औट म्हणजे साडेतीन

17 एप्रील 2017

‘औट घटकेचं राज्य’ किंवा ‘औट घटकेचा राजा’ असे शब्दप्रयोग मराठीत आहेत. त्याचा अर्थ अल्प काळाचे राज्य आणि अल्प काळाचा राजा असा होतो. एक घटका म्हणजे चोवीस मिनिटे. औट घटका किंवा साडेतीन घटका म्हणजे चौऱ्याऐंशी मिनिटे. त्यामुळे एखादे सरकार वर्षा-दीड वर्षांत पडले तर त्याचा उल्लेख औट घटकेचे राज्य असा केला जातो. अनेक पक्षांच्या कडबोळ्यातून आणि अपक्षांचा टेकू घेऊन उभी राहिलेली राज्य सरकारे आघाडीत बिघाड झाला किंवा अपक्षांचा टेकू सरकला की महिन्या-दोन महिन्यांत कोसळतात. त्यामुळे औट घटकेची सरकारे आणि त्यांचे औट घटकेचे सरदार खूप पाहण्यास मिळतात.

माणसाच्या शरीराचा उल्लेख ‘औट हाताचा देह’ असा काही वेळा केला जातो. अंगुळ, वीत, हात ही माणसाची प्राचीन काळापासूनची परिमाणे आहेत. बोटांमधील रुंदी म्हणजे अंगुळ, ताणलेला अंगठा व करंगळी यांच्या टोकांतील अंतर म्हणजे एक वीत, तर कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकाइतके अंतर म्हणजे एक हात. माणसाची उंची त्याच्या साडेतीन हाताइतकी म्हणजे औट हात असते.

‘शाळांमध्ये पूर्वी, पाठांतरावर भर दिला जाई. मुलांच्या तोंडी घोकून उतरवण्याचा प्रयत्न असे. तीस पर्यंतचे पाढे पाठ करावे लागतच; शिवाय पावकी, निमकी, पाऊणकी वगैरेही. पाठांतरात चूक झाली की दामले मास्तरांसारख्या जमदग्नींच्या हातचा मारही खावा लागे. म्हणूनच ‘पावकी, सवायकी, अक्कारकी, औटकी ह्यातील प्रत्येक संथा ही गतजन्मीची चेटकीण आहे ह्यांवर माझा नितांत विश्वास असायचा. त्या चेटक्यांनी माझे बाल्य पळवले’ असे पुलंनी ‘बिगरी ते मॅट्रिकः एक बिकट वाट’ ह्या लेखात म्हटले आहे.

ज्ञानेश्वरीत तेराव्या अध्यायात हे -

‘औट हात मोटके | की केंवढे पां कौतुके |
बरड की पिके | कोणाचे हे ||’

ह्या ओवीत माणसाच्या साडेतीन हात देहाचे वर्णन आले आहे.

कवी वसंत बापट यांनी ‘होडी’ ह्या कवितेत आपल्या देहाला होडीची उपमा देताना म्हटलंय,

औट हात होडीला माझ्या
आभाळाहुन मोठे शीड
बंदर धक्के चुकवून बेटी
भलत्या जागा घे निर्भीड. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तसे पाहिले तर विश्वाच्या ह्या अफाट पसाऱ्यात आणि काळाच्या अनंत विस्तारात प्रत्येक माणूस औट घटकेचाच राजा असतो, त्याच्या राज्याचा विस्तार औट हात एवढाच असतो आणि मृत्यूनंतर त्याला लागणारी जागाही औट हात इतकीच असते, नाही का !

- डॉ. उमेश करंबेळकर

आपला अभिप्राय नोंदवा