साडीचा पदर - एक शोध!


आम्ही घर बदलले त्यास तेरा वर्षें उलटून गेली. जुन्या घराच्या रस्त्यावरून जाणेयेणे होते, पण मुद्दामहून त्या घराकडे पाय वळत नाहीत. सुरुवातीच्या एक-दोन वर्षांत जुन्या पत्त्यावर पत्रे येत. आमच्या घरविक्रीच्या व्यवहारातील मध्यस्थ, अस्लमभाई यांच्याकडून फोन आल्यावर, मी ती घ्यायला जात असे. पुढे, माझी पत्रे तिकडे येणे विरळ झाले... थांबलेच ! पण गेल्या फेब्रुवारी महिन्यात (२५/०२/२०१६) अस्लमभार्इंनी मला, मी त्या रस्त्यावरून जात असताना हाक मारून बोलावले व एक लिफाफा माझ्या हातात ठेवला. आमच्या जुन्या घराच्या शेजारच्या इमारतीत, तळमजल्यावर त्यांचे न्हावीकामाचे दुकान आहे.

मी घरी येऊन, लिफाफा उघडून पत्र वाचले. आश्चर्य वाटले! आनंद वाटला. पत्र अंजली किर्तने ह्यांचे होते. शैलीदार लेखिका. काही महत्त्वाच्या पुस्तकांच्या लेखिका. त्यांचे मला पत्र आले होते! त्यांनी आनंदीबार्इंचा शोध घेऊन ग्रंथ प्रसिद्ध केला. तो मला फार आवडला होता. त्या ‘पॉप्युलर प्रकाशन’मध्ये संपादकपद अनेक वर्षें भूषवलेल्या, पण त्यांना संशोधनाची आवड, ओढ. त्यामुळे त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आनंदीबाई जोशी, दुर्गा भागवत यांच्यावर उत्तम, संशोधनपूर्ण कलात्मक लघुपट निर्माण केले.

आता, अंजली किर्तने, दुर्गा भागवत यांच्यावर संशोधन करून ग्रंथ सिद्ध करत आहेत. दुर्गाबाई या त्यांची आत्या. त्यामुळे त्यांना दुर्गाबार्इंबद्दल ममत्व. त्यांचे ‘पाऊलखुणा’ ह्या पुस्तकात दुर्गाबार्इंवर बनवलेल्या लघुपटाच्या वेळचे मनोज्ञ अनुभव आले आहेत. त्यामुळेच बहुधा, त्यांनी त्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यास घेतला असावा.

दुर्गाबार्इंनी ‘लोकसत्ते’च्या ‘चतुरंग’ पुरवणीत ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा’ हा लेख१९९२ मध्ये लिहिला होता. पदरावरची निरनिराळी डिझाइन्स, ‘पदर’ ह्या शब्दावरून मराठीत रूढ असलेल्या निरनिराळ्या म्हणी, वाक्प्रचार यांचे संदर्भ... असा काहीसा त्या लेखाचा आशय/विषय असावा. माझ्या मनात साडीच्या ‘पदरा’संबंधात असलेल्या एका शंकेचे निरसन व्हावे म्हणून मी दुर्गाबार्इंना उद्देशून त्या लेखानिमित्ताने त्यावेळी पत्र लिहिले. ते ‘लोकसत्ते’त प्रसिद्ध झाले. अंजली किर्तने ह्यांना माझे ते पत्र त्यांच्या शोधमोहिमेत पाहण्यास मिळाले. त्यांना ते आवडले. पण त्यांना अधिक उत्सुकता आहे ती दुर्गा भागवत यांनी त्या पत्राला त्यावेळी काय प्रतिसाद दिला, हे जाणण्याची. त्यांनी उत्तर दिले का? मी त्यांना कधी भेटलो काय? तो पत्रव्यवहार पुढे वाढला काय? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. मनस्वी संशोधकाला जी उत्सुकता असते, ती अंजली किर्तने यांच्या पत्रात मला आढळली.

त्यांना ह्याची जाणीव आहे व त्यांनी ती पत्रात व्यक्त केली आहे, की माझे पत्र तेवीस वर्षांपूर्वीचे आहे व त्या चौकशीचे पत्र लिहित आहेत २०१६साली (१६/०१/२०१६)! तोपर्यंत मी कदाचित जुनी जागा बदलली असण्याची शक्यता आहे. आणि त्यांचा तर्क बरोबर ठरला होता. मी जागा बदलली होती. पण आशावाद, उमेद अमर असावी. त्यामुळे अस्लमभार्इंकडून ते पत्र मला मिळाले!

दुर्गाबार्इंचे उत्तर मला त्यावेळी आले नव्हते. त्यामुळे माझ्यासाठी तो साडीपदराचा विषय तेथे संपला गेला, पण अंजली यांच्या पत्राने तो विषय माझ्या मनात नव्याने उजळला गेला व माझी शंका अधिक व्यापक समुदायासमोर मांडावी असे वाटले. माझे निरीक्षण असे -

आपल्याकडे कोणतेही धार्मिक कार्य करताना, त्या क्षणाची तिथी, वार, नक्षत्र, ग्रहस्थिती यांच्याबरोबर ते स्थान कोठे आहे? नर्मदा नदीच्या उत्तरेकडे आहे, की दक्षिणेकडे याचा उल्लेख केला जातो. गंगा नदी पवित्र मानली जात असली तरी परिक्रमा केली जाते, ती नर्मदा काठाने. सांस्कृतिक दृष्ट्याही नर्मदेच्या उत्तरेकडील नि दक्षिणेकडील कार्यपद्धतीतील वेगळेपण जाणवते. संबोधन सुलभतेसाठी आपण त्यांना अनुक्रमे ‘उत्तरी’ (नर्मदेच्या उत्तरेकडील) व ‘दक्षिणी’ (नर्मदेच्या दक्षिणेकडील) असे संबोधू.

शंभर वर्षांपूर्वीच्या दक्षिणी महिला सहसा नऊवारी साड्या नेसत, तर उत्तरी महिला पाचवारी/सहावारी. त्या काळी त्या नेसणे पद्धतीला अनुक्रमे सकच्छ/ कासोटा असलेल्या नि विकच्छ/गोल साडी असे म्हणत. दोन्ही पद्धतींच्या साड्यांचे एक टोक - साधारण एक-दीड वार भाग हा ‘पदर’ म्हणून प्रसिद्ध आहे व तो घेण्याची पद्धतही, ‘उत्तरी’ व ‘दक्षिणी’ महिलांची वेगवेगळी खासियत आहे. ‘दक्षिणी’ पद्धतीत पदर हा पुढून, डाव्या खांद्यावरून पाठीमागून घेऊन, उजव्या खांद्यावरून पुढे छातीवर पसरून सोडला जातो. दक्षिणेकडे ती पद्धत उलट आहे.

पुढे केव्हा तरी – बहुधा भारतीय चित्रपटांनी एक मोठा संयोग जुळवला. भारतीय चित्रपटातील महिला ‘उत्तरी’ – सहावारी परिधान करू लागल्या. पण त्यांनी साडीचा पदर घेण्याची पद्धत मात्र दक्षिणी – पुढून घेऊन डाव्या खांद्यावरून पाठीमागे सोडणे, ही स्वीकारली. आज तमाशा-धार्मिक कार्य-नाटक-चित्रपटांत जुना काळ दाखवणे नसेल, तर मुद्दामहून कोणी त्या शंभर वर्षांपूर्वीच्या साडीपद्धतींचा वापर करत नाही.

भारतीय साडी हा जगात सर्वत्र कुतूहलाचा विषय आहे. बऱ्याच पर्यटक परदेशी महिला भारतात आल्यावर आवर्जून साडी नेसून फोटो काढून घेतात. त्या भारतीय साडीत ही एकसूत्रता साडी सहावारी (उत्तरी) नि तिचा पदर घेण्याची पद्धत ‘दक्षिणी’, तो पुढून घेऊन डाव्या खांद्यावरून पाठीमागे सोडणे ह्याचा जनक कोण? हा माझ्या कुतूहलाचा विषय नि त्यासाठीच मी दुर्गा भागवत यांना पत्र लिहिण्याचे धाडस केले होते. त्याचे त्यांनी उत्तर दिले नव्हते.

तत्पूर्वी ‘चाकोरीबाहेर’ हे गंगुताई पटवर्धन ह्यांचे आत्मकथन माझ्या वाचनात आले होते. त्या साधारणपणे १९९६-९७ साली निवर्तल्या. मृत्यूसमयी, त्यांचे वय शहाण्णव-सत्याण्णव होते. म्हणजे त्यांचा जन्म १९००/१९०१ चा असावा. त्या काळच्या प्रथेप्रमाणे मुलीचे लग्न वयाच्या आठव्या-दहाव्या वर्षीं होई. पण गंगुतार्इंना शिकायचे होते. आईने त्यांना पाठिंबा दिला. आईने त्यांना महर्षी कर्वे महिला पाठशाळेची पदवी मिळवल्यावर विवाहास राजी केले. ना.म. पटवर्धन हे विधुर होते. पण त्यांना समाजकार्य करायचे होते- विशेषत: हिंगण्याच्या ट्रेनिंग कॉलेजचे (निवासी) मुख्याध्यापक म्हणून आजन्म सेवकपद स्वीकारायचे होते. त्यांचे विधुरपद त्या आड येत होते. त्यांना एक मुलगी असल्याने, तिला सावत्र आई असावी अशी त्यांची इच्छा नव्हती, त्यांना संसाराचा-शरीरसुखाचा मोह नव्हता. गंगुतार्इंनाही समाजसेवा-शिक्षणक्षेत्रात काम करायचे होते. त्यामध्ये त्यांचे अविवाहित राहणे, आड येण्याची शक्यता होती. तेव्हा संस्थेचे बापुसाहेब यांनी ना.म. पटवर्धन व गंगुताई यांनी विवाह करावा असे सुचवले व ‘शरीरसंबंधांची अपेक्षा न ठेवण्याच्या अटीवर गंगुताई त्यास राजी झाल्या’. अशा त्या, ‘चाकोरीबाहेर’चा मार्ग स्वीकारणाऱ्या गंगुताई. त्या माँटेसरी व अन्य उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या, त्या नऊवारी साडीतच. तेथे त्यांना दिनशा मॅडम भेटल्या व त्यांनी गंगुतार्इंना सहावारी साडी नेसण्यास शिकवले (१९२७). मी गंगुतार्इंना भेटलो व त्यांना ‘उत्तरी’ व ‘दक्षिणी’ साडी नेसण्याच्या पद्धतीच्या मिलाफाचा जनक कोण हे विचारले – प्रथम, १९७५ साली पत्राने व प्रत्यक्ष भेटीत, १९९४ साली. पण त्यांना ते नीट आठवेना आणि तो विषय मनाच्या कुपीत तसाच राहिला.

श्रीमती अंजली किर्तने यांच्या पत्राने त्याला पुन्हा उजाळा मिळाला आहे. कोणी ह्या विषयावर प्रकाश टाकला, तर आनंद वाटेल.

- श्रीधर गांगल
९६१९४२०४९५

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.