गांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील


_GandhiNavacheGugha_1.jpgमहात्मा गांधींच्या मृत्यूला सत्तर वर्षें झाली. म्हणजे त्यांना पाहू न शकलेल्या दोन पिढ्या होऊन गेल्या. गांधी नावाचे गूढ किंवा गांधी नावाचे गारुड अजून कायम आहे. गांधी यांचे नाव गेल्या शतकातील सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणूनदेखील काही वेळा उच्चारले जाते. आज ऐतिहासिकदृष्ट्या विचार करत असता गांधींचे जे महात्म्य आहे ते ध्यानी घेता ‘गूढ’, ‘गारूड’ हे शब्दप्रयोग अनैसर्गिक वाटत नाहीत. मात्र शंभर वर्षांपूर्वी, गांधीजी हे ‘फूल अॅक्शन’मध्ये असताना देशविदेशातील लोकांना ते गूढच वाटत होते असे ‘पुण्यश्लोक’ या, 1922 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून जाणवते. ‘भारत गौरव ग्रंथमाले’ने ते पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे लेखक म्हणून ‘एक महाराष्ट्रीय’ एवढाच उल्लेख आहे. त्या पुस्तकात महात्मा गांधी यांच्यावर अनेक वृत्तपत्रे /नियतकालिके यांतील लेखांचे संकलन आहे. त्यामध्ये इतर भाषांत छापून आलेल्या लेखांचे अनुवाददेखील आहेत. प्रकाशक त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात, “हा लेखसंग्रह करत असताना केवळ व्यक्ती या दृष्टीने महात्माजींची अवास्तव स्तुती किंवा विषदर्प दृष्टीने केलेली अकारण निंदा अशा प्रकारचे थोडे लेख हाती लागले; परंतु ते पुस्तकातून वगळले आहेत. केवळ तत्त्वदृष्ट्या हिंदुस्थानच्या चालू मन्वंतरासंबंधाने विचार करण्याची पात्रता ज्यांच्या लेखणीत दिसून आली तेवढ्याच लेखांचा संग्रह या पुस्तकात केला आहे.”

प्रकाशकांनी लेख संकलनासाठी किती मेहेनत घेतली असेल त्याचा काहीसा अंदाज ज्या वृत्तपत्रांतून लेख स्वीकारले आहेत त्या वृत्तपत्रांच्या नावांवरून येऊ शकेल – ‘एशियन रिव्ह्यू’, ‘डेली टेलिग्राफ’, ‘न्यू यॉर्क सिनफीनार’, ‘न्यू यॉर्क हेराल्ड’, ‘ग्लासगो हेराल्ड’, ‘हिबर्ट जर्नल’, ‘नेशन’ (न्यूयॉर्क ), ‘सर्वे ग्राफिक’, ‘कलकत्ता रिव्यू’, ‘डेली मेल’. जगभरातील वृत्तपत्रे आणि नियतकालिके, संगणक नसताना शंभर वर्षांपूर्वी वाचणे आणि त्यातून निवड करणे ह्यासाठी लेखक-प्रकाशक किती चिकाटी दाखवत होते याच्या कल्पनेने अचंबित व्हायला होते. काही लेखांच्या सोबत त्यांच्या लेखकांची नावे दिली आहेत तर काही ठिकाणी फक्त वृत्तपत्रांची नावे दिसतात. दोन लेख असे आहेत, की त्याखाली फक्त ‘एक इंग्रज’ आणि ‘एक अमेरिकन’ एवढेच उल्लेख आहेत.

नवलाची गोष्ट अशी, की त्या त्या लेखाखाली तो लेख कोणत्या तारखेला प्रसिद्ध झाला होता त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे लेख कोणत्या काळातील आहेत ही उत्सुकता राहते. तिचे काही अंशी निराकरण प्रस्तावनेत आहे. यांतील अर्धे लेख महात्माजी तुरुंगात जाण्यापूर्वीचे असून, अर्धे लेख महात्माजी तुरुंगात गेल्यानंतरचे आहेत. तरीही त्या लेखांच्या खाली पूर्वप्रसिद्धीची तारीख असती तर त्यांचे महत्त्व आणखी वेगवेगळ्या तऱ्हेने अधोरेखित झाले असते. संग्रहातील विविध लेखांत महात्माजींच्या स्वदेशी, असहकार, अहिंसा आणि त्यांचा साधेपणा यांवर दोन्ही बाजूंची मते आलेली दिसतात. गांधीजींच्या साधेपणाचे आणि व्रतस्थ वर्तणुकीचे विदेशातील लोकांना वाटलेले नवल आणि महात्माजींच्या भारतीयांवर असलेल्या प्रभावाचा परदेशी लोकांनी लावलेला अर्थ अनेक लेखांतून दिसतो. मात्र सर्व लेख गांधीजींचा परदेशी नागरिकांनी केलेला स्वीकार किंवा केलेले कौतुक सांगणारे नाहीत. ‘एक इंग्रज’ त्याच्या लेखात म्हणतो, “गांधी यांनी मुलांच्या हाती चरखा देण्यापेक्षा त्यांचे लक्ष शेतकी सुधारण्याकडे लावले असते तर हिंदुस्थानला ते अधिक फायद्याचे झाले असते. असहकारयोगाचा सारा कार्यक्रम पार पडला तर हिंदुस्थानचे कल्याण खरोखरच होईल, की नाही हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. रवींद्रनाथ टागोर त्यांचा युरोपातील प्रवास संपवून हिंदुस्थानात परत गेले आणि त्यांनीच तो प्रश्न तेथे प्रथम उपस्थित केला. त्यांनी त्यांस असहकारयोगाचा कार्यक्रम पसंत नाही असे जाहीर केले. ते देशभक्त या नात्याने त्या गोष्टीबद्दल फार वाईट वाटत आहे असेही म्हणाले.” (पृष्ठ ७९). मात्र रवींद्रनाथांनी एका अमेरिकन पत्राच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत (पृष्ठ ५३-५७ ) त्यांनी गांधीजींच्या कोणत्याही कार्यक्रमाशी मतभेद दर्शवलेले नाहीत. त्यांनी गांधीजींच्या त्यागाची स्तुती करताना त्या मुलाखतीत म्हटले आहे.” प्रत्यक्ष यज्ञपुरुषाचे दर्शन कोणास करायचे असेल तर त्याने गांधी यांस भेटावे. यज्ञाला स्वतः मनुष्यरूप घ्यावेसे वाटले आणि गांधी यांच्या रूपाने तो अवतरला असे मला वाटते. असहकारिता ही चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे. ते युद्ध कल्पनासृष्टी आणि जडवादाची दंडनीती यांजमध्ये आहे. शुद्ध जडात्मक दंडनीती आणि कल्पनासृष्टीतील चैतन्यशक्ती यांच्या युद्धात चैतन्यशक्तीचाच विजय अखेर होईल असे मला वाटते. ती प्रचंड चळवळ गांधी यांजसारख्या योग्य पुरुषाच्या हाती आहे हे खरोखरच मोठे नशीब म्हटले पाहिजे.”

लाला लजपत राय आणि दीनबंधू अँड्र्यूज यांचे लेखही संग्रहात आहेत. पैकी लाला लजपत राय हे जहाल म्हणून ओळखले जात. मात्र ते त्यांच्या लेखात गांधीजींचे विचार पूर्णपणे पुरस्कृत करताना दिसतात. महात्मा गांधी यांना वेगवेगळ्या अंगांनी समजून घेण्याकरता पुस्तकाचे वाचन आवश्यकच होय.

‘पुण्यश्लोक’
प्रकाशक - प्रभाकर श्रीपत भसे
भारत गौरव ग्रंथमाला पुष्प ४५
१-११-१९२२
पृष्ठे २१४ मूल्य - सव्वा रुपया

- मुकुंद वझे

'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'ने महात्मा गांधी लिखित 'हिंदस्वराज्य' पुस्तकाला एकशे चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुणे येथे दोन दिवसांचा परिसंवाद २०१३ साली घडवून आणला होता. तो परिसंवाद 'थिंक महाराष्ट्रा'च्या युट्युब चॅनेलवर पाहता येईल.

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.