वैष्णवधाम - आदर्श गावाचा आगळा प्रयोग (Vaishnavdham)

प्रतिनिधी 10/12/2018

_Vaishnavdham_4.jpgपुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव निसर्गाच्या कोपाने नेस्तनाबूत झाले. वैष्णवधाम हे गावही माळीण या गावासारखे; त्याच परिसरातील; तशीच पार्श्वभूमी असलेले छोटेसे खेडे. लोकवस्ती दोन हजारही नाही. ती वस्ती बुचकेवाडी या नावाने पूर्वी ओळखली जाई; आता ‘वैष्णवधाम’ आहे.  या गावाने अल्पावधीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव, निर्मल ग्राम, पुणे जिल्हा परिषदेचा डोंगरी भागातील आदर्श कृषी ग्राम अभियानातील प्रथम क्रमांक असे पुरस्कार मिळवले आहेत. तसेच, गावाचा गौरव संत तुकाराम वनग्राम अभियानातही झाला आहे. वैष्णवधामच्या यशोगाथेची सुरुवात झाली 2009 सालापासून.

तोपर्यंत ते गाव होते बकाल खेडे. घरटी एक माणूस मुंबईत चाकरीला. शेती पारंपरिक. जवळ बंधारा बांधलेला. बंधाऱ्यात बुचकेवाडीकरांची जमीन गेलेली, पण बंधाऱ्याच्या पाण्याचा लाभ शेजारच्या पारुंडेकरांना. बुचकेवाडीचे प्रकल्पग्रस्त लाभक्षेत्रात नव्हते. त्यांना पाणी उचलून घेण्याची मुभा होती. मग काही शेतकरी धीर करून एकत्र आले. त्यांनी ‘लिफ्ट इरिगेशन’ची स्कीम करण्याचे ठरवले. पण त्या प्रयत्नाचा लाभ थोडक्या शेतकऱ्यांना; तोही वर्षांतील दोन पिकांपुरता झाला. गावकऱ्यांना शाश्वत विकासाचा मार्ग दाखवला ‘लुपिन फाउंडेशन’ने. त्या  संस्थेने गावकऱ्यांना ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या कार्यक्रमाचे महत्त्व पटवले.

गावात अण्णा हजारे यांच्या प्रभावातील सुरेश गायकवाड हा तरुण पुढे आला. शिवाजी डेरे या गावातील मान्यवर व्यक्तीने पुढाकार घेतला. हळुहळू गावकरी श्रमदानाला तयार झाले. जंगलात कुऱ्हाडबंदी, चराईबंदी घोषित झाली. डोंगरउतारावर चर, बांध-बंदिस्ती सुरू झाली. गावच्या तरुणांनी नर्सरी तयार केली. नर्सरीत काशीद, बांबू, सीताफळ, शेवगा अशी जवळपास पंचेचाळीस हजार रोपे तयार केली. ती गावकऱ्यांनी श्रमदान करून वनक्षेत्रात लावली, वाढवली. जंगलात चराईबंदी झाली. गावातील एका तरुणाची वनसंरक्षक म्हणून निवड झाली. गुरे मोकाट सोडणाऱ्यांवर दंड बसवण्यात आला. त्यामुळे गावातील गुरांना वर्षभर पुरेल इतका चारा मिळू लागला. जंगलात वस्तीला असलेल्या आदिवासी बांधवांना चाराविक्रीतून रोजगार मिळू लागला. गावातून डेअरीत जाणाऱ्या दूधाचे प्रमाण वाढले.

_Vaishnavdham_1.jpgगावाभोवतालच्या दोनशेअठ्ठेचाळीस हेक्टर वनक्षेत्रात गावकऱ्यांनी जवळपास सत्तर  हजार झाडे लावली. नाबार्ड अर्थसाह्याने पाणलोट क्षेत्र विकासाचा प्रभाव दिसू लागला. त्यातून 118.69 हेक्टर पडिक क्षेत्रावर व 248.67  हेक्टर जंगल क्षेत्रावर जलसंधारणाची विविध कामे पार पडली. त्यामुळे सुमारे 23.67 हेक्टर पडिक क्षेत्र कृषीलायक झाले. रब्बी हंगामामध्ये 149.37 हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा निर्माण झाली.

‘लुपिन फाऊंडेशन’चे ध्येय ग्रामीण, दुर्गम भागांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान पोचवून विकास साधणे हे आहे, पण अवजारे शेतकऱ्यांना परवडणारी नव्हती. त्या समस्येवर मात करत गावाने ‘आधुनिक शेती अवजारांची बँक’ हा आगळावेगळा प्रयोग प्रत्यक्षात आणला. लुपिन व गावकरी यांनी अवजारांसाठी निधी उभारला. त्यातून नवनवीन अवजारे आली. ती अल्प भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांना उपलब्ध केली जातात. अवजारांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च भाडे म्हणून जमा केलेल्या रकमेतून निघतो. महाराष्ट्रात शेतकरी साहित्य बँकेचे हे एकमेव उदाहरण असावे.

भारतात, विशेषत: महाराष्ट्रात सूर्यप्रकाश, हवा व सर्वसाधारण जमीन भरपूर आहे. पण पाण्याच्या कमतरतेमुळे सर्वत्र विकास होत नाही. वैष्णवधामच्या शेतकऱ्यांनी त्या समस्येवर मार्ग काढत पाण्याचे नियोजन करण्याचे ठरवले. त्यासाठी मंडळी ठिबक सिंचनाकडे वळली. पण ठिबक सिंचनातून शेती करायची तर भांडवल कोठून आणणार? वैष्णवधामच्या शेतकऱ्यांना लुपिन फाउंडेशनने आत्मविश्वास दिला. बँकांकडेही पाठपुरावा केला. नारायणगावच्या कॅनरा बँकेने वैष्णवधामच्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. अगदी गावात येऊन कर्जप्रकरणे मंजूर केली. मग ठिबक सिंचनाच्या तंत्राने टोमॅटो, बटाटा, फुलांची लागवड झाली. फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला पिकवला गेला. इतकेच काय, वेफर्स उत्पादन करणाऱ्या एका कंपनीशी करार करून, तेथील शेतकऱ्यांनी गटशेतीचा प्रयोग करून, त्या कंपनीला विशिष्ट दर्ज्याचे बटाटे पिकवून देऊन भरघोस नफा मिळवला. बँकांना कर्जाचे हप्ते वेळेच्या वेळेवर मिळाले नि वैष्णवधाम शेतकऱ्यांची पत वाढली.

_Vaishnavdham_2.jpg‘लुपिन’ने गावातील वेगवेगळ्या महिला बचत गटांमध्ये समन्वय तयार केला. सर्व गटांची मिळून फेडरेशन तयार झाली. महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे त्या गावातील महिलांनी भीमथडी जत्रेत स्टॉल लावून व्यवसाय तर केलेच, महिला गावातही वेगवेगळे व्यवसाय करत आहेत. जुन्नर तालुका भाजीपाला व टोमॅटो उत्पादनांमध्ये प्रसिद्ध आहे. ती उत्पादने व्यापाऱ्यांकडे पोचवताना विशिष्ट प्रकारच्या नायलॉनच्या पिशव्या वापरल्या जातात. त्या पिशव्या उत्पादनाचा कारखाना वैष्णवधामच्या महिलांनी गावात उभारला आहे.

बुचकेवाडीतील शेतकरी दरवर्षी कांदा व बटाटा यांची पिके काही प्रमाणात घेतात, परंतु खरीपात बटाटा व रब्बीत कांदा उत्पादन एकदम निघत असल्याने बाजारभाव खाली येतात. साठवणुकीची यंत्रणा नसल्याने शेतकऱ्यांना कांदा व बटाटा येईल त्या किमतीस विकण्याशिवाय पर्याय नसे. ते लक्षात घेऊन ‘लुपिन फाउंडेशन’ व ‘नाबार्ड’ यांच्यामार्फत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य पुरवण्यात आले. तब्बल पंचवीस ते पन्नास टन क्षमतेच्या कांदा व बटाटा चाळी शेतकऱ्यांनी उभारल्या. त्यातून जवळपास दीडेशे मेट्रिक टन कांदा व बटाटा साठवणुकीची सोय झाली.

शेतकरी त्यांच्या शेतातील भाजीपाला मुंबई अथवा तत्सम बाजारपेठांमध्ये पाठवतात. ‘लुपिन फाउंडेशन’ने पुणे शहरातील काही सोसायट्यांमध्ये बुचकेवाडीतील तरुणांना भाजीविक्री केंद्रासाठी मोफत जागा मिळवून दिली आहे.

उपलब्ध पाण्याचे सोशल ऑडिट व्हावे, पाणीवाटप पाण्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जबाबदारीने व्हावे यासाठी बुचकेवाडीने नजीकच्या बंधाऱ्यातील पाणीवापराचे मोजमाप करणारे जी.आय.एस. हे यंत्र बंधाऱ्याजवळ बसवले आहे. बुचकेवाडीनजीकच्या पाझर तलावाचे पाणी घेणाऱ्या आठ पाणीवापर सोसायट्या आहेत. त्या सोसायट्यांमध्ये प्रत्येकी पाच-सहा शेतकऱ्यांमध्ये मिळून एक पंप पाणी खेचतो. कोणत्या पंपाने किती पाणी खेचले याची नोंद जी.आय.एस. प्रणालीद्वारे संगणकात होते. त्या पद्धतीचा सर्वांत उत्तम फायदा म्हणजे उपलब्ध पाण्याचे चोख नियोजन शक्य होते. जी.आय.एस. ही इस्त्रायलमध्ये विकसित झालेली प्रणाली आहे. त्या प्रणालीचा संपूर्ण आशियात प्रथमच वापर बुचकेवाडीमध्ये केला जात आहे.

_Vaishnavdham_3.jpgगावात सेंद्रीय शेती, गांडूळ खत, गोबर गॅस असे अनेकविध उपक्रम सुरू आहेत. गावातील लोक पूर्वी मुंबईत ‘डबेवाला हा व्यवसाय करत. कारण ती माणसे शारीरिक कष्टाची कामे करू शकत होती. पण तेथील शेतकऱ्यांनी त्यांचा मोहरा फळउत्पादनाकडे वळवला आहे. मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या मंडळींनी गावाच्या शैक्षणिक विकासासाठी निधी उभारला आहे. त्यातून गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते.

गावातील आदिवासी तरुणांना मासेमारी, खेकडे पकडणे यांचा छंद होता. त्या छंदांचे रूपांतर व्यवसायात होऊ पाहत आहे. “या तरुणांना मत्स्योत्पादनाचे रीतसर प्रशिक्षण मिळाले. त्यामुळे त्यांनी मत्स्य उत्पादन सहकारी सोसायटी स्थापन केली. नजीकच्या भविष्यात त्या प्रयोगालाही यश येईल”, असे मत ‘लुपिन’चे पुणे जिल्हा व्यवस्थापक व्यंकटेश शेटे नोंदवतात.

गावात अघोषित दारूबंदी आहे. गावातील जवळपास सर्व ‘माळकरी’ आहेत. गावाने गरीब विद्यार्थ्यांसाठी संस्थाही चालवली आहे. ‘गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे ट्रस्ट’ या संस्थेत राहून विद्यार्थी शालेय शिक्षण घेतातच, पण कीर्तनादी धार्मिक पाठही शिकतात.  सामूहिक नेतृत्वातून शाश्वत विकासाची कास धरणारे वैष्णवधाम हे गाव ‘आदर्श’ गावाचा सुंदर नमुना आहे.

लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन
सर्वे न. 46-ए, मौजे नांदे, तालुका-मुळशी, जिल्हा- पुणे - 411 042
pune@lupinfoundation.in, 02020270297

- प्रतिनिधी

लेखी अभिप्राय

गावकर्याचया परिश्रमाला प्रणाम। आपल्या येथे एंयाचा मार्ग पुणे व इतर जावालचा महामार्ग सांगाल

Rabindra 11/12/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.