झोत पुस्तकाची चाळिशी : शिळ्या कढीला ऊत!


_Zot_CHalishi_1.jpgमी रावसाहेब कसबे यांच्या ‘झोत’ या पुस्तकातील प्रतिपादनाचा प्रतिवाद करणारे ‘‘झोत’च्या निमित्ताने संघकार्याचा मागोवा” हे पुस्तक त्याच वेळी लिहिले होते. मी स्वतः त्या पुस्तकाच्या प्रती कसबे, नरहर कुरुंदकर व इतर समाजवादी लोकांना पाठवल्या होत्या. कुरूंदकर वगळता, इतर कोणी त्याची साधी पोच दिली नाही किंवा मी कसबे यांच्या विधानांवर खोडून काढण्यासाठी जे आक्षेप केले, त्याचा पुन:प्रतिवादही केला नाही. जनता पक्षाच्या पुण्याच्या शिबिरात संघवाल्यांनी फु.क्रां.द.च्या  (इति अरूण लिमये. मूळ नाव -युवक क्रांती दल) पावलावर पाऊल ठेवून गोंधळ घालणे, पुस्तकाची होळी करणे इत्यादी गोष्टी केल्या हे खरे. मी स्वत: ‘संघकार्याचा मागोवा’ यामध्ये त्या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे (पृष्ठ 1). माझ्यासारखा एखादा व्यक्तिगत बोरू बहाद्दर (मी लेखक आणि माझी पत्नीच प्रकाशक) सोडला तर, कोणाही मातब्बर संघवाल्याने ‘झोत’चा प्रतिवाद केला नाही. सारे संघवाले त्यांच्या पद्धतीप्रमाणे काही न बोलता आणि गाजावाजा न करता काम करत राहिले. पुस्तकाची जाळपोळ आणि गोंधळ यांमुळे ‘झोत’च्या बरोबर रावसाहेब कसबे यांना मात्र फुकटात प्रसिद्धी मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्याभोवती हौतात्म्याचे वलय तयार झाले! ‘झोत’च्या आवृत्ती निघाल्या आणि भाषांतरे झाली असली तरी संघाने माझे पुस्तक बासनात बांधून ठेवले. आता, चार दशकांनंतर, मिलिंद कसबे यांना त्या वादाचे मढे उकरून काढायचे असेल तर मी ‘संघकार्याचा मागोवा’त कसबे यांच्या लिखाणासंदर्भात केलेली पुढील विधाने अनायासेच पुढे येतील.

कसबे यांनी सुमंत मुरंजन ह्यांच्या ‘पुरोहित वर्गवर्चस्व व भारताचा सामाजिक इतिहास’ ह्या पुस्तकातील (पृष्ठ 14 ते 20 मधील) मजकूर थोडा फेरफार करून जसाच्या तसा दिला आहे. ते करताना त्यांनी मुरंजन ह्यांचा उल्लेख मात्र केलेला नाही. कसबे ह्यांनीही मुरंजन ह्यांनी केलेली ढोबळ चूक सुध्दा जशीच्या तशी लिहून काढली आहे व त्यांनी लिहिताना मजकुराचे थोडेसुद्धा भान ठेवले नाही. (संघकार्याचा मागोवा, पृष्ठ 52)

कसबे ह्यांना बर्ट्रंड रसेल व इतर पाश्चात्य विचारवंत यांची केवळ नावे माहीत असावीत, अन्यथा त्यांना शोषणाचे घृणास्पद व छळाचे कुटील उद्योग इजिप्शीयन संस्कृतीपासून ते देवाच्या लाडक्या पुत्राच्या अनुयायांनी व प्रत्यक्ष ईश्वरापासून आज्ञा घेणाऱ्या प्रेषिताच्या अनुयायांनीसुद्धा केल्याची माहिती झाली असती. (संघकार्याचा मागोवा, पृष्ठ 59)

समाजवादी लेखक अ.भि.शहा यांच्या लेखाचा (महाराष्ट्र टाइम्स, 11 मे 1979) संदर्भ देत मी लिहिले होते – ‘संघाच्या प्रचाराने समाजवादी चळवळ मोडकळीस आली हे (कसबे यांचे) विधान वाचकांनी तपासून पाहवे.’ (संघकार्याचा मागोवा, पृष्ठ 45)

‘झोत’ची चाळिशी साजरी करण्याचे ठरले तर त्या निमित्ताने रावसाहेब कसबे यांनी संदर्भ दिलेल्या पुस्तकांतील भाग पुन्हा अधिक खोलात जाऊन तपासण्याची संधी मला मिळेल. कसबे यांनी थोडासा मजकूर बदलून सुमंत मुरंजन यांच्या ‘पुरोहित वर्गवर्चस्व व भारताचा सामाजिक इतिहास’ या पुस्तकातून केलेल्या विचारचौर्याचा भागही परत उगाळता येईल. संदर्भ दिलेल्या पुस्तकांचा धांडोळा घेताना काही अधिक आणि वादग्रस्त विचारांचा परामर्श घेता येईल. त्याचे एक उदाहरण पुढे देतो.

संघावर जातीयतेचा आरोप सातत्याने करणाऱ्यांत समाजवादी आणि तथाकथित पुरोगामी विचारवंत पुढे होते. हिंदू धर्मात जातिव्यवस्था ही शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे. तिचे विकृत स्वरूप म्हणजे हिंदू समाजात पाळली जाणारी अस्पृश्यता हे आहे. संघामधे अगदी स्थापनेच्या काळापासून जातिभेदाचा बाऊ न करता सर्वांना संघस्थानावर एकत्र आणण्याचे आणि त्यातून बडेजाव न करता जातिभेदाला तिलांजली देण्याचे धोरण अवलंबले गेले आहे. स्वतः महात्मा गांधी यांनी त्याचा अनुभव हेडगेवार यांच्या उपस्थितीत घेतल्याची आठवण सांगितली जाते. संघ कार्यकर्ते हे समाजातील सर्व घटकांमधून पुढे आलेले आहेत. मिलिंद कसबे लिहितात, की रावसाहेब कसबे यांनी ‘झोत’मध्ये दाखवून दिले आहे, की ‘संघाचे हिंदुत्व वैदिक ब्राह्मण्याचा पुरस्कार करणारे आहे. संघवाले केवळ राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून अस्पृश्य हिंदूंना आपलेसे करण्याचा देखावा करतात. त्यामुळे संघाच्या हिंदुत्वाच्या कल्पनेला ऐतिहासिक व सांस्कृतिक अशा दोन्ही अर्थांनी मर्यादा आहेत.’ मिलिंद यांनी तो लेख मोहन भागवत यांच्या दिल्लीतील कार्यक्रमानंतर लिहिला आहे. त्या ठिकाणी, सर्वानी मान्य केल्याप्रमाणे, संघ जागतिक स्तरावर पोचला आहे. तसे वास्तव असताना मिलिंद यांनी केलेले विधान तर्ककठोर परीक्षणाच्या कसोटीवर कितपत टिकेल?

रावसाहेब कसबे यांनी चाळीस वर्षांपूर्वी संघावर जातीयतेचा शिक्का मारला होता. त्यावेळी गोळवलकर गुरुजींनी ‘विचारधना’तून जातीयता आणि अस्पृश्यता यांच्या संदर्भात काय विचार प्रसृत केले होते हे मी परत वाचून पाहिले. गोळवलकर गुरुजींनी अस्पृश्यतेला रोग म्हटले आहे. त्या रोगाचे निदान करताना ते लिहितात - “अस्पृश्यतेच्या रोगाचे मूळ कारण असे, की अस्पृश्यतापालन हे धर्माचे एक अंग आहे आणि धर्माज्ञेचे उल्लंघन करणे हे महत्पाप आहे अशी समाजातील बहुसंख्य सर्वसामान्य जनांची समजूत आहे. ती अनिष्ट प्रथा अनेक धर्माचार्यांच्या आणि समाजसुधारकांच्या शतकानुशतकांच्या प्रयत्नांनंतरही जनमानसात अजूनही घट्ट चिकटून आहे. त्याचे प्रमुख कारण, धर्माविषयीची विकृत धारणा हे आहे. नानक, रामानुज, बसवेश्वर, शंकरदेव, दयानंद, नारायण गुरु, गांधी, सावरकर यांसारख्या अनेक थोर पुरुषांनी हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक पुसून टाकण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले आहेत. परंतु तो कलंक अजून कायम आहे. स्वतःला उच्चवर्णीय मानणारे लोक तथाकथित अस्पृश्यांना त्यांच्या बरोबरीने वागवण्यास तयार नाहीत. राजस्थानात एका हरिजन युवकाने मिशा ठेवल्या, त्या कारणास्तव त्याला बेदम झोडपून ठार मारल्याचे वृत्त अलिकडेच वाचले. का तर मिशा ठेवणे हा केवळ क्षत्रियांचा अधिकार आहे अशी तेथील लोकांची समजूत आहे! अशा घटनांचा हिंदू धर्माचार्यांनीही निषेध केला नाही. त्यांनीही रूढी आणि धर्म यांची गल्लत केलेली दिसते” (विचारधन, आवृत्ती 1980, पृष्ठ 312). 

वरील परिच्छेद मुळातून देण्याचा उद्देश पुढे दिलेल्या विश्लेषणातून लक्षात येईल -

या ‘विचारधन’ आवृत्तीला एम.ए. व्यंकटराव यांची प्रस्तावना 28 एप्रिल 1960 या दिनांकाची आहे. त्याचा अर्थ त्यात प्रकट केलेले विचार त्याच्या कितीतरी आधी मांडले गेले होते.

गोळवलकर गुरुजींनी अस्पृश्यतेला सामाजिक रोग आणि हिंदू समाजावरील कलंक असे निःसंदिग्धपणे नमूद केलेले आहे.

गुरुजी जनसामान्यांचा कल अस्पृश्यता हे धर्माचे अंग आहे असे मानण्याकडे आहे आणि तो चुकीचा आहे, ती एक विकृत रूढी आहे याचे उदाहरण देतात. त्यावरून ध्वनित असे होते, की त्यांना अस्पृश्यता  आणि जातीय विभाजन यांची उतरंड मान्य नव्हती..

गुरूजींना थोर पुरूषांनी जातिभेद व अस्पृश्यता निवारण्यासाठी शेकडो वर्षांपूर्वीपासून ते विसाव्या शतकापर्यंत केलेल्या पराकाष्ठेच्या प्रयत्नांची जाण आहे. ते ज्या गाधी यांच्या खुनासाठी संघाला सत्तर वर्षांनंतरही वेठीस धरले जात आहे, त्या गांधी यांचा आणि त्यांच्या खून खटल्यात ज्यांना गोवले गेले त्या सावरकर यांचा अशा दोहोंचा थोर पुरूष म्हणून आदराने उल्लेख करतात. अशा अखिल भारतीय स्तरावरील नेत्यावर जेव्हा जातीयतेचा शिक्का मारण्यात येतो तेव्हा तो डोळे झाकून, हेतूतः केलेल्या विखारी प्रचाराचा भाग असतो.

_ZOT_1.jpgमिलिंद कसबे लिहितात त्याप्रमाणे संघ हिंदुत्वाचा, वैदिक ब्राह्मण्याचा पुरस्कार करतो या आरोपाचा मागमूस तरी या उताऱ्यात दिसतो काय?

गुरूजींनी धर्माचार्य अस्पृश्यतेच्या प्रथेचा निषेध करण्यासाठी पुढे आले नाहीत, ते मूक राहिले, याबद्दल खंत व्यक्त केली आहे. उपरोल्लेखित घटनेनंतर, गुरुजींनी स्वतः धर्माचार्यांना एकत्र आणून, अस्पृश्यता आणि जातिभेद यांच्याविरूद्ध धार्मिक भूमिका तयार करण्याच्या कामी पुढाकार घेतला. अनेक धर्माचार्यांना एकत्र आणून, त्यांचे परस्परांतील मतभेद मिटवून, त्यांना एका उंचीच्या आसनांवर स्थानापन्न करून, सर्वांनी मिळून ‘विश्व हिंदू परिषदे’ची स्थापना 1964 मध्ये राखी पौर्णिमेच्या दिवशी केली. त्या परिषदेत हिंदूंमधील जातिभेद, विशेषतः अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने धार्मिक घोषणा सर्वानुमते करण्यात आली. ‘हिंदू सारा एक’, ‘हिन्दू: न पतितो भवेत्’ या धर्माधिष्ठित आज्ञा जाहीर करून, मनुस्मृतिसकट सर्व श्रुती आणि स्मृती यांमधून सांगितलेली जातिभेदांची उतरंड मोडीत काढली गेली. त्यावर धर्माचार्यांकडून शास्त्र म्हणून मान्यतेची मोहर उमटवली गेली. ते हिंदू धर्माच्या दृष्टीने मोठे पाऊल होते. ते घडवून आणण्यासाठी गुरूजींनी अनेक प्रसंगी स्वतःकडे कनिष्ठता घेऊन, सर्व धर्माचार्यांना मान देऊन, एक प्रकारे धार्मिक परिवर्तन घडवून आणले. त्याची दखल ना त्या वेळच्या समाजवाद्यांनी घेतली; ना रावसाहेब कसबे यांच्यासारख्या प्रस्थापित होऊ पाहणाऱ्या तरूण विचारवंताला घ्यावीशी वाटली.

अस्पृश्यांवर अत्याचार होतात. ते रूढीप्रियतेचे सामाजिक वास्तव आहे. त्यासाठी मिलिंद कसबे रा. स्व. संघाला जबाबदार धरणार आहेत काय? त्याचा खुलासा रावसाहेब यांनी अथवा नव्या पिढीतील मिलिंद कसबे यांनी ‘झोत’च्या चाळिशीच्या निमित्ताने शिळ्या कढीला ऊत आणताना करावा.

मिलिंद कसबे यांनी संघाला लिखित घटना नाही असे ठोकून दिले आहे. संघाला बंदी उठण्याच्या वेळी लिखित घटना करावी लागली होती. त्यात लोकशाही व्यवस्थेला धरून पदाधिकाऱ्यांचे निर्वाचन करण्याचे कलम आहे. संघाने त्यांचा सर्व व्यवहार घटनेनुरूप चालवला आहे. संघाने संस्थेच्या घटनेची पायमल्ली केल्याचे उदाहरण कोठेही नसल्याने त्याची चर्चाच झाली नाही. मी ‘संघकार्याचा मागोवा’ लिहिण्यापूर्वी संघाच्या पुण्याच्या कार्यालयातून संघाच्या घटनेची प्रत आणून अभ्यासली होती. नव्या पिढीतील कसबे यांनी ती वाचून नंतर योग्य काय ते लिहावे. ठोकून देणारी विधाने (Sweeping statements) करू नयेत.

मिलिंद कसबे गोळवलकर गुरूजींच्या ‘विचारधना’तील विचारांची अवतरणे देतात. पण ती पडताळून पाहण्यासाठी पृष्ठक्रमांक देत नाहीत. गुरूजींचे वर्णव्यवस्थेसंदर्भातील विचार ‘विचारधन’मध्ये (आवृत्ती डिसेंबर 1980, पृष्ठे 101 ते 103) आहेत. त्यात गुरूजींनी वर्णव्यवस्था जातिव्यवस्थेपासून वेगळी कशी आहे त्याचा उहापोह केला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी हिंदू समाज त्याच्या आंतरिक शक्तींमुळे अनेक आक्रमणांना तोंड देत कसा राहिला त्याचे विश्लेषण केलेले आहे. समाजविज्ञान (Social Sciences) अनेक स्तरांवर प्रगत झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते विश्लेषण परत एकदा तपासून पाहणे हे अधिक योग्य ठरेल. तसेच, आजची उभरत्या राष्ट्रवादाची भूमिका त्या संदर्भात तपासता येईल. 

समाजवादी व साम्यवादी यांनी सांस्कृतिक क्षेत्रात कर्तव्यशून्यता दाखवली म्हणून गोळवलकर यांनी मांडलेला विकृत इतिहास सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे असे मिलिंद लिहितात. ‘विचारधन’ प्रसिद्ध झाल्यापासून तो 2014 पर्यंतच्या काळात शालेय; तसेच, महाविद्यालयीन इतिहासलेखनाचे कार्य ‘जेएनयु’प्रणीत समाजवादी व साम्यवादी लोकच करत होते. तरीही तो सर्वसामान्य जनतेच्या पचनी का पडला नाही याचे विश्लेषण चाळीस वर्षांपूर्वी रावसाहेब यांनी केले नाही आणि चाळीस वर्षांनंतर मिलिंदही करत नाहीत. आता तर, त्यांना भारतातील राष्ट्रवादाची चर्चा खूप होत असल्याचे जाणवले आहे. ते संघाने वर्गीय वर्चस्व आधारित तथाकथित राष्ट्रवाद टिकवण्याचा प्रयत्न केला आहे असे लिहितात. भाजप ‘सबका साथ सबका विकास’ याची घोषणा देते, त्याला संघाचा विरोध नसतो. मग त्यापेक्षा वेगळा कोणता मानवतावादी राष्ट्रवाद आहे, की तो रूजवण्यासाठी पुरोगामी प्रवाहांकडून अधिक जोमाने प्रयत्न व्हायला पाहिजेत? मला वाटते, रावसाहेब कसबे यांच्या प्रमाणेच मिलिंद यांनाही, त्यांनी अशा ठोकून दिलेल्या विधानांना धरून स्वतःच्याच विचारविश्वाचे परखड परीक्षण करण्याची आवश्यकता आहे.

संघ कालबाह्य झाला आहे हे विधान पुरोगाम्यांना मनापासून आवडणारे आहे. मिलिंद यांनी त्याची पुनरुक्ती केली आहे. तरीही वास्तवात मात्र संघ आणि संघप्रणीत संस्था जोमाने वाढत राहिल्या, तर तिकडे समाजवादी चळवळीची वाताहत इंदिरा गांधी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येण्यापूर्वीपासूनच सुरू झाली होती. समाजवादी कंपूतील एकेक मोहरे त्यांच्या जनता पक्ष फोडण्याच्या घोडचुकीसाठी पश्चात्ताप करत 1980 नंतर स्मृतिआड गेले. ज्यावेळी मधू लिमये यांनी जनता पक्ष फोडल्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करून जॉर्ज फर्नांडिस यांना सर्व समाजवादी विचारांना बासनात बांधून ‘भाजप’ची साथ न सोडण्याची सूचना, किंबहुना आज्ञा केली, त्याच वेळी ‘झोत’ आणि 1978 मधील रावसाहेब कसबे कालबाह्य झाले! ‘झोत’विषयी परत लिखाण करणे, चर्चासत्रे घेणे चालू केल्यास ते शिळ्या कढीला ऊत आणणे ठरेल. त्यातून कसबे यांची 1978 मधील वैचारिक अपरिपक्वता उघडी पडण्याचा धोका आहे. मी व्यक्तिश: तशा वैचारिक देवाणघेवाणीसाठी तयार आहे.

संघाने एक संघटना म्हणून आणि त्या मुशीत तयार झालेल्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यांतून, विविध क्षेत्रांत राष्ट्रोत्थानाचे कार्य गेली चार दशके करून रा. स्व. संघावरील जातीयतेच्या, प्रतिगामी असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. संघप्रणीत संस्थांनी अक्षरशः हजारो प्रकल्प गेल्या चाळीस वर्षांत कार्यान्वित केले. कोठलाही भेदभाव न करता निरनिराळ्या जाती-जमातींमधून अ-राजकीय नेतृत्व उभारले. कार्यकर्ते जातिपातींचा विचार न करता बहुजन समाजातून पुढे आणले. तसेही, संघामध्ये पहिल्यापासून कधी कोणाची जात पाहिली जात नसे किंवा विचारली जात नसे. तरीही संघावर जातीयतेचा शिक्का मारणारी मंडळी स्वतः किती जातीयवादी होती याबाबत हमीद दलवाई यांचे विचार सर्वश्रृत आहेत. समाजवादी-सेक्युलर विचारवंतांच्या बाबत दलवाई लिहितात –“ तो (समाजवादी-सेक्युलर विचारवंत) जमाते इस्लामीच्या लोकांना नासेर यांच्या विरुद्ध दिल्लीला निदर्शने करताना अटक झाल्याबद्दल सरकारचा निषेध करील. तो पैगंबराबद्दलच्या भवन्सच्या अंकाविरुद्ध मुसलमानांच्या निदर्शनांना पाठिंबा देईल. तो हमीद दलवाई यांच्या ‘इंधन’ कादंबरीच्या निमित्ताने त्याला नामशेष करण्याचा पवित्रा टाकलेल्या मुस्लिम धर्मवेड्यांच्या मागे उभा राहील आणि हमीद दलवाई यांना विरोध करील.”( मुस्लिम जातीयतेचे स्वरूप, कारणे व उपाय, पृष्ठ 43, लेखक हमीद दलवाई. अवतरण – ‘संघकार्याचा मागोवा’, पृष्ठ 30 वरून). ती, महाराष्ट्रातील समाजवादी-सेक्युलर पिढी कालबाह्य ठरत काळाच्या पडद्याआड गेली. त्यांच्या बोटावर मोजण्याइतक्या संस्था नामशेष झाल्या. इकडे संघ आणि परिवार यांचे कार्य आणि राष्ट्रवादाची स्पष्ट व अढळ भूमिका भारतीय जनमानसाला पटून 2014 साली भाजपप्रणीत सरकार बहुमताने सत्तेवर आले. ‘झोत’मध्ये पृष्ठ 30 वर रावसाहेब कसबे लिहितात, “आधुनिक राज्यशास्त्र मानते, की राष्ट्र हा अशा प्रकारचा जनसमुदाय असतो, की ज्यात जीवनाचे समान आदर्श, एकच संस्कृती, समान भावना, समान निष्ठा आणि समान परंपरा असते व त्यामुळे समाजाची विशिष्ट जीवनपद्धत विकसित होत असते. थोडक्यात म्हणजे एखाद्या विशिष्ट भूभागावर राहणाऱ्या आणि समान परंपरा व आकांक्षा, भूतकाळातील अनुभवांच्या स्मृती, शत्रू-मित्रत्वाच्या समान भावना आणि सर्वांचे एकमेकांशी निगडित हितसंबंध असणाऱ्या अशा एकसंघ जनसमूहाला राष्ट्र म्हणावे. गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रवादासंबंधी हा विचार त्यांच्या ‘विचारधन’ची मांडणी करताना स्वीकारलेला दिसतो.” रावसाहेब कसबे यांनी ‘झोत’मध्ये पृष्ठ 30वर मांडलेल्या राष्ट्रवादी विचारसरणीला आणि गोळवलकर गुरुजीप्रणीत ‘विचारधना’त स्वीकारलेल्या त्याच राष्ट्रवादी विचारसरणीला लोकशाहीतील जनतेने 2014 च्या निवडणुकीत दिलेला बहुमताचा प्रतिसाद होता.

संघ का वाढला, कसा वाढला, भारतीय जनतेला सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक विविधतांना आत्मसात करून कसा भावला, जनतेने समाजवादी, साम्यवादी या विचारसरणींना का झिडकारले त्याचा विचार आता उरल्यासुरल्या समाजवादी, साम्यवादी, संघविरोधी वृद्धांनी शांतपणे करावा. ‘झोत’सारख्या उथळ पुस्तकाचा उदो-उदो पुन्हा करून, पूर्वी मिळालेल्या हौतात्म्याच्या खरूजेची खपली काढून स्वत:ला मानसिक दृष्ट्या रक्तबंबाळ करून घेऊ नये, शिळ्या कढीला ऊत आणू नये असा पोक्तपणाचा सल्ला मला (वय वर्षें 68) द्यावासा वाटतो.

गोळवलकर गुरूजींच्या पश्चात तीन सरसंघचालक होऊन, आता, चौथे सरसंघचालक मोहन भागवत आले आहेत. संघ संघटनात्मक आणि वैचारिक स्तरावर या चार दशकांत बदललेला आहे. संघाची आणि सर्वसाधारण संघ कार्यकर्त्यांची भूमिका सर्वसमावेशक संघविचार हा केवळ हिंदूंच्यासाठी न राहता समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध स्तरांपर्यंत पोचावा अशी आहे. संघाचा विस्तृत विचार केवळ भारतात नव्हे तर भारताबाहेरही दिल्लीमध्ये झालेल्या सर्वसमावेशक चर्चासत्राच्या (ऑक्टोबर 2018) दरम्यान गेला आहे. त्यावेळी कोणीही संघाला पूर्वीची शेलकी दूषणे देण्याच्या भानगडीत पडले नाही.

“थिंक महाराष्ट्र डॉट काम”च्या संयोजकांनी अथवा मिलिंद कसबे यांनी ‘झोत’वर चर्चासत्रे खुशाल घडवावीत. त्यानिमित्ताने, माझे त्यावेळी अर्धे राहिलेले काम पूर्ण करण्याची संधी मला मिळेल. नवसमाजवादी, सध्या चर्चेत असलेले विषय – भारत फोडो ब्रिगेड, रावणदहन आणि रावणाचे उदात्तीकरण, आर्य-अनार्य वाद, जाती व्यवस्था निर्मिती (Archaeology of Castes by Dr. Pramod Pathak, 2018) - अशा सर्व प्रश्नांना घेऊन वैचारिक आदानप्रदान करण्याची संधी त्या निमित्ताने मला आणि माझ्यासारख्यांना पुन्हा मिळणार आहे. मी त्या निमंत्रणाची वाट पाहत आहे!

- प्रमोद पाठक, drpvpthk@yahoo.co.in

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.