सूचनाफलकातून जागा झाला समाजभाव!


_Suchanafalak_1.jpgपर्यावरणाचे भान जपत आगळा-वेगळा गणेशोत्सव मुंबईच्या लोअर परळमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून साजरा केला जातो. ते मंडळ पर्यावरणाचे मोठे नुकसान, वेळेचा अपव्यय, विसर्जनावेळी होणारी वाहतूक कोंडी आणि विद्युत ऊर्जेचे नुकसान यांपासून दूर आहे. त्यांचा बाप्पा लोअर परळच्या पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कजवळील चाळीत विराजमान होतो.

मंडळाचे नाव रूस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळ. त्यांच्या गणेशोत्सवाची सुरुवात गमतीदार आहे. 1978च्या पूर्वीची गोष्ट. प्रत्येक चाळीमध्ये जसे सूचनाफलक बसवलेले असतात तसेच ते रुस्तम चाळीत असत. त्यांचा वापर चाळीतील रहिवाशांना सूचना आणि शुभेच्छा संदेश देण्यासाठी होई. उत्सवामधील शुभेच्छा त्या त्या उत्सवाचे चित्र काढून व्यक्त होत. उदाहरणार्थ, नागपंचमीच्या वेळी नाग काढायचे, स्वातंत्र्यदिनी भारताचा ध्वज चितारायचा. तेथे चित्रे काढण्याचे काम चाळीतील बबन कांदळगावकर यांच्याकडे असे. एकदा, त्यांनी गणपतीचे चित्र गणेशोत्सवात काढले, चाळीतील निवासींना फार छान वाटले. बबन यांना चार मुली होत्या आणि बबन यांच्या पत्नी पाचव्या वेळी गरोदर होत्या. बबनला त्याचे चाळीतील मित्र मस्करीत म्हणाले, की तू काढलेल्या बाप्पाजवळ नवस बोल, की मला आता मुलगा हवा! बबन नवस बोललेही. त्यावेळी चाळीत गणपती बसत नव्हते. अनंत चतुर्दशी होऊन गेली आणि योगायोगाने, बबन यांना चार मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाला! ते खूप आनंदित झाले. पण बबन आणि चाळीतील त्यांचे सहकारी यांनी जे काही घडले त्या घटनेला नवसाच्या गोष्टीचे स्वरूप न देता गणपती उत्सव साजरा करण्याचे ठरवले, पण त्यांनी ते करत असणाऱ्या गणेशोत्सवाचा इतर कोणा मंडळींना त्रास होणार नाही याची काळजी घेतली. त्यांनी बाप्पांचे चित्र सूचनाफलकावर खडूने काढून बाप्पांची प्रतिष्ठापना 1978 साली केली. ती प्रथाच पडून गेली. चाळीतील सगळेजण सकाळ-संध्याकाळ टाळ्यांच्या गजरात आरती आणि पूजा करण्यासाठी एकत्र येतात. तेथे स्थानिक कार्यक्रम; तसेच, परंपरागत पद्धतीच्या खेळांचे आयोजन होत असते. बबन यांनी खडूने चित्रे सलग पंधरा वर्षें काढली.

काळानुरूप बदल होत राहतात तसेच बदल त्या मंडळात घडले. बाप्पांचे चित्र बबनऐवजी चाळीतील काही विद्यार्थी काढतात. ते विद्यार्थी सध्या जे.जे. महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेत आहेत. ते वॉटर कलरच्या साहाय्याने बाप्पांचे चित्र रेखाटण्याचे काम करतात. मंडळ सामाजिक संदेश देणारा नयनरम्य देखावा तेथे मांडत असत. त्याशिवाय, वेगवेगळ्या विषयांवर पथनाट्याचे सादरीकरण होते. सगळी कामे चाळीतील रहिवासी करतात. त्यांची विसर्जनाची पद्धतही वेगळी आहे. तेथे येणारे भाविक दर्शनासाठी पेढे, केळी, नारळ, हार घेऊन येतात. बाप्पा विराजमान झाल्यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत जमा झालेले नारळ फोडून त्यात येणारे पाणी एका बादलीत किंवा टबमध्ये साठवले जाते. ते पाणी बाप्पाच्या चित्रावर शिंपडले जाते. फलकाखाली भांडे ठेवलेले असते. फलकावरून खाली येणारे पाणी त्या भांड्यात पडते. बाप्पांचे चित्र पुसले जाते आणि बाप्पांचे विसर्जन होते! जमा झालेले पाणी चाळीतील तुळशी वृंदावनात सोडले जाते.

_Suchanafalak_2.jpgविसर्जनाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री दहा वाजता सुरुवात होते. विसर्जन झाल्यानंतर आरतीला सुरुवात रात्री 11:55 मिनिटांनी होते आणि रात्री 12:00 वाजता संपते. दुसऱ्या दिवसापासून रहिवासी नेहमीच्या रुटीनला सुरुवात होते. मंडळाची अधिकृत नोंदणी आहे.

मंडळातर्फे सामाजिक उपक्रमही होत असतात. ते वर्गणी मागण्यासाठी कोणाला जबरदस्ती करत नाहीत. जो जितकी रक्कम देईल तितकी ते स्वीकारतात. शिवाय, बाप्पाजवळ दानपेटी ठेवलेली असते. जमा रकमेपैकी सत्तर टक्के रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी वापरली जाते, तर तीस टक्के रक्कम ते पुढील वर्षीच्या गणेशोत्सवासाठी ठेवतात. त्यांनी 2016 साली जमलेल्या वर्गणीच्या पैशांतून पाचशेएक झाडे खरेदी केली आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत सातारा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. तसेच, 2017 साली अंध विद्यार्थ्यांना दिवाळीत कपडेवाटप, फराळवाटप केले. मंडळ आरोग्यशिबिरे, होतकरू विद्यार्थी; तसेच, खेळाडूंना मदत करणे अशा प्रकारचे उपक्रम करत असते.

चाळीतील लोकांच्या वेगवेगळ्या चांगल्या ओळखींमुळे मंडळाला स्पॉन्सरही भेटतात. गणेशरूप जागेवरच असल्याने मंडपासाठी जागेचा प्रश्नच उद्भवत नाही. वाहतुकीचा खोळंबा, आगमन सोहळा, कर्णकर्कश्य वाद्य या साऱ्याला तेथे फाटा मारलेला आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पुजारी आहेत तर अमोल मिराशे हे खजिनदार आहेत. मस्करीत घडलेली ही घटना समाजासाठी पुढे उपयोगी आली. चाळीस वर्षें झाली, कोठलेही भांडणतंटा न होता तो गणेशोत्सव अगदी आनंदाने पार पाडला जातो!

अमोल मिराशे, 9867776616, mirashiamol@gmail.com
रुस्तम रहिवाशी गणेशोत्सव मंडळ, पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कजवळ,
गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (पश्चिम),मुंबई - ४०००१३

- शैलेश दिनकर पाटील, patilshailesh1992@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.