न सुटलेला प्रश्न - कर्णबधिरांच्या पुनर्वसनाचा


_N_Sutalela_Prshan_1.jpgविकलांग आणि त्यांचे पुनर्वसन हा प्रश्न मोठा आहे. त्यांचे लवकर आणि चांगले पुनर्वसन होण्यासाठी समाजाचा आधार आणि समाजाचा सहभाग या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. समाजाला अपंगांच्या कथा आणि व्यथा समजल्या तर समाजातून हजारो हात मदतीसाठी पुढे येतील. समाजातील समज-अपसमज दूर होऊन प्रेरणादायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. विकलांग व्यक्‍तींमध्ये कर्णबधिर, अंध, शारीरिक अपंगत्व असे विविध प्रकार असतात. त्या विविध प्रकारांतील शारीरिक विकलांग आणि अंध-अपंग ही मंडळी भाग्यवान म्हणायची. त्यांना पाहताच पाहणार्‍याला त्यांचे न्यूनत्व समजून येते- त्यांचे सुख-दु:ख समजते - त्यांना काय हवे-नको, त्यांचा त्रास काय आहे ते कळते आणि समाजातील व्यक्ती, संस्था, शासन त्यांना मदतीचा हात देण्यास पुढे सरसावतात.

शारीरिक विकलांग, अंध यांच्या पुनर्वसनाचा प्रवास पाहिला, की वाटते तसे भाग्य कर्णबधिरांना केव्हा लाभेल? ते समाजात अपरिचित आहेत. त्यांचे अपंगत्व दृश्य स्वरूपात समाजापुढे येत नाही. त्यांच्या रखडपट्टीला बधिरपणाचे निदान होण्यापासून सुरुवात होते. शासनाचे धोरण यथायोग्य आहे. ते बाळ जन्माला आल्यावर त्याच्या इतर चाचण्यांप्रमाणे श्रवणशक्तीची तपासणी व्हावी असे आहे. परंतु ती तपासणी त्यासाठी लागणारी यंत्रणा सज्ज नसल्याने सहसा होत नाही. पालकांना त्यांचे मूल इतर मुलांप्रमाणे बोलू लागत नाही तेव्हा शंका येते आणि मग त्यांची धावाधाव सुरू होते. अनेक रुग्णालयांत ऑडिओलॉजिस्ट असत नाहीत. शहरांमध्ये अशी अवस्था तर ग्रामीण भागात परिस्थिती काय असेल त्याचा विचार करावा! केंद्र सरकारची ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हिअरिंग हॅण्डिकॅप्ड’ वांद्रे येथे आहे. तेथेही परिस्थिती आशादायक नाही. ‘निदान करता बालपण संपले आणि दाखला मिळवता मिळवता तरुणपण येऊन ठेपले’ अशीच परिस्थिती बधिर व्यक्तींच्या बाबतीत सर्वसाधारणपणे सगळीकडे आहे.

प्रगत वैद्यकशास्त्र अपंगत्व कमीत कमी करण्याचा प्रयत्न करते, तर आधुनिक तंत्रज्ञान, तंत्रज्ञानाची जोड देऊन, अपंगत्वाबरोबर यशस्वी कसे जगावे हे शिकवते. कृत्रिम अवयव, विविध प्रकारचे क्रचेस, वॉकर्स, मोटराईज्ड सायकल-स्कूटर्स, व्हील चेअर्स त्यांच्या चालण्याफिरण्याची, योग्य ठिकाणी पोचण्याची समस्या सोडवतात. शिवाय, तशा व्यक्ती कंप्युटर्स, इंटरनेट, सीडीज आणि इतर गोष्टी यांच्या आधारावर त्यांच्या जिद्दीने समाजाला त्यांची ओळख पटवून देतात, समाजात स्थान मिळवतात. प्रसार माध्यमे त्यांच्या कर्तृत्वाच्या कथा समाजापर्यंत पोचवतात. अशा तर्‍हेने त्यांच्या पुनर्वसनाला आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे वयाच्या चौदाव्या वर्षी रेल्वे अपघातात कोपरापासून दोन्ही हात गमावलेली इव्हा अथाविया ही प्रशिक्षित समाजसेविका बनते, कॅन्सरग्रस्त रुग्णांची सेवा करते. तितकेच नव्हे तर एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्षपद भूषवते. तरुण प्रसाद फक्त हातांच्या बोटांची हालचाल करू शकतो; तो शरीराने काही करू शकत नाही. तो त्याच्या व्हीलचेअरमध्ये बसून त्याचे काम करतो, देशी-विदेशी अपंगांसाठी ‘समर्थ ट्रॅव्हल कंपनी’ यशस्वीपणे चालवतो. अंध रामकृष्ण आय.डी.बी.आय.चे फायनान्स मॅनेजर होतात. मी त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटले. मला त्यांना त्यांच्या बोलक्या कंप्युटरवर काम करताना पाहून आनंद झाला, त्यांचा अभिमानही वाटला. अंध शिवाजी चव्हाण ट्रॅव्हलिंग कंपनी चालवतात. त्यांची अंध पत्नी स्मिता चव्हाण स्वत:च्या घरसंसाराबरोबर अंधांच्या पुनर्वसन कार्यात झोकून देते. स्वत:चा ऑर्केस्ट्रा चालवणारी मंजू-मागू, संगीत-शिक्षिकेची नोकरी करणारी शांती – किती जणांविषयी लिहावे! पांढरी काठी, ब्रेल टॉकिंग बुक्स ते इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे अंधांच्या जीवनात चैतन्य निर्माण करतात. त्यांनी स्वत:च्या संस्था काढून, त्या स्वत: चालवून अंधांना नेतृत्व दिले आहे; त्यांच्या पुनर्वसनाचा आलेख चढता आहे.

‘कॉकलिअर इम्प्लाण्ट’चे ऑपरेशन केले, की कर्णबधिरांना ऐकू येते याचा बोलबाला गेली काही वर्षें आहे. ऑपरेशनचा फायदा ती मुले दोन-तीन वर्षांची असेपर्यंत ऑपरेशन केल्यास होतोही; परंतु पालक मुलाच्या बधिरपणाचे निदान उशीर होत असल्यामुळे मुले आठ-दहा वर्षांची होईपर्यंत ऑपरेशन्स करून घेऊ शकत नाहीत. ती त्या वयात केल्यावर अर्थातच त्यांचा फायदा अनुभवाला येत नाही. ज्या कानाचे ऑपरेशन केले जाते, त्या कानामागे साऊंड प्रोसेसर – एक लहान मशीन - बसवले जाते. मुलांना ते गैरसोयीचे असते. ऑपरेशननंतर श्रवण-वाचेचे प्रशिक्षण ऑडिओलॉजिस्ट-स्पिचथेरपिस्ट यांच्याकडून घ्यावे लागते. शिक्षित, अर्धशिक्षित पालकांना त्याचे महत्त्व समजत नाही व त्याकडे दुर्लक्ष होते. ऑपरेशनचा खर्च देणगीदार करण्यास उत्सुक असतात, पालकांना दुरुस्ती खर्च करावा लागतो. तोही अनेकदा परवडणारा नसतो.

श्रवणयंत्राचे मार्केट खूप विस्तारलेले आहे. पॉकेट मशीन जाऊन कानामागे, कानामध्ये लावण्याची मशीन बाजारात दीड-दोन हजार रुपयांपासून ते थेट लाख-दोन लाख रुपये किंमतीपर्यंत आहेत. सरकारी यंत्रणा त्या बाबत कार्यरत असली तरी योग्य श्रवणयंत्र प्रत्यक्ष हातात पडेपर्यंत वेळेचा बराच अपव्यय होतो. विशेषत: शाळांमध्ये जाणारी कर्णबधिर मुले श्रवणयंत्र लावताना दिसतात (शाळांची शिस्त), परंतु शाळा सोडलेली, शिक्षण संपलेली मुले आणि प्रौढ व्यक्ती श्रवणयंत्रे वापरताना दिसत नाहीत. “आम्हाला त्याचा उपयोग नाही” असे त्यांचे मत असते.

कर्णबधिरांच्या शाळांना शंभर वर्षांचा इतिहास आहे, तरी त्यांचे स्वरूप बदललेले नाही. त्यांनी आधुनिकतेचे आव्हान स्वीकारलेले नाही. ‘स्पेशल’ स्कूल्स मुलांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून असतात, परंतु ती स्कूल्स आणि त्यातील ‘स्पेशल’ शिक्षिका लक्ष मुलांच्या बुद्धिविकासावर केंद्रित करण्याऐवजी त्यांना बोलते करण्याचे धोरण स्वीकारतात. बहुतांशी शाळा चौथी अथवा सातवीपर्यंत शिक्षण देतात आणि नंतर कमी प्रतीचा दहावीचा अभ्यासक्रम राबवतात. त्यांच्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागण्याचे उद्दिष्ट व अपेक्षा ठेवल्यामुळे त्यांचे मुलांच्या बुद्धिविकासाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या कर्णबधिर विद्यार्थ्यांना वाचता-लिहिताही येत नाही. शासनाने एकात्मिक शिक्षणाचे धोरण नव्याने आणले आहे. ते त्या मुलांसाठी योग्य नाही. त्यातून पुढील शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी सहज उघडली जात नाहीत. त्यांना हवे असलेले उत्तम प्रतीचे प्रशिक्षण उपलब्ध होत नाही. कर्णबधिर नोकरी मिळवण्याच्या बाबतीत सर्व अपंगांच्या शर्यतीत सर्वांत शेवटचा असतो. न त्याला बोललेले समजते, न त्याला बोलता येते. कर्णबधिरांच्या पुनर्वसनाची कथा अशी दयनीय व करूण आहे.

‘इंडिया डेफ सोसायटी’, ‘नॅशनल डेफ असोसिएशन’, ‘बॉम्बे डेफ वुमन फाउंडेशन’ अशा कर्णबधिरांच्या संस्था आणि त्यांचे विशेष उपक्रम पाहिले, की त्यांच्या बुद्धिमत्तेची ओळख पटते. त्यांच्या ‘जागतिक कर्णबधिर दिन’, ‘इंडिया डेफ – एक्स्पो’, ‘डेफ फिल्म फेस्टिवल’ यांसारख्या कार्यक्रमांत त्यांचे नियोजन पाहिल्यावर त्यांच्या विविध क्षमतांची ओळख पटते. त्यांचे सर्व व्यवहार हे साइन लँग्वेजमधून चालतात. हजारो कर्णबधिर एकत्र येऊन आनंद मिळवतात. सांगण्याची खास बाब ही, की तेथे सर्वसाधारण लोकांना आमंत्रित केले जात नाही. त्यामुळे कर्णबधिरांचे बेट तयार होत आहे. सर्वसाधारण समाज आणि कर्णबधिर यांच्यात मोठी दरी आहे. तशीच दरी शिक्षित, श्रीमंत कर्णबधिर आणि अशिक्षित कर्णबधिर यांच्यामध्ये दिसते.

कर्णबधिर समाजामध्ये बदलत्या काळाबरोबर थोडीफार जागरूकता निर्माण होत आहे. व्हिडिओ मोबाईल्स, व्हॉट्सअॅप यांमुळे कर्णबधिर एकमेकांशी जोडले जात आहेत. त्यांना त्या माध्यमांमुळे माहिती, ज्ञान मिळत आहे. कोठे-काय चालले आहे, काय घडत आहे याची माहिती; तसेच, देश-परदेशांतील कर्णबधिरांच्या प्रगतीचा प्रवास त्यांच्यापर्यंत पोचत आहे. कर्णबधिर सक्षम असू शकतात व उत्तम यशस्वी जीवन जगू शकतात याची मुंबईतील दोन उदाहरणे म्हणजे ध्रुव लाक्राचे ‘मिरॅकल कुरियर’ आणि अनुज व प्रवीण यांचे पवई येथील ‘मिरची अॅण्ड माईम’ रेस्टॉरंट. तेथे फक्त कर्णबधिर युवक-युवती त्यांचे कर्मचारी आहेत. तेथे सर्व वाद-संवाद-चर्चा त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच खुणांच्या भाषेतून चालतात. ‘एम्प्युल्स’ एक्स्पोर्टचा व्यवसाय करणारा आलोक केजरीवाल, वडापावची गाडी चालवून त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उंचावणारी हरविंदर कौर, एम.बी.ए. करणारी वैदेही, पदव्युत्तर कंप्युटरचा कोर्स करून ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये अधिकारी म्हणून जॉब करत असलेली अवंती, स्वत:च्या जिवावर-हिंमतीवर ‘डेफ फिल्म फेस्टिवल’चे आयोजन करणारी जगदीश-प्रतिभाची जोडी या सर्वांना भेटल्यावर कर्णबधिरांच्या क्षमतेची, कर्तबगारीची ओळख पटते; ‘माणसाला ऐकू येत नाही म्हणून त्याचे सगळेच काही बिघडत नसते’ याचा प्रत्यय येतो.

सरकारच्या ‘स्किल डेव्हलपमेंट’ धोरणामुळे दहावी-बारावी पास-नापास झालेल्या कर्णबधिरांसाठी ‘डिडस्’ (DEEDS), ‘सुजया फाउंडेशन’, ‘एनेबल्ड इंडिया’, ‘संकल्प’ यांसारख्या काही ‘एनजीओ’ज पुढे येत आहेत. त्या कर्णबधिरांना विविध तर्‍हांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन सक्षम करत आहेत. ते ‘करून दाखवता समक्ष शिकून दाखवतो प्रत्यक्ष’ या कर्णबधिरांच्या अपेक्षा पूर्ण करत आहेत.

कर्णबधिरत्वाचे निदान ते त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण यांमधील अडथळे दूर करणे आवश्यक आहे. त्यांची इच्छा-आकांक्षा पुढील शब्दांत मांडण्याचा मोह होतो –

आम्हालाही उंच उडायचंय

तुमच्यासारखं मोठं व्हायचंय

तुमच्यासारखं जगायचं आहे

लाईफ एन्जॉय करायचं आहे

तुमच्यात सामावून जायचं आहे

तुमच्या बरोबरीनं राहायचं आहे

- उषा धर्माधिकारी

अध्यक्ष, डेफ अॅक्शन ग्रूप

9892211946, ashudharma@hotmail.com

लेखी अभिप्राय

Khup molache kaary aahe he. Usha tai na mnapasun dhanyawad.

rima desaiRima…19/08/2017

आभारी आहे की तुम्ही खुप छान करता .
मी एक कर्णबधिरांचा पालक आहे .
कृपया भाषा वाढिचा अभ्यासक्रम मिळेल का ?

santosh kulal06/02/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.