खुज्या माणसांचा साहित्यसंस्कृती प्रदेश


खरेच, आपण स्वतंत्र आहोत का? नयनतारा सहगल यांनी विचारलेला हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. मराठी साहित्य व राजकारण यांच्या समोर मूल्यांचा पेच त्यातून उभा राहतो. आपले सांस्कृतिक आचरण दिवसेंदिवस इतके संकुचित होऊ लागले आहे, की साहित्य आणि समाज यांचा काहीएक संबंध आहे हेही मराठी माणूस विसरून गेला आहे. दरम्यान, मराठी माणसाच्या राजकीय महत्त्वाकांक्षा मात्र टोकदार होऊन गेल्या आहेत. ते धर्माच्या, जातीच्या आणि प्रादेशिक अस्मितेच्या अभिनिवेशातून घडले आहे.

मराठी माणसाचा लढाऊ बाणा, मराठी संस्कृतीचा गौरवशाली इतिहास आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा या वैभवाला साज चढवण्यासाठी जे प्रयत्न साहित्य, समाज आणि कला क्षेत्रांत झाले त्यांनाही मोठी प्रतिष्ठा लाभली आहे. पण मात्र आज महाराष्ट्रात राजकीय दंडेलशाही, रस्त्यांवरील धुमाकूळ, जाळपोळ, हिंसाचार, बलात्कार, विचारी कार्यकर्त्यांच्या हत्या या साऱ्या अनिष्ट गोष्टी ठळकपणे दिसतात. जगाने धुमसत्या महाराष्ट्राचे हे चित्र गेल्या काही वर्षांत पाहिले आहे. मराठी माणसांचा देश प्रचंड वेगाने खुज्या माणसांचा प्रदेश बनत आहे. हे सांस्कृतिक खुजेपण म्हणजे विचारसंपन्न मराठी माणसाला त्याचा महामृत्यूच वाटेल! माणसांपेक्षा त्याच्या सावल्या मोठ्या झाल्या आहेत. ही सायंकाळची लक्षणे आहेत. त्यापुढे रात्र तर नाही? अशी चिंता वाटते.

साहित्य आणि कला यांची मुख्य जबाबदारी माणसांना विचारसंपन्न बनवणे ही असते. साहित्याचा निरपेक्ष हेतू कलेच्या निखळ आणि नितळ आनंदात न्हाऊ घालून माणसांना दुःखमुक्त करणे हाही असतो, पण गेल्या काही वर्षांत मराठी साहित्यविश्व एकीकडे व्यवहारी आणि दुसरीकडे उत्सवप्रिय बनले. तशा व्यवहारी आणि उत्सवप्रिय गोष्टींना शिकार बनवणे राजकारणाला फार सोपे असते. बांधिलकी व निष्ठा हे लेखकाचे स्वाभाविक गुण असतात, पण भूमिका न घेणारे संयोजक-लेखक जेव्हा अधिकाधिक उंच होतात तेव्हा एकूण साहित्यव्यवहारापुढे प्रश्न उभे राहतात. अशा वेळी डावी आणि उजवी अशा दोन समांतर फळ्या पडणे व त्यांची स्वतंत्र संमेलने उभी राहणे साहजिक घडते. त्यामुळेच विद्रोहाचा आवाज बुलंद करणारी छोटीमोठी साहित्य संमेलने महाराष्ट्रात भरू लागली. ग्रामीण, आदिवासी, मुस्लिम अशा स्वतंत्र संमेलनांनी वैचारिक भूमिका घेऊन साहित्यव्यवहार हा सांस्कृतिक परिवर्तनाचा प्रागतिक मार्ग बनवला, पण मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाला मात्र स्वतःचा मार्ग सापडलेला नाही.

मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाने कथनी आणि करनी यांत नेहमीच अंतर ठेवले, त्याचा परिणाम ठळकपणे दिसू लागला आहे. जात आणि धर्म अशा कालबाह्य कल्पना डोक्यात घेऊन माणसे जेथे जेथे जातात तेथे तेथे ती साहित्य व कला यांचा व्यवहार संकुचित करतात. मराठी साहित्यात अशा खुजा माणसांचा कळप सगळ्याच अभिव्यक्तिस्थळांना खुजे करत आहे. मराठी साहित्यात साचलेपण आले त्याची अनेक कारणे सांगता येतील. त्यांतील महत्त्वाचे कारण म्हणजे मराठी साहित्य पुरेसे परपुष्ट नाही. मराठीत भाषांतराकडे दुर्लक्ष झाले. सध्या भाषांतरित साहित्यास बहर आहे हे खरे, पण त्यामागे नियोजनबद्ध विचार नाही. लोकप्रिय, चित्रवेधक साहित्य अनुवादले जाते. वैचारिक साहित्याकडे दुर्लक्ष होते. नयनतारा सहगल म्हणतात, की भाषांतराच्या अभावाने आपण एकमेकांना वाचू शकलो नाही. जोवर आपण एकमेकांना वाचू शकत नाही तोवर आपण एकमेकांना समजून घेऊ शकत नाही. त्यातून सर्वांच्याच मनात माणुसकीचा दुष्काळ पडलेला आहे. अभिव्यक्तीच्या सर्व स्थळांवर सांस्कृतिक हुकूमत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. जागतिक अर्थकारणातून सांस्कृतिक साम्राज्यवाद येऊ पाहत आहे. मानवी जीवनात विचाराने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विचारसरणीत गोंधळ म्हणजे माणसाच्या सांस्कृतिक जगण्यात गोंधळ असे समीकरण ते आहे. समाजशास्त्रज्ञ कार्ल म्यानहाईम यांनी विचारसरणीबद्दल महत्त्वाचे सूत्र सांगितले आहे. त्यांच्या मते, विचारसरणींचा उदय त्या त्या व्यक्तीच्या सामाजिक संदर्भात होत असतो. व्यक्तीची विचारसरणीकडे पाहण्याची दृष्टीही तिला लाभलेल्या सामाजिक पार्श्वभूमीवर घडत असते. सध्या देशातील सामाजिक पर्यावरण वेगाने दूषित होत आहे. शिवाजी, शाहू महाराज, महात्मा फुले व आंबेडकर यांची मोठी विचारपरंपरा महाराष्ट्राला लाभली, पण तेथील सामाजिक पर्यावरण कधी नव्हते तेवढे उसवले गेले आहे. जातीय अस्मितांचा नवनवा टकराव रस्त्या रस्त्यांवर दिसत आहे. धर्माची नखे विस्तारली जात आहेत. महापुरुष आणि त्यांच्या जयंती हे राजकीय इव्हेंट बनले आहेत. त्यांचे नामोच्चार हे नाममहात्म्याचे बनले आहेत. तंत्रज्ञानाने माणसांच्या मेंदूचे सपाटीकरण करून त्यांना विचारसरणींपासून खूप दूर नेले आहे. त्याचा परिणाम म्हणजे तत्त्वशून्य राजकारण, वांझोटे साहित्य आणि दिखाऊ कला! राजकारणी त्या गोष्टींचा उपयोग मोठ्या चलाखीने करतात. राजकीय नेत्यांनी पोसलेला तरुण लुम्पेनवर्ग महाराष्ट्रात हवा तसा धुडगूस घालून सांस्कृतिक वर्चस्व मिळवू पाहत आहे. त्या पब्लिकला ना साहित्य, कला यांचे घेणेदेणे असते, ना संस्कृतीची कदर असते. त्याला हव्या असतात त्या केवळ चंगळवाद जोपासणाऱ्या खोट्या राजकीय श्रद्धा. तशा मूठभर दहशती माणसांच्या धमक्यांना बळी पडून मराठी साहित्य व्यवहार धर्मांधतेची शिकार बनत आहे. ती महाराष्ट्राची वैचारिक दिवाळखोरीच होय!

मराठी साहित्य संमेलनांविषयी अनाठायी चर्चा गेल्या काही वर्षांपासून होत आहे. अध्यक्षीय निवडणूक हा विषय या चर्चेचे केंद्र होता. काही काळ राजकीय हस्तक्षेप हाही चर्चाविषय होता. संमेलनाचे नियोजन, निमंत्रणे आणि मानापमान हे विषय कधी चर्चाकेंद्र बनले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातील अशा राजकारणामुळे मराठी साहित्याच्या विकासाचा कोणताही आराखडा आखला गेला नाही. साहित्य संमेलनांच्या बहुतांश अध्यक्षांची कारकीर्द भाषणबाजीच्या पलीकडे गेलेली नाही. महामंडळाने समाजातील वाङ्मयीन घटकसंस्थांना जोडून घेऊन वाचकांमध्ये मराठी साहित्याविषयी जी जागृती करायला हवी तीही समाधानकारक रीत्या केलेली नाही. वाचन चळवळ नामशेष होण्याच्या तयारीत असताना कोणत्या प्रश्नांना अग्रक्रम दिला पाहिजे याचेही भान साहित्यिक राजकारण्यांना दिसत नाही.

जागतिकीकरणात मराठी भाषेचे काय होईल? तिच्या अभिव्यक्तीस्थळांचे नियंत्रण कोणाच्या हातात जाईल? ‘एण्ड ऑफ हिस्ट्री’, एण्ड ऑफ आयडियालॉजी आणि एण्ड ऑफ कल्चर’ या एण्डोलॉजीचा पुढचा क्रम ‘एण्ड ऑफ ऑथर’ आहे. मराठी साहित्य या ग्लोबल बदलाकडे कसे पाहते हे फार महत्त्वाचे आहे. मराठीतील अनेक बोलींचे अस्तित्व धोक्यात असताना, भाषेच्या अभिनिवेशात अडकणे योग्य नव्हे. जागतिकीकरणात कोणतीही भाषा शुद्ध राहणार नाही, तशी कोणतीही भाषा शुद्ध नसते. महाराष्ट्रात रोजच्या जगण्यात हिंग्लिश व मिंग्लिश या मिश्र भाषेने शिरकाव केला आहे, दुकानांच्या पाट्या मराठीत रंगवण्याचा आग्रह धरणे म्हणजे मराठी माणसाचे हित ठरत नाही. मातृभाषेच्या विकासासाठी जे मूलभूत बदल शिक्षणात करायला हवे होते ते न करता केवळ घोषणाबाजी करणे म्हणजे मतलबी राजकारण आहे. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे यांच्या स्तरावर मातृभाषेला अडगळीत बसवले जाते. अभ्यासक्रमाची गचाळ रचना करून भाषेला डावलले जाते, शिक्षणात मराठी भाषेचे अस्तित्व संकुचित होत आहे, असे सारे प्रश्न असताना, केवळ साहित्योत्सव म्हणजे साहित्य विकास असे चित्र रंगवण्यात सारे मशगुल आहेत.

सृजनात्मक कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांना सध्याच्या राजकीय वातावरणात महत्त्व नाही. साहित्य, कला ही गोष्ट राजकारणापासून वेगळी असते. लेखक, विचारवंत, कलावंत हा साहित्यसत्तेचा अनभिज्ञ राजा असतो. तो त्याच्या प्रतिभासृष्टीने जे जग उभे करतो ते सत्य, शील आणि करुणा यांवर उभे असते. लेखक बुद्धिवादाची मूल्यधारणा करण्याचे महान नैतिक काम करत असतो. बुद्धिवाद ही सर्वश्रेष्ठ मूल्यसरणी आहे. ती महान नैतिकता आहे. ते जीवनातील सत्य-असत्याला समजून घेणारे जीवनतत्त्व आहे. म्हणून बुद्धिवादी माणूस त्याच्या सर्जनाच्या प्रक्रियेत सरकार किंवा जमाव यांच्याकडून आलेले आदेश स्वीकारत नाही. तो सरकारच्या दमनाला आणि जमाव यांच्या दबावाला घाबरत नाही. तो चालत राहतो, त्याला गवसलेल्या सम्यक, सुंदर, सत्य आणि विवेकी वाटेवरून. तो साहित्य संमेलने, परिसंवाद, पुरस्कार, पुरस्कार समित्या अशा राजकीय उत्सवापासून कोसो दूर राहणे पसंत करतो. अशा अनाभिज्ञ आणि बुद्धिवादी माणसांच्या शब्दांना आणि त्यांच्या वाणीतील सत्याला दमनकारी व्यवस्था नेहमीच घाबरत असते. कारण काळोखाला पंक्चर करण्याची क्षमता बुद्धिवादाच्या वाणीत असते. बुद्धिवाद म्हणजे अंधाराशी लढणारा उजेड असतो. तो उजेड समाजाला प्रकाशमान करत असतो, त्याला विवेकी आणि विज्ञाननिष्ठ करत असतो.

लेखकाची बांधिलकी केवळ कलाकृतीच्या निर्मितीची नसते. तो ज्या सामाजिक संघर्षातून जात असतो त्या संस्कृतिसंघर्षाचे प्रतिबिंब त्याच्या शब्दांत उमटत असते. साहित्य हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पोथी-पुराणे, इतिहासदत्त कथा आणि कल्पनेवर आधारित साहित्य काळाच्या ओघात बाद होऊन परिवर्तन ही साहित्याची प्रकृती आहे हे मनावर ठसू लागले आहे. दलित, ग्रामीण, आदिवासी, अहिराणी, स्त्रीवादी इत्यादी साहित्यप्रकारांनी जे वास्तव अनुभव मराठी साहित्यात मांडले त्यावरून त्या साहित्याचे निर्मितिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्रही वेगळे असायला हवे हेही अधोरेखित झाले. परिवर्तन ही गोष्ट आपोआप घडत नसते, त्यासाठी मानवी प्रज्ञेला धडपड सतत करावी लागते. परिवर्तन योग्य आणि सर्वांच्या कल्याणाच्या दिशेने व्हावे यासाठी प्रज्ञावंत डोळ्यांत तेल घालून पहारा देत असतात. बर्ट्रांड रसेल यांच्या म्हणण्यानुसार, माणसाची महत्त्वाकांक्षा पूर्ण होवो वा ना होवो. ते फार महत्त्वाचे नसते. त्यासाठी तो कोणत्या दिशेला जात आहे आणि कोणता परिणाम साधण्याचा प्रयत्न करत आहे हे अधिक महत्त्वाचे असते. म्हणून परिवर्तन सर्वांना उपकारक ठरावे असे ज्यांना-ज्यांना वाटते त्या सर्वांनी परिवर्तनासाठी उजेडाच्या बाजूने ठामपणे उभे राहणे महत्त्वाचे आहे.

- मिलिंद कसबे, 9766984770, m.kasbe1971@gmail.com

लेखी अभिप्राय

छान लिहिले आहे .

Manohar Surwade06/02/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.