एकशे चौदा बुरूजांचा नळदुर्गचा भुईकोट किल्ला


_Naldurg_3.jpgनळदुर्गचा भुईकोट किल्ला एक सुंदर आणि सर्वात मोठा दुर्ग आहे. नळदुर्ग नावाचे गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात पुणे-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर आहे. तेथेच बोरी नदीच्या काठी तो भुईकोट किल्ला आहे. किल्ला अभेद्य व भक्कम असा आहे. किल्ला एका दिवसात पाहून होतो. किल्ल्याचा बाह्यभाग हैदराबाद हमरस्त्याने प्रवास करताना दुरूनही दिसू शकतो. किल्ल्यास तीन किलोमीटर लांबीची तटबंदी, तब्बल एकशेचौदा बुरुज, भव्य परिसर, दुर्गाच्या भोवतालचा खंदक- त्याच्या आत दुहेरी तटबंदी, खंदकात वळवून सोडलेले नदीचे पाणी इत्यादी गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. तेथे पावसाळ्यात उंचावरून कोसळणारे नर व मादी धबधबे पर्यटकांचे आकर्षण असतात.

किल्ल्यात तीन भव्य प्रवेशद्वारे ओलांडून जावे लागते. उंच व दगडी बुरुजांमधील प्रवेशद्वारे अवाढव्य आहेत. बुरुजांवरही कलाकुसर आहे. पर्यटक किल्ल्यात प्रवेश केल्या केल्या पहारेकर्‍यांच्या देवड्यांसमोर येतो. त्याला आत आल्यानंतर जाणवतो तो किल्ल्याचा भारदस्तपणा. प्रवेशद्वार, हत्ती दरवाजा, बुरुज, तटबंदी, पहारेकर्‍यांच्या देवड्या इत्यादीवर भारदस्तपणाची छाप दिसून येते. देवड्यांसमोर अंबरखाना आहे. उद्ध्वस्त अवस्थेतील अंबारखान्याची इमारतही तशीच भव्य आहे. तेथे तीन तोफा पडलेल्या दिसतात. ‘हाथी तोफ’, ‘मगर तोफ’ अशी नावे त्या अजस्र तोफांना आहेत. बारुद कोठा ही दारुगोळा साठवण्याची इमारत पडलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावरील रंगन महाल, जाळी ह्या भग्न इमारती इतिहासाची साक्ष देतात. त्या पाहत पाहत पर्यटक पाणीमहालाच्या दिशेने जातो. रस्त्यात ‘जामा मस्जिद’ व बाजूला लोकांची काही घरे दिसतात. तो त्यांच्या पुढे चालत गेला, की डाव्या बाजूला ‘बारदरी’ नावाची इमारत लागते. त्या इमारतीत इंग्रज अधिकारी कर्नल मेडोज टेलर राहत असे. इमारत बोरी नदीच्या पाण्याने भरलेल्या काठावर आहे. त्यामुळे बोरी नदीच्या पाण्याचे व त्याच्याच पुढे असणार्‍या बंधार्‍याचे दृश्य तेथून अप्रतिम दिसते. तो नजारा पावसाळ्यात तर इतका सुंदर दिसतो, की किल्ला भुईकोट वाटण्याऐवजी जलदुर्ग वाटू लागतो! बोरी नदीचे पात्र वळवून बांधलेला तो ‘जलमहाल’ म्हणजे सौंदर्याचे मूर्तिमंत शिल्प.

पर्यटक बारदरीची इमारत पाहून जलमहालाकडे जातो, खरे म्हणजे पाणीमहाल (जलमहाल) तर ते त्या नळदुर्गचे हृदयच आहे. पाणीमहालाचे सौंदर्य काही अनोखेच. पर्यटकांस बोरी नदीच्या बंधार्‍यावर आल्यानंतर प्रचंड जलसाठा दिसतो. तो नुसता बांध नसून त्यात जलमहाल आहे. बंधार्‍याच्या पोटात खाली तळाला महालाची खास आकर्षक वास्तू बांधलेली असून त्या काळी स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते त्याची कल्पना त्यावरून येते. किल्ल्याच्या संरक्षणासाठी जोडदुर्ग बांधलेला आहे. त्याचे नाव ‘रणमंडळ’. गडाच्या बाजूला असणार्‍या पठारावर रणमंडळ हे तटबंदीचे बांधकाम आहे. रणमंडळाला आणि नळदुर्गाला संरक्षक खंदक हवा, म्हणून बोरी नदीचे पात्र कायम ठेवून तिच्या प्रवाहाचा काही भाग वळवून पाणी खंदकात घेण्यात आले आहे. खंदकातील पाणी एरवीही कायम राहवे म्हणून खंदक आणि रणमंडळ यांच्यामध्ये बांध घालण्यात आला आहे. त्या वेळच्या प्रशासकाची कल्पकता व दूरदृष्टी तेथे दिसून येते.

_Naldurg_2.jpgआदिलशाहीतील शासक अली आदिलशहा याने किल्ल्यास जोडून नदीच्या पात्राचा सदुपयोग करणे, पाण्यापासून दुर्गाचे रक्षण करणे, पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करणे यासाठी दुसरा एक जोड किल्ला बांधण्याचे ठरवले. बोरी नदीचे पात्र किल्ल्याच्या आत वळवून चोहो बाजूंनी पाणी खंदकात सोडले आहे. दोन्ही किल्ल्यांना जोडण्यासाठी बांध बांधला. तो बांध नुसता भरीव दगड-वाळू-चुन्यात बांधलेला नसून आतमध्ये राणी महाल, गंधक महाल, गणेश महाल अशी दालने बांधण्यात आली आहेत.

तेथेच भुईकोटाचे वैशिष्ट्य दडले आहे. दोन दुर्गांना जोडणारा तो बंधारा एकशेचौर्‍याहत्तर मीटर लांब, अडीच ते चौदा मीटर रुंद व एकोणीस मीटर उंच आहे. बंधार्‍याच्या आत उतरून जाण्यासाठी पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या उतरून पर्यटक खाली आला, की त्याच्या समोर येतो तो दुर्गाचा पाणीमहाल! पर्यटक त्या कलाकृतीसमोर उभे राहताच स्तब्ध होतो. त्या महालास कोठेही पाण्याचा स्पर्श होत नाही. अतिशय थंड, अगदी एसीपेक्षाही थंडगार अशी ती निवांत जागा आहे. महालाच्या एका बाजूस पाणी अडवलेली भिंत तर दुसर्‍या बाजूला व्हरांडा आहे. महालात दोन दालने आहेत. बाहेरील बैठकीची खोली व आतील नक्षीदार, सुंदर असे शयनगृह. त्या दोन्ही दालनांमध्ये कारंजे उभे आहे. डावीकडे स्नानगृह व शौचगृह आहे. त्या सार्‍या वास्तूवर नक्षीदार बारीक कलाकृती कोरलेली आहे. सर्वात शेवटी नऊ गवाक्षांचा सज्जा दिसतो. पाणीमहालाचा आकार २३×१०×१० तर गच्ची २७×३३×०७ आहे. दोन्ही महालांतून नदी वाहते. बाजूने सांडवे सोडले आहेत. तेच नर-मादी धबधबे म्हणून ओळखले जातात. सांडवे शंभर-दीडशे फूट उंचीवरून कोसळतात, परंतु बांधाच्या आतील भागातील महालात बसणार्‍यांना पाण्याचा स्पर्शही होत नाही. तो ऐतिहासिक बांध मजबूत स्थितीत असून नदी अडवल्यामुळे आजुबाजूची शेती हिरवीगार झाली; पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. पाणीमहाल पाहवा तो पावसाळ्यात, जेव्हा बोरी नदी भरून वाहते तेव्हा. पाण्याचा बंधारा ओसंडून नर-मादी धबधब्यांच्या रूपाने वाहू लागतो. त्यातून पडणारे पाणी हे पाणीमहालासमोरच्या व्हरांड्यात पाण्याचा झिरझिरीत पडदा घेऊन खाली पडताना दिसते. पाणी (जल) महालाच्या दर्शनी भागातून नदीचे पाणी धबधब्यासारखे पात्रात पडते. महालात उभे राहिल्यास डोळ्यांसमोर पाण्याची चादरच निर्माण झाल्यासारखे दृश्य दिसते. त्या अप्रतिम पाणीमहालाच्या निर्मात्याचे नाव आहे मीर इमाद्दीन. त्याने त्या आरस्पानी सौंदर्याची माहिती देणारा फलकही महालात लावला आहे. पाणीमहाल १६१३ मध्ये इब्राहिम आदिलशहा – २ यांच्या काळात बांधला गेला आहे.

नळदुर्ग किल्ल्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे तेथील एकशेचौदा बुरुज. खंदक आणि नदीचा प्रवाह यांच्यामध्ये विविध आकारांचे बुरुज भुईकोटाचे सौंदर्य द्विगुणित करतात. काही बुरुज गोलाकार, षट्कोनी, अष्टकोनी आहेत. बुरुजांची नावेदेखील परंडा, नगर, संगम, संग्राम, बंड, पुणे बुरुज अशी मजेशीर आहेत. मात्र त्यातील दोन बुरुज आवर्जून पाहण्यासारखे आहेत. पहिला उफळी बुरुज. त्या बुरुजावर जाण्यासाठी सत्तर पायर्‍या असून तो किल्ल्याच्या आत उभा आहे. तो बुरुज म्हणजे किल्ल्यातील सर्वात उंच जागा. टेहळणीसाठी त्या बुरुजाचा वापर होत असावा. दुसरा गडाचा वैशिष्ट्यपूर्ण नऊ पाकळ्यांचा नवबुरुज. तो बुरुज पर्यटकास आतून दिसत नाही. तो हैदराबाद-तुळजापूर रस्त्यावर उभे राहिले, की दृष्टीस पडतो. एखाद्या बुरुजाला नऊ पाकळ्यांचा आकार क्वचितच पाहण्यास मिळतो.

दुर्ग काही काळ मराठी साम्राज्यातही होता. नंतर तो निजामाकडे गेला. ती मालकी हक्काने नवाब मोहम्मद इक्बाल अलिखान बहादूर यांच्या वारसांकडे आहे. सध्या वीस हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेले ते गाव हमरस्त्यामुळे वर्दळीचे आहे. गावात खंडोबा, भगवान आदिनाथ, इच्छापूर्ती हनुमान, गणेश, राम इत्यादी मंदिरे पाहण्यासारखी आहेत. त्याशिवाय मशिदी व मकबरेही आहेत.

- रंजना उन्हाळे

(आदिमाता, जून २०१७ अंकावरून उद्धृत)

Last updated on 11 Nov 2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.