डॉ. प्रतिभा जाधव - प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट प्राध्यापक

1 जून 2016

प्रतिभा जाधव-निकम यांचा प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट प्राध्यापक असा प्रवास थक्क करणारा आहे. त्या नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात लासलगाव येथे ‘नुतन विद्याप्रसारक मंडळा’च्या ‘कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’त मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांना लहानपणापासून वेगळे, नवीन काही करण्याचा ध्यास होता. त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणाचे ध्येय जोमाने गाठले. त्या एम.ए., एम.एड., सेट (मराठी, शिक्षणशास्त्र), पीएच.डी. आहेत. त्यांचे भाषा व शिक्षणविषयक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या ‘अक्षराचं दान’ या पहिल्याच कवितासंग्रहाला उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार 2012 साली प्राप्त झाला व पाच राज्यस्तरीय पुरस्कारही लाभले. त्यांना साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पंधरा पुरस्कार मिळाले आहेत! त्यांचे लेखन विविध मासिके, वर्तमानपत्रे, साप्ताहिके व दिवाळी अंक यांतून प्रसिद्ध होत असते, त्यांचे ‘झी मराठी’, ‘कलर्स मराठी’, ‘आय.बी.एन. लोकमत’, ‘साम टिव्ही’, ‘मायबोली’ या वाहिन्यांवर समाज प्रबोधनाचे कार्यक्रम झालेले आहेत. विशेष म्हणजे त्या दै. सकाळ-मधुरांगण (जून 2014) आयोजित ‘नाशिक स्मार्ट सौ.’ स्पर्धेच्या विजेत्या आहेत.

प्रतिभा प्राध्यापक झाल्यावर त्यांच्यासाठी प्रगतीचे, सामाजिक कार्याचे व संपर्काचे अनेक मार्ग खुले झाले. त्यांची महाराष्ट्रभर ‘रंग कवितेचे’, ‘सावित्री तू होतीस म्हणूनच...’ व ‘आई’ या विषयांवर व्याख्याने होत असतात. त्या ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल मंडळा’च्या व्याख्यात्या आहेत. त्यांचे पती निलेश हेही येवला येथे शिक्षकी पेशात आहेत.

अशा चतुरस्रपणे वावरणाऱ्या व तळपणाऱ्या प्रतिभा यांनी षटकार मारला, तो ‘मी अरुणा बोलतेय...!’ या त्यांनीच लिहिलेल्या व सादर केलेल्या एकपात्री प्रयोगाने. तो एकपात्री प्रयोग के.ई.एम. रुग्णालयातील अत्याचारग्रस्त अरुणा शानभाग या परिचारिकेच्या वेदनामय जीवनावर आधारित आहे. प्रतिभा बेचाळीस वर्षें कोमात असलेल्या अरुणाच्या मृत्यूच्या बातमीने अस्वस्थ झाल्या, अरुणा शानबाग गेल्यावर टिव्हीच्या सर्व वाहिन्यांवर भरपूर सांगण्यात आले. वर्तमानपत्र, साप्ताहिक यांच्यामध्येही त्यांच्याबद्दल खूप चर्चा झाली. तरीही प्रतिभा जाधव यांची अस्वस्थता कमी होईना. त्या म्हणाल्या, “वासनांध प्रवृत्तीला बळी पडलेल्या अभागी अरुणा शानबाग या भगिनीच्या वेदना काळजाला भिडल्या. ती बाईपणाच्या नात्याने मला अंतर्मुख विचारप्रवृत्त व दु:खी करून गेली. त्या वेदनेनेच मला लिहिते केले.”
   
त्यांनी प्रथम अरुणावर ‘एक होती अरुणा’ ही कविता लिहिली. ती काही ठिकाणी सादरही केली, पण त्यांची अस्वस्थता जाईना, तेव्हा त्यांनी ‘महिला साहित्य संमेलना’च्या आदल्या दिवशी फक्त एका तासात झपाटल्यागत ‘मी अरुणा बोलतेय...!’ या एकपात्री नाटकाची संहिता लिहून काढली. दुसऱ्या दिवशी ‘महिला साहित्य संमेलना’तील सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत, कोठल्याही सरावाशिवाय ‘मी अरुणा...!’ हा त्यांचा पहिलावहिला एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्याचे चौतीस प्रयोग झाले. पारनाका, वसई येथे ऑक्टोबर २०१५ मध्ये पार पडलेल्या ‘नरवीर चिमाजीअप्पा साहित्य संमेलना’त प्रतिभा यांनी तो एकपात्री प्रयोग सादर केला. त्यास प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली.

अरुणाबद्दलची त्यांची कविता -

एक होती अरुणा
शब्द, ताल, सूर, लय नसलेले तुझे भेसूर जीवनगाणं...
किती किती सोसलंस बाई
मती शून्य होते माझी...
              
कशी झालीस गं अरुणा तू कुमारिकेची एकदम आजी?
तुला रूप, रस, गंध कसलाच आनंद घेता आला नाही,
की ऋतूंचे सोहळे बघता आले नाही
ऋतूंमध्ये पाहिला तू फक्त जीवघेणा उन्हाळा...

शब्द रूसले नंतर तुझ्यावर
तू आज शब्दांची प्रेरणा झालीस...
तू कोण? कुठली? माहित नाही सखे...
पण बाईपणाच्या नात्याने तू मला माझीच वाटलीस
तुला नाही वाटलं का गं कधी पक्वान्न, नवी कोरी साडी वा फुलांची हौस...
तुझ्याभोवती सदैवच वेदनांची फौज...

तू असून नव्हतीस अन् नसूनही असल्यासारखी...
भयाण जगलीस पण जे काही जगलीस...
तो सुटला मोकाट पण तू मात्र संपलीस...
अरुणा तुझं जगणं किती रेंगाळणारं होतं खरंच
आज जेव्हा विचार करते तेव्हा शहारा अन् गुदमरच
तुझ्या दु:खाची जाणीव भयंकर पिडते...

एक प्रश्न पडतो, क्षण क्षण जाळतो
पोखरतो खोलवर आत आत
अरुणा... अरुणा खरं सांग...
खूप काही पेटत होतं ना... तुझ्या विझलेल्या मनात...

संपर्क - डॉ. प्रतिभा जाधव-निकम  (९६५७१३१७१९)

- प्रमोद श्री. शेंडे

वाचकांच्या प्रतिक्रीया..

Khup chan upkram Madam..

Khup chan upkram Madam. Pudhil vatachalis khup khup shubhechha..!

खुपच छान

खूपच छान

सामाजिक चिञण, व्यथा, स्त्री

सामाजिक चित्रण, व्यथा, स्त्री मन, संस्कार, संस्कृती ,भाव भावनांचा सुरेख संगम , स्त्री जीवनाचे ह्दय स्पर्श भाव. या सर्व गोष्टींचा मिलाफ म्हणजे डॉ. प्रतिभा जाधव यांचे सादरीकरण होय.

Fine one! Happy to read such

Fine one! Happy to read such informative articles!!!

Apratim kautukaspad

Apratim kautukaspad vyaktimatv Ahe dr pratibhatai yanche ! अरुणाच्या रुपाने अव्यक्त भावनांना व्यक्त रुप देऊन प्रत्येकाच्या मनात दडपलेले प्रश्न समाजासमोर आले! खूप मार्मिक!

प्रतिभाताईंची " मी अरुणा

प्रतिभाताईंची " मी अरुणा बोलतेय..." ही एकांकिका मी बदनापुर येथे बघितली. संपूर्ण सभागृह अक्षरश: स्तब्ध होते. भूमिकेशी समरसता इतक्या उच्च कोटीची होती की ते शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. नुकत्याच त्या माॅरिशस दौरा करून आल्या. एक 'प्रतिभा'वंत अभिनय त्यांनी सातासमुद्रापलिकडे नेला. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. तुम्हास भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!

Suvarna kadam

Suvarna kadam

खरच तुझ्या प्रतिभा नावाचे तु

खरच तुझ्या प्रतिभा नावाचे तू सार्थक केले. तू लहान वयात इतकी मोठी होशील याची कल्पना आपण collage ला असतानाच होती. आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या या मैत्रिणीचा.

Pages

आपला अभिप्राय नोंदवा