जेएनयु आणि मराठी विद्यार्थी

प्रतिनिधी 29/09/2016

दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने स्थापन झाले. तेथे मानव्यविद्या शाखेतील जवळ जवळ सर्व विषयांचे शिक्षण उपलब्ध आहे. देशभरातील विद्यार्थी तेथे प्रवेश घेण्यासाठी येत असतात, एवढी प्रतिष्ठा त्या विद्यापीठास लाभली आहे. देशविदेशातील नावाजलेले व उत्कृष्ट प्राध्यापक तेथे शिकवण्यासाठी, व्याख्याने देण्यासाठी येत असतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना जसा लाभ होत असतो, तसे त्या प्राध्यापकांनाही बौद्धिक सुख लाभते. त्यातूनच जेएनयुला खुले विचारपीठ असे रूप प्राप्त झाले आहे.

गेल्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिका-रशिया या दोन बड्या राष्ट्रांतील शीतयुद्धातील संघर्षाचा भाग म्हणून उजवा व डावा असे दोन विचारप्रवाह रूढ झाले. उजवा म्हणजे भांडवलवादी, रूढीवादी, प्रतिगामी आणि डावा म्हणजे कम्युनिस्ट, मार्क्सवादी, प्रगतीशील व पुरोगामी. डाव्या विचारात क्रांतीची बीजे दिसत, कारण डावा विचार वंचितांची, शोषितांची बाजू घेत असे. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात मुख्यत: आफ्रिका-आशियातील जे देश स्वतंत्र झाले त्यांमधील गरीब जनता स्वाभाविकपणे डाव्या विचाराकडे खेचली गेली. त्या विचारानेच तरुणांच्या अंगावर क्रांतीचे रोमांच उमटत.

भारतातही काँग्रेस जरी सत्तवेर असली तरी डाव्या विचारांचे प्राबल्य महत्त्वाच्या ठिकाणी होते. खुद्द पं. नेहरू व इंदिरा गांधी यांच्या दरबारात अनेक डावे विचारवंत, कलावंत असत. जेएनयुमध्येही डाव्या विचारांचा वरचष्मा असे. डाव्या विचारांमधील वर्गीय विश्लेषणपद्धत मांडणीसाठी सूत्रबद्ध असे. भारतातील पारंपरिक धर्माधिष्ठित विचार त्यासमोर लुळा भासे. किंबहुना, दोन्ही विचारपद्धतींची आमनेसामने लढत कोठे घडूनच आली नाही. दोन्ही पद्धतींचे अड्डे असत व त्यात प्रभावाच्या अंगाने डाव्यांची सरशी असे.

अटलबिहारी वाजपेयी नरसिंहरावांच्या सरकारनंतर पंतप्रधानपदी आले आणि उजव्यांची चुळबुळ वाढली. तेव्हापासून जेएनयुसारख्या अड्ड्यांतून दोन्ही विचारपद्धतींच्या संघटनांचे द्वंद्व सुरू झाले. नरेंद्र मोदींनी निर्विवाद सत्ता मिळवल्यावर तो वाद अधिकच चिघळला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनेते कन्हैयाकुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक वगैरे प्रकरण घडले. डाव्यांचे जाळे जगभर पसरलेले आहे. त्यामुळे कन्हैयाकुमारला अक्षरश: जगातून पाठिंबा मिळाला, पत्रके निघत राहिली.

सरकारच्या व नोकरशाहीच्या कारभारपद्धतीप्रमाणे कन्हैयाकुमारवरील आरोप सिद्ध झालेच नाही. दरम्यान कन्हैयाकुमार जामिनावर सुटले. त्यांनी देशभर दौरा केला. त्यांच्या पत्रकार परिषदा, भाषणे यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. नंतर यथावकाश स्पष्ट झाले, की कन्हैयाकुमार सक्रिय राजकारणात येण्याच्या बेतात आहेत. त्यांच्या व्यक्तिगत आकांक्षा काय आहेत ते स्पष्ट झालेले नाही, तथापी ते त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठ आहेत.

कन्हैयाकुमार प्रकरणाचा फायदा डाव्या संघटनांना भरपूर झाला. त्यांचे प्रतिनिधी २०१६ च्या निवडणुकीत सर्व निवडून आले आणि उजव्या विचारांचे प्रतिनिधी नामोहरम झाले.

जेएनयुमध्ये मराठी विद्यार्थ्यांचे प्रमाण अल्प असते. भारतीय पातळीवर स्पर्धात्मक जगात मराठी माणूस कमीच उतरतो. पण जे मराठी विद्यार्थी आहेत, ते जेएनयुच्या खुल्या वातावरणात खूष आहेत. अशा तिघांचे – मधुरा दामले, आलोक ओक व सुवर्णा साधू बॅनर्जी - लेख प्रसिद्ध करत आहोत.

- टिम 'थिंक महाराष्‍ट्र'

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.