इगतपुरीचा नवरा-नवरीचा डोंगर

1 मार्च 2017

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कुशेगावजवळ नवरा-नवरीचा डोंगर प्रसिद्ध आहे. गिर्यारोहणासाठी लोकांना आवडेल असे ते ठिकाण आहे. ‘डोंगराच्या कुशीत वसलेले’ म्हणून त्या गावाचे नाव कुशेगाव. नाशिकहून वाडीवऱ्हे फाटा येथून वळले, की पश्चिमेकडे वीस किलोमीटर अंतरावर कुशेगाव लागते. गाडी कुशेगावला पार्क करून डोंगराच्या दिशेने पायी जावे लागते. डोंगर दुरून विलोभनीय दिसतो.

कुशेगावाच्या उत्तरेला पूर्व-पश्चिम पसरलेली डोंगररांग आहे. त्या डोंगररांगेच्या पूर्व टोकावर दोन सुळके आहेत. ते सुळके म्हणजे जणू नवरा-नवरी जोडीने उभे आहेत असे वाटते. म्‍हणून त्या सुळक्यांना ‘नवरा-नवरी’ असे म्हटले जाते.

कुशेगावातून वाटाड्या सोबत घ्यावा. त्या डोंगररांगेच्या मध्य भागात खिंड आहे. खिंडीच्या दिशेने चालत गेल्यास टेकडीचा एक टप्पा पूर्ण करून पुढे ती पायवाट मुख्य डोंगराकडे जाते. कड्याच्या दिशेने चालत गेल्यावर सुरुवातीला घनदाट जंगल लागते. भवतालची हिरवीगार गर्द झाडी, पक्ष्यांचे आवाज मन मोहून टाकतात. पायवाटेपासून जवळच डोंगरउतारावरून वाहणा-या पाण्याचा खळखळाट ऐकू येतो. पुढे, मुख्य डोंगराची चढण हिरव्यागर्द झाडीतून सुरू होते. तो भाग चढून आल्यावर, कड्याजवळ पोचल्यावर खरी गंमत येते. तो कडा म्हणजे वेगळा भूआकार आहे. कडा दुभंगून कड्यात फट निर्माण झालेली आहे. ती पाच ते सहा फूट रूंद व पंचवीस ते तीस फूट उंच आहे. त्या उंच, अरूंद फटीतून पायवाट जाते. फटीच्या टोकावर मोठी दगडी शिळा अडकलेली दिसते. त्या ठिकाणी पोचल्यावर सगळा थकवा दूर होतो. थंडगार हवा व निसर्गसौंदर्य मनाला मोहून टाकते.

कड्याच्या उंच, अरूंद फटीतून पुढे गेल्यावर पर्यटक शिखरावर पोचतो. तेथून अंजेनेरी, ब्रम्हगिरी व इतर डोंगररांगा दिसतात. वैतरणा व मुकणे धरण दिसतात. चोहोबाजूला असलेला हिरवागार नयनरम्य निसर्ग मनाला तजेला देतो. डोंगराच्या बाजूला कड्याला लागूनच मोठी घळई आहे. ती पायवाट त्या खोल घळीतून पुढे जात डोंगराच्या विरूद्ध बाजूला खाली उतरत जाते. पर्यटक अशा प्रकारे संपूर्ण डोंगररांग पार करून त्र्यंबकेश्वर गावाच्या दिशेने खाली उतरतो. तो प्रवास पाच ते सहा तासांत पूर्ण होतो. ते पदभ्रमण अतिशय रमणीय असते.

- प्रा. सीताराम. आर. निकम

Last Updated On 3rd March 2017

वाचकांच्या प्रतिक्रीया..

It will give an wonderful

It will give an wonderful information about the fort

Very Good and useful

Very Good and useful information sir I LIKE IT Congratulation

नमस्कार निकम सर...

नमस्कार निकम सर... खंरच खुपच नयनरम्य ठिकान आहे. लेख अतिशय उत्तम ..मला या ठिकानी नक्कीच भ्रमंती करायला आवडेल.

Pages

आपला अभिप्राय नोंदवा