पसरणी गावचा शेख मीरा यांचा वाडा


वाई शहरापासून चार किलोमीटर अंतरावर पसरणी गाव आहे. गावाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावर एका ऐतिहासिक वाड्याच्या खुणा पाहण्यास मिळतात. तो शेख मीरा यांचा वाडा.

संभाजीराजांचे पुत्र शाहुराजे हे औरंगजेब बादशहाच्या कैदेतून १७०७ मध्ये सुटले. त्यांनी परतीच्या प्रवासात नर्मदा नदी ओलांडल्यावर लगेच मराठा सरदारांना पत्रे पाठवून स्वत:कडे आकृष्ट केले. ‘तुम्ही स्वामींचे पुरातन सेवक, या प्रसंगी स्वामींचे दर्शनास येऊन सेवा करावी, स्वामी तुमचे अर्जीत विशेष प्रकारे करतील. पुढे कूच दरकूच येत आहोत,’ असे पत्रात म्हटले होते. त्यांचा आणि ताराराणींचा संघर्ष झाला. खेड येथे लढाई होऊन शाहूराजांचा विजय झाला. ते पुणे, सुपे, शिरवळ, रोहिडा, राजगड, प्रचंडगड, चंदनवंदन ही ठिकाणे ताब्यात घेऊन साताऱ्यास आले. साताऱ्याच्या अजिंक्‍यतारा किल्ल्यावर परशुरामपंत प्रतिनिधी होते. शाहूराजांनी त्यांना शरण येण्यासंबंधी निरोप दिला. मात्र ते शरण येण्यास तयार नव्हते.

शाहुराजांच्या सैन्याने अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा नोव्हेंबर १७०७ मध्ये घातला. त्या वेळी शेख मीरा किल्ल्याचा हवालदार होता. त्याचा कुटुंबकबिला पसरणी येथील वाड्यात होता. शाहुराजांच्या सैन्याने त्यांना पकडून साताऱ्यात आणले. शाहूराजांनी शेख मीरास आठ दिवसांत किल्ला ताब्यात दिला नाही तर त्या सर्वांना तोफेच्या तोंडी देऊ असे कळवले. शेख मीरा घाबरला. त्याने परशुरामपंतांची भेट घेतली. मात्र पंतप्रतिनिधींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्यास ‘तुझी नुकसान भरपाई करून दिली जाईल, काळजी करू नकोस’ असे सांगितले. तेव्हा शेख मीराने प्रतिनिधीसच कैद केले आणि साताऱ्याच्या किल्ल्याचा दिंडी दरवाजा शाहुराजांना मोकळा करून दिला. अशा त-हेने ताराराणीची सातारा ही राजधानी शाहूराजांच्या ताब्यात डिसेंबर १७०७ मध्ये गेली. शाहुराजांचा संकल्प आठ दिवसांत किल्ला ताब्यात घेण्याचा होता, तो पूर्ण झाला. तो दिवस शनिवारचा होता. तेव्हापासून शनिवारी ‘फत्तेची नौबत’ वाजवण्याची प्रथा पडली.

त्यानंतर शेख मीरा शाहूराजांच्या सैन्यात अखेरपर्यंत असल्याचे दिसते. मराठे अकरा-बारा हजार सैन्य घेऊन दिल्लीत नोव्हेंबर १७१८-१७१९ मध्ये गेले. त्या सैन्यात अंबाजीपंत पुरंदरे, खंडेराव दाभाडे, संताजी, राणोजी घोरपडे, सटवाजी जाधव, कृष्णाजी जाधव, कृष्णाजी दाभाडे, तुकोजी पवार, शंकराजी मल्हार, मोहकमसिंग, नारो गंगाधर, बाळाजी फडणीस, नारो शंकर, चिमणाजी दामोदर, आवजी नीळकंठ, महादेव हिंगणे आणि शेख मीरा हे सरदार होते. शाहूराजांनी जंजिऱ्याचा सिद्दीसात यावर केलेल्या मोहिमेसाठी उदाजी पवार, देवराम, मेघश्याम, हरी मोरेश्वर, राजाज्ञ आणि शेख मीरा यांना आज्ञा केली होती.

महाबळेश्वरला जाताना पाचगणी घाटातून आजही आपणास पसरणी गाव व शेख मीराचा वाडा दिसतो. शेख मीराचा वाडा पसरणी येथील कोराळा ओढ्याच्या जवळ उभा आहे. तो वाडा शेख मीराच्या तत्कालीन सरदारी थाटाची साक्ष देतो. तो वाडा सहा एकरांच्या परिसरात पसरला असल्याचे त्याची उभी असलेली तटबंदी सांगते. वाड्याचे प्रवेशद्वार त्याच्या भव्यतेची ग्वाही देते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच चार मोठ्या कमानी असलेली इमारत नजरेत भरते. बाहेरचे दालन खुले असून, त्याला जोडूनच चार-पाच खोल्या आहेत. एका खोलीत शेकोटीची कमान आहे. त्यावर चुन्यात बांधलेले धुरांडे आहे. एक खोली नमाजाची आहे. मुख्य दालनातून खोल्यांमध्ये प्रवेश करण्यास जिना आहे. मागच्या बाजूस कमानी असलेले दालन आहे. वाड्यास जोडूनच एक उंच टेहळणी बुरूज (मनोरा) उभा असल्याचे दिसते. एका बाजूस घोड्याची पागा असून, जवळच मोटेची घट्ट बांधणीची विहीर आहे.

ब्रिटिश आमदनीत त्या वाड्यात वैभव नांदत होते. नोकर-चाकर यांची वर्दळ होती. शेख मीरा याला पसरणीचे नवाब म्हणून ओळखले जात असे. सध्या त्या वाड्यास नवाब बंगला असे म्हटले जाते. तेथून जाणारा एक कच्चा रस्ता आहे. तो पाचगणीला जातो. तो नवाबाच्या खासगी मालकीचा होता. त्याच्या परवानगीशिवाय त्या रस्त्याने जाता येत नसे अशी आठवण सांगितली जाते.

धोम धरण झाल्यावर त्या भागातील आजगावच्या काही विस्थापित लोकांनी तो वाडा खरेदी केला होता, त्यातील काही मंडळी तेथे वास्तव्य करून आहेत.

पसरणी गावात रघुनाथस्वामी नावाच्या संतांची समाधी असून, तेथे राममंदिर आहे. कालभैरवनाथ हे गावाचे मुख्य दैवत आहे. त्याचे मंदिर हेमाडपंथी आहे.

गावचे सुपुत्र पद्मश्री बी.जी. शिर्के यांनी उद्योगपती म्हणून देशात आणि देशाबाहेर मोठी कीर्ती संपादली. त्यांनी गावात माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधली असून, गावाच्या मंदिराचा जीर्णोद्धारही केला आहे. त्यांनी गावासाठी अनेक सार्वजनिक कामे केली. त्यांना गावात मानाचे स्थान आहे.

शाहीर साबळे पसरणी गावचे. त्या गावातील शिवाजीराव तथा मामासाहेब शिर्के यांनी दशकाहून अधिक काळ ‘पवनेचा प्रवाह’ हे साप्ताहिक चालवले आहे. त्या गावाचे रहिवासी न्यायमूर्ती पानसे हे हायकोर्ट जज्ज म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.

शेख मीरा यास बरीच गावे इनाम म्हणून मिळाली होती. पाचगणी येथील मालमत्ता त्याच्या उत्तराधिकाऱ्यारकडे होती. शेख मीराचा वंशज सैदुद्दीन हैदर विजली खान हा पाचगणी येथील जमीन खरेदी-विक्रीच्या गैरव्यवहारामुळे दिल्ली येथे कैदेत आहे असे समजते.

- डॉ. सदाशिव शिवदे

लेखी अभिप्राय

मी आत्ताच join झालो आहे. दोन पोस्ट पाहिल्या. असे वाटते, की आपल्याला महाराष्ट्राची/इतिहासाची काहीच माहिती नाही. शाळेबरोबर इतिहास, इतिहासच झाला. वाचून बरे वाटते. आता मला जुनी ऐतिहासिक माहिती मिळेल व माझा महाराष्ट्र मला समजेल. शेख मिराबद्दल प्रथमच वाचले. छान! हा चांगला उपक्रम आहे. माझ्या शुभेच्छा. माझ्या मित्रांना सुध्दा Think Maharashtra सोबत जोडेन. पुन्हा एकदा शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र माझा.

राजन गोखले25/03/2016

Dhanyvad. hi mahiti dilyabddhal. Khup chan mahiti milali. Pan baryach lokanna hi mahiti nahi.

Ganesh Bhise.26/03/2016

Mast mahit dili ahe

Mahesh Hanamnt…16/08/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.