रणजिता पवार - तांड्यावरील पहिली शिक्षिका

6 फेब्रुवारी 2017

रणजिता लमाणी आहे. ती तांड्यावर लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिने स्वत: समाजाच्या जाती-जातींतील विषमता अनुभवली. तिने तांड्यावरील शैक्षणिक अनास्थेला झुगारले. तिने कुटुंब, जातपंचायत यांचा विरोध व प्रतिकूल परिस्थिती यांवर मात करत डी.एड.पर्यंत शिक्षण घेतले. रणजिताने जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर तांड्यावरील पहिली शिक्षिका होण्याचा मान मिळवला. आज, ती तांड्याच्या विकासासाठी काम करत आहे. रणजिता गणेश पवार ही ‘सामर्थ्य’ संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये काम करते.
   
रणजिता तांड्यावरील मुलांची शैक्षणिक प्रगती, स्त्रीसक्षमीकरण, न्याय्य हक्कांबद्दल जागृती, सर्वांना समान पातळीवरील वागणूक अशी कामे साधता साधता भटक्या-विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘सामर्थ्य’च्या वतीने युवकांच्या मनात संवेदनशीलता निर्माण व्हावी, त्यांचा तांड्याच्या विकासकार्यात सहभाग वाढावा यासाठी त्यांचे गट बनवून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. रणजिता त्यात सातत्य टिकून राहवे यासाठी नवनवीन स्वयंसेवकांचा शोध घेत असते. 

रणजिताचा जन्म २७ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला. ती उमरग्यातील सरदारनगर तांड्यावर राहत असे. तिचे वडील भारतीय सैन्यात होते. तीन बहिणी, दोन भाऊ, आईवडील हा रणजिताचा परिवार. तिन्ही बहिणींची लग्ने तेरा-चौदा अशा पोरसवदा वयात झाली. रणजिताने तांड्यावरील शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले. ‘मुलींना शिक्षण काय करायचेय? मुलींनी लग्न करून त्यांचा संसार करावा’ असे जातपंचायतीप्रमाणे तिच्या वडिलांचेही मत होते. पण रणजिता शिक्षणाबाबत निग्रही होती. तिने चौथीपुढे शिकण्याचा निर्धार आईकडे बोलून दाखवला. आईने वडिलांना समजावले. वडिलांनी रणजिताला तांड्यापासून दोन किलोमीटर दूर असलेल्या कदेर गावातील ‘लोकमान्य टिळक हायस्कूल’मध्ये घातले.

तांड्यावर शिक्षण बोलीभाषेत दिले जाई. जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्यावर तेथे प्रमाणभाषेत शिकवले जाई. त्यामुळे तांड्यावरील मुलांना बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांत संगती साधता येत नसे. बोलीभाषेत शब्द वेगळे, त्याला मराठीतील वेगळा शब्द रणजिताच्या लक्षात पटकन येत नसे. शिक्षक पाढे, मुळाक्षरे शिकवत, ते समजून घेतानाही तिची गल्लत होई. पण रणजिता हुशार होती. तिला तिची जिज्ञासू वृत्ती स्वस्थ बसू देत नसे. रणजिता शिक्षकांना प्रश्न विचारे. कधी कधी, प्रश्नाला योग्य उत्तर न मिळता, शिक्षकांचा मारही खावा लागला. रणजिताचे कळकट-मळकट कपडे, गुजराती भाषेसारखी हेल काढत मारवाडी, सिंधी भाषेचा आधार घेत तोंडात असलेली अशुद्ध बोली यामुळे तिला शेवटच्या बाकावर बसवले जाई. त्यामागे जातीय विषमता हेही कारण होते. रणजिता अभ्यास करत राहिली, जिद्दीने शिकत राहिली. ती दहावीची परीक्षा २००२ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली.

रणजिताला दहावीला गणित व विज्ञान विषयांत चांगले मार्कस पडले. तिला सायन्सला जायचे होते, पण जातपंचायतीने तिच्या शिक्षणाला प्रखर विरोध आरंभला. सायन्सच्या प्रॅक्टिकल्सच्या वेळांवरून ते शिक्षण तिच्यासाठी कसे योग्य नाही हे तिला जातपंचायतीकडून समजावले गेले. रणजिताने शिक्षणासाठी जातपंचायतीविरुद्ध दंड थोपटले. तिने शिक्षण अर्धवट सोडण्यापेक्षा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचे ठरवले. त्याच सुमारास तिने लग्न करावे म्हणून घरातून दबाव वाढू लागला. पण रणजिताची आई तिच्या निर्णयात पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिने गुंजवटी येथील ‘श्रीकृष्ण महाविद्यालया’त वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. तिला शिक्षणासाठी फेलोशिप मिळाली, पण शिक्षण घेण्याच्या निर्णयाचा रणजिता व तिचे कुटुंबीय यांना त्रास सहन करावा लागला. लोकांकडून व जातपंचायतीकडून येता-जाता टोमणे ऐकावे लागत असत. रणजिता २००४ मध्ये बारावी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. रणजितासमोर बी.कॉम.चा पर्याय असतानाही तिने डी.एड. करण्याचे ठरवले. कारण दरम्यान, तिला सामाजिक कार्याची ओढ निर्माण झाली. तिने तिच्या जातबांधवांना शिक्षित करण्याचे ध्येय निश्चित केले. ती डी.एड. लातूरच्या अहमदपूर महिला अध्यापक विद्यालयातून २००७ मध्ये झाली. तिचे सर्वत्र कौतुक झाले. तेव्हा मात्र रणजिताच्या वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला!

रणजिताला अध्यापनाचे प्रशिक्षण घेत असताना विविध ठिकाणी अध्यापनाचे वर्ग घ्यावे लागत. तिला “हे अध्यापनाचे वर्ग आपल्या तांड्यावर का घेऊ नयेत” असा प्रश्न पडला. रणजिताची ओळख ‘नवम’ या वंचितांच्या शिक्षणासाठी काम करणार्यार पुण्यातील संस्थेशी २००५-०६ च्या दरम्यान झाली. त्या संस्थेचे मराठवाड्यात भटक्या-विमुक्तांच्या शिक्षणासाठी काम सुरू होते. त्या वेळी ‘नवम’ संस्थेला भटक्या-विमुक्तांच्या बोलीभाषेतून प्रमाणभाषा शिकवण्यासाठी दुभाषाची गरज होती. ती संधी रणजिताला मिळाली. ‘नवम’ संस्थेकडून खेळ, गाणी, गोष्टी व चित्रे यांच्या माध्यमातून मुलांना कसे शिकवावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. तेथून रणजिताच्या अध्यापन कार्याची सुरुवात झाली. तिने विविध गावपाड्यांवर शैक्षणिक काम केले. रणजिता ‘नवम’ संस्थेने दिलेल्या त्या संधीबद्दल आभार मानण्यास विसरत नाही.

रणजिताने शैक्षणिक कार्य करता यावे यासाठी लमाणी जातीतील मुलाशी लग्न करायचे नाही हे आधीच ठरवले होते. कारण तिला सासरच्या घरातून पाठिंबा मिळणार नाही हे माहीत होते. ती ‘सामर्थ्य’च्या कामानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये सहभागी झाली. तिची कैकाडी समाजाचे राजेंद्र जाधव यांच्याशी भेट एका कार्यशाळेदरम्यान झाली. ते समाजसेवक आहेत. दोघांचे विचार जुळले. त्यांनी कार्य समान, ध्येय समान असल्यामुळे लग्नासाठी प्रस्ताव ठेवला. त्या लग्नाला घरातून विरोध झाला. दोघांचे एक वर्ष घरातल्यांना समजावण्यात गेले. अखेरीस, रणजिताचे लग्न सातार्‍यात २९ मे २००९ रोजी राजेंद्र जाधव यांच्याबरोबर झाले.

रणजिता पवार लमाण, महार, लमाण, महार मांग, आणि मुस्लिम समाजांतील मागासवर्गीयांसाठी काम करते. रणजिताचे काम तांड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, जातीजातींमधील विषमतेची दरी मिटावी, सर्वांना मानवतेच्या समान पातळीवर घेऊन यावे, मागास जातीला मिळणारी अमानुषतेची वागणूक थांबून त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे, त्यांना त्यांच्या न्याय्य हक्कांची जाणीव व्हावी, लिंगभेद न करता स्त्री-पुरुषांना समान हक्क मिळावेत, मागासवर्गीय मुलांना शिक्षणात समान संधी मिळावी यासाठी पस्तीस तांड्यांवर शंभर ग्रूपच्या माध्यमातून सुरू आहे. तिच्या समाजकार्यात तिचे पती राजेंद्र यांची तिला साथ आहे.

रणजिता सांगते, तांडे हे गावकुसाबाहेर असतात. त्यामुळे ग्रामविकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. ते शिक्षणापासून वंचित राहिल्याने मागास आहेत. त्यांच्यातील जुन्या प्रथा-परंपरा वर्षानुवर्षे जशाच्या तशा चालत येतात. त्यामुळे स्त्री-पुरुष लिंगभेद बराच असतो, बालविवाह अजूनही केले जातात. त्या समुदायातील ते चित्र बदलावे, त्यांना नागरी हक्कांची जाणीव व्हावी म्हणून रणजिताने सरदारनगर, सेवानगर, व्यंकटनगर, महाराणा प्रतापनगर अशा जवळच्या तांड्यांपासून कामाला सुरुवात केली. त्या सामाजिक जागरूकतेच्या कामात प्रेम राठोड, बबिता राठोड, बालाजी राठोड, वंदना पाटील, कोमल जाधव, माया स्वामी यांनी मदत तिला केली. साधारण वर्षभर काम केल्यानंतर कामाला योग्य दिशा मिळावी, या कामात युवा पिढी सहभागी व्हावी यासाठी तांड्यावर संस्था असावी अशी गरज तिला वाटली. त्या गरजेतून ‘सामर्थ्य कल्याणकारी संस्थे’ची स्थापना ८ जानेवारी २००८ रोजी झाली. सध्या त्या संस्थेचे वरील मूळ सात सदस्य व पस्तीसेक स्वयंसेवक आहेत. ‘सामर्थ्य’ या संस्थेमार्फत साकव शाळा, अभिरुची क्लासेस, ज्ञानधारा ग्रंथालय, बचत गटांच्या माध्यमातून स्त्रियांचे आर्थिक सक्षमीकरण, शिबिरे-रॅली यांच्या माध्यमातून समाजजागृती असे उपक्रम राबवले जातात. काही लोकांना घरकूल योजनेतून घरेही मिळवून दिली गेली आहेत.

रणजिता सांगते, तांड्यावरची मुले मोकळ्या वातावरणात वाढलेली असतात. त्यांना धरून-बांधून, चार भिंतींत कोंडून शिकवणे शक्य नसते. त्यांना त्यांच्या कलाने शिकवावे लागते. त्यांची शिक्षणाची मानसिकता खेळ आणि गोष्टी यांच्या माध्यमातून तयार करावी लागते. ती गोष्ट ‘साकव शाळे’च्या माध्यमातून साध्य केली जाते. मुलांना रुचेल अशा पद्धतीने शिकवले जाते (उदाहरणार्थ, वजाबाकीसाठी, त्यांच्यातील चार मुले उभी केली जातात. त्यांतून दोन मुलांना बाजूला काढले की राहिले दोन अशा पद्धतीने गणित शिकवले जाते). मराठीतील शब्द बोलीभाषेत शिकवताना रिंगणात वेगवेगळे शब्द लिहून विचारलेल्या शब्दावर मुलांना उडी मारण्यास सांगितले जाते किंवा त्या शब्दाची ओळख चित्राच्या माध्यमातून करून दिली जाते. अशा पद्धतीने, त्या मुलांना ‘साकव शाळे’त जिल्हा परिषदेच्या शाळेतील अभ्यासक्रम शिकवला जातो. रणजिताच्या शिकवण्याचा आरंभ नातेवाइकांची पाच-सात मुले घेऊन झाला. ती संख्या वाढून चाळीसवर गेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यापूर्वी प्रमाण भाषेचा दुवा म्हणून ही ‘साकव शाळा’ काम करते.

तांड्यावरील युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यासाठी आयटीचे काही कर्मचारी, ‘अक्षरभारती’ व ‘सामर्थ्य’ संस्था यांच्या माध्यमातून ‘ज्ञानधारा ग्रंथालय’ सुरू करण्यात आले आहे. त्या ग्रंथालयात एक हजार पुस्तके आहेत. पुस्तकांचे आदानप्रदान पाच तांड्यांवर मोबाईल लायब्ररीच्या माध्यमातून केले जाते. प्रत्येक तांड्यात वाचनासाठी पंचवीस पुस्तके देऊन दर महिन्याला ती बदलून मिळतात.

‘सामर्थ्य’ संस्थेमार्फत दहा तांड्यांवर ‘अभिरुची क्लासेस’ चालवले जातात. मुलांना खेळ, गाणी, गोष्टी यांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, श्रवण-लेखन-वाचन यांचा विकास होऊन त्यांना अभिव्यक्त होता यावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर असतो. सुमारे पावणेचारशे विद्यार्थी त्या क्लासेसचा फायदा घेत आहेत.

‘सामर्थ्य’ संस्थेद्वारे बालमेळावे व महिलामेळावे आयोजित केले जातात. त्यामुळे तांड्यावरील मुलांना मैदानी खेळांमध्ये सहभागी होता येते. महिला मेळाव्यांमधून महिलांना कायदाविषयक ज्ञान, अॅट्रॉसिटी कायद्यासंबंधी माहिती करून दिली जाते. मुलींच्या शिक्षणाबाबत, कुटुंब नियोजनाबाबत जागरूकता यावी, बालविवाहास पायबंद घालावा, महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी विशेष प्रबोधन केले जाते.

सरदारनगरमध्ये बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जातो. ‘सामर्थ्य’ संस्थेतर्फे बँकांकडून (शिलाई दुकान, पशुपालन, बॅग मॅन्युफॅक्चरिंग, फ्लोअर मिल, ग्रोसरी शॉप वगैरे) व्यवसायांसाठी कर्ज मिळवून देण्यास मदत केली जाते. संस्थेने दुग्धव्यवसायासाठी तांड्यातील वीस-बावीस महिलांना म्हशींचे वाटप केले आहे. संस्थेचे सदस्य व बचत गटाच्या महिला यांनी तांडा हागणदारीमुक्त व्हावा यासाठी पुढाकार घेऊन बचत गटांना मिळालेल्या कर्जाच्या रकमेतून शौचालये बांधली आहेत. चारशे लोकवस्तीच्या त्या तांड्यात हातभट्टीची दारू तयार करणे हा उपजीविकेचा एकमेव धंदा होता. व्यसनामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. ते सावरण्यासाठी बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन चाळीस हातभट्ट्या बंद केल्या. सरदारनगर तांडा साठ वर्षें अंधारात होता. त्या तांड्यावर वीज १६ ऑक्टोबर २०११ रोजी आली. रस्ता व पाणी यांची सुविधाही उपलब्ध झाली आहे.

‘सामर्थ्य’ला सरकारची मदत मिळत नाही. ‘स्वीस एड ऑर्गनायझेशन’कडून दहा ते पंधरा लाखांची मदत मिळते. ‘सीडीएसएस ऑर्गनायझेशन’कडून वर्षाकाठी साठ हजारांची मदत मिळते. संस्थेच्या कार्यकर्त्यांना मुंबईतील ‘कोरो’ संस्थेकडून फेलोशिप मिळते. शिवाय, विद्यार्थ्यांकडून दहा-वीस रुपये फी आकारली जाते. अशा पद्धतीने संस्थेचा आर्थिक भार सावरला गेला आहे.

रणजिताला तांड्यावरील कामाबद्दल २००७ मध्ये अभय बंग यांच्या मातोश्री सुमित्रा बंग यांच्याकडून ‘उद्धवराव पेटकर युवा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. तसेच, महाराष्ट्र माळी संघ, अमरावती यांच्याकडून ‘जीवनगौरव पुरस्कार-२००७’ प्राप्त झाला आहे.

‘सामर्थ्य’ संस्थेच्या कार्याचा परिपाक म्हणजे तांड्यावरील सुशिक्षितांचा टक्का वाढला आहे. युवक नोकरदार झाले आहेत. मुलींचे शिक्षण चौथी, फार तर सातवी-आठवीपर्यंत होई. ते नऊ-दहा वर्षांच्या काळात बारावीपर्यंत गेले आहे. काही मुली ग्रॅज्युएट झाल्या आहेत. पंचायतीमध्ये महिलांना सदस्यत्व नव्हते. युवक त्यांचा कार्यभार सांभाळत. पण आता महिलाही पंचायतीचा भाग बनल्या आहेत. हे कर्तृत्व खचितच रणजिताचे म्हणावे लागेल!

रणजिता पवार ९७६५३६३७३४

- वृंदा राकेश परब

वाचकांच्या प्रतिक्रीया..

रणजीता यांचं कार्य खूपच

रणजीता यांचं कार्य खूपच प्रेरणादायी आहे. त्यांच्या परीने त्यांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे. आपणही सहभाग दाखवून उचलायला हवा. त्यांच्या कार्यास शुभेच्छा. महेश माने, उप अभियंता , सा.बां.वि. ठाणे.

सलाम!

सलाम!

Pages

आपला अभिप्राय नोंदवा