कला-संस्कृती विचार आजच्या परिस्थितीत आणा!


प्रदीप मोहिते यांनी 'दिवाळी आणि करुणरम्य संस्कृती' या लेखात संस्कृतिरक्षण व संवर्धन या बाबतीतील कारुण्याचा मुद्दा भावस्पर्शी रीतीने मांडला आहे. तो दिवाळीच्या निमित्ताने पुढे आल्यामुळे अधिकच भिडतो. त्यामध्ये चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपासून महाराष्ट्रात रुजू झालेली वैचारिक बंडखोरी आहे. ती विचारांच्या पातळीवर योग्यही आहे, परंतु समाज त्या काळात प्रगतीची पाऊलवाट चोखाळत पुढे गेला आहे. त्यामुळे विषय गुंतागुंतीचा बनला आहे. मोहिते ज्या कोल्हाटी समाजाबद्दलच्या कणवेचे उदाहरण घेऊन लिहितात, तो कोल्हाटी समाजही इतर समाजाबरोबर प्रगती पावला आहे. तो समाज भिक्षेकरी व उपेक्षित राहिलेला नाही. त्यांतील निवडक व्यक्तींनी तर ऑस्ट्रेलिया-अमेरिका-न्यूझिलंड- रशिया-इंडोनेशिया या देशांत कार्यक्रम केले आहेत. कोणताही कोल्हाटी त्याच्या मुलीला तमाशात घालायला तयार नाही. प्रत्येक कोल्हाट्याला त्याच्या मुलीला शिकवायचे आहे. मुलामुलींना शिकायचे आहे की नाही व काय शिकायचे आहे हा सा-या समाजपुढीलच वेगळा प्रश्न आहे. सुषमा अंधारे ही कोल्हाटी स्त्री कलेक्टरपदापर्यंत पोचली आहे व ती त्या समाजासाठी मोठे काम करून राहिली आहे. कोल्हाट्यांची मुलेही पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकून स्थलांतराची स्वप्ने पाहत आहेत. मंगला बनसोडे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांचा फोटो क्षणार्धात सर्व समाजात व्हॉटस् अॅपवर फिरला आणि ते उदाहरण तुरळक नाही. नवनवीन घटना व नवनवीन हकिगती सोशल मीडियामधून समाजात प्रसृत होत असतात. तो समाज, तेवढाच नव्हे तर एकूण समाज भौतिक प्रगती व तंत्रविज्ञान यांमुळे तेवढा आधुनिक बनला आहे.

प्रश्न गुंतागुंतीचा असा झाला आहे, की तमाशा दाखवण्यासाठी जेथे संधी आहेत व जेथे एका कार्यक्रमाला लाखभर रुपये मिळू शकतात तेथे ब्राह्मणादी पुढारलेल्या समाजातील मुली आहेत. कोल्हाटी मुली त्यापासून वंचित आहेत. कारण कोल्हाट्यांना त्या कलेपासून दूर राहायचे आहे आणि मोहिते यांच्यासारखे विचारवंत त्याची सैद्धांतिक चर्चा करत आहेत.

मुळात कलाविचारापुढेच वेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. लोककला लोकांमधून विकसित होत गेल्या. त्या भारतात धर्मविचाराशी जोडल्या गेल्या. त्यामधून कलावंतांचे शोषण सुरू झाले. ती एक दुष्ट व्यवस्थाच तयार झाली. (राजकारण सांगते, की ती केली गेली.) त्यात शोषण होते हे खरेच, पण ते शोषण आहे हे माणसाला गेल्या दीड-दोनशे वर्षांत कळून आले. त्या राजकीय प्रक्रियेत कला वैचारिक पातळीवर तरी व्यवस्थेपासून वेगळी काढली गेली. (ती दुस-या बाजारी व्यवस्थेशी जोडली गेली – पण तो मुद्दा वेगळा), कलेला शासनाचे प्रोत्साहन मिळू लागले. त्या ओघात लोककलेला असलेला धर्म-संस्कृतीचा, वर्णवर्चस्वाचा संदर्भ दुर्बल होत गेला; किंबहुना ते नातेच राहिलेले नाही. आज कलावंतांचे शोषण कलाकेंद्रांत होत असते.

लोककलेचे जतन व संवर्धन हाच निव्वळ मुद्दा तयार झाला – तशी लोकशाही शासनाकडून धोरणे विचारार्थ व अंमलबजावणीसाठी पुढे येऊ लागली. त्यामुळे मृण्मयी देशपांडे व भार्गवी चिरमुले या कोणाही कलानिपुण कोल्हाटी स्त्रीइतक्याच सक्षमपणे तमाशा सादर करू शकतात. ती कला कृतक असते, तिला तमाशाचे विशुद्ध स्वरूप असू शकत नाही. वेगळे उदाहरण घेऊन सांगायचे तर दशावतार नाट्य पूर्वीप्रमाणे रात्रभर करत राहायचे, की सद्यकाळात रसिक प्रेक्षकांना रुचेल-पचेल अशा दीड-दोन तासांत सादर करायचे? त्या प्रयोगाला कृतक म्हणायचे का? हा कलेपुढील प्रश्न आहे. तो विचारवंत सोडवू शकत नाहीत. तो समाज सोडवतो व विद्वान त्याचा अर्थ लावणार.

लोककलेच्या जतन-संवर्धनाबाबत दोन विचारसूत्रे रूढ झाली आहेत. एक आहे दत्तो वामन पोतदार – रा.चिं. ढेरे या संप्रदायाचे. ते कलावंतांना लोकसंस्कृतीचे उपासक, लोकपुरोहित म्हणतात. दुसरे विचारसूत्र पुरोगाम्यांनी रूढ केले आहे. ते म्हणतात, की समाजव्यवस्थेने लोककलावंतांना भिक्षेकरी, उपेक्षित ठेवले आहे. या दोन्ही सूत्रांतील तथ्य व सतत बदलत चाललेली परिस्थिती नीट समजावून घ्यायला हवी. मोहिते यांच्यासारखे विचारवंत कलेचे बाजारू स्वरूप व कलेतील अभिजातता जाणतात. त्यांना विठाबाई नारायणगावकर, यमुनाबाई वाईकर, राधाकृष्ण कदम, राजारामबुवा कदम, माणिकबाई रेणके यांच्या कलेतील निखळ सौंदर्य कळते – त्याचे दंडक तयार व्हावे, त्यांची नोंद व्हावी असे वाटते. ते योग्यच आहे, पण ते कलावंतांची दुस्थिती मांडताना मात्र दारू पिऊन रस्त्यावर पडणा-या ‘वाघ्यां’ची उदाहरणे घेतात. ते दोन्ही विचार वेगवेगळ्या पातळ्यांवर व्हायला हवेत. हे खरे आहे, की त्या दोन्ही प्रकारच्या विचारांमागील समाजव्यवस्था एकच आहे, पण तो विशिष्ट धर्म, ते यातुविधी नष्ट होत आहेत, त्या जागी एक नवी व्यवस्था येत आहे. ती निकोप, सर्वांना न्याय देणारी कशी असेल? नवे कलासंकेत कसे तयार होतील व विफल कलावंत दारू पिऊन मरणार कसे नाहीत असा समग्र विचार प्राप्त परिस्थितीच्या संदर्भात करावा लागेल. त्या परिस्थितीत चाळीस वर्षांपूर्वीचा विचार चालणार नाही. माणसाने माणसाचे शोषण करू नये हे त्या विचारपद्धतीमधील सूत्र समाजाने स्वीकारले आहे. प्रश्न आहे त्यानुसार व्यवस्थापन करण्याचा.

-  प्रकाश खांडगे, 9821913600

(टीप - या लेखात उल्‍लेखलेला प्रदीप मोहिते लिखित 'दिवाळी आणि करुणरम्य संस्कृती' हा लेख 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'वर मंथन सदरात प्रसिद्ध झाला आहे.)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.