‘कोकण गांधी’ अप्पासाहेब पटवर्धन


सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन ऊर्फ अप्पासाहेब यांना महात्मा गांधींचे पहिले दर्शन मुंबई काँग्रेसच्या वेळी १९१६ मध्ये झाले. तेव्हा गांधीजी सेहेचाळीस वर्षांचे तर अप्पा एकवीस वर्षांचे होते. दक्षिण आफ्रिकेतून आलेले बॅ. गांधी काठेवाडी फेटा व उपरणे पोषाखात वापरत होते, तर मुंबईच्या ‘एल्फिन्स्टन कॉलेज’चे स्कॉलर अप्पा शर्ट-पँटमध्ये होते. पुढे, दोघेही एका पंचावर आले! दोघांचे त्यावेळचे संभाषण इंग्रजीतून होत होते. नंतर आयुष्यभर उभयतांचे गुजरातीतून बोलणे व पत्रव्यवहार झाला. अप्पांचे गुजराथी तर एवढे चांगले झाले, की त्यांनी १९३० मध्ये गांधीजींच्या आत्मकथेचे ‘माझे सत्याचे प्रयोग’ हा अनुवाद मूळ गुजरातीवरून मराठीत केला. (लक्षावधी प्रती खपलेल्या पुस्तकाबद्दल मानधन न घेता अप्पांनी फक्त एक प्रत घेतली).

अप्‍पांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी तत्त्वज्ञान हा विषय निवडला. ते एम.ए. ची परीक्षा पहिल्‍या श्रेणीत उत्‍तीर्ण झाले. ते साबरमतीला गांधीजींकडे पत्रव्यवहार लिहीत असत. मात्र अप्पा गांधीजींच्या विचारांनी एवढे प्रभावित झाले, की त्यांनी १९१७-१८ मध्ये एक वर्ष ‘न्यू पूना कॉलेज’मध्ये (आताचे एस.पी.) तत्त्वज्ञानाची प्राध्यापकी करून लगेच राजीनामा दिला आणि  त्यांनी समाजकार्य करण्याचे ठरवले. ते गांधीजींच्या आश्रमात दाखल झाले. गांधीजींनी त्यांना चार कामे दिली –

१. मीठाच्या कायद्याचा अभ्यास करणे. तो पुढे १९३० च्या मीठ सत्याग्रहाची बैठक ठरला.

२. गांधीजींचा पत्रव्यवहार सांभाळणे.

३. ‘यंग इंडिया’चे संपादन करणे.

४. साबरमती आश्रमातील राष्ट्रीय शाळेत शिकवणे व मुख्य म्हणून काम करणे.

अप्पांनी त्या प्रसंगाचे वर्णन केले आहे ते असे – “अशा तऱ्हेने माझ्या जीवनाचा ओहोळ गांधीजींच्या गंगेला मिळाला.” पण हा ओढासुद्धा गंगेइतकाच स्फटिकशुभ्र, स्वच्छ व पवित्र होता! कारण त्यांनी ब्रह्मचर्याचा निश्चय गांधीजींना भेटण्याच्या आधीपासून केला होता. त्यांना दीनदलितांबद्दल व स्त्रियांबद्दल पहिल्यापासून कळवळा होता. आचार्य स.ज. भागवतांनी अप्पांच्या जीवनाचे रहस्य पुढील शब्दांत लिहिले आहे –

“मातृभक्ती, ब्रह्मचर्य, दलितसेवा ही त्यांची जीवनप्रेरणा होती. सत्य, प्रेम, सेवा या तीन त्यांच्या शक्ती होत्या आणि वीरवृत्ती होती.”

गांधीजींच्या आणि अप्पांच्या जीवनघडणीचा प्रवास हा समान आणि समांतर झाला याचे आश्चर्य वाटते. दोघेही मातृभक्त आणि ईश्वरनिष्ठ. पण कर्मकांडांवर विश्वास नसलेले होते. भगवद्गीता व रामनाम हे दोघांच्याही आवडीचे. अप्पांनी रस्किनचे 'Unto this last' हे पुस्तक बी.ए.ला पाठ्यपुस्तक म्हणून वाचले होते; तर गांधीजींना ते पुस्तक प्रवासात एका मित्राने वाचायला दिले होते. दोघांवरही त्याचा विलक्षण प्रभाव पडला. श्रमनिष्ठ जीवन हेच खरे, बुद्धिजीवी व श्रमजीवी यांना सारखेच वेतन मिळायला हवे ही ती शिकवण. पुढे, त्याचसाठी अप्पांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात ‘गोपुरी आश्रम’ सुरू केला. गोसेवा हा दोघांत आणखी एक समान धागा होता.

अप्‍पा गांधीजींच्‍या आश्रमात असताना तेथे मानवी विष्‍ठेपासून सेंद्रीय खत तयार केले जाई. त्‍याचा वापर शेतामध्‍ये केला जात असे. अप्‍पांनी त्‍या खताचा अभ्‍यास केला. कणकवलीत 'गोपुरी आश्रम' चालवत असताना सेंद्रीय खत त्‍यांच्‍या कामाचा भाग राहिला. त्‍यांनी कावड तयार केली होती. त्या कावडीच्या दोन्ही बाजूस दोन बादल्या बांधल्या. ते ती कावड खांद्यावर ठेवून कणकवली गावात जात. तेथे टोपल्यांच्‍या शौचघरातील मानवी विष्‍ठा त्‍या कावडीत भरून गोपुरी आश्रमात आणत. ते त्यापासून खत बनवीत. या खताला त्यांनी सोनखत असे नाव दिले. अनेक वर्षे त्यांनी मानवी मैल्यापासून खत बनविण्याचेच कार्य केले. हे खत आश्रमातील भात, भाजीपाला व फळझाडे यांना दिले जाई, त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढले.

गांधीजी म्हणत, की रचनात्मक कार्य एवढे झाले पाहिजे, की स्वराज्य पक्व फळासारखे हाती पडले पाहिजे. अप्पासाहेब हे देशभरात मुख्यत: रचनात्मक कामाबद्दल ओळखले जातात. त्यांनी ‘कुणबी सेवा संघ’ काढला. ते ‘चरखा संघा’चे तर अध्यक्षच झाले होते. त्यांनी रत्नागिरीत सूतकताई व ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमोल काम केले. त्यांनीच जिल्ह्यात काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली. ते जिल्हा काँग्रसचे अध्यक्षही होते. ते स्वातंत्र्य चळवळीत सुमारे साडेतीन वर्षें तुरुंगात होते. त्यांनी त्यांना तुरुंगात भंगीकाम करण्यास मिळावे म्हणून केलेला सत्याग्रह गाजला. कारण त्यांच्या समर्थनार्थ गांधीजींनीही उपोषण केले. एवढा परस्पर विश्वास त्या दोघांत होता. महारबंधूंनी मेलेल्या पशूची कातडी सोडवणे बंद केले तेव्हा त्यांनी मृतपशूची कातडी, खतासाठी मांस आणि हाडे मिळवण्याच्या दृष्टीने अनेक चर्मालये काढली. तेथे भाई सुखी, बाबा फारक, बाळूदादा पानवलकर, शामराव जोशी, बांदेकर हे त्यांचे पहिल्यापासूनचे सोबती व अनेक ब्राह्मण सहकारीसुद्धा काम करत. ते सगळे स्वातंत्र्यसैनिक होते. दलितमित्र रमाकांत आर्ते यांनीही खूप काम केले.

त्यांनी मुलांना शिक्षण हवे म्हणून कणकवलीला मुलांचे व मुलींची अशी छात्रालये सुरू केली. दोन्हीकडे विहिरी बांधून घेतल्या. मोठा हॉल, सामान ठेवण्यास रॅक, स्वयंपाकाची खोली, न्हाणीगृह, जादा दोन-तीन खोल्या अशी व्यवस्था केली. आजुबाजूला फुलझाडे लावली. रामभाऊ जाधव व ताई शेट्ये नावाचे व्यवस्थापक नेमले. सरकारकडून मदतीची व्यवस्था झाली. गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा होत्या. मुलांनी स्वयंपूर्ण व्हायला हवे याचे शिक्षण त्यांना मिळाले. मालवणच्या म्हाळसाबाई भांडारकर नावाच्या एका सधन बाईनेही छात्रालयाला मदत दिली. त्यामुळे दलित, पीडित, अशिक्षित मुलांना शिक्षणाची सोय झाली. त्यांना सर्व कामे यायला हवीत म्हणून त्यांच्या पाळ्या लावल्या. त्यामुळे आजुबाजूच्या खेड्यांतील मुलांना शिक्षण मिळाले. पुढे, ती पिढी वरच्या स्थानावर कामे करू लागली.

अप्पासाहेबांनी शेती, जनावरांचे दुधदुभते अशी व्यवस्था केली. चामड्याच्या वस्तू - चपला, पर्स, बॅगा बनवण्याचा कारखाना काढला. त्यामुळे बेकारांना काम मिळाले. त्यांच्यासाठी घरे बांधली. त्यांचा संसार चालू केला. असा तो महान सेवाव्रती कणकवलीत गरिबांच्यासाठी अहोरात्र झटला.

त्यांनी कणकवली गावात आल्यापासून हातात झाडू घेऊन गाव साफ करण्यास घेतले. इतर लोकपण त्यांच्याप्रमाणे काम करू लागले. अप्पासाहेबांना स्वच्छतेची आवड होती. लोक नदीवर शौचाला जात किंवा कोठे आडोशाला बसत. संडास कोणाकडे फार नसत. म्हणून अप्पांनी भंगी कष्टमुक्तीसाठी चराचे संडास, गोपुरी संडास, सोपा संडास असे अनेक संडास लोकप्रिय केले. मानवी विष्‍ठेचा खतासाठी उपयोग करताना त्‍यांनी शौचघरे शास्त्रीय पद्धतीने बांधली. त्यांनी 3 फूट x 3 फूट x 3 फूट आकाराच्या दोन टाक्‍या बांधल्या. या टाक्‍या एकमेकांना लागून होत्या. टाक्‍यांच्या वरच्या बाजूस मधोमध शौचविधी करण्यास दीड फूट लांब व नऊ इंच रुंद अशी पोकळ जागा ठेवण्यात आली. शौचविधी झाल्यानंतर त्यावर माती टाकण्यात येई. असे केल्यानंतर सहा महिन्यांत त्यातून सेंद्रिय खत तयार होई. असे सहा महिने वापरले म्हणजे सहा महिन्यांत त्याचे सोनखत तयार होते. ते झाडांना घातले तर झाडे तरारून येतात. एक टाकी भरली, की दुसऱ्या टाकीचा उपयोग केला जाई. अप्पासाहेबांनी त्याला 'गोपुरी शौचघर' असे नाव दिले. अप्‍पांनी त्याकाळात कुकर, पवनचक्की, गोबरगॅस प्लँट असे अपारंपरिक ऊर्जास्रोताचे यशस्वी प्रयोगही केले. त्यावर पुस्तके लिहिली. 

त्यांच्या आश्रमातील फळे, फुले विक्रीला येत. भाजीपाला पण विक्रीला येई. दुधदुभते पण विक्रीला येई. चामड्याच्या पर्स, चप्पल, बॅगा यांची पण विक्री होई. उन्हाळ्यात मुंबईकरांना गोपुरीमध्ये जांभळे, करवंदे, चिकू, आंबे, फणस, सरबते, आंब्यांची साले, फणसाची साले खाण्यास व नेण्यास मिळत. प्रवासी लोकांची गर्दी वाढली. गोपुरीत मोठी प्रदर्शने होत. मोठमोठे लोक येत. सुतकताई, गोबर गॅस, पवनचक्की पण चालू होती. त्यांनी तरुणांची लग्ने लावून दिली. त्यांचे संसार थाटले गेले. गोपुरी पाहण्यास लांबहून लोक येत. सर्व झाडे हिरवीगार होती. लोक सुट्टीच्या दिवशी अगर संध्याकाळी मुद्दाम तेथे फिरण्यास येत.

अप्पासाहेबांची काशिविश्वेश्वर मंदिरात मुलांना मार्गदर्शनपर भाषण होत. अप्पांना सर्वजण मान देत. मी प्राथमिक शाळेत उत्तम पास झाले म्हणून त्यांच्या हस्ते खाल्लेला पेढा मला(रजनी वैद्य) आठवतो. अप्पासाहेबांमुळे कणकवली गाव फार पुढे आले.

गांधीजी अप्पांच्या शेवटच्या भेटीत महात्माजींची इच्छा कै. महादेवभाई देसार्इंच्या जागी अप्पांनी त्यांचे स्वीय सहाय्यक व्हावे अशी होती. पण अप्पा ‘कस्तुरबा निधी’ जमवण्यासाठी आणि स्वातंत्र्य चळवळीत आलेल्या त्रुटी दुरूस्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात गेले. “मला आता त्याचा पश्चाताप होतो.” असे त्यांनी सत्तरीत लिहून ठेवले आहे. गांधीजींना अप्पा आजारी असल्याचे कळले तेव्हा त्यांनी अप्पांना पत्र लिहिले, “तुला आजार झालाच कसा, मला तर लाज वाटते. पण आता उरळीकांचनला आला आहेस तर परत जायची घाई करू नको!” असे होते दोघांचे पिता-पुत्रासारखे नाते.

(आप्‍पासाहेब पटवर्धन - जन्‍म - ४ नोव्‍हेंबर १८९४, मृत्यू - १० मार्च १९७१)

- प्रा. सतीशचंद्र तोडणकर

(छायाचित्रे - गोपुरी आश्रम)

(या लेखात रजनी वैद्य यांनी लिहिलेली अधिक माहिती छापली आहे.)

लेखी अभिप्राय

समाज सेवा हीच ईश्वर सेवा.

Anil chavan10/01/2019

समाजसेवा हिच ईश्वर सेवा.

Vedant sanjay sawant29/09/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.