दया पवार यांच्या बलुतंची चाळिशी!

प्रतिनिधी 25/09/2018

_Daya_Pawar_3.jpgपुस्तकाची चाळीशी! अशी घटना मराठी साहित्यविश्वात बहुधा प्रथम घडत असावी. दया पवार यांच्या ‘बलुतं’ला चाळीस वर्षें झाली. ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’, ‘दया पवार प्रतिष्ठान’ व ‘ग्रंथाली’ यांनी मिळून तो प्रसंग यथार्थ औचित्याने 20 सप्टेंबर 2018 रोजी साजरा केला.

हा दया पवार यांचा स्मृतिदिन. त्यांच्या नावाने असलेल्या प्रतिष्ठानामार्फत दरवर्षी सांस्कृतिक क्षेत्रातील तीन व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. त्याचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे असते. ती सारी व्यवस्था दया पवार यांच्या पत्नी हिरा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची कन्या प्रज्ञा व मुलगा प्रशांत हे दोघे मुख्यतः पाहतात. यावर्षी ‘बलुतं’ची चाळिशी असल्याने, त्यांनी ‘ग्रंथाली’ व ‘चव्हाण प्रतिष्ठान’चे सहकार्य घेतले आणि दिवसभराचे संमेलन साजरे केले. त्यामध्ये ‘बलुतं’च्या लेखन व निर्मिती काळातील आठवणी उजळल्या गेल्या. दुसऱ्या सत्रामध्ये ‘बलुतं’ आणि एकूणच दलित साहित्य यांचा सामाजिक संदर्भ कितपत टिकून आहे याबाबत चर्चा झाली. तिसऱ्या सत्रात दया पवार यांच्या कविता प्रज्ञा दया पवार व कवी सौमित्र यांनी सादर केल्या. त्यामुळे दया पवार यांची मूळ प्रकृती कवीची होती याची पुन्हा एकदा ठासून जाणीव झाली.

दिवसभराच्या तीन सत्रांत एकूण चार पुरस्कार दिले गेले. त्यांपैकी तीन दया पवार यांच्या स्मृत्यर्थ होते आणि एक यावर्षीच ‘ग्रंथाली’ने सुरू केलेला ‘बलुतं पुरस्कार’, तो नजुबाई गावित या आदिवासी लेखिकेला देण्यात आला. तो नजुबाई गावित यांना त्यांच्या ‘आदोर’ या आत्मकथनपर कादंबरीसाठी देण्यात आला. अन्य तीन पुरस्कार राहुल कोसंबी, सयाजी शिंदे व आनंद विंगकर यांना देण्यात आले. ‘बलुतं’ या पुस्तकाच्या नावाने पुरस्कार ही अभिनव कल्पना ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी मांडली.

‘बलुतं’ चाळीस वर्षांपूर्वी, 1978 मध्ये प्रथम प्रकाशित झाले, तेव्हा त्याने मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवली, ती मुख्यतः सामाजिक जाणीवेमधून. तोपर्यंत मध्यमवर्गीय साहित्यात रमलेला मराठी वाचक त्या पुस्तकातील वास्तव दर्शनाने खडबडून जागा झाला. त्याला सामाजिक विषमतेची तीव्र जाणीव झाली. खुद्द पु.ल. देशपांडे यांनीच ‘दु:खाने गदगदलेलं झाड’ असा अभिप्राय त्यावर लिहिला. त्यामुळे तर ते पुस्तक सर्वदूर पोचले. दलित समाजातील तोपर्यंत सुस्थापित झालेल्या वर्गाला त्यांच्या समाजाचे असे दर्शन पसंत पडले नाही. त्यामुळे ते लोक चिडून उठले. परिणामी पुस्तकावर ठिकठिकाणी खडाजंगी चर्चा घडून आल्या.

त्या पुस्तकाचे खरे श्रेय म्हणजे त्यामुळे मराठीत समाजस्पर्शी साहित्य या वाङ्मय प्रकाराला तोंड फुटले. त्यापूर्वी बाबुराव बागूल व अन्य मान्यवर लेखकांनी तळच्या समाजाबद्दल लिहिले आहे. परंतु वाङमयीनदृष्ट्या ‘बलुतं’मध्ये प्रगट झालेली सामाजिक विषमता भेदक ठरली, हे खरे.

_Daya_Pawar_2.jpg‘बलुतं’ पाठोपाठ ‘उपरा’, ‘उचल्या’, ‘अक्करमाशी’, ‘कोल्हाट्याचं पोर’ अशी, समाजाच्या विविध समूहांतून अनेक पुस्तके आली. त्यांना सोशल डॉक्युमेंटचे महात्म्य लाभले. ‘बलुतं’ला पंचवीस वर्षे झाली तेव्हाच ‘ग्रंथाली’ने ‘आयदान’ हे उर्मिला पवार यांचे आत्मकथन प्रसिद्ध केले. त्यामध्ये सवर्ण-अस्पृश्य हा संघर्ष आहेच, पण त्या बरोबर स्त्री-पुरुष विषमतेचाही मोठा भाग त्या पुस्तकात येतो. स्त्री-पुरुष असा फरक जेव्हा केला जातो तेव्हा ही जात आणि ती जात असा फरक असत नाही हा त्या पुस्तकाचा बोध आहे. म्हणजे मराठी दलित आत्मकथने अधिकाधिक समजुतीने व प्रगल्भतेने लिहिली गेली असल्याचेच ते लक्षण होय.

रावसाहेब कसबे हे दया पवार यांचे मामा. ते दोघे संगमनेरला एकत्र वाढले. कसबे यांनी दयाच्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, की दयाचा प्रवास सर्जनशील निर्मितीच्या अंगाने झाला, तर मी वैचारिक लेखनाचा पाठपुरावा केला, पण आमचे दोघांचे उद्दिष्ट एकच राहिले, की पददलित समाजात सुधारणेचे, विकासाचे वारे सुटले आहे, त्याला जोर द्यायचा.

सुशीलकुमार शिंदे यांनीही जुन्या दिवसांना उजाळा दिला. ते म्हणाले, की ‘पण लक्षात कोण घेतो?’ या कादंबरीत ब्राह्मण स्त्रियांच्या उपेक्षेचे चित्रण आले आहे. त्यानंतर पन्नास वर्षांनी दया पवारने दलित समाजातील उपेक्षितांच्या दु:खास तशीच वाचा फोडली.

संमेलनात दुपारच्या सत्रात तोच विषय चर्चेला होता. त्यामध्ये सुदाम राठोड, धम्मसंगिनी रमा गोरख या दोन तरुण समीक्षकांनी सहभाग घेतला. राहुल कोसंबी हे अध्यक्षस्थानी होते. सुदाम यांनी दलित कवितेबाबत ठामपणे असे सांगितले, की त्या काव्यातही साठोत्तरी-नव्वदोत्तरी हे भाग आहेतच; परंतु त्यापुढे जाऊन दलित कवितेत गेल्या आठ-दहा वर्षांत समाजमाध्यमोत्तरी असा एक नवा पंथ झकास रुजला गेला आहे आणि तेथे प्रकट होणारी कविता ही, आधीच्या दोन टप्प्यांच्या खूपच पुढे गेलेली जाणवते. त्यांनी या तिसऱ्या टप्प्यातील कवितांचे काही नमुने पेश केले.

धम्मसंगिनी रमा गोरख यांचे भाषण आक्रमक व विचारप्रक्षोभक झाले. त्यांना उपस्थित तीनशे श्रोत्यांनी वेळोवेळी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांचे म्हणणे आजचे दलित साहित्य विविध अंगाने खूप विस्तारले आहे. ते मुख्य प्रवाहाचे साहित्य ठरणार आहे. त्यामुळे मराठी साहित्य दालनातील एक कोपरा अशी जी दलित साहित्याची संभावना होई ती केव्हाच मागे पडली आहे. मराठी साहित्याचे नेतृत्व दलित साहित्याकडे येणार आहे. ‘बलुतं’पासून सुरू झालेला हा प्रवास चाळीस वर्षांत या शिखरावर येऊन पोचला आहे. त्याला साचलेपण कसे म्हणता येईल? तो तर उर्ध्वगामी विस्तारच आहे!

कोसंबी यांनी दोन्ही वक्त्यांशी सहमती दर्शवली. तरीसुद्धा ते म्हणाले, की सुदाम राठोड यांना समाज माध्यमोत्तरी कविता या त्यांच्या संज्ञेचे स्पष्टीकरण नीट द्यावे लागेल. धम्मसंगिनी यांच्या प्रतिपादनातून प्रश्नच प्रश्न निर्माण होतात असे सांगून ते म्हणाले, की धम्मसंगिनी यांनी जे वर्णन केले ते सकारात्मक आणि आशादायी असले तरी समाजशास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करणे व साध्य करणे हे आव्हानात्मक आहे.

_Daya_Pawar_7.jpgदिवसभराच्या कार्यक्रमात दोन गोष्टी मुद्दाम नमूद कराव्या अशा घडल्या. रावसाहेब कसबे यांनी सांगितले, की त्यांच्या ‘झोत’ या पुस्तकालादेखील चाळीस वर्षे झाली आहेत. ‘झोत’ या पुस्तकात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे दुसरे संघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकातील विधानांचा प्रतिगामी म्हणून सडकून समाचार घेतला आहे. ‘संघ’वाल्यांनी ते पुस्तक त्याकाळी त्याज्य ठरवले होते. योगायोग असा, की ‘बलुतं’ची चाळिशी साजरी होत असताना, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दिल्लीतील भाषणाचा वृत्‍तांत आला. त्यात भागवत यांनी असे म्हटले आहे, की गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’मधील प्रतिपादन कालबाह्य ठरले आहे! भागवतांच्या या विधानाचा उल्लेख करून रावसाहेब कसबे म्हणाले, की मी चाळीस वर्षांपूर्वी हेच तर सांगत होतो!

दुसरी उल्लेखनीय घटना कवितेच्या सादरीकरणावेळी घडली. प्रज्ञा दया पवार व सौमित्र हे व्यासपीठावर होते. त्या सत्रामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांना पुरस्कार दिला गेला. त्यावेळी स्वाभाविकच, त्यांच्या कविताप्रेमाचा विषय निघाला. सयाजी यांनी काही कविताही सादर केल्या. तेव्हा ते म्हणाले, की ‘बाई, मी धरण बांधते’ या दया पवार यांच्या कवितेने माझे काव्यप्रेम जागे केले. त्यांनी असे सांगून पवार ती कविता कशी ठसक्यात म्हणायचे त्या पद्धतीने ती म्हणूनही दाखवली. त्या कार्यक्रमात अभिनेते कैलास गायकवाड हे देखील सामील होते. ते त्यांच्या स्वत:च्या ढंगात ‘बाई, मी धरण...’ ही कविता गायले. त्यांच्याबरोबर ती गाण्यास अवघे सभागृह टाळ्यांचा ताल धरत सहभागी झाले. कैलास म्हणाले, दया यांची ती कविता नंतर त्यांची राहिलीच नाही. ती आम्हा चळवळींच्या माणसांची होऊन गेली!

- प्रतिनिधी

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.