बलुतंची चाळिशी आणि ग्रंथालीची सार्थकता


_Daya_Pawar_3.jpgएखाद्या साहित्यकृतीची पंचविशी-चाळिशी-पन्नाशी किंवा शतक महोत्सव साजरा होण्याचे भाग्य जगात फार कमी साहित्यकृतींच्या वाट्याला आले आहे. मराठीत तर ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे. 'बलुतं’ या आत्मकथनाला हे भाग्य मिळाले आणि त्यानिमित्ताने ‘ग्रंथाली’ला एक वेगळी सार्थकता लाभली आहे.

‘ग्रंथाली’ला चव्वेचाळीस वर्षें झाली. सुरुवातीच्या सात-आठ प्रकाशनांनंतर ‘ग्रंथाली’च्या हाती दया पवार यांचे ‘बलुतं’ लाभले. दया पवार हे ज्या सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीतून आले होते, त्यांच्या साहित्याची वाट तोपर्यंत मराठी साहित्य प्रांतात पडली नव्हती. आत्मकथनाचा हा बाजही मराठी साहित्यविश्वाला पूर्णपणे नवा होता. त्यातील अनुभव, त्याचा शोध आणि व्यक्त होण्याची असोशी त्यावेळच्या मराठी सारस्वताला पूर्णपणे अनोळखी होती. ‘ग्रंथाली’ वाचक चळवळ जो नवा प्रवाह साहित्यविश्वामध्ये रुजवू पाहत होती, मराठी साहित्यविश्वाला जे जाणवून देण्याचा प्रयत्न करत होती, ‘बलुतं’ हे त्याचेच प्रातिनिधिक रूप होते. ‘ग्रंथाली’ने ‘बलुतं’मुळे समीक्षेचे नवे दालन खुले होईल असेही पाहिले आणि हे पुस्तक खेड्यापाड्यांत सर्वसामान्यांच्या हातात जाईल यासाठी परिश्रम घेतले.

‘बलुतं’ गाजणार होतेच. तसे ते गाजले. पण, तेवढ्या गाजण्याने ही प्रक्रिया थांबणार नव्हती. त्यामुळे पाठोपाठ ‘उपरा’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं गोठणं’, ‘आभरान’, ‘कार्यकर्ता’, ‘उचल्या’, ‘आयदान’, ‘अक्करमाश्या’ आले... ही यादी आता बरीच मोठी आहे. या साऱ्या यादीचा उगम ‘बलुतं’ आहे. म्हणून ‘बलुतं’ची चाळिशी साजरी एका वेगळ्या अंगाने-ढंगाने, रंगाने सांस्कृतिक माहोलात कार्यक्रमाद्वारे करण्याचे ठरवले.

‘ग्रंथाली’ने यानिमित्त ‘बलुतं’च्याच नावाने उपेक्षित समाजघटकातून येणाऱ्या लेखकाच्या आत्मकथनासाठी पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार केवळ ‘ग्रंथाली’च्या प्रकाशनांसाठी किंवा लेखकांसाठी नाही, तर हा पुरस्कार देताना पूर्णपणे तटस्थता आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी साधल्या जाव्यात म्हणून येत्या पाच वर्षांसाठी हा पुरस्कार ठरवण्याची जबाबदारी आम्ही ‘दया पवार प्रतिष्ठान’वरच सोपवली आहे. यावर्षीच्या पहिल्या पुरस्कर्तीची निवड तर झाली आहे. ‘ग्रंथाली’च्या वतीने तेही श्रेय आम्ही घेऊ इच्छित नाही. मराठी साहित्याने गेल्या चाळीस वर्षांत आशय आणि भाषा या दोन्ही अंगांनी बराच प्रवास केला आहे. तो प्रवास निरंतर असतो. तो कोणी थांबवू शकत नाही. आपण सगळे त्याचे साक्षीदार व्हायचे असते. नव्या प्रवाहांना, नव्या उर्मीना योग्य वेळी पाठबळ द्यायचे असते, सुपीक जमीन उपलब्ध करून द्यायची असते. ‘ग्रंथाली’च्या चाळीस वर्षांपूर्वीच्या विश्वस्तांनी ते केले. त्याला मान्यता आज आपण सगळे देत आहोत. ‘ग्रंथाली’चे विद्यमान विश्वस्त मंडळही त्याच उर्मीने आणि त्याच जबाबदारीने साहित्यव्यवहाराकडे पाहत आहे.

- सुदेश हिंगलासपूरकर (विश्वस्त, ग्रंथाली)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.