अक्षता संजय शेटे – कलाकार व्यायामपटू


_Akshata_Shete_1.jpg‘शेटे’ कुटुंब मूळ साताऱ्याचे. अक्षता ही त्यांची आजच्या पिढीची प्रतिनिधी. ती आहे  ‘सातारा भूषण’ अक्षता संजय शेटे. तिने तिच्या कर्तृत्वाने देशाचे क्रीडाक्षेत्र लहानपणात गाजवले आहे. तिच्या घरात क्रीडा आणि समाजकार्य यांचा वारसा होताच. लहानग्या अक्षताने पहिले पाऊल बाहेर टाकले तेच मुळी ‘मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ’ या महाराष्ट्रातील अग्रणी क्रीडा संस्थेत. तेथे संध्याकाळी लहान मुलांसाठी जिम्नॅस्टिक्सचे वर्ग चालत. अक्षताचे बाबा मंडळाचे पदाधिकारी होते. अक्षता त्यांच्या धाकामुळे सुरुवातीला त्या वर्गात जाऊन बसू लागली. अक्षता सर्जनशील आणि उत्साही होती. तिला जिम्नॅस्टिक्समधील कृतिशील आव्हानांची गोडी लागली. तिला सराव करायचा आणि नवनवीन उड्या, कसरती आत्मसात करायच्या याचे जणू वेडच लागले. त्याच बेताला, ती मला भेटली. मी महाराष्ट्र शासनाची जिम्नॅस्टिक्समध्ये मार्गदर्शक आहे. माझ्या नजरेत त्यावेळी आठ वर्षांच्या असलेल्या अक्षतामधील क्रीडा गुणवत्ता भरली व मी तिला अजिंक्य जिम्नास्ट बनवण्याचा चंग बांधला. त्यामुळे तिच्या उत्साहाला चिकाटी आणि एकाग्रता हे गुण लाभले. तिचा स्वभाव जिद्दी होताच, त्यांना परिश्रमांची जोड लाभली.

अक्षताने सबज्युनियर गटात आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या जिल्हा आणि राज्य पातळींवरील वीसएक स्पर्धा पुढील चार वर्षांत खेळून पाच डझन पदके गोळा केली. मला अक्षताच्या उमलत्या शरीरात दडलेला कलाकार माझ्या लक्षात आला आणि अक्षताला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सकडून रिदमिक जिम्नॅस्टिक्सकडे वळण्याचा सल्ला दिला. ते नवे वळण अक्षताला हितकर ठरले. ती क्रीडा शाखा मुलींसाठी आहे. त्या प्रकारात नयनरम्य कसरती संगीताच्या साथीवर रिंग, बॉल, रिबीन अशा साधनांसह फ्लोअर मॅटवर सादर केल्या जातात. लवचीकता, चपळता, तोलाचे कसब, उंच उड्या, साधन-हाताळणीतील समन्वय यांचे कलात्मक सादरीकरण केले जाते. अक्षताला तो प्रकार मनापासून भावला. तिने सकाळ-संध्याकाळ तीन-तीन तास मेहनत करून लवचीकता प्राप्त केली. रिंग किंवा बॉल उंच उडवायचा, खेळाडूने कोलांट्या उड्या अथवा गिरक्या घेत पुढे जाऊन तो अचूकपणे हातात किंवा पायातसुद्धा झेलायचा. अशा साधन-हाताळणीतील अवघड प्रकारांवर नैपुण्य मिळवायचे म्हणजे त्याला सततचा रियाज करावा लागतो. अक्षताकडे विविध, नाविन्यपूर्ण साधन-हाताळणीतील कौशल्य आत्मसात करायची उपजत बुद्धिमत्ता आहे. तिने त्याला तपश्चर्येची जोड दिली आणि तिचा ठसा रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये राष्ट्रीय पातळीवर उमटण्यास सुरुवात केली.

_Akshata_Shete_2.jpgअक्षताने तिच्या पहिल्याच राष्ट्रीय शालेय स्पर्धेत 2004 साली रौप्य आणि कांस्य पदक यांची कमाई केली. अक्षताची घौडदौड तेथून सुरू झाली, ती अवर्णनीय आहे. तिने राष्ट्रीय शालेय स्पर्धा आणि संघटनेच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा यांत ज्युनियर गटात सलग तीन वर्षें महाराष्ट्राचे प्रातिनिधित्व करत सांघिक सुवर्ण पदकांबरोबरच अनेक साधन-विजेतेपदांची कमाई केली. अक्षताने 2005 च्या ‘इंफाळा ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशीप’ मध्ये पहिल्यांदा ‘ऑल राउंड चॅम्पियनशीप’ मिळवली. अक्षता ज्युनियर गटातून सिनीयरमध्ये जाईस्तोवर कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूलमधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोतदार कॉलेजमध्ये दाखल झाली होती. कॉलेजने तिला खेळाच्या सरावासाठी पूर्ण मुभा दिली. अक्षताचे आयुष्य पूर्णत: रिदमिक जिम्नॅस्टिक्समय होऊन गेले. तिच्या पालकांनीही त्यांचे रुटीन अॅडजस्ट केले आणि तिचा आहार, सराव, दिनचर्या यांना प्राधान्य दिले. वजन नियंत्रित ठेवणारे व्यायाम, डोळ्यांतून पाणी काढणारे फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाईजेस आणि साधन हाताळणीचा तासन् तास सराव. अक्षताच्या समर्पण आणि भक्ती यांमुळे स्पर्धारूपी देव तिच्यावर प्रसन्न झालाच. तिने वरिष्ठ गटात सर्वांगीण राष्ट्रीय विजेतेपद 2007 ते 2011 या कालावधीत सलग चार वेळा पटकावले.

तिची निवड जपानला झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी 2009 मध्ये झाली, ती भारतीय कर्णधार म्हणून. तिने संघातील सर्वोत्तम गुण मिळवून जपानमध्ये तिची निवड सार्थ ठरवली. तिने तिची जागतिक क्रमवारीही पुढील वर्षी मॉस्कोला झालेल्या ‘जागतिक अजिंक्यपद’ स्पर्धेत भाग घेऊन सुधारली. तिने ‘बेलारूस’ येथे ‘वर्ल्ड कप’ स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले. अक्षताच्या या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला देशातील रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक वर्षा उपाध्ये यांचे कर्तबगार मागर्दर्शन लाभले. 2010 साली दिल्लीत झालेल्या ‘कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये भारतीय संघातील तीनही खेळाडू वर्षा उपाध्ये यांच्याच विद्यार्थिनी होत्या. महाराष्ट्राची विजयपताका अक्षता शेटे, क्षिप्रा जोशी आणि पूजा सुर्वे या तिघींनी दिल्लीवर रोवली.

रांचीच्या ‘नॅशनल गेम्स’मध्ये अक्षताने ‘महाराष्ट्राची कर्णधार’ म्हणून परिपक्व खेळाचे प्रदर्शन करत दोन सुवर्ण, दोन रौप्य, एक कांस्य पदकासह राज्य शासनाची रोख रकमेची पारितोषिकेही पटकावली. अक्षताने आठ वर्षांच्या कारकिर्दीत सत्तेचाळीस सुवर्ण, चाळीस रौप्य आणि तीस कांस्यपदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्र शासनाने 2008 -09 चा ‘श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ देऊन तिचा गौरव केला आहे.

_Akshata_Shete_4_0.jpgती त्यावेळी कारकिर्दीच्या अत्युच्च टप्प्यावर होती. अक्षताने तिच्या मागाहून येणाऱ्या खेळाडूंना पदके मिळवण्याची संधी राहवी म्हणून सतत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करूनही विजेतेपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. तिचे ते कृत्य बऱ्याच जणांना अनाकलनीय वाटते. पण उमद्या खिलाडू स्वभावाच्या पालकांची आणि प्रगल्भ सामाजिक जाणीव असलेल्या शिक्षिकेची तिला तीच शिकवण होती.

अक्षताने बी कॉम झाल्यावर एक वर्ष सिंगापूरहून ‘एम बी ए’ केले; पण तिच्या नसानसात जिम्नॅस्टिक्स भरले आहे. त्यामुळे ती मुलगी निवृत्त झाल्यावरही खेळापासून दूर राहू शकली नाही. तिने तिच्यानंतरही रिदमिक जिम्नॅस्टिक्स क्षेत्रात मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे नाव चमकत राहिले पाहिजे यासाठी बी.पी.सी.ए. (बॉम्बे फिझिकल कल्चर असोसिएशन) च्या ‘रिदमिक जिम्नॅस्टिक्स क्लब’ची स्थापना केली.

अक्षताने प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली आहे. तिच्या क्लबने छान बाळसे मागील चार वर्षांत धरले आहे. क्लबमध्ये साठ मुलींना नवोदित, प्राथमिक, प्रगत अशा तीन बॅचेसमध्ये प्रशिक्षण दिले जाते. ती ‘हेड कोच’ आहे. तिच्या पंचवीस मुली जिल्हा पातळीवर, सात राज्य पातळीवर तर तीन राष्ट्रीय पातळीवर पोचल्या आहेत. तिच्या विद्यार्थिनींनी पन्नासहून अधिक पदके जिल्हा पातळीवर तर पंचवीसहून अधिक पदके राज्य आणि राष्ट्र पातळींवर पटकावली आहेत.

अक्षता तिच्या खेळाडूंना घेऊन ‘हाँगकाँग’ला झालेल्या ‘क्वीन्स कप’ या निमंत्रित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डिसेंबर 2016 मध्ये गेली होती. तिच्या छोट्या खेळाडूंनी त्या स्पर्धेतही बक्षिसे मिळवली. त्यामुळे त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला आहे. अक्षताने ‘ग्रीस’मधील ‘इमराल्ड कप’ या निमंत्रित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुलींना सप्टेंबर 2017 मध्ये उतरवले. समृद्धी शहा या अक्षताच्या विद्यार्थिनीला तर ‘सिंगापूर ओपन स्पर्धे’त सहभागाची संधी मिळाली. अक्षता ठामपणे सांगते, की आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव सुरुवातीपासून मिळणे हे खेळातील प्रगतीसाठी आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स संघटनेचा प्रशिक्षकांसाठी तीन लेव्हल्सचा अभ्यासक्रम असतो. अक्षताने लेव्हल एक आणि लेव्हल दोन पूर्ण केले आहेत. ती भारतीय संघाची प्रशिक्षक 2016 च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी होती. अक्षताने प्रशिक्षकाच्या भूमिकेस पूरक ठरावे म्हणून नृत्याचे अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. तिला नृत्यकलेची आवड आहे. ती महाराष्ट्रातील सगळ्या आर्टिस्टिक जिम्नास्टची लाडकी नृत्यदिग्दर्शक आहे.

_Akshata_Shete_3.jpgअक्षताचे खेळावर निस्सीम प्रेम आहे. ते तिच्या ‘पंच’ म्हणून असलेल्या खेळातील भूमिकेतून आणखी वेगळ्या पद्धतीने व्यक्त होते. त्यामुळे अक्षताने लहान वयात त्या खेळात ‘पंच’ म्हणून नाव कमावले आहे. खेळाच्या किचकट नियमांचा सखोल अभ्यास, सतत वाचन आणि इंटरनेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाशी संबंधित तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ विचार ही तिची खासियत आहे. ती तेराव्या जिम्नॅस्टिक्स सायकलमध्ये आर्टिस्टिक आणि रिदमिक, दोन्हींचीही राष्ट्रीय पंच होती. अक्षताची चौदाव्या सायकलमधील ‘आंतरराष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिक्स पंच’ परीक्षेसाठी भारतातून निवड 2017 मध्ये झाली होती. ‘अझरबैझान’ येथे झालेल्या अत्यंत कठीण परीक्षेत तिने ‘वैयक्तिक’ स्पर्धा प्रकारात कॅटेगरी तीन तर ‘ग्रूप’ स्पर्धा प्रकारात कॅटेगरी चार मिळवली. तेव्हापासून अक्षताने ज्युनियर आणि सिनीयर आशियाई अजिंक्यपद स्पर्धा- कझागिस्तान 2017 मलेशिया 2018, ग्रेसिया कप 2017, सिंगापूर ओपन 2018 या स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करून कॅटेगरी दोन प्राप्त करून घेतली. अक्षताला कॉमनवेल्थ गेम्स (गोल्ड कोस्ट), एशियन गेम्स (कोरिया), वर्ल्ड चॅलेंज कप (रशिया) वर्ल्ड चॅम्पियनशीप्स (बल्गेरिया) अशा आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रथम दर्जाच्या स्पर्धांसाठी पंच म्हणून निमंत्रण येऊ लागले आहे. एशियन गेम्समध्ये तिला प्रतिष्ठित अशा ‘डी’ दर्जाच्या पंचाचा मानही मिळाला.

मुंबईहून स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा पदव्युत्तर डिप्लोमा केलेल्या अक्षताला भविष्यात या क्षेत्रात स्पर्धा संयोजक म्हणून पुढे येण्याची इच्छा आहे. अक्षता संजय शेटे हिची एवढ्या लहान वयातील क्रीडाक्षेत्रातली ही गरुडझेप पाहून खरोखरच पटते, ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान!’

- संजीवनी पूर्णपात्रे, spurnapatre@yahoo.com

लेखी अभिप्राय

खुप छान संकलन केलेले आहे.

शिवदत्त.ढवळे(प…15/01/2019

खेळाडुंना प्रोत्साहन देणारा एक माहितीपूर्ण लेख. खेळाडूचा व प्रशिक्षिकेचे, दोघींचेही मनापासून अभिनंदन. आणि पालकांचेही.

उदय वि. देशपांडे16/01/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.