कवितेचे कुसुमाकर (Kusumakar)


_Kusumakar_2.jpgमराठीत नियतकालिके अनेक प्रकाशित होत असतात. काही नियतकालिके काळाच्या ओघात बंद पडली; काही नवी सुरू होतात, तरी हाताच्या बोटांवर मोजता येणारी ठरावीक नियतकालिके संपादक-मालक यांच्या चिकाटीच्या प्रयत्नांनी सुरू आहेत. त्यांचीही अवस्था फार काही ठीक नाही. ती सर्व नियतकालिके सहसा साहित्याशी संबंधित अशा व्यक्तींनी किंवा संस्थांनी सुरू केलेली आहेत. त्यातीलच ‘कुसुमाकर’ हे मासिक. त्याने त्याचे वेगळेपण जपले आहे. ‘कुसुमाकर’ म्हणजे भ्रमर, फुलांच्या भोवती सतत फिरणारा, परागकण आणि मध गोळा करणारा. मात्र हा ‘कुसुमाकर’ थोडा वेगळा आहे. कवितेत रमणाऱ्या एका मुसाफिराने सुरू केलेले ते लहानसे मासिक आहे. त्या मुसाफिराचे नाव आहे श्याम पेंढारी.

पेंढारी यांनी त्यांचे ‘कुसुमाकर’ कवितेच्या ओढीने सुरू केले. ते त्याच निष्ठेने ते मासिक गेली एकोणीस वर्षें प्रसिद्ध करत आहेत. ते ‘कुसुमाकर’मध्ये केवळ कविता नाही तर विविधांगी साहित्य प्रसिद्ध करतात. त्यांनी ‘कुसुमाकर’चे सात-आठ दिवाळी अंक प्रकाशित केले. आता दिवाळी अंक, जाहिरातींअभावी प्रकाशित करता येत नाही. म्हणून ते दोन महिन्यांचा जोड अंक (ऑक्टोबर-नोव्हेंबर 2018) दिवाळी विशेषांक या नावाने प्रकाशित करतात. ते म्हणाले, की ‘दुधाची तहान ताकावर!’

पुरुषोत्तम पाटील यांचे ‘कवितारती’ आणि मोरेश्वर पटवर्धन यांचे ‘कविताश्री’ ही कविता या वाङ्मयप्रकारास वाहिलेली मासिके मराठीत प्रसिद्ध होती. पैकी पटवर्धन यांच्या मासिकाचे व त्यांच्या अन्य उपक्रमांचे नामोनिशाण उरलेले नाही. पाटील यांच्या ‘कवितारती’चा मात्र मराठी कवितेवर सखोल प्रभाव आहे.

श्याम पेंढारी हे सरकारी कर्मचारी, ‘एमटीएनएल’मध्ये काम करत. परंतु त्यांना मनाच्या कोपऱ्यात कवितेबद्दल प्रेम आणि आस्था आहे. त्या प्रेमापोटी आणि ‘ग्रंथाली’च्या ‘कवितांचे व्यासपीठ’ या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन, त्यांनी शिरोडकर हायस्कूल (परळ) मध्ये कवितेसाठी वाहिलेले ‘काव्यगंध’ नावाचे व्यासपीठ 1995 मध्ये सुरू केले. ‘काव्यगंध’ आठ वर्षें सुरू होते. त्याच दरम्यान, त्यांना कवितेसाठी एखादे मासिक सुरू करावे असे वाटू लागले. त्याची परिणती म्हणजे ‘कुसुमाकर’. त्यांनी ते जिद्दीने आणि प्रेमापोटी सहा वर्षें सातत्याने सुरू ठेवले आहे. त्यांनी ‘एमटीएनएल’मधून शारीरिक कारणामुळे स्वेच्छानिवृत्ती 2005 साली घेतली आणि मासिकासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यात पैसे व शारीरिक कष्ट घरच्यांचे आहेत. ‘पैशाचे सोंग आणता येत नाही’ या उक्तीनुसार ‘कुसुमाकर’ पैशांच्या पाठबळाअभावी आणि वर्गणीदारांची संख्या कमी झाली म्हणून एकदा बंद पडले. कारण पेंढारी यांना हक्काचे वाचक नसतील तर मासिक कोणासाठी प्रसिद्ध करावे हा प्रश्न सतावत होता. पण कवी-लेखक-पोलिस अधिकारी धनराज वंजारी यांनी आणि अन्य काही जणांनी अर्थसहाय्य देऊ केले आणि पेंढारी यांच्या मित्रांच्या सहाय्याने ‘कुसुमाकर’ पुन्हा सुरू झाले! ‘कुसुमाकर’ने पुन्हा जन्म 2007 रोजी घेतला. तेव्हाच श्याम पेंढारी यांनी निर्णय घेतला, की आता थांबायचे नाही. त्यांनी एकोणीस वर्षांच्या अंकांची एकेक वर्षाचे अशी बांधणी करून ते अंक जतन करून ठेवले आहेत. त्यासोबत त्यांना आलेली निवडक पत्रे त्यांनी बॉक्स फाईल करून जपून ठेवली आहेत. त्यांना मासिकाच्या ध्यासामुळे या प्रवासात अनेक नवनवे कवी-मित्र भेटले. पेंढारी सध्या एकाहत्तर वर्षांचे आहेत. ते स्वत:च डीटीपीपासून मासिकाचे सर्व काम करतात.

_Kusumakar_1.jpgत्यांची स्वत:ची सहा पुस्तके प्रसिद्ध आहेत - ‘भेटीगाठी’ (ललितसंग्रह), ‘वळणावरती’ (कादंबरी), ‘मैत्रीचा गाव’, 'मातीचे घर', 'प्राजक्त' (कवितासंग्रह) आणि ‘कंदील’ (लेखसंग्रह) आहे. त्यांच्या मासिकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी गाजलेल्या कवींच्या कविता मुखपृष्ठावर एका चित्रासोबत छापतात ते कलरफुल नसते. त्यांनी मासिकात जाहिरात कधीही छापली नाही.

श्याम पेंढारी हे शंकर वैद्य यांचे विद्यार्थी होते. सुरुवातीच्या अंकापासून ते त्यांचा अंक शिरीष पै, यशवंत देव, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य यांना पाठवत. ते सर्वजण आवर्जून अभिप्राय कळवत. पाडगावकर त्यांना दिवाळी अंकासाठी नेहमी कविता पाठवत. सदानंद डबीर यांनी ‘कुसुमाकर’ अंकाबाबत सातत्याने मासिक प्रसिद्ध करणे हीदेखील महत्त्वाची बाब आहे असे कौतुकाचे उद्गार व्यक्त केले. नवोदित कवींना ज्येष्ठ मंडळींसोबत सामावून घेणे ही मोठी गोष्ट पेंढारी यांनी साधली. तसेच, ‘कुसुमाकर’मध्ये अनेक नवकवी घडले. उदाहरणार्थ, किरण येले. त्यांची पहिली कविता ‘कुसुमाकर’मध्ये प्रसिद्ध झाली आणि त्यांचा पहिला कवितासंग्रहदेखील त्यांनीच प्रसिद्ध केला. प्रसिद्ध गझलअभ्यासक राम पंडित यांनी मागील वर्षी ‘कुसुमाकर’मध्ये छंदशास्त्रावर वर्षभर लेखमाला लिहिली होती. त्यात त्यांनी मुक्तशैली, गझलसाठी वापरली जाणारी वृत्तछंदशैली - त्यांचे नियम इत्यादी बाबतींत महत्त्वपूर्ण लेखन केले. 
श्याम पेंढारी, संपर्क: 9869275992, shampen@ymail.com

- नितेश शिंदे, info@thinkmaharashtra.com

लेखी अभिप्राय

नमस्कार,

कुसुमाकर ह्या मासिकाबद्दाल आपण घेतलेली दाखल वाचली.

मी कुसुमाकरचा सुरुवातीच्या काळातील लेखक होतो. पहिली काही वर्ष मी ह्या मासिकात कथा लिहीत असे. एक दोन दिवाळी अंकात कथा आणि लेखही लिहिले आहेत.

संपादक श्री श्याम पेंढारी यांनी जिद्दीने हे मासिक सुरू ठेवले आहे. त्यांचे खरच कौतुक. आणि आपण त्याची घेतलेली दखलही आभारास्पद.
धन्यवाद !

Amit Pandit16/11/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.