इये मराठीचिये नगरी


मराठी लिहीता-बोलताना माझ्या भोवताली सतत होणारा इंग्रजी शब्दांचा वापर मला अनेक वर्षे त्रास देतो आहे.

माझ्या लहानपणी रसाळ, अर्थपूर्ण आणि साधे पण नेटके मराठी लिहीणारे आणि बोलणारे माझ्या वडिलांच्या पिढीतले कितीतरी लोक होते. त्यातले अनेक इंग्रजीही सफाईने बोलत व लिहीत. माझ्या वडलांचे मराठीचे शिक्षक आणि वसंत कानेटकरांचे वडिल कवी गिरीश आमच्या घरी अनेकदा उतरत असत. ते आल्यानंतर साहित्याशी जवळचे किंवा दूरचे संबंध असणारे कितीतरी जण घरी येत असत. अशा अनेक वेळी चूप बसण्याच्या अटीवर मला चर्चा ऐकायची परवानगी मिळत असे. रा. ग. गडकऱ्यांच्या आणि इतरांच्या कविता एकामागून एक म्हणायची चढाओढ होत असे. कवी गिरीश, यशवंत हे कविता सुंदर गात असत.

वामन मल्हार जोशांच्यामुळे माझ्या बहिणीचे नाव रागिणी ठेवले होते. मी त्यांना पाहिले नाही. पण त्यांच्या सोप्या भाषेत मांडलेल्या तर्कशुद्ध विचारांबद्दल वडिलांनी मला कितीदा तरी सांगितले होते.

प्र. के. अत्र्यांचा आचरटपणा वगळला तर त्यांचे अग्रलेखही वाचनीय असत - विशेषत: नेहरूंवरची 'सूर्यास्त' ही लेखमाला वाचताना लहानापासून मोठ्याचे डोळे सहज पाणावतील अशी त्यांची लेखणी स्रवली होती. त्यांनी लिहीलेल्या 'नवयुग वाचन माले'तल्या नादमधुर आणि सरळ मराठीचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही.

कॉलेजमध्ये मला मराठी शिकवणारे म. वा. धोंड, रा. ग. जाधव, विजयाबाई राजाध्यक्ष यांनी कधी इंग्रजीची ठिगळे लावली नाहीत. अशोक केळकरसारखा गाढा विद्वान मित्र ज्याने हार्वर्ड, येल इ. जगप्रसिद्ध विद्यापीठात अध्यापन केले तोही किती सुरेख, अर्थवाही आणि नेमके मराठी बोलत असे. अशोक जर्मन, उर्दु, फ्रेंच ह्या भाषा जाणत होता. त्यातून मराठीत अनुवाद करत होता.

माझा अनेक दशकांचा दुसरा बहुभाषिक मित्र म्हणजे गोविंद पुरूषोत्तम देशपांडे. चीनी भाषा शिकलेला, काही दशके जवाहरलाल नेहरू विद्यापीठात चीनी संस्कृती, इतिहास व राजकारण शिकवणारा, जर्मनीत काही काळ अध्यापक असलेला गोविंद जी कोणती भाषा बोलत असे तिचे गुण जाणून ती बोलत असे. त्याचा संस्कृतचा अभ्यास सखोल. संस्कृत काव्ये मुखोद्गत. तो एकाद्या भाषेतले संपूर्ण अवतरण देऊन पुन्हा तिहाई घेतल्याच्या सफाईने मराठीतले संभाषण सुरू करीत असे.

अरूण कोलटकरबरोबरचे संवाद सहजपणे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जात. पण सांधे बदलताना खडखड होत नसे.

आमच्यापैकी कुणीही देशीवादी नव्हते. भाषाशुद्धीबद्दल संकुचित विचार नव्हते. पण भाषेच्या सौंदर्याची जाण होती. तिचे आंतरिक भान होते. तिचा तोल न जाऊ देता, तिचा रेखीवपणा आणि सुरेलपणा यांचा मान राखून प्रत्येक जण भाषेचा / भाषांचा वापर करत असे.

आता चाळीशीच्या खालच्या पिढीचे लेखन जेव्हा वाचतो, त्यांची वक्तव्ये ऐकतो तेव्हा अंगावर शहारा येतो. यांना न इंग्रजी येते न मराठी. व्यावहारिक साक्षऱता म्हणावी इतकीच भाषेची जाण. एकाद्या संस्कृतीत जन्माला येतो म्हणजे तिची भाषा येते असे नाही. सूराप्रमाणे लिहीण्याची भाषा, बोलण्याची भाषा कमवायला लागते. तिचा रियाज करावा लागतो. तिच्या श्रुतींतली अंतरे कानांना कळावी आणि जीभेतून वळावी लागतात. लिखाणात वैचारिक व सांस्कृतिक खांब आणि तुळया झेलाव्या लागतात. ध्वनीच्या वेलबुट्‌ट्या साधाव्या लागतात. प्रासांच्या लालित्याशी लडिवाळपणा करायला लागतो. शेलक्या शब्दांचे लफ्फे झोकात फेकावे लागतात. भाषा कुठलीही असो. तिच्यावर प्रेम करायला लागते. तिचा अनुनय करावा लागतो.

भाषांचा योग्य मिलाप होतो तेव्हा खानदानी अरबी घोडे जन्माला येतात. ते वेगाने अर्थाला वाहून नेतात आणि त्यांच्या ध्वनीच्या नालबंद टापांनी दरीखोरी दुमदुमत रहातात.

एरवी जन्माला येतात त्यांना म्हणतात भाषिक खेचरे. त्यांना भाषेला पुढच्या पिढीपर्यंत नेता येत नाही. आपल्या भाषिक आडमुठेपणामुळे ती जन्मताच खच्ची झालेली असतात.

मी सुमारे दहा भाषांचा अनेक वर्षे अभ्यास केला आहे आणि करतो आहे. त्यानंतर नशापाणी न करता, संपूर्ण शुद्धीवर असताना, शरीराने आणि मनाने ठणठणीत असलेल्या स्थितीत माझ्या मराठी भाषिक मित्रांना आणि मैत्रिणींना माझे कळकळीचे सांगणे आहे. जग फिरून आल्यावर मला अंगणातल्या दंवाच्या थेंबावर पहिला सूर्यकिरण दिसल्यावर जे काही दिसले ते मी तुम्हाला फक्त मराठीतच सांगेन. आणखी काय सांगणार? प्रभाकर शाहीराच्या एका ओळीची आठवण करून देतो. "आम्ही जातो. तुम्ही रंग करा आपुला".

- अरूण खोपकर

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.