सोशल मीडिया म्हणजे गावगप्पा!


_Social_Media_2.jpgसोशल मीडिया गेल्या दहा वर्षांत जगभर फैलावला. काही लोकांना तो रोगासमान वाटतो, म्हणून त्यावरील मेसेज खूप झपाट्याने पसरला तर त्याला ‘व्हायरल’ झाला असेच म्हटले जाते. म्हणजे त्याचे मूळ विषाणू व्हायरस आहे; जीवाणू (बॅक्टेरिया) नाही. खरोखरीच, फेसबूक, व्हॉट्स अॅपवरील मेसेजेस, पोस्ट्स या विषवल्ली आहेत का? त्यातील माहिती इतकी समाजविघातक, विकृत असते? कोणी वर वर, ते संदेश, लेखन चाळले तर तसे वाटणार नाही. साधी, एका माणसाने दिलेली माहिती दुसऱ्या दुसऱ्या माणसापर्यंत त्यामार्फत पोचत असते. माहिती दूरवर पोचवण्याची ती आधुनिक तऱ्हा आहे. आचार्य अत्रे यांची गेल्या शतकाच्या पूर्वार्धातील गोष्ट आहे, ‘बोलका ढलपा’ नावाची. त्यातील एक रावसाहेब माणूस लाकडाच्या तुकड्यावर बाजूला पडलेल्या चुन्याने की कोळशाने काही खरडतो व समोर नोकरासमान उभा असणाऱ्या निरक्षर आदिवासी माणसास तो ढलपा घेऊन जाण्यास सांगतो. रावसाहेबाचा निरोप पंतमाणसाला कळतो. तसा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरतो. तो आदिवासी निरक्षर माणूस अचंबित होतो. त्याला रावांचा निरोप पंतांना कळला कसा याचे आश्चर्य वाटते. सोशल मीडियाकडे पाहण्याची सर्वसाधारण दृष्टी अशी निरक्षराची आहे. मीडिया म्हणजे गावगप्पा! पूर्वी गावच्या पारावर गावातील माणसे जमायची, आणि त्यांच्या विविध तऱ्हेच्या गप्पागोष्टी चालायच्या. शेतीचे प्रश्न, धर्माच्या गोष्टी, गावातील गॉसिप असे सर्व बोलणे तेथे होई. कधी त्यांना कुचाळक्यांचे स्वरूपदेखील येई. आधुनिक तंत्रसाधनांचा वापर सर्रास व सर्वत्र झाल्यानंतर जग हे एक खेडे आहे असे त्याचे वर्णन केले जाऊ लागले, कारण संपर्क वाढला. भारतात रात्र असते तेव्हा अमेरिकेत दिवस असल्यामुळे कित्येक वेळा वर्तमानपत्रातील वा सोशल मीडियावरील बातमी आपल्याकडे वाचली जाण्याआधी अमेरिकेत कळलेली असते आणि अचंबा तयार होतो.

सोशल मीडिया म्हणजे मुख्यत: व्हॉट्स अॅप आणि फेसबूक, मग असतात ट्विटर व तसे अन्य प्लॅटफॉर्म. त्याशिवाय लिंक्डइन वगैरेसारख्या मुख्यत: व्यवसायाच्या अंगाने जोडून घेण्याच्या सोयी आहेतच. त्या सर्व इंटरनेटवर आधारित असतात. मुळात इंटरनेटलाच जेमतेम वीस वर्षे झाली आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचे आयुष्य आहे दहा-पंधरा वर्षांचे. पण तेवढ्या अल्पावधीत त्याने जगभरच्या माणसांची मने जिंकली आहेत. माणसे त्याच्या दुष्परिणामांची चर्चा न करता मोबाइलच्या माध्यमातून साऱ्या जगातील गप्पागोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मला व्यक्तिश: सोशल मीडियाचे फायदे व सुपरिणाम अधिक आहेत असे जाणवते. त्यामुळे माणसे सतत ‘कनेक्टेड’ राहू लागली, बहुश्रुत बनली. चौकस झाली आणि स्वान्त रमू लागली. परिणामी स्वबद्दल अधिक जागरूक झाली. स्वची जाणीव हाच अध्यात्माचा मुद्दा असतो ना! यांतील प्रत्येक गोष्ट माणसास हितकर आहे की नाही?

अडचण अशी आहे, की एकतर जगभरची माणसे तंत्रज्ञानाबद्दल निरक्षर, अडाणी आहेत. अगदी जगभरच्या विज्ञान जाणणाऱ्या वैज्ञानिकांनादेखील संगणकाचे व एकूणच तंत्रज्ञान माणसाला घेऊन कोठे जाणार आहे? त्याचा शेवट काय आहे? ते माहीत नाही. ते प्रगतीपर आहे व त्याने माणसाचे भले होत आहे असे दिसते/जाणवते. त्यामुळे त्याचा स्वीकार झपाट्याने केला जात आहे. योगसाधना हेदेखील तंत्र आहे. माणसाची त्यावर पकड बसली आहे व त्यामुळे ते तंत्र समाज हितासाठी वापरले जाते, की योगदिन मानवी स्वास्थ्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो तसा उद्धार समाजमाध्यमाचादेखील होईल. ‘फेसबूक’चा निर्माता मार्क झुकेरबर्ग आणि ‘व्हॉट्स अॅप’चे निर्माते जेन कूम/ ब्रायन एक्टन यांना मानवी इतिहासात अनन्य स्थान दिले जाईल. ते केव्हा? तर योगविद्येचा जसा विकास झाला व त्या शास्त्राचे नियमन केले गेले तसे समाजमाध्यम विद्येबाबत घडले तर! उलट, सध्या ते गावगप्पा पातळीवर आहे. त्यामुळे गप्पांनी गावात हानी पोचत होती, भांडणे लागत होती व चांगल्या गोष्टींचा प्रसारही होत होता, कीर्तन-प्रवचनांची माहिती कळत होती.

माणसाची स्वाभाविक वृत्ती चाहूल घेण्याची आहे. ती असुरक्षिततेतून निर्माण व विकसित झाली आहे. त्यामुळे माणूस सतत सावध राहू शकतो, पण त्यामुळेच माणसाच्या मनात शेजाऱ्याबद्दल, पलीकडच्याबद्दल कुतूहल, चौकसपणा तयार होतो. त्यातून माणसाच्या वृत्तिप्रवृत्ती खुलतात. दोनशे वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या वर्तमानपत्रापासून सोशल मीडियापर्यंत सर्व साधने त्यामुळे लोकांना रुचली-पचली. वर्तमानपत्रे व अन्य माध्यमे दोनशे वर्षांत विकसित होत गेली. त्यांच्या विकासाचे नियम-अधिनियम करण्यात आले. त्यांचे नियमन पद्धतीने होत गेले. त्यांच्या सामाजिक परिमाणांचा अभ्यास झाला. संगणकविद्या व सोशल मीडिया आम लोकांमधून पावसाळ्यातील कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे विकसित होत व विस्तारत चालले आहेत. ते आपल्या सोशल मीडियाबद्दलच्या भयाचे कारण आहे. त्याचे नियमन माणसाच्या बुद्धीलाच शक्य आहे यावरील विश्वास माणसाने गमावला आहे.

_Social_Media_1_0.jpgआमच्या गावी देवभात नावाचा एक तांदळाचा प्रकार होता. त्याला देवभात म्हणायचे कारण तो कोठेही उगवायचा – कसाही वाढायचा. तो कापून-मळून-भरडून मात्र माणसे आणायची. त्याचा भात करून तो आम्ही ऋषी पंचमीला खायचो; कारण त्या दिवशी नांगर वगैरेसारख्या यांत्रिक साधनाने साध्य धान्य खायचे नाही असा नियम होता. देवभात चवीला झकास लागायचा, कारण पूर्णत: असंस्कारित असायला केव्हातरी त्यात गंमत असतेच. धान्यवाहतुकीतून भात कोठे- कधी सांडायचे, ते बी तसेच तळ्याकाठी, नदीकाठी उगवायचे असा तो देवभात असायचा. ती निसर्गाची किमया. त्यातून उत्पादन तयार झाले. माणसाने त्याची व्यवस्था लावली. सोशल मीडिया हे स्वाभाविक निर्माण होत असलेले साहित्य आहे. त्याची व्यवस्था कशी लावायची याचे नियम अजून बनले नाहीत. तो आंतरराष्ट्रीय व्यवहार असल्याने राष्ट्रे त्यावर नियंत्रण कसे आणता येईल याचा विचार करत असतात.

वर्तमानपत्रांवर सोशल मीडियाचा परिणाम हा मुद्दादेखील महत्त्वाचा ठरतो. वास्तवात गेल्या पन्नास वर्षांत टेलिव्हिजनपासून आलेल्या माध्यमांनी वर्तमानपत्रांचे जग आक्रसले आहे. त्यांना जनसंपर्काचे एकमेव माध्यम असे जे स्थान होते त्याला आकाशवाणीने प्रथम शह निर्माण केला, मग ट्रांझिस्टर, टेलिव्हिजन अशी अनेकानेक दृकश्राव्य माध्यमे तयार होत गेली व वर्तमानपत्रांना बहुमाध्यमातील एक स्थान प्राप्त झाले. ते मुद्रण माध्यमातील पत्रकारांनी जाणले पाहिजे.

तंत्रविकासाच्या या टप्प्यावर हे स्पष्ट आहे, की मुद्रित मजकुराचे वाचन हा समाजाचा माहिती मिळवण्याचा सर्वात तळचे स्थान असलेला मार्ग आहे. त्यामुळे वाचनाने आम माणसे शहाणी होतात हा भ्रम डोक्यातून काढला पाहिजे. आम माणसे सध्या विविध माध्यमांच्या उपलब्धतेमुळे बहुश्रुत व म्हणून शहाणी आहेत. ती व्यक्तिगत पातळीवर अधिक चोखंदळ झाली आहेत. त्याचा सामूहिक आविष्कार मात्र होत नाही. एके काळी, डांगे, जॉर्ज फर्नांडिस, वाजपेयी यांनी शिट्ट्या फुंकल्या की माणसे उभी राहत, पार बोरिवलीपासून कल्याणपर्यंतची माणसे शिवाजी पार्कच्या सभेला धावत. माणसांना ती बौद्धिक, वैचारिक मेजवानी वाटे. अधिक चिकित्सक माणसे मधु लिमये, मुरली मनोहर जोशी यांच्या स्टडी सर्कलला वा बौद्धिकांना जात. वर्तमानपत्रांतही लोकप्रिय धर्तीची व सुसंस्कृत, बुद्धिप्रधान वर्गासाठी अशा तऱ्हा असत. तंत्रज्ञानाने प्रत्येक व्यक्तीला तिच्या रूचीप्रमाणे काय हवे ते उपलब्ध आहे असा काळ निर्माण केला आहे; विविध ऑप्शन्सचा हा काळ आहे. त्यामुळे माणसाला ज्या अनेक गोष्टी लागतात त्या सोशल मीडियात उपलब्ध असतात व प्रत्येक माणूस त्याच्या पसंतीनुसार त्यांचा आस्वाद घेत असतो.

बहुमाध्यमांच्या या जगात वाचनाला अनन्य महत्त्व आहे. ज्यांना ज्ञानसंस्काराचे काम करायचे आहे त्यांच्यासाठी ग्लासवरील वाचन – मग ते डेस्कटॉप, लॅपटॉप ते मोबाइल यांपैकी कोणत्याही साधनांवर असो – मानवी मनावर सखोल परिणाम करू शकत नाही. त्या साधनांत स्वभावत: धावतेपण आहे. म्हणून मग मुद्रित माध्यमांची जबाबदारी अशी राहील की त्यांच्या साहित्याचा/माहितीचा बाज हा भले ललित, वरकरणी वाचनवेधक असेल; तरी तो वाचकाला सखोलतेकडे घेऊन जाईल. सोशल मीडियाच्या काळात वर्तमानपत्रांनी त्यांचे स्वरूप पक्के केले नाही तर त्यांच्यासंबंधात व्हायरल झालेला मेसेज सत्य ठरेल. त्याचा उगम व सत्यासत्यता कोणालाच माहीत नाही, परंतु ‘मेसेज’ असे सांगतो, की जगातील शेवटचे वर्तमानपत्र 2032 साली, अजून चौदा वर्षांनी बंद पडेल! पाश्चात्त्य देशांतील मोठमोठी वर्तमानपत्रे ज्या झपाट्याने बंद पडत गेली आहेत तो वेग मात्र त्या भविष्यवाणीस पूरक आहे.

‘इन्फर्मेशन’ व ‘एंटरटेनमेण्ट’ हा जो वर्तमानपत्रांचा आत्मा आहे तोच वेगवेगळ्या माध्यमांतून व्यक्त होत आहे. सोशल मीडियाची तीच हकिगत आहे. सोशल मीडियाला वळण लावण्याची, सामाजिक व्यवहारात त्याचे स्थान ठरवण्याची, तसे संस्कार करण्याची जबाबदारी समाजाची आहे. पत्रकारांनी त्यांचा त्या जबाबदारीतील वाटा उचलावा. रात्र वैऱ्याची/आव्हानाची नाही – संधी उपलब्ध होत जाण्याची आहे.

- दिनकर गांगल, dinkargangal39@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.