यांत्रिक सुधारणांचे खोटे व रंजक जग


_yantrik_sudharnanche_1_0.jpgस्मार्ट फोनने सगळ्यांच्या आयुष्यावर जसजसे अतिक्रमण केले आहे अथवा अॅमेझॉन, फ्लिप कार्ट, बिग बास्केट, स्नॅप डील वगैरेंसारख्या ऑनलाईन खरेदीची जी प्रचंड लाट आली आहे, त्यामुळे पैसे टाकले की वस्तू दारात हजर हे वास्तव टळटळीतपणे समाजात दिसत आहे. मी माझ्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी बोलताना याला ‘स्मार्टनेस’ म्हणावे, की अपंगत्व असा विषय काढला. त्या वस्तू येतात कोठून? तयार कशा होतात? त्यासाठीची सामग्री काय असते - ती कोठे मिळते? ते करणारे हात कोणाचे? असे असंख्य प्रश्न कोणाच्या मनात तरी येतात का? माझ्या मनात विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर तसे प्रश्न उभे राहिले.

आणि तशातच, मी आदिवासी लोकांचे पुण्यात भरलेले प्रदर्शन पाहण्यास गेले होते, तेव्हा मी तेथील छोटी, तरुण मुले-मुली समरसून सुंदर सुंदर वस्तू तयार करण्यात गढून गेलेली पाहिली. मग माझ्या मनात आले, की ‘रिसोर्सफुल’, हिकमती, कुशल आणि हुशार खरे तर तीच! मुलेमुली शिकल्या-सवरलेल्या शहरातील मुलामुलींना कितीतरी मूलभूत गोष्टी माहीतच नसतात.

मुंबईच्या वय वर्षें पंचावन्न असलेल्या एका महाशयांना लसूण हा गड्डा असतो हेच माहीत नव्हते! त्यांना वाटत होते, की कोणी लसूण पाकळ्या गजऱ्यासारख्या एकत्र बांधून देतात! फार पूर्वी एक किस्सा वाचला होता. शहरातून एक मुलगा गावी येतो. त्याच्या मामाच्या बैलगाडीत बसून शेतावर जातो. तेथे बैलजोडीला मोकळे सोडले जाते. त्या मुलाला त्या बैलजोडीकडे उत्सुकतेने पाहताना दिसते, की एक बैल शू करतोय. तो मुलगा घाईघाईने मामाकडे जाऊन काळजीने विचारतो, “आता कसे जायचे आपण परत? बैलातील पेट्रोल तर सांडले सगळे!”

त्याच सुमारास माझ्या वाचनात जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा ‘Accumulation of wealth and men decay’  हा निबंध वाचनात आला. मला तो आवडला आणि मनापासून पटला, मी त्याचे भाषांतर केले. ते विचार आजच्या काळातही किती विलक्षण चपखल बसतात! असे जाणवले. म्हणजे शहरी, पुढारलेले लोक किती एकसुरी झालेले आहेत! त्यांचे पुढारलेपण पैसे देऊन ऑनलाईन वाट्टेल ते खरेदी करणे एवढ्यापुरतेच आहे का? यांत्रिकीकरण वाढत आहे, यंत्रे विविध उत्पादने ओकत आहेत, त्यामुळे संपत्तीचा ओघ वाढत आहे, मात्र यंत्रवत झालेल्या माणसांचे माणूसपण लोप पावत आहे! जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीचा लेख आहे हा.  –

संपत्तीचा संचय आणि मानवाचा ऱ्हास - जॉर्ज बर्नार्ड शॉ

_yantrik_sudharnanche_2_0.jpgभांडवलशाही व्यवस्था समोर उभी ठाकलेली असताना, लोकांना त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीने त्यांचे ज्ञान आणि नियंत्रण यांच्या पलीकडे जाऊन असहाय्यपणे झोडून काढले आहे. या परिस्थितीचा सकारात्मक विचार करायचा असेल तर मला असे सांगावेसे वाटते, की लोकांनी साम्राज्य आणि युद्ध यांसारख्या मोठ्या विषयांना बगल देऊन छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. उदाहरण टाचणीचे घेऊ. एक काळ असा होता, की टाचणी तयार करणारे कारागिर टाचणी तयार करण्यासाठी सारी सामग्री विकत आणत, तिला आकार देत, टाचणीचे डोके जाड वळणाचे आणि टोक अणकुचीदार तयार करत. मग तयार टाचण्या कागदावर सुबक पद्धतीने व आकर्षकपणे लावून, बाजारपेठेत घेऊन जात किंवा दारोदारी जाऊन विकत. त्यांना व्यापाराची तीन सूत्रे माहीत असणे गरजेचे होते -खरेदी, उत्पादन आणि विक्री. त्यांना काही कौशल्येही टाचण्या बनवण्याच्या प्रक्रियेसाठी अवगत असावी लागत, पण त्यांना एका कागदावर टोचलेल्या वेगवेगळ्या टाचण्या एका पैच्या भावात विकणे परवडत नव्हते. टाचण्या तयार करण्यास इतका खर्च येई की एखाद्या स्त्रीच्या पोशाखासाठी दिला जाणाऱ्या भत्त्याला ‘पिन-मनी’ असाही शब्दप्रयोग त्यावरून तयार झाला.

स्कॉटिश तत्त्ववेत्ते आणि राजकीय अर्थव्यवस्थेचे प्रवर्तक म्हणून जगविख्यात असलेले अॅडम स्मिथ अठराव्या शतकाच्या अखेरीला, फुशारकीने म्हणाले होते, की एक टाचणी तयार करण्यास अठरा माणसे लागतात. त्यांतील प्रत्येकजण त्याची त्याची छोटी जबाबदारी पार पाडून, ती टाचणी पुढील माणसाकडे पाठवतो. त्यांच्यापैकी कोणालाही एकट्याला एक टाचणी तयार करण्याचे कसब अवगत नसते, ना त्यांच्यापैकी कोणाला सगळी सामग्री विकत घेता येत होती, ना बाजारात जाऊन विकता येत होती. फार फार तर त्यांच्याबद्दल एवढे म्हणता येईल, की त्यांना टाचणी कशी तयार करायची याची थोडीफार कल्पना निदान होती, पण टाचणी तयार करण्याचे कसब मात्र नव्हते. त्यावरून निष्कर्ष असा निघतो, की ते पूर्वीच्या टाचणी बनवणाऱ्या लोकांपेक्षा त्या बाबतीत कमी सक्षम आणि कमी ज्ञानी होते. वास्तविक, सध्याची परिस्थिती इतकी वाईट असताना, अॅडम स्मिथ यांना त्यात संस्कृतीचा विजय असल्यासारखे बढाई मारण्यासारखे काय वाटले? असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. त्याचे कारण असे आहे, की एकाला एकच काम दिल्याने आणि ते त्याने अनेक वेळा, पुनःपुन्हा केल्याने तो त्या कामात एकदम वाकबगार बनतो आणि त्यामुळे तो ते काम खूपच वेगाने करू शकतो. ते असे सगळे मिळून, जवळ जवळ पाच हजार पिना एका दिवसाला तयार करू शकतात. त्यामुळे पिनांचे स्वस्तात आणि भरपूर उत्पादन होते. इतके उत्पादन तयार होत असल्याने देश श्रीमंत असणारच! मात्र, त्यामुळे सक्षम लोकांचे रूपांतर यंत्रामध्ये झाले. यास्तव ते बुद्धी गहाण ठेवून काम करतात. एखाद्या यंत्राला जसे त्यात कोळसा आणि तेल भरून त्याच्याकडून काम करवून घेतले जाते, तसे या कामगारांना भांडवलशहांच्या अन्नावर पोसले जाते. केवळ म्हणून दूरदृष्टी असलेला अर्थशास्त्रज्ञ आणि कवी गोल्डस्मिथ याने त्याच्या कवितेतून त्याबद्दल ‘संपत्तीचा संचय पण मानवाचा ऱ्हास’ असे उद्वेगाने म्हटले आहे.

हल्लीच्या काळात अॅडम स्मिथ यांची ती अठरा माणसे, दिप्लोडोकॅस नावाच्या डायनासोरसारखी लुप्त झाली आहेत. हाडामांसाच्या त्या अठरा यंत्रांची जागा लोखंडी यंत्रांनी घेतली आहे आणि ती लोखंडी यंत्रे शेकडो दशलक्ष टाचण्या दिवसाला ओकत असतात. यंत्रेच त्या टाचण्या गुलाबी कागदावर चिकटवण्याचे कामही करत असतात. त्याचा परिणाम असा झाला आहे, की टाचण्या बनवण्याचे यंत्र प्रत्यक्ष बनवणारे लोक अपवाद म्हणून वगळले तर कोणालाही टाचणी कशी तयार होते किंवा ती कशी तयार करावी हे माहीतच नसते! म्हणजे टाचणी तयार करण्याच्या कंपनीतील या आधुनिक कामगाराला जुन्या बुद्धिमान, कसबी आणि कौशल्यप्राप्त टाचणी बनवणाऱ्या कारागिराच्या एकदशांशदेखील हुशार असण्याची गरज नाही. या अधोगतीत आपला फायदा एवढाच, की टाचण्या खूप स्वस्त झाल्या आहेत! मात्र एका टाचणीला स्वतंत्र असे काहीच मूल्य उरलेले नाही. करणावळ आणि नफा यांचा मेळ बसवला तरी अगदी एका पैला तुम्ही डझनभर पिना विकत घेऊ शकता.

जॉन रस्किन आणि विल्यम मॉरीस यांच्यासारखे गंभीर विचारवंत यांनाही गोल्डस्मिथ यांच्याप्रमाणेच या बदलाचा त्रास झाला. त्यांनी प्रश्न उभा केला, की माणसातील कौशल्यांचा ऱ्हास होत असताना संपत्तीचा संचय वाढत आहे, त्याला प्रगती म्हणावे का? आणि टनावारी टाचण्या वाया घालवणे ही टाचणी-कारागिरांची अवहेलना नव्हे काय? आता, ऐषोरामाचा विचार करता, पुन्हा जुन्या मार्गांचा अवलंब करून तसे काबाडकष्ट करावेत का? तर नाही; तसे अजिबात नाही. कारण नवीन तंत्रज्ञानामुळे, आधुनिक यंत्रांमुळे आहे तो वेळ सगळ्यांच्यात समान वाटला जात असेल, वेळेची बचत होत असेल तर आपण टाचणी तयार करणे यापेक्षा अधिक पुढील विचार करण्यास हवा. पण त्या दरम्यान, वस्तुस्थिती अशी आहे, की जे पुरुष आणि ज्या स्त्रिया टाचण्या तयार करण्याचे काम करतात त्यांना स्वतःला दुसरे काहीच करता येत नाही आणि ते स्वतःची दुसरी काही तसुभराची व्यवस्थाही करू शकत नाहीत. ते अडाणी आणि असहाय्य झाले आहेत. ते स्वतःचे बोटही त्यांना रोजगार देणाऱ्या त्यांच्या मालकाने काम दिल्याशिवाय उचलू शकत नाहीत. रोजगार देणाऱ्याला यंत्र विकत आणता येते, पण त्या यंत्राची माहितीच नसते. ते दुसऱ्या कोणाला पैसे देऊन यंत्राची जुळणी करवून घेतात आणि ते दुसरे कोणी लोक मशीन तयार करणाऱ्याच्या सूचनेबर काम करतात.

तेच कपड्यांच्या बाबतीत. पूर्वीच्या काळी, मेंढ्यांना कातरण्यापासून अंगावर घालण्यायोग्य कपडे तयार करण्याचे काम खेड्यातील, घरातील स्त्रीपुरुष करत. विशेषतः स्त्रिया! म्हणून तर लग्न न झालेल्या स्त्रीला ‘स्पिनस्टर’ म्हणत! त्यातील मेंढ्यांना कातरणे याखेरीज कोणतेच काम शिल्लक राहिलेले नाही. ते काम आणि शिलाई ही कामे, जसे गाईची धार काढणे यंत्राने केले जाते, तशीच केली जातात. आजच्या एखाद्या स्त्रीला मेंढी द्या आणि सांगा तिला लोकरीचा पोशाख शिवायला. तिला ते करणे केवळ अशक्य असेल; तेवढेच नव्हे, तर तिला मेंढी आणि ती घालत असलेला लोकरीचा पोशाख यांचा परस्परांशी काही संबंध आहे हे देखील माहीत नसले तर आश्चर्य वाटू देऊ नका. तिला जर कपडे घ्यायचे असतील तर ती दुकानात जाऊन खरेदी करेल. तिला वस्त्रप्रावरणात लोकरी, कापडी आणि रेशमी असे फरक असतात हे माहीत असेल, फ्लॅनेल (लोकर आणि कापसाच्या धाग्यांनी केलेले कापड), मेरिनो (अत्यंत मऊ लोकर), आणखी कदाचित स्टॉकिनेट (अंतर्वस्त्रे तयार करण्यासाठी ताणले जाणारे, विणलेले कापड) आणि इतर वेफ्ट्स (हातमागावर धाग्यांनी विणून तयार केलेले कापड) यांतीलही फरक माहीत असेल, पण ते कपडे तयार कसे होतात किंवा ते कशाचे बनवले जातात किंवा ते दुकानात कोठून आणि कसे तयार होऊन येतात याची सुतराम माहिती नसेल. ती ज्याच्याकडून विकत घेते त्यालाही त्यातील काही ज्ञान नसते. ती वस्त्रे तयार करणाऱ्या लोकांची अवस्था अजून वाईट. कारण ते इतके गरीब असतात, की त्यांना कपडे विकत घेताना फारशी निवड करणे परवडणारे नसते.

तर अशा प्रकारे, भांडवलशाही व्यवस्थेने गोष्टी कशा बनतात किंवा बनवल्या जातात याबद्दलचे जागतिक अज्ञान माजवले आहे! तशा परिस्थितीत, कारखानदारांना अवाढव्य प्रमाणात या गोष्टी कराव्या लागतात, करणे भाग असते. आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात काय करतो हे समजून घेण्यास विश्वकोश आणि पुस्तके खरेदी करावी लागतात. जे पुस्तके लिहितात, ते पुस्तके तयार करत नाहीत आणि पुस्तके जी माहिती देतात ती वीस ते पन्नास वर्षांपूर्वीची, कालबाह्य झालेली असते. शिवाय, आपल्यापैकी बरेचजण लोक घरी येईपर्यंत कामाने इतके थकून गेलेले असतात, की त्यांच्यात पुस्तक वाचण्याचे त्राणच राहिलेले नसते. अशा वेळी, आपल्याला गरजेचे काय वाटते तर सिनेमा, जेणेकरून त्यांचे मन या वास्तवापासून दूर जाईल आणि कल्पनेच्या साम्राज्यात विहार करेल!

भांडवलशाही असलेले जग हे एक गमतीचे ठिकाण आहे. तेथे चकित होण्याइतके अज्ञान आणि असहाय्यता भरून राहिलेली आहेत; आणि तसे असताना, आपण मात्र शिक्षणाच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराबद्दल फुशारक्या मारत असतो. तेथे हजारो मालमत्तेदार मालक आणि लक्षावधी पगारी चाकरमाने अस्तित्वात आहेत, की ज्यांना काहीच तयार करता येत नाही, त्यांना काय करायचे ते सांगेपर्यंत काही करणे जमत नाही, त्यांच्यापैकी कोणाला कल्पनाही नाही, की पैसे देणारे लोक त्यांना कोठून पैसे देतात आणि त्या पैशाने विकत घेण्याच्या गोष्टी दुकानात उपलब्ध कशा असतात आणि जेव्हा ते प्रवासाला जातात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो, की रानटी लोक, बर्फात राहणारे एस्किमो लोक किंवा खेड्यातील लोक हे त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिवान आणि हिकमती आहेत; ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत याचे आश्चर्य! आपण आपल्या बुद्धीचा आणि मानसिक क्षमतेचा नीट उपयोग केला नाही आणि जर सचित्र वृत्तपत्रे आणि कादंबऱ्या आणि नाटके आणि सिनेमा यांतील रोमँटिक मूर्खपणाच्या बाहेर आलो नाही तर आपला नाश आपल्याच मूर्खपणाने होईल. या साऱ्या गोष्टींमुळे जिवंतपणा राहतो पण त्या प्रत्येकाचे खोटे आणि रंजक चित्र आपल्यापुढे उभे करतात. त्यामुळे लोक खऱ्याखुऱ्या वास्तव जगामध्ये कमीअधिक प्रमाणात वेडे होत जातात हे खरे!

अनुवाद : अपर्णा महाजन, aparnavm@gmail.com

लेखी अभिप्राय

its very good . thought provoking .

anil awachat12/10/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.