कल्याणचा वझे यांचा ‘खिडकीवडा’!


‘खिडकी’ संदर्भात आलेली, लिहिलेली वर्णने खूप आहेत. त्यात काव्यरचनांचाही समावेशही आहे. जसे, की शांता शेळके यांच्या ‘खिडकीबाहेर निळे आभाळ, पाखरांचे किलबिल सूर, अर्धकच्ची तुरट स्वप्ने, क्षितिज दूर’ या ओळी किंवा सोपानदेव चौधरी  यांच्या ‘खिडकीपाशी एक मुलगी... स्वत:मध्येच गढलेली’ इत्यादी. ‘खिडकी’बाहेरील दृश्यांची ललित वर्णने तर अनेक आहेत. कथांमध्येही खिडकी डोकावते. हिचकॉकचा सिनेमा ‘रिअर विंडो’ फारच प्रसिद्ध आहे. घराचा अविभाज्य घटक म्हणजे खिडक्या आणि दरवाजे. दरवाज्याशी असणारे नाते हे आत-बाहेर येण्या-जाण्याचे, पण ‘खिडकी’पाशी मात्र मनुष्यप्राण्याचे, पशुपक्ष्यांचे, झाडावेलींचे भावनिक नाते असते. रुसूनफुगून बसण्यासाठी किंवा एखादी खास वाट बघत बसण्याची जागा म्हणजे खिडकी. ब्राँझ शिल्पकार नागेंद्रराज भंडारी यांनी तर केवळ ‘खिडकी’ हा विषय घेऊन अनेक शिल्पे तयार केली आहेत.

... आणि मग चोरून चिठ्ठ्याचपाट्या देण्यास मदत करणारी ही खिडकी, जेव्हा जिभेचे चोचले पुरवणारे, चमचमीत, झणझणीत, कुरकुरीत असे ‘बटाटेवडे’ अगदी मानाने विकते तेव्हा मात्र त्या ‘वास्तुघटकाला’ वेगळीच प्रसिद्धी मिळते आणि प्रमाणित असे नाव मिळते... ‘खिडकी वडा’!

कल्याणचा पारनाक्याजवळचा अहिल्यादेवी चौकातील सानेवाडा १८८५ साली वझेवाडा झाला. पाचवी पिढी बघणाऱ्या, नांदणाऱ्या त्या वाड्यात मोरेश्वर वझे १९२६ साली राहण्यास आले. त्यांचा मुलगा यशवंत याने १९६४ ते १९८२ एवढ्या कालावधीत ‘कोहिनूर मिल’मध्ये नोकरी केली आणि त्याबरोबर अनेक जोड उद्योगधंद्यांचा पाठपुरावा केला. त्यांनी व्यावसायिक होण्याचे स्वप्न बालवयापासून पाहिले होते. सत्यात मात्र त्यांनी फुलबाज्याच्या तांब्याच्या तारा बसवून देणे, मसजिद बंदरवरून घाऊक चहापावडर आणून विकणे, दादरजवळील हिंदमाता मार्केटमधून ब्लाऊझ पीसचे तागे आणून विकणे अशा प्रकारे सुरुवात केली होती. अण्णांनी छोटेमोठे व्यवसाय अनेक केले, पण त्यांना यश मिळाले ते एका ‘चविष्ट’ व्यवसायामध्ये. शिवसेनेने मराठी तरुण उद्योजक निर्माण व्हावेत म्हणून १९६७ साली जागोजागी पादचारी रस्त्यांवर तरुणांसाठी ‘बटाटेवडे’ विक्रीचा व्यवसाय उभारून दिला आणि ती घटना अण्णांना प्रेरित करून गेली. अण्णांचे लग्न १९६८ साली झाले. सुगरण जोडीदार उमाकाकू त्यांच्या जीवनात आल्या आणि अण्णांनी त्यांच्या डोक्यात घोळत असलेला बटाटेवड्याचा व्यवसाय सुरू केला.

मुंबई-कर्जतमध्ये आधीच प्रसिद्धी पावलेला बटाटेवडा कल्याणमध्येही प्रसिद्ध करायचा तर काहीतरी ‘वेगळेपण’ हवे. ती करामत केली वझेकाकूंच्या ‘खास’ मसाल्याने. त्याची रेसीपी फक्त आणि फक्त वझे कुटुंबीयांना ठाऊक आहे. वझेकाकूंना जेव्हा विचारले, की सांगा ना रेसीपी. त्यावर काकू कोठलाही आडपडदा न ठेवता म्हणाल्या, की “अहो त्यात काय एवढं ... ही एवढी कोथिंबीर घ्यायची, हा इतका इतका कढीपत्ता घ्यायचा, ह्या इतक्या इतक्या मिरच्या घ्यायच्या, की बास... झाला मसाला !” म्हणजे काकूंनी मला दुखावले नाही, की त्यांचे ‘खास’ सिक्रेटही सांगितले नाही.

व्यवसायाला सुरुवात तर केली, पण दहा बाय दहाच्या अडगळीच्या खोलीला असणाऱ्या एकाच खिडकीतून त्या वड्यांची विक्री करावी लागली. म्हणतात ना, की अडचण ही पुढील घटनांची नांदी असते... आणि अगदी तस्सेच झाले. “अरे, त्या खिडकीतून मिळणारे वडे काय झकास असतात!... ” अशी आणि इतक्या साध्या सोप्या भाषेत प्रसिद्धी तर मिळत गेलीच, पण महत्त्वाचे म्हणजे अप्रचलित आणि वैशिष्ट्यपूर्ण ‘ब्रँडनेम’ही मिळून गेले ‘खिडकी वडा!’. अण्णा आणि काकू त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, की “लोकांनीच या व्यवसायाला ‘नाव’ दिले, पण कधी ‘नाव’ नाही ठेवले!”

अण्णांचा संसार वाढत गेला. दोन मुलांची जबाबदारी आली. तोपर्यंत गिरण्यांनाही घरघर लागली होती. गिरणी कामगारांना अखेर, १९८२ साली कायमचे घरी बसण्याची वेळ आली. मात्र अण्णा गडबडून गेले नाहीत. अण्णांनी त्यांचा ‘खिडकी वडा’ त्यांच्या पत्नीच्या साहाय्याने -

‘पीळ देऊनी पोटाला |
निघे आपल्या कामाला ध्येयमार्ग आक्रमित |
चाललासे नीजमार्गी ||’

या उक्तीनुसार अधिकच जोमाने चालू ठेवला.

नीलेश-शैलेश ही दोन्ही मुले अभ्यास-कॉलेज सांभाळून हाताशी आली होती. यशामागोमाग स्पर्धक आपोआप आले. तुमची ‘खिडकी’ तर आमचा ‘दरवाजा’ येथपर्यंत मजल गेली. पण दरवाज्यांची चौकट निखळून पडते, की काय असे झाले. खिडक्या मात्र भक्कम राहिल्या. कारण त्यांना आधार होता तो दगड, विटा, सिमेंट वाटावे अशा निर्धाराचा. दरवाजे आले, उघडले आणि बंदही झाले. ‘खिडकी’ मात्र मजबूत आहे.

अण्णांनी दोन्ही मुलांची आणि सुनांची भक्कम साथ आहे म्हटल्यावर पुढे, १९९१ साली कमांडर जीप घेतली व ‘वझे बंधू ट्रॅव्हल्स’ हा नवीन व्यवसाय सुरू केला. त्यानंतर २००२ साली तेथून जवळ पन्नास फुटांवर ‘वझे बंधू भोजनालय’, ‘मोरेश्वर सभागृह’ नावाचा लग्नाचा हॉल हेही व्यवसाय सुरू केले. ‘मोरेश्वर सभागृह’ची खासीयत म्हणजे ‘पॅकेज सिस्टिम’. साखरपुडा, लग्न, मंगळागौर, बारसे, वाढदिवस इत्यादी आवश्यक परंपरांचा समावेश त्या पॅकेजमध्ये केला. अण्णांनी सगळे उद्योगधंदे-व्यवसाय कर्जातूनच उभे राहिले आहेत हे आवर्जून नमूद केले. त्याला कारण म्हणजे कर्ज-भागीदारी-नफा-तोटा-स्पर्धा-व्यवसाय इत्यादी अनेक शब्दांपासून दूर पळणारा मराठी माणूस! मात्र अण्णांनी त्यांच्या दोन्ही मुलांना प्रोत्साहन देत सांगितले, की “शोधा बघू जा जा थेट | चमचमणारी वाट ||”

त्यांच्या मोठ्या मुलाचे नीलेशचे हर्णे-मुरूड येथे ‘सागरिका’ रिसॉर्ट आहे. कांगवई, दापोली येथे ‘वझे बंधू फूड प्रॉडक्ट्स’ नावाची मसाल्याची फॅक्टरी आहे. वझेकाकूंनी फक्त बटाटेवड्यांसाठी म्हणून बनवलेली मसाल्याची रेसीपी कोकणात नॉनव्हेजसाठीसुद्धा सर्रास वापरली जात आहे. कल्याणपाठोपाठ तो मसाला आणि ‘खिडकी वडा’ पुणे, कोल्हापूर, कोकण येथपर्यंत पोचला आहे. “ज्या ‘खिडकी वडा’ या नावाने आम्हाला उत्पन्न, प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली त्याबद्दल मनात कृतज्ञता आहेच, ते समाजाचे ऋण आम्ही वेळोवेळी समाजकार्य करून फेडतही असतो... ” असे काकू म्हणाल्या. वझे कुटुंबीयांनी त्यांचे सभागृह २६ जुलै २००५ च्या महाप्रलयाच्या वेळी लोकांना खुले करून दिले. प्रलयात अडकलेल्यांना काही दिवस सातत्याने पिठले-भाकरी मोफत वाटली. गणपतीच्या दिवसांमध्ये ट्रॅफिक पोलिसांवर कामाचा खूप ताण असतो, खाण्यापिण्याच्या वेळा अनियमित असतात. अशा वेळी त्यांना दरवर्षी ‘खिडकी वडा’ पुरवला जातो. नि:शुल्क! हर्णे-मुरुड येथील ‘महर्षी कर्वे स्मारका’चे जतन व संवर्धन वझे कुटुंबीयांकडून समाजकार्याचा भाग म्हणून होत आहे.

वझे कुटुंबीयांची अशा प्रकारची सेवा बघून कल्याणच्या ‘ब्राह्मण सभे’ने त्यांचा दोन वेळा सत्कार केलेला आहे. शिवसेने कडून - कल्याण शाखा- ‘प्रसिद्ध उद्योजक’ म्हणून त्यांचा सत्कार झालेला आहे. त्यांना ‘अग्निशमन व आणिबाणी सेवा’ असा पुरस्कार २०१० साली मिळालेला आहे.

एकाहत्तर वर्षांच्या वझेकाकू आणि शहात्तर वर्षांचे अण्णा न थकता, न कंटाळता, अजून नवनवीन कल्पना घेऊन व्यवसाय पुढे नेऊ पाहत आहेत. त्या मागची ऊर्जा आणि कारणे विचारली असता, दोघेही गंमतीने म्हणतात, की “अहो, ‘वडा’ हा आमचा पहिला मुलगा आहे... नीलेश आणि शैलेश नंतरचे. मग पहिल्या मुलाचे कोडकौतुक हे वेगळेच असणार ना?”

- रिमा राजेंद्र देसाई

Last Updated On 27th Feb 2017

लेखी अभिप्राय

Lekh uttam, wachaniya ahe.

Saroj25/02/2017

सुंदर लेख आणि सविस्तर माहिती मिळाली

सिद्धार्थ सावंत 25/02/2017

Thanyat ha bhavishya, ruchkar wada khanyacha yog ala hota...
Kalantarane te band zale...
I miss it..

रमा ताम्हनकर25/02/2017

मी पंच्याहत्तर श्यहात्तर सालापासुन हा वडा खात आलो आहे. ह्याच्या चवीचे खास वैशिष्ठ्य आहे.एखाद्या कल्याणकराने दिवसभरात हा वडा खाल्ला नसेल तर त्याला तो फाउल वाटत आसे.

श्रीरंग कोटीभा…25/02/2017

खूपच अप्रतिम लेख
वाचता वाचताच खिडकी वडा खाण्याचा मोह झाला .

सौ.माधुरी बागड…25/02/2017

Great

Shubhada 25/02/2017

कल्याण चा खिडकी वडा हा या उद्योगाची संपूर्ण कथा साहित्यिक अंगाणे उलगडणारा खमंग चवादार मेजवानी देणारा लेख.

सुधीर शेरे25/02/2017

Vaze kaka kakuna mancha mujra.tyani je yash sampandan

Gteat couple.

smita chemburkar.25/02/2017

Atishay sunder lekh.

smita chemburkar.25/02/2017

Khup chaan writeup

Dr.Asavari Shinde 25/02/2017

खुप छान लेख

मेधा राजाध्यक्ष25/02/2017

Nice. I liked

Veena Joshi25/02/2017

Very nice article Rima mami and the life of vaze family is really inspiring to all of us.

Sushant Sawant25/02/2017

खिडकी वडा रेसिपी, फारच उत्तम,
माझी दोन्ही मुलं मेलॅबोरण , व लॉस अंगिलिएस ला जेवण बनवण्यासाठी वापरतात.

प्रशांत कोपटे25/02/2017

मा.रिमाताई़नी रेखाटलेले नामांकित कल्याण खिडकी वडा निर्मातेंचे शब्दचित्र म्हणजे ते संपूर्ण कुटुंबिय डोळ्यासमोर येतात व वड्याचा खमंग वास नाकात अलगत शिरतो आणि जीभेवर चव प्रत्यक्ष वडा न खाता रेंगाळू लागते.अतिशय छान.ताईंच्या लेखनाला शुभेच्छा व वझे कुटुंबियांचे कौतुक व आभार.

प्रा.मगन सुर्य…26/02/2017

अतिशय छान शब्दरचना आणि योग्य ती माहिती आहे लेखात....
ह्या खिडकीवड्याबद्दल फक्त ऐकलं होतं पण आता त्या मागचा इतिहास ही माहित झाला.

सागर निंबाळकर26/02/2017

अतिशय सुंदर, माहितीपूर्ण ,मार्गदर्शक लेख.वझे काका,काकूंना सलाम

Sunita amburle26/02/2017

अतिशय सुन्दर रचलेला लेख

संग्राम शिंदे26/02/2017

Ha Lekh wachun mla Anek lokanche phone yet aahet. Samast Marathi aani Bigar Marathi lokancha suddha Wada ha khas pdarth aahe he tyatun kalle.

Rima Desai fro…26/02/2017

Ha Lekh wachun Anek lokanche phone yetaahet...

Rima Desai 26/02/2017

Khidki vada masala khoop chan aahe mazi donhi mule America v Australia yethe asun doghehi to masala vaprun bhajya kartat tyamule bhaji tasty hote

Smt. Pranita kopte27/02/2017

Sundar lekh pratyaksh vada jasa bhavishya tasa lekh sundar amhi kalyan la gelyavar arjun vada kharach ata dapolithi murud yethe babancha mulga nilesh yanihi khudai vada chalu kela ahe

santosh same dapoli27/02/2017

सुन्दर आणि वास्तविक वर्णन खिडकी वडा आणि वझे कुटुम्बास वर्धिष्णु यशासाठी शुभेच्छा

अज्ञात27/02/2017

Ha lekh khupch apratim ahe lahanpachya athavni taja karun gela pratyaksh apratyash sakshidar ahot tyamule khupach abhiman vatla

smita dilip joshi27/02/2017

Ha lekh khupch apratim ahe lahanpachya athavni taja karun gela pratyaksh apratyash sakshidar ahot tyamule khupach abhiman vatla

smita dilip joshi27/02/2017

खिडकी वड्याची माहिती वाचुन खूप आनंद झाला.कारण तुमच्या प्रत्येक ठिकाणाची मी साक्षिदार आहे, खिडकी वडा ,हॉल,हॉटेल या सर्व ठिकाणी आम्ही आलो आहोत,तुमचा वडा जसा पहिला होता तसाचीच चव अजून आहे खिडकी वाड्याची मालकीण माझी बहिण आहे हे मी अभिमानाने सांगते.असेच उत्तरोत्तर यश मिळो हि सदिच्छा
जयश्री गोखले, सुलूताई

श्रीमती जयश्री…28/02/2017

Atishay sundar lekh. Lekh wachta wachat Tondala pani tr sutlech aani Khidki wada ekda nakki khawa asa nirnay ghetlay. Vaze kaka Kaku Tumhala Khup khup subhechha.

Janhavi surve. 28/02/2017

वझे कुटुंबााचे अभिनंदन !!

रविंद्र कुर्वे, ठाणे03/03/2017

वा खूप छान - खिडकी वडा

Manohar Bagle13/03/2017

mast lekh. aata mal pan khidki vada khaycha moh zalay

ashavajit 25/05/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.