटिल आहेत. म्हणून त्या प्रश्नांची तड लागत नाही, लागणारही नाही. कोणत्या बायका वेश्या होतात? का होतात? त्या जगतात कशा? या प्रश्नांची उत्तरे शोधणे अशक्य नाही. पण ते धाडस करण्याची मानसिकता कधीच निर्माण होत नाही.’’ दुर्गाबार्इंचे निरीक्षण लक्षात घेता, स्त्रीस्वातंत्र्यामुळे उच्चस्तरीय वेश्याव्यवसायातही वाढ झाली, वेश्या व्यवसाय नसता तर देशातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असते किंवा पुरुषांमधील विकृतीचे प्रमाण वाढले असते हे सुनंदा जोशी यांचे निष्कर्ष एकांगी वाटतात.

एकंदरीत वेश्याव्यवसायास कायदेशीर मान्यता द्यावी की नाही हा प्रश्न साधासरळ नाही. त्याला पुष्कळ कंगोरे आहेत. 1997 मध्ये कोलकात्यात देशभरातील दीड हजार वेश्यांचा मेळावा भरला होता, तोही गाजला. कारण इतिहासात घडलेली तशा प्रकारची ती पहिली व एकमेव घटना होती. तो  मेळावा कोलकात्यातील वेश्यांनी बोलावला होता. त्यांचे म्हणणे असे होते, की सगळ्या क्षेत्रांतील लोक त्यांच्या त्यांच्या संघटना बांधतात. मग आम्ही आमची संघटना करू, आम्हाला वेश्या न म्हणता लैंगिक कामगार (सेक्स वर्कर) असे म्हटले जावे. तसे झाले तर इतर कामगारांप्रमाणे वेश्यांनाही काही अधिकार मिळतील. बारबाला, मसाज वर्कर किंवा मॉडेलिंग यांच्या नावाखाली पोलिसांशी चाललेली लपाछपी बंद होईल. सेक्स वर्कर युनियन झाल्यावर पोलिसांचे हप्ते चुकवणे आणि त्यांची पिळवणूक बंद होईल. अर्थात हा केवळ आशावाद आहे!

स्त्रिया वेश्यावृत्ती का स्वीकारतात या प्रश्नाचे स्वरूप सायबर सेक्स मार्केटिंगच्या काळातही जुनेच आहे, हे लक्षात घ्यावे लागते. प्रसिद्ध बंडखोर लेखिका गीता साने यांच्या मते, स्त्रिया वेश्याव्यवसाय स्वीकारत नाहीत, तर परिस्थितीमुळे त्या तिकडे लोटल्या जातात. क्षुल्लक कारणांवरून घटस्फोट दिलेल्या, टाकून दिलेल्या, विधवा व लग्न न होऊ शकलेल्या स्त्रिया केवळ पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमुळे अगतिकतेने वेश्यावृत्ती पत्करत असतात. म्हणजे रेड लाईट एरिया असो, की इंटरनेटवरील वेबसाईट असो वेश्यावृत्तीचा उगम स्त्रीपुरुष संबंधातील दुटप्पी नैतिकतेमध्ये आहे. देवदासी, देवांगना, गणिका, कंचनी, रक्षा, सर्वसामान्य वेश्या असोत, की सिनेमा-मॉडेलिंगच्या आडून देहव्यापार करणाऱ्या कॉलगर्ल्स असोत, त्यामागे कारण विषम नैतिक मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था हेच आहे हे लक्षात येते. देहव्यापार करणाऱ्या स्त्रियांचे शोषण हा चिंतेचा खरा विषय आहे. भारतातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या वस्त्या सर्वात अधिक अस्वच्छ आणि असुरक्षित असतात. त्यांच्या वाट्याला जनावरांप्रमाणे जगणे येते. दलाल आणि पोलिस यांच्या जाचाने वेश्यांना गुलामाचे जीवन जगावे लागते. मुंबईतील ग्रांटरोडवरील एका गुप्त डान्सबार अड्ड्यावर छापा 2018 मध्ये जून महिन्यात टाकण्यात आला. तेव्हा तेथील संडासाच्या भिंतीमागे अंधाऱ्या खोलीत बारबालांना ठेवल्याचे आढळून आले. तेथे हवा येईल अशी कोणतीही फट नव्हती, पाणी नव्हते. बारबालांना अक्षरश: झुरळांसारखे तेथे कोंबलेले होते. ते सगळे पोलिसांच्या भीतीने. स्वतःच्या आणि कुटुंबातील इतरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्या स्त्रियांना तसे नरकासारखे जीवन जगावे लागत असेल, तर ते  स्मार्टसिटी आणि विकास यांच्या मोठमोठ्या वल्गना करणाऱ्या समाजाला कलंक आहे असेच म्हणावे लागते.                

दुसऱ्या बाजूला, महानगरांमधील गुंतागुंतीची जीवनशैली केवळ व्यापारी-आर्थिक संबधांनी नियंत्रित झालेली आहे. तेथे स्त्रीपुरुषांमधील संबंध हे निखळ मानवी भावना, संवेदना व सौंदर्य यांवर आधारलेले राहिलेले नाहीत. ते दूषित झाले आहेत. घर-कुटुंब हेही त्यातून सुटलेले नाहीत. तेथे मैत्री, प्रेम, लैंगिक संबंध हे निरपेक्ष उरलेले नाहीत. किंबहुना व्यावसायिक निष्ठेतून प्रेम-शरीरसंबंध आणि वेश्यावृत्ती यांच्यातील सीमारेषाच पुसट होत चाललेल्या आहेत. मधुर भांडारकर यांच्या अनेक चित्रपटांचे विषय त्याच प्रकारचे असतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराला संगणकप्रणाली आणि उपग्रहसंदेशवहन यांमुळे मेट्रोसिटी आणि लहान शहरे यांच्याही सीमा उरलेल्या नाहीत. सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी (म्हणजे पुरेसा पैसा असलेल्यांना) घरबसल्या मिळू शकतात. त्याला देहव्यापारही अपवाद कसा राहणार? आणि त्या व्यापारातील एजंट इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर कसा सोडणार?

सायबरयुगात अमर्याद वेगाने सुरू असलेल्या प्रगतीचा हाही एक मानवी चेहरा आहे.

 - प्रमोद मुनघाटे ,Pramodmunghate304@gmail.com,7709012078

सी-301, शेवाळकर गार्डन, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर-440022
 

 

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.