निवृत्ती शिंदे - खडकमाळेगावचे बेअरफूट डॉक्टर

17 जानेवारी 2017

निवृत्ती महाराज शिंदे ह्या समाजाला वाहून घेतलेल्या एका अवलिया व्यक्तीची भेट नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात खडकमाळेगाव गावात झाली. ते स्वार्थापासून निवृत्त झालेले व परमार्थासाठी जीवन जगणारे, नावातच निवृत्ती असलेले शिंदे. निवृत्ती शिंदे एक सर्वसामान्य शेतकरी आहेत. वडिलोपार्जित जमीन त्यांच्या वाट्याला थोडी आली. ते ती कसतात. साहजिकच, कुटुंब कष्टाळू, मेहनती आहे. परंतु नेकीने जीवन जगते.

निवृत्ती तीन-चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईने त्यांचे संगोपन, पालनपोषण केले. आईने मोलमजुरी करून त्यांना वाढवले. निवृत्ती यांना समज आल्यावर त्यांना एक जाणवले, की त्यांना जे भोगावे लागले तशी वेळ कोणावर येऊ नये! त्यामुळे लोकांना मदत करावी. दुसऱ्याची अडचण समजून घ्यावी व ती सोडवण्यासाठी सहाय्य करावे. निवृत्ती आईची शिकवण फार मोलाची ठरली असे म्हणतात.

निवृत्ती बावन्न वर्षांचे आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. खडकमाळेगाव गावात कृषीविषयक बरेच प्रयोग झाले. शेतीत अनेक सुधारणा झाल्या. ग्रामविकासाची कामे  झाली. शैक्षणिक प्रगतीसाठीही प्रयत्न झाले, पण आरोग्यविषयक समस्या मात्र सोडवल्या जात नव्हत्या. कोणी आजारी पडले व रूग्णास दवाखान्यात नेण्याची गरज असली तर त्यांच्या गावात रुग्णवाहिका नव्हती. ती अडचण सोडवण्यास नाशिकचे ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ' यांचे सहाय्य लाभले.

निवृत्ती यांनी स्वत: च्या खांद्यावर रुग्णवाहिका चालवण्याची जबाबदारी घेतली. ते ड्रायव्हिंगचे काम गेली चार वर्षें तळमळीने, स्वेच्छेने, जबाबदारीने, आस्थेने, निष्ठेने व विनावेतन पार पाडत आहेत. ते रूग्ण उपचाराविना राहू नये यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतात. त्यांनी त्यांच्या जीवनाचे ते एकमेव ध्येय मानले आहे. त्यांना कोणत्याही रूग्णाचा, रूग्णवाहिकेची गरज असल्याचा, कोणत्याही वेळी, निरोप मिळाला तरी ते तात्काळ तेथे पोचतात. हातातील कोणतेही काम बाजूला ठेवतात. ते रूग्ण व डॉक्टर यांची भेट होईपर्यंत रूग्णांची सर्वतोपरी काळजी घेतात, आवश्यक असेल तर जमेल तसे आर्थिक सहाय्यही करतात.

खडकमाळेगाव हे खेडेगाव आहे. तेथून जवळ असलेल्या लासलगावला ग्रामीण रुग्णालय असले तरी तेथे तज्ज्ञ डॉक्टर अनेक वेळा उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्णाला नाशिक शहरापर्यंत नेणे अपरिहार्य असते. मग प्रथमोपचार होणे आवश्यक असते. निवृत्ती यांनी त्याकरता प्रथमोपचाराचे शिक्षण घेतले.

त्यांनी ज्या रुग्णावर तातडीने उपचार करणे गरजेचे असते अशा श्वानदंश, सर्पदंश, अपघात, हृदयविकार, पाण्यात बुडणे, प्रसूती, रक्तस्राव इत्यादी रोगांमध्ये रुग्णाला कसे हाताळावे याचा अभ्यास केला.

श्वान किंवा सर्प दंशाच्या केसमध्ये विष रक्तात भिनू न देणे महत्त्वाचे असते. त्यांनी त्यासाठी बॅण्डेज कसे व कोठे बांधावे हे शिकून घेतले. त्यांनी ड्रेसिंग करणे, अपघाताच्या रुग्णाचा रक्तस्त्राव थांबवणे, हाडाला दुखापत झाली असेल तर हाड हलणार नाही - त्याची स्थिती बदलणार नाही याची दक्षता घेणे इत्यादी बाबीही समजून घेतल्या. पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचे पोटात गेलेले पाणी बाहेर काढून टाकणे, मसाज करणे, हृदयविकाराच्या रुग्णास कृत्रिम श्वास देणे यांचा सराव केला. त्यांनी रुग्णाला ऑक्सिजन कसा द्यावा हेदेखील शिकून घेतले आहे. निवृत्ती यांनी या सर्व उपचारांसाठी लागणारे साहित्य जमा केले आहे. अशा तऱ्हेची शोधक बुद्धी त्यांच्यामध्ये विकसित झाली आहे.

त्यांनी एकदा एका गरोदर आदिवासी महिलेला जवळच्या दवाखान्यात नेले. पण डॉक्टरांनी तिचा रक्तदाब वाढला असल्याने तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. तिचे वडील तिच्या सोबत होते. वेळ रात्रीची होती. ती महिला वाटेत रानातच रुग्णवाहिकेत प्रसूत झाली! निवृत्ती यांनी बाळाची नाळ कापून तिला आवश्यक सर्व सहाय्य करून बाळ बाळंतिणीला सुखरूपपणे डॉक्टरांच्या स्वाधीन केले!

जवळच्या गावातील पाच वर्षांची मुलगी खेळता खेळता चुकून पाण्यात बुडाली. तिच्या नाकातोंडात पाणी गेले, पोटात पाणी गेले व ती बेशुद्ध पडली. निवृत्ती यांनी तेथे पोचल्यावर तिचे दोन्ही पाय धरून तिला हवेत गोल फिरवले व तिच्या पोटातील पाणी काढले. तिच्या छातीवर दाब व कृत्रिम श्वासही दिला. तिला धुगधूगी आली, ती श्वास घेऊ लागली. त्यांनी तिला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

त्यांनी हृदयविकाराचे रुग्णही कृत्रिम श्वासोश्वास देऊन वाचवले आहेत. त्यांच्याच जवळ राहणाऱ्या त्यांच्याच वयाच्या एका इसमाला एकदा घरीच हृदयविकाराचा झटका आला. त्याला त्यांनी तातडीने दवाखान्यात नेले. तेथे पोचल्यावर, त्याला पुन्हा दुसरा झटका आला. डॉक्टरांनी त्याला तपासले व ‘आणखी काही उपचार करणे शक्य नसल्याचे’ सांगितले. सारे संपल्याचा निर्वाळाही दिला. निवृत्ती यांनी डॉक्टरांना कृत्रिम श्वास पुन्हा देऊन पाहण्याची विनंती केली. डॉक्टरांनी ती नाकारली. निवृत्ती यांनी स्वत:च्या जबाबदारीवर त्या रुग्णास मसाज केला. त्याला कृत्रिम श्वासोश्वास दिला. छातीवर दाब दिला. रुग्ण हळुहळू प्रतिसाद देऊ लागला. निवृत्ती यांनी त्याला ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली. तो शुद्धीवर आला. त्याची बायपास सर्जरी अन्य हॉस्पिटलमध्ये करण्यात आली व तो गेली तीन वर्षें आनंदाने जीवन जगत आहे. त्या नंतर निवृत्ती यांनी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवला व ते ऑक्सिजन देण्यासही शिकले.

निवृत्ती यांनी अपघातग्रस्तांना तर खूपच मदत केली आहे. कोणाचे हाड मोडले, तर कोणाच्या गुडघ्याला दुखापत झाली, अशा वेळी त्यांना आवश्यक प्रथमोपचार  करून, बॅण्डेज बांधून, रक्तस्राव थांबवण्याचे उपाय अवलंबून, परिस्थिती अधिक बिघडणार नाही याची काळजी घेऊन डॉक्टरांपर्यंत पोचवले आहे. पोलिसदेखील त्यांना अपघाताच्या केसेसमध्ये काही वेळा निरोप देतात.

एका अपघातात एका व्‍यक्‍तीच्या पोटाची त्वचा सोलली गेली व आतील आतडी बाहेर दिसू लागली. रक्तस्रावही होत होता. निवृत्ती तेथे पोचल्यावर, त्यांनी प्रथम रुग्णाला धीर दिला व त्याच्या मनावर त्याला काहीही झाले नसल्याचे ठसवले. ‘साधी, वरील कातडी तर निघाली आहे, टाके घातले की झाले’ असे त्याला पुन्हा पुन्हा सांगून दिलासा दिला. तो जगेल याची त्याला वारंवार खात्री दिल्याने तो आश्वस्त झाला. एवढ्या मोठ्या जखमेवर बांधण्यासाठी पुरेसे बॅण्डेजही निवृत्ती यांच्याजवळ नव्हते. अखेरीस, त्यांनी स्वत:च्या अंगातील लेंगा काढून त्याचे इसमाच्या पोटावर बॅण्डेज बांधले, रक्त वाहणे थांबवले व त्याला घेऊन दवाखाना गाठला आणि त्याला डॉक्टरांच्या हवाली केले. डॉक्टरांनी जखमेला टाके घालून जखम शिवून टाकली. तो माणूस आठ-पंधरा दिवसांत खडखडीत बरा होऊन घरी परतला.

निवृत्ती यांच्याजवळ अशा केसेसचे अनेक किस्से आहेत. त्यांच्यामुळे सर्पदंशाच्या तर अनेक केसेस वाचल्या आहेत. खेडवळ माणूस, फारसे शिक्षणही झालेले नाही, हाताशी पैसा नाही, पण मनात तळमळ असेल, इच्छा असेल तर किती मोलाचे काम करू शकतो, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

अपघातात काहीजण दगावतात. पोलिसांचा फोन येतो. पण निवृत्ती पोचण्यापूर्वीच अपघातग्रस्ताने प्राण सोडलेले असतात. त्याचा काही ठावठिकाणा लागत असेल तर संबधितांना कळवण्याच्या कामातही निवृत्ती मदत करतात. पण पोलिस काही वेळा काही  बेवारस अपघातग्रस्तांचे दफन करून टाकतात. अशा वेळी, निवृत्ती निधन पावलेल्या अपघाताग्रस्ताचे दफन करण्यापूर्वी त्याला नवे कपडे घालतात. ते स्वखर्चाने पुरुषाला लेंगा-सदरा व बाईला साडीचोळी नेसवतात. ‘कोणालाही बेवारस मरू द्यायचे नाही, मी माणूस या नात्याने सर्वांचा वारस आहे’ अशी त्यांची त्यामागील भावना आहे.

रूग्णवाहिकेमधून अनेक प्रकारच्या रूग्णांची ने-आण केल्याने गाडीत कित्येक वेळा रक्त, लघवी अशा प्रकारची घाण होते. निवृत्ती गाडी धुण्याचे काम स्वहस्ते पार पाडतात. ते कोणावरही त्या बाबतीत विसंबत नाहीत. ते गाडीच्या काटेकोर स्वछतेबाबत कमालीचे आग्रही असतात. कारण ते त्यातून होऊ शकणाऱ्या जंतुसंसर्गाचा धोका ओळखून आहेत. गाडी धुताना ते हातमोज्यांचा वापर करतात.

निवृत्ती यांनी गाडी त्यांच्या ताब्यात आल्यापासून वाहनाचे लॉगबुक व्यवस्थितपणे नोंदवले आहे. गाडी कोणत्या दिवशी कोठे नेली, जाण्यायेण्याचे अंतर व वेळ, झालेला पेट्रोल खर्च, गाडी ज्या रुग्णासाठी वापरली त्याचे नाव, लिंग, वय, पत्ता व त्याच्या आजाराचे स्वरूप, या सर्व बाबींची तपशीलवार नोंद, त्यांच्या लॉगबुकमध्ये केलेली आहे. ते वाहनातून नेलेल्या रुग्णाकडून त्याने दिले तर आणि तो देईल तितके पैसे घेतात. त्यांनी रुग्णांनी दिलेल्या पैशांची नोंदही ठेवलेली आहे. त्यांनी रुग्णवाहिका मिळाल्यापासून गेल्या पाच वर्षांत जवळ जवळ अकराशे रुग्ण दवाखान्यात पोचवले आहेत व त्यांची गाडी पंचावन्न हजार किलोमीटर फिरली आहे.

निवृत्ती यांना कुटुंबीयांचीही साथ आहे. त्यांच्या कामाचे मोल कुटुंबीय जाणून आहेत. आईने सेवाभावी वृत्तीचे संस्कार केले असे ते म्हणतात. निवृत्ती यांच्या सर्व कुटुंबाच्या रक्तातच ते भिनून गेले आहेत.

निवृत्ती रुग्णाच्या आजाराचे अचूक निदान करतात. त्यांना कोणत्या रुग्णाला कोठल्या हॉस्पिटलमध्ये न्यावे याचा नेमका अंदाज आलेला आहे. डॉक्टर निवृत्ती यांनी पाठवलेला रूग्ण सहसा नाकारत नाहीत.

निवृत्ती वारकरी संप्रदायाचे आहेत. ते माळकरी आहेत. ते व्यसनमुक्तीचा प्रचार करत असतात. ते भेटेल त्याच्याशी त्यासाठी संवाद साधून त्यांचे विचार त्याच्या गळी उतरवत असतात. ते कीर्तन-प्रवचनही करतात. त्यामुळे काही लोक त्यांना महाराज असे म्हणतात.

निवृत्ती यांच्या कामामुळे गावपातळीवर बेअरफूट डॉक्टरची असलेली गरज अधोरेखित होते. निवृत्ती यांच्यासारख्या जिज्ञासू, तळमळीच्या व प्रामाणिक कार्यकर्त्याची गरज गावोगावी आहे. रुग्णाचे प्राण अपुऱ्या आरोग्यसेवांमुळे धोक्यात येतात. अशा वेळी प्रथमोपचाराची निकड भासते.

निवृत्ती महाराज शिंदे
मु.पो. खडकमाळेगाव, ता. निफाड, जिल्हा नाशिक
09403513680

- अनुराधा काळे

वाचकांच्या प्रतिक्रीया..

Good work

Good work

बाबा चे निस्वार्थी काम ....

बाबा चे निस्वार्थी काम .....रात्री बेरात्री कशाचीही पर्वा न करता....आपल्या गावासाठी आसलेल समाजसेवी कामाला मानाचा मुजरा .....

Pages

आपला अभिप्राय नोंदवा