महाराष्ट्राच्या बेचाळीस भाषांचे लोकसर्वेक्षण


_MaharachyaBechalis_BhashancheLoksarvekshan_1.jpgगणेश देवी यांच्या ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ ‘महाराष्ट्र’ या खंडात जवळपास बेचाळीस भाषा सर्वेक्षक व चर्चक यांचे प्रयत्न समाविष्ट आहेत. त्यांचे विभाग संपादक अरुण जाखडे यांनी महाराष्ट्रासंदर्भात भूमिका आणि पद्धत स्पष्ट केल्या आहेत. ते लिहितात, ‘महाराष्ट्राची भाषिक संस्कृती बहुआयामी आणि बहुविध आहे. ती दुर्मीळ होत आहे... या निमित्ताने ह्या प्राचीन भाषिक संस्कृतीचे, तिच्या परंपरेचे स्मरण झाले, नोंद करता आली.’ त्यांनी एकूण महाराष्ट्र भाषांचा हा दस्तऐवज आहे असे नोंदवले आहे. गणेश देवी यांनी या प्रकल्पाच्या निमित्ताने भारतीय भाषांचा दस्तऐवज वज्रलिपित केला आहे.

‘महाराष्ट्र’ या खंडात चार विभाग आहेत. पहिल्या विभागात (अ) मध्ये - मराठी आणि मराठीची रूपे, अन्य रूपे आणि सामाजिक उपरूपे यांसह मराठी प्रकाशने आणि अभिजात मराठीची वाटचाल समाविष्ट असून; अहिराणी, आगरी, कोहली, खानदेशी, चंदगडी, झाडी, तावडी, पोवारी, मालवणी, वऱ्हाडी, वाडवळी, सामवेदी, संगमेश्वरी अशी मराठीची रूपे परिचित होतात. (ब) मध्ये - सिंधी आणि उर्दू या मराठीतर भाषांची रूपे पाहता येतात.

दुसऱ्या विभागात कातकरी, कोकणा, कोरकू, कोलामी, गोंडी, गोंडी-थाट्या, गोंडी-माडिया, ठाकरी, ठाकूर क, ठाकूर म, ढोरकोळी, निमाडी, निटाली, परधानी, पावरी, भिल्ली/भिलोरी/देहवाली, मथवाडी, मल्हारकोळी, मावची, मांगेली, राठ्या (बारेला), वारली, हलबी या आदिवासी लोकभाषांचा परिचय होतो.

तिसऱ्या विभागात - भटक्या-विमुक्तांच्या कुंचीकोरवा, कैकाडी, कोल्हाटी, गुप्त व सांकेतिक भाषा, गोरमाटी, गोल्ला, गोसावी, घिसाडी, चितोडीया, छप्परबंद, डोंबारी, नंदीवाले, पारधी, पारुषी-नाथपंथी डवरी, पारूषी-मांग, पारुषी-मांग गारुडी, बेलदार, वडारी, वैदू या लोकभाषांचा परिचय होतो.

चौथ्या विभागात - दख्खनी, नॉ लींग या अन्य भाषांची रूपे परिचित होतात. परिशिष्टे पाहता कृषिसंस्कृतीतील काही शब्द, शेतीची साधने, घरातील वस्तू आणि बलुतेदारांचे बोलण्यातील शब्द नोंदवले आहेत.

सातशेवीस पृष्ठांच्या या ग्रंथात, प्रत्येक भाषेचे प्रारूप वाचकास ज्ञात व्हावे अशा नोंदी आहेत. भाषेचा इतिहास, परिक्षेत्र व त्याचे उपविभाग, मौखिक साहित्य व लिखित साहित्य, लोककथा, लोकगीते आदी लोकसाहित्य प्रकारांतून भाषा-परिचय होतो. नामे, सर्वनामे, क्रियापदे, नातेसंबंध, रंग, ऋतू, वार, महिने, अंक, मापे, अंतरे, खाणेपिणे, दिशा, शेती-वनस्पती, गुणदोष, प्राणी, पक्षी, कपडे, सामाजिक व्यवहार, वाक्प्रचार, म्हणी यांविषयी शब्द, नामे व त्यांचे चलन सहज लक्षात येईल. मौखिक परंपरेतील लोकसाहित्याचे नमुने देऊन भाषेची प्रामाणिकता स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्राच्या लोकभाषांच्या या प्रारूपांमुळे महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक विभागांतील प्राचीनतम साहित्य आणि भाषारूपे अभ्यासण्याचे साधन प्राप्त झाले आहे. परंतु ‘महाराष्ट्रा’सारख्या, अनेक भिन्नभाषिक सीमांवर, मध्यवर्ती स्वरूपात स्थित असलेल्या व्यापक भूप्रदेशाची वैविध्यपूर्ण भाषिक लोकसंस्कृती अभ्यासण्यास मदत होते. मराठी भाषेअंतर्गत विविध बोलींचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी या दस्तऐवजाचा उपयोग होऊ शकतो. मराठी भाषेची अभिजातता, मराठी भाषेची परंपरा व जडणघडण जाणून घेण्यासही या लोकसर्वेक्षणाचा मूलगामी उपयोग होऊ शकतो. भाषेचा ऐतिहासिक, वर्णनात्मक आणि सामाजिक भाषाविज्ञानाच्या अंगांनी अभ्यास करून मध्यवर्ती भाषेचा विकास आणि घटना समजून घेण्यास आणि मराठी वाङ्मयाचे शैलीविज्ञानात्मक आणि प्रादेशिक स्वरूपातील परिशीलन करण्यासाठीही त्या प्रकल्पाचा पायाभूत उपयोग होऊ शकतो.

'भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण' हा प्रकल्प व्यापक स्वरूपात प्रथमच उभारला गेलेला आहे. मात्र तो केवळ प्राथमिक अभ्यास नसून; पूर्वसुरींच्या अभ्यासाचा दस्तऐवज साकारलेला प्रकल्प आहे.

- अनिल सहस्रबुद्धे

shripad.kulkarni68@gmail.com

- (अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ जानेवारी - मार्च 2014 मधील लेखातून उद्धृत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.