संजीव वेलणकर - पंच्याण्णव व्हॉटस् अॅप ग्रुपचे अॅडमिन

17 नोव्हेंबर 2016

माझा मित्र किरण भिडे याने मला संजीव वेलणकरांबद्दल सांगितले आणि मी अक्षरशः उडालो! तो माणूस तब्बल पंच्‍याण्‍णव व्हॉट्सॲप ग्रुप्सचा ॲडमीन आहे. किरण म्हणाला “वेलणकर पुण्यात असतात, तू फोनवर त्यांची मुलाखत घेऊ शकतोस.” पण तशा वल्लीशी फक्त फोनवर बोलून माझे समाधान होण्यासारखे नव्हते. मी वेलणकरांच्या भेटीसाठी पुण्याला गेलो.

मी सकाळी दहा वाजता शिवाजीनगर स्टेशनला उतरलो. वेलणकरांचे ऑफिस तेथून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. शिवाजीनगर बस डेपोसमोरच्या गल्लीत ‘रमारमण मंगल कार्यालय’ आहे. वेलणकर ते कार्यालय चालवतात. तेथेच त्यांचे ऑफिस आहे. हॉलच्या आत शिरलो. वेलणकरांचे केबिन म्हणजे एखाद्या कंपनीच्या इडीपी मॅनेजरचे ऑफिस वाटते. अद्ययावत लॅपटॉप, दोन-तीन स्मार्ट फोन्स, प्रिंटर, स्कॅनर, दणदणीत इंटरनेट कनेक्शन, फोनसाठी बॅटरी बॅकअप सुद्धा! काय नाही हे विचारा...

“अहो, माझे फोन्स दिवसातून तीन वेळा चार्ज करावे लागतात. त्यामुळे माझ्यासाठी बॅटरी बँक मस्ट आहे.” वेलणकर म्हणाले. त्यांनी दोघांसाठी कॉफीची ऑर्डर दिली आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. पहिला प्रश्न अर्थातच व्हॉटस् अॅपचे प्रकरण कधी सुरू झाले असा होता. वेलणकर हा डिजिटल माणूस. त्यांना तारखेसह सगळे लक्षात होते.

“माझ्या डोक्यात आपण अशा प्रकारचा एखादा ग्रूप सुरू करावा असे १५ जून २०१५ च्या दिवशी घोळू लागले आणि मी पहिला व्हॉट्स ॲप ग्रूप १८ जूनला सुरू केला. मी त्या आधी काही वर्षे व्हॉट्सॲप वापरत होतो. पण तो साधा मेसेजिंग वगैरेसाठी वापर होता. त्या वेळी माझ्या असे लक्षात आले, की माणसं विरंगुळा म्हणून व्हॉट्सॲप ग्रुप्ससारखे साधन सर्रास वापरतात. त्यातील बहुतांश मेसेज हे गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि मोठमोठे सुविचार इत्यादी 'फॉरवर्डस्' प्रकारात मोडणारे असतात. त्यात लोकांचा अनावश्यक वेळ जातो. शिवाय, तेथे येणारी माहिती फार स्वैर असते. त्यामुळे एखाद्या नेमक्या विषयाला वाहिलेला ग्रूप असावा आणि त्यावर सर्व लोकांनी त्यांच्या त्यांच्या आवडीचे मात्र एकाच विषयावरील विविधरंगी पोस्ट करत राहवे, त्यामुळे त्या त्या विषयानुरूप माहितीचा एकाजागी समग्र साठा होईल अशी माझी कल्पना या ग्रूप्समागील होती.”

”म्हणून मी माझ्या आवडीच्या संगीत-कला क्षेत्राचा पहिला ग्रूप तयार केला. सिनेमा, नाटक, संगीत, लेखन, काव्य, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत सेलिब्रिटीज असतात. रोज कोठल्या न कोठल्या सेलिब्रिटीचा जन्मदिवस किंवा पुण्यतिथी असतेच. मग मी तशा सर्व कलाकारांची माहिती संकलित करून त्या त्या दिवशी लेखाच्या स्वरूपात ग्रूपवर टाकण्यास सुरुवात केली. बरं, त्यासाठी कोणताही विभाग, भाषा, राज्य मला वर्ज्य नसते. कलाकार छोटा असो वा मोठा, कोठलाही भेदभाव न बाळगता मी त्याच्याबद्दल लेख तयार करतो. पण मी स्वतः त्यातील एकही शब्द लिहीत नाही. मी उत्तम ‘कंपायलर’ आहे. मी इंटरनेटवर डिजिटली उपलब्ध असलेली माहिती वाचनीय लेखरूपात तयार करतो. अर्थात लेखाच्या खाली ज्याचे त्याचे श्रेय त्याला देतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लिहिलेली सर्व माहिती केवळ आणि केवळ मराठीत असावी यावर मी ठाम असतो. त्यात काही झाले तरी तडजोड नाही. समजा एखाद्या कलाकाराविषयी मराठीत माहिती उपलब्ध नसेल तर मी त्या दिवशी लेख बनवणार नाही, पण त्या बदल्यात इंटरनेटवरील हिंदी किंवा इंग्रजी लेख पुढे सरकावणे मला जमत नाही!”

मी म्हटलं, “हा तर अस्सल पुणेरी बाणा झाला!” त्या वर वेलणकर मोठ्याने हसून म्हणाले, “प्रश्नच नाही. माझा जन्म पुण्याचा, कार्यक्षेत्रही पुणे. त्यातही आमचा केटरिंगचा पिढीजात व्यवसाय. त्यामुळे इतका सडेतोडपणा हवाच ना?”

मात्र वेलणकरांनी सडेतोडपणाच्या जोडीने येणाऱ्या पुणेरी विक्षिप्तपणाला जवळपासही फिरकू दिलेले नाही. तेवढ्यात आमची कॉफी आली.

वेलणकरांचे मंगल कार्यालय रत्नागिरी शहरात आहे. ते त्यांनी वार्षिक करारावर चालवण्यास दिलेले आहे. तेथेच त्यांचे हॉटेल आहे. त्यांचे रत्नागिरीत ‘युनिसेक्स ब्युटी पार्लर’देखील आहे. ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे पार्लर मानले जाते. तेही त्यांनी चालवण्यास दिलेले आहे. त्यांना पुण्यात बसून रत्नागिरीतील सगळ्या गोष्टी सांभाळणे शक्य होत नाही.

वेलणकरांचे पुण्यात कर्वेनगरमध्ये ‘निर्मला निकेतन’ नावाचे लेडीज होस्टेल आहे. सौ. वेलणकर त्याचा कारभार पाहतात.

त्यांचा तो सारा व्याप पाहून माझा पुढील स्वाभाविक प्रश्न आला, “या कामकाजातून व्हॉट्स ॲपच्या उद्योगासाठी इतका वेळ कोठून काढता?”

त्याट प्रश्नाचे उत्तर वेलणकरांना तोंडपाठ असावे. “मंगल कार्यालयाच्या आमच्या व्यवसायात रोज उठून कार्यक्रम नसतात. शिवाय, आज पस्तीस वर्षे या व्यवसायात काढल्यावर सर्व व्यवस्था इतक्या सेट झाल्या आहेत, की कामं करून घेण्यासाठी मला आमच्या लोकांच्या डोक्यावर सतत उभं राहवं लागत नाही. शिवाय, मी आमच्या सर्व कामाचं पूर्ण संगणकीकरण केलं आहे. मी स्वतः त्यासाठीचं सॉफ्टवेयर मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये तयार केलं आहे. तेही पूर्णतः मराठीत! आम्ही त्यात फक्त बेसिक फॉर्म फीड केला, की आमच्या प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांच्या त्यांच्या कामाची चेकलिस्ट आपोआप जनरेट होते. चुकण्याला किंवा राहून गेलं असं म्हणण्यास काही स्कोपच ठेवलेला नाही.”

वेलणकर ही वल्ली विलक्षणच आहे! वय वर्षे छपन्नत. वाणिज्य शाखेचे शिक्षण, केटरिंगचा व्यवसाय आणि कमालीचा टेक्नोसॅव्ही माणूस. सगळेच अजब रसायन. त्यांना सुरुवातीपासून टेक्नोलॉजीची आवड होती. त्यांनी मित्राच्या मदतीने सुटे पार्ट्स विकत आणून, त्याची जुळणी करून स्वतः पीसी तयार करण्याचे उद्योग अनेक वर्षांपूर्वी केले आहेत. पुढे, त्यांची स्वतःची सॉफ्टवेयर कंपनी काढण्याची संधीही थोडक्यात हुकली.

संजीव वेलणकर सांगत होते आणि मी अवाक होऊन ऐकत होतो!

“तुमच्यासारखे भेटण्यास येणारे एक-दोन लोक वगळता माझ्याकडे फुरसतच फुरसत असते. मग मी त्या सर्व वेळाचा असा ‘व्हॉटस् अॅप’मार्फत सदुपयोग करतो. मी पहिला ग्रूप काढून थांबलो नाही. ‘पाककृती’ हा माझा आवडता आणि प्रभुत्व असणारा विषय. मग विविध पदार्थांच्या रेसिपी देणारा दुसरा ग्रूप मी सुरू केला. ‘आरोग्य’ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यावर तिसरा ग्रूप. ज्यात अनेक डॉक्टर्सही मेंबर आहेत. त्यांचं जिज्ञासू लोकांशी तिथे सातत्याने इंटरॅक्शन चालू असतं. आणि मी सुरू केलेला चौथा ग्रूप म्हणजे ‘मराठी उद्योजकता’ अर्थात मराठी तरुणांना व्यवसायाकरता प्रोत्साहन, मार्गदर्शनपर लेखन.”

“त्या चारही ग्रूप्सना मिळणारा प्रतिसाद अफाट आहे. मी ग्रुप्‍सद्वारे दररोज वीस हजार लोकांपर्यंत मेसेज पोचवतो. ते लेख पुढे शेअर होऊन हजारो लोकांपर्यंत पोचतात. रोज असंख्य नवीन लोक माझ्याशी संपर्क साधत असतात. माझं हे काम पाहून दुसऱ्या कित्येक ग्रूप्सनी मला त्यांची मानद ॲडमीनशिप देऊ केली आहे. अशा ग्रूप्सची संख्या आता पंच्याण्णवपर्यंत पोचली आहे. या निमित्ताने माझ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संपर्क आणि उत्तम ओळखी झाल्या आहेत. माझ्या लेखनामुळे त्या त्या कलाकारांचे नातेवाईक, चाहते हे वेळोवेळी कृतज्ञतेने माझे कौतुक आणि आभार मानत असतात. दूरदर्शनचे निर्माते शिवाजी फुलसुंदर यांनी मध्यंतरी मला फोन केला. सह्याद्री वाहिनीच्या नव्या दिनविशेष कार्यक्रमासाठी त्यांना माझं सहकार्य हवं असल्याचं त्यांनी सांगितलं.”

मी वेलणकरांशी बोलता बोलता माझ्या फोनवर त्यांचे ‘फेसबुक प्रोफाईल’ चेक करत होतो. उत्पल दत्त, मास्टर विनायक, गायक व्ही. डी. पलुस्कर, गुलजार, गिरीश ओक, सुप्रिया पिळगावकर, कविवर्य नारायण सुर्वे, गायिका हेमलता, कीर्ती शिलेदार, गीतकार इंदीवर, राखी, उस्ताद अमीर खॉं... काही दिवसांतील मान्यवरांवरील लेखांची ती यादी होती. केवढे वैविध्य आहे बघा यात. या सर्वांवर माहितीवजा लेख ते व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरून प्रसारित करत असतात. रोजच्या रोज, न चुकता, अखंडपणे... ती एक प्रकारची तपस्याच म्हणा ना!

वेलणकर बोलतच होते. “आता गेल्या वर्षभरात तीनशेपासष्ट दिवसांची माझी लेखांची बँक तयार झाली आहे. पण तुम्हाला सांगू का? मला त्या कामाचा कंटाळा येत नाही. तसा मी एकलकोंडा माणूस आहे. खायला प्यायला इथं जागेवर मिळालं तर मी दिवसदिवस माझ्या सेटअपच्या बाहेरही पडणार नाही. मी आणि माझं ऑफिस.. बस्स... मला लोकांची किंवा त्यांना भेटण्याची गरज नाही.”

मात्र ‘एकलकोंडे’ वेलणकर त्यांच्या उपक्रमात इतके गुंतले आहेत, की त्यांनी त्यांच्या रेसिपी ग्रूपचे पुण्यात एक मोठे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. त्याला सुमारे सव्वाशे लोक आले होते. दिवसभराचा खाद्यविशेष समारंभच होता तो. ज्यात काही लाईव्ह रेसिपीज करून दाखवल्या गेल्या. त्यानंतर रत्नागिरीला त्यांच्याच ‘कानसेन’ या संगीतविषयक ग्रूपचे स्नेहसंमेलन झाले. तेथेही दीडशे लोकांची उपस्थिती होती. त्या निमित्ताने गाण्यांचे विविधरंगी बहारदार कार्यकम दिवसभर सादर झाले. म्हणजे केवळ मोबाईलवर मैत्र असणारे हे गावोगावचे लोक वेलणकरांच्या निमित्ताने प्रत्यक्षात एकमेकांना भेटू लागले आहेत.

वेलणकरांशी गप्पा मारता मारता अडीच-तीन तास कधी उलटून गेले समजलेच नाही! त्या ‘छोट्याशा’ भेटीत आम्हात दोघांचा जणू जुना परिचय असावा असे दिलखुलास ‘फिलिंग’ वेलणकरांनी दिलं होतं. निघता निघता ते जे म्हणाले ते आमच्या भेटीचं सार होतं असं म्हणता येईल. "कुलकर्णी, दोन वर्षापूर्वी माझ्या मुलीच्या लग्नाला एक हजार लोक आले होते. तुमचा विश्वास बसणार नाही, पण उद्या मी जेव्हा माझ्या मुलाचं लग्न करीन त्यावेळी किमान पाच हजार पान होईल, एवढे माझे घनिष्ठ संबंध गेल्या वर्षभरात लोकांशी निर्माण झाले आहेत."

व्हॉट्स ॲपसारख्या आभासी समजल्या जाणाऱ्या जगातील जिव्हाळ्याचे हे उदाहरण. ते संजीव वेलणकरांचं थोरपण तर सांगतंच; पण त्याच जोडीनं समाजमाध्यमांची अचाट ताकद स्पष्ट करणारा तो एक स्पष्ट निदर्शकही आहे.

संजीव वेलणकर 9422301733
sanvelankar@gmail.com

- सुधन्वा कुलकर्णी

वाचकांच्या प्रतिक्रीया..

श्री. वेलणकरांचे काम थक्क

श्री. वेलणकरांचे काम थक्क करणारे आहे.अशा कामातूनच इतिहास सिध्द होत जातो.

हा एक आगळा वेगळा छंद मनापासुन

हा एक आगळा वेगळा छंद मनापासुन जोपासणारी व्यक्ति पु लं च्या व्यक्ति आणि वल्ली मधे सहज सामावली असती. मी त्याला लिम्का बुक कडे रेकॅार्ड पाठविण्यास सुचवले आहे

Kup divsani eka chaglya

Kup divsani eka chaglya dishyadarshak manusa baddel vachyala milaley,thanks!!

व्हॉटस् अॅपचा विधायक वापर

व्हॉटस् अॅपचा विधायक वापर करून चांगल्या पध्दतीने ज्ञानाचे आदानप्रदान करता येते याचे हे उत्कृष्ट उदाहरण वाटते. तेच तेच कॉपी पेस्ट करण्यापेक्षा वेगळे काही केले तर सर्वांनाच फायदा होईल आणि वेळही सार्थकी लागेल असे वाटते. वेलणकर सर आपल्या कामांना न्याय देऊन समाजमाध्यमांचा वापर ज्ञान, मनोरंजन, आरोग्य व सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी करत आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाास मनपूर्वक शुभेच्छा !

लाखात एकच अशी व्यक्ती जन्माला

लाखात एकच अशी व्यक्ती जन्माला येते, आमचं भाग्य थोर, अशी माणसं आपल्या ओळखी ची असणं हे पूर्व पुण्ययी शब्द अपुरे पडतात,

संजीव जी तुमचे अभिनंदन

संजीव जी तुमचे अभिनंदन करायला अभिनंदन हा शब्द ही दुबळा झाल्यासारखा वाटतोय. खुपच छान वाटले तुमची मुलाखत वाचुन. मला तुमच्या मराठी उद्योजक ग्रुपमधे यायचे आहे. प्लीज मला सुद्धा एड कराल का ?

आपला अभिप्राय नोंदवा