कैद केलेले कळप!

प्रतिनिधी 17/04/2018

_KaidKeleleKalap_1.jpg'कैद केलेले कळप' ही डॉ. अरुण गद्रे यांची कादंबरी 2015 साली प्रसिद्ध झाली. तिची दुसरी आवृत्ती 2016 साली, म्हणजे वर्षभरात प्रसिद्ध झाली. गद्रे ती कादंबरी लिहिण्यास का प्रवृत्त झाले? त्यांनी त्याविषयी सविस्तर मनोगत लिहिले आहे. कादंबरी त्यांच्या स्वतःच्या सामाजिक कामातील अनुभवांवर आधारलेली आहे. आम्ही त्या कादंबरीची पुरस्कारासाठी शिफारस करताना मुख्यतः कादंबरीची कथावस्तू विचारात घेतली. ती समाजाच्या अंत:स्तराशी संबंधित आहे आणि त्याचवेळी तिचा संबंध वर्तमान बाह्य सामाजिक परिवेशाशीदेखील आहे. आम्ही कथावस्तूची त्यांनी संयमपूर्वक केलेली हाताळणीदेखील विचारात घेतली. कादंबरीचा विषय अगदी वेगळा आहे. नुसता वेगळा नाही, तर सर्वसाधारण सुशिक्षित वाचकांच्या अनुभवांच्या कक्षेबाहेरील आहे. कधी तशी व्यक्ती-घटना बघण्यात- ऐकण्यात आली, तर चटकन झटकून टाकण्याचा आहे, पण तरीदेखील त्याबद्दल एक चोरटे कुतूहल वाटण्यास लावणारा आहे. तो विषय बऱ्याच जणांच्या सूप्त आकर्षणाचाही आहे. विषय आहे देहविक्रय करण्यार्‍या समाजातील निम्न स्तरावरील स्त्रिया आणि समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष या समाजगटांच्या आयुष्याचा. त्या गटांमध्ये आणि त्या गटांमुळे बाहेरच्या समाजामध्ये एड्स या दुर्धर व्याधीचा प्रसार होऊ नये यासाठी काम करणारी एक स्वयंसेवी संस्था -NGO आणि तिचे कामकाज या कादंबरीत चित्रित झाले आहे.

आपण मध्यमवर्गीय सर्व लोक समाजाच्या ज्या स्तरावर वावरत असतो त्या स्तराच्या खाली बिळे करून ते समाजगट राहत असतात, त्यात वावरत असतात. त्या दोन गटांखेरीज आणखीही काही गटांची बिळे तेथे असतात. लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर - ते गट LGBT या नावाने समाजात ओळखले जातात. त्याखेरीज त्यात मेल प्रॉस्टिट्यूट्सही असतात- देहविक्रय करणारे पुरुष. पण सगळ्यात भीतीदायक, सगळ्यात धोकादायक आणि सगळ्यात क्रूर गट असतो तो  paedophiter चा - बालकाचे यौन शोषण करणाऱ्या लोकांचा. त्याची हृदयविदारक दोन उदाहरणे कादंबरीत वाचण्यास मिळतात. वाचकाच्या  पायाखालील जमिनीत कोठेतरी त्यातील एखाद्या बिळाचे तोंड दिसते. त्याबद्दल लोक कधी दबला तर कधी मोठा आवाजही करतात, पण ती बिळे जमिनीखाली खूप खोलवर पसरलेली असतात. त्यांची बांधणी मजबूत आणि पद्धतशीर असते. त्यांपैकी काहींचे चित्रण कादंबरीत पाहण्यास मिळते.

कादंबरीचे लेखन या गटांच्या आयुष्याबद्दल, वागण्याबद्दल पुरेसे तपशील देऊन झालेले आहे. पण लेखनाचे वैशिष्ट्य हे आहे, की त्यात उत्तेजकता नाही. चित्रण त्या संबंधांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचा आब राखून, त्यांचे वर्तनस्वातंत्र्य मान्य करून एका वस्तुनिष्ठ तटस्थतेने आणि तरीही सहृदयतेने केलेले आहे. एका डॉक्टरचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आणि सहानुभूतीपूर्ण व्यवहार त्यात दिसून येतो.

माणसांचे सगळे प्रश्न, सगळी सुखदुःखे समाजाशी निगडित नसतात. पण सगळे सामाजिक प्रश्न हे माणसांचे असतात. त्या प्रश्नांमध्ये माणसांचे सुखदुःख गुंतलेले असते. त्यात गुंतलेला, प्रश्नांच्या मागचा माणूस दिसू लागला, की त्याचे सुखदुःख कथनात्म साहित्याचे रूप घेते आणि ते प्रश्न सामाजिक समस्यांबद्दलचे वृत्तांत, अहवाल किंवा आकडेवारी यांच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे आणि थेटपणे वाचकांपर्यंत पोचतात.

कादंबरीचे कथानक तीन पातळ्यांवर घडते. पहिली पातळी आंतरराष्ट्रीय स्तरावरची. तेथून  एक फंडिंग एजन्सी जगभरातील एड्सविरोधी कामासाठी पैसा पुरवते. तो पैसा त्या फंडिंग एजन्सीला आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या त्यांचे स्वतःचे व्यावसायिक धोरण राबवण्यासाठी देत असतात. दुसरी पातळी देशांतर्गत असते- जेथे प्रत्येक देशात तो पैसा त्या त्या देशपातळीवरील कार्यालयाकडे पाठवला जातो. भारतात तो त्या फंडिंग एजन्सीच्या दिल्ली येथील कार्यालयात पाठवला जातो. तिसरी पातळी स्थानिक एनजीओ ची- जेथे खरे काम चालते, आणि त्या कामासाठी दिल्लीहून पैसा पाठवला जात असतो. कामाचे स्वरूप, कामाची व्याप्ती, कामाचे ध्येयधोरण आंतरराष्ट्रीय फंडिंग एजन्सीमार्फत आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या ठरवत असतात. स्थानिक एनजीओ ती करत असलेल्या कामाचे अहवाल नियमित तयार करते आणि ते दिल्लीच्या कार्यालयाकडे पाठवते. स्थानिक एनजीओमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांबरोबर प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, त्या त्या समाजगटांशी संपर्क साधणाऱ्या त्यांच्यापैकी काही प्रशिक्षित व्यक्ती असा स्टाफ असतो. स्टाफचे काम असे असते की त्या समाजगटांना म्हणजे देहविक्रय करणाऱ्या समाजातील निम्न स्तरावरील स्त्रिया आणि समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष यांना कंडोम वापरण्यास प्रवृत्त करायचे, त्यांना कंडोम वापरण्याचे प्रशिक्षण द्यायचे, त्यांना कंडोम पुरवायचे, आणि त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करायची. त्या सर्व कामांचा विशेषतः नियमित वैद्यकीय तपासणीचा अहवाल तयार करून तो देशातील मुख्य कार्यालयाकडे पाठवायचा.

या साध्या, सरळ, एकमार्गी कामात गुंतागुंत तयार होते ती कामे करणाऱ्यांचे वेगवेगळे स्वभाव, त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, त्यांचे कौटुंबिक प्रश्न यांच्यामुळे. पण फक्त त्यांच्यामुळे नव्हे. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय फंडिंग एजन्सीमधील राजकारण,  त्यांची बदलती ध्येयधोरणे, देशांतर्गत कार्यालयातील अधिकाऱ्यांचे आंतरराष्ट्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी असणारे संबंध यांच्यामुळेदेखील गुंतागुंत वाढत जाते.

कादंबरीच्या शेवटी शेवटी लेखकाने मिशनरी हॉस्पिटल हा एक नवा घटक आणला आहे- कथानकाचा रोख बदलण्यासाठी म्हणून. मिशनरी हॉस्पिटल सेवाभावी वृत्तीने एड्स च्या मरणासन्न रोग्यांसाठी काम करते, पण त्या काम करणाऱ्यांची या समाजगटाच्या वर्तनवैचित्र्याला सहानुभूती नाही.

लेखकाने ते निमित्त करून, काही संशोधनाचा हवाला देऊन एकूणच समलिंगी संबंधाच्या नैसर्गिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे आणि अलिकडे जाहीरपणे केल्या जाणाऱ्या त्यांच्या चळवळीशी असहमती दर्शवली आहे.

एक वैद्यकीय व्यावसायिक आणि त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लेखकाने कथानकाला दिलेले वळण समजण्यासारखे आहे, परंतु त्याने कादंबरी लिहिताना एक सृजनशील लेखक म्हणून घेतलेल्या भूमिकेशी ते वळण विसंवादी आहे.

आम्ही या कादंबरीची पुरस्कारासाठी शिफारस केली, कारण कादंबरी एका नाजूक, अवघड आणि दडपल्या जात असलेल्या विषयाचे सहृदयतेने, संयमाने, शक्य तितक्या संतुलीतपणे चित्रण करते. कादंबरीकाराने रंगवलेले चित्र काहीसे भावुक आणि आदर्शवादी असले, तरी ते भविष्याबाबात आशावादी चित्र रंगवते.

- नीलिमा भावे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.