ऐतिहासिक चोळा पॉवर हाऊस

2 जानेवारी 2016

ठाकुर्ली रेल्वे स्टेशन डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्टेशनच्या दरम्यान आहे. स्टेशनाच्या मागे, पश्चिमेला खाडीपर्यंतचा सारा परिसर म्हणजेच ‘चोळा पॉवर स्टेशन’ वा ‘कल्याण बिजली घर’ होय.

विजेवर चालणारी इंजिने १९२५ सालापासून सुरू झाली. त्या काळी रेल्वेला लागणारी वीज टाटा पॉवर लाइनकडून घेतली जात असे. तेव्हाच्या रेल्वे विभागाला जी.आय.पी. असे म्हटले जाई. जी.आय.पी. रेल्वेने ठाकुर्ली येथे ‘चोळा पॉवर हाऊस’ या नावाने १९२९ साली वीजनिर्मिती केंद्र सुरू केले. ते जी.आय.पी. रेल्वेचे स्वत:चे आणि भारतातील पहिले वीजनिर्मिती केंद्र होय. त्यास स्थानिक लोक ‘कल्याण बिजली घर’ या नावाने ओळखत असत. रेल्वे पॉवर हाऊस बांधण्यासाठी ठाकुर्ली येथे थांबू लागली. पुढे, तेथे रेल्वे स्टेशन उभारले गेले. पॉवर हाऊससाठी खाडीलगत शंभर एकर जमीन खरेदी केली गेली. पॉवर हाऊसमध्ये वीजनिर्मितीसाठी मोठमोठे बॉयलर वापरून पाण्याची वाफ तयार केली जात असे. ती वाफ वीज जनित्रांना पुरवली जाई आणि त्याद्वारे वीजनिर्मिती होई. पाण्याची वाफ तयार करण्यासाठी वापरले जाणारे ते बॉयलर तेथे आजही पाहायला मिळतात.

पुढे, चार टर्बाइन्सद्वारे १९२९ साली चाळीस मेगावॅट, दुस-या विस्तारात दोन टर्बाइन्स वाढवून चोवीस मेगावॅट तर तिस-या विस्तारात तीन टर्बाइन्स वाढवून छप्पन मेगावॅट आणि शेवटच्या चौथ्या विस्तारात एक टर्बाइन्स वाढवून अठ्ठावीस मेगावॅट याप्रमाणे एकूण एकशेछत्तीस मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती ‘चोळा पॉवर हाऊस’मध्ये केली जाऊ लागली. ते ‘पॉवर हाऊस’जर आज कार्यरत असते तर तेवढ्या क्षमतेच्या विजेची गरज डोंबिवली शहराला भागवू शकली असती.

त्याकाळी ‘चोळा पॉवर हाऊस’मध्ये वीजनिर्मितीसाठी रोज तीस वॅगन दगडी कोळशाची गरज भासे. तो सर्व दगडीकोळसा मध्यप्रदेश, बिहार येथून आणला जाई. कोळशाची उरलेली राख वीटभट्टीसाठी विकली जात असे. वीजनिर्मितीसाठी लागणारी तेथील टर्बाइन्स इंग्लंड, जर्मनी या देशांतून आयात केली गेली होती. तेव्हाच्या काळातील मोठमोठ्या आकारांतील तीन Ammeter, Voltmeter, Relays अजूनही तेथे आहेत व ती अद्यापही व्यवस्थित काम करत आहेत. आजकालच्या हॅण्डी डिजिटल मीटरच्या काळात सर्व वस्तू अशाच स्वरूपातील असतात.

त्या पॉवर हाऊसमध्ये त्या काळातील प्रथमोपचार पेटी, सूचनांचे फलक आजही तेथे वापरात आहेत. तेथे एका फलकावर १९२९ पासून ते १९८७ पर्यंतच्या कार्यरत असलेल्या मु‘ख्य अभियंत्यांची नावे व त्यांचा कार्यकाल लिहिलेला आहे. पॉवर हाऊसचे विटांनी केलेले बांधकाम व आतील सर्व लाकडी फर्निचर ब-याच चांगल्या स्थितीत शाबूत आहे. पॉवर हाऊस सुरू झाले तेव्हा जवळच्या जमिनीवर तेथील कर्मचा-यांसाठी बावन्न चाळी उभ्या राहिल्या. त्या चाळींना ‘बावन्न चाळ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या चाळींत जवळपास चारशे कुटुंबे राहायची. कर्मचा-यांच्या हुद्यानुसार के टाइप, जी टाइप, जे टाइप, एस टाइप अशा प्रकारच्या त्या चाळी होत्या. एक वार खोली, स्वयंपाकघर, व्हरांडा, अंगण, कोप-यात न्हाणीघर व संडास, कौलारू छप्पर, अंगणाला सात-आठ फूट उंचीची भिंत अशी तेथील घरांची रचना आहे.

ठाकुर्ली स्टेशनच्या पूर्वेकडील टेकाडावर ‘बारा बंगला’ ही अधिका-यांसाठी वसाहत उभी राहिली. वृक्षराजींनी घेरलेल्या परिसरातील ते बंगले ऐसपैस आणि ब्रि‘टिश धाटणीचे होते. आज त्या बंगल्यांची दैना झाली असली तरी त्यांच्या दृश्य रूपावरून त्या वास्तूची श्रीमंती कळून येते.

पॉवर हाऊसजवळ एक जुनी दगडी इमारत आजही उभी आहे. ती मूळची रेल्वे इन्स्टिट्यूट.

‘चोळा पॉवर स्टेशन’ येथे १९२९ सालापासून ते १९८७ पर्यंत वीजनिर्मिती केली जात होती. ती वीज रेल्वेसाठी वापरली जाई. पॉवर हाऊसमध्ये डिसेंबर १९८७ मध्ये मोठा अपघात झाला. बॉयलर हाऊसमधील स्टीलचा पाइप फुटून बाहेर पडलेल्या प्रचंड तापमानाच्या वाफेने बरेच कर्मचारी भाजले गेले तर काही होरपळून मृत्युमुखी पडले. त्याकाळचे रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांनी वीजनिर्मिती हे रेल्वेचे काम नसल्याचे जाहीर करत डिसेंबर १९८७ पासून चोळा पॉवर हाउस बंद करण्याचे आदेश दिले.

तेथील यंत्रसामग्री भंगारात १९९० साली विकली गेली. तेथे पॉवर हाऊसचे अवशेष व काही यंत्रसामग्री अद्यापही पाहता येतात. आज तेथे रेल्वेने नव्याने उभारलेले वीज उपकेंद्र दिसते. त्या उपकेंद्राला टाटा कंपनीकडून वीज पुरवली जाते.

पॉवर हाऊस परिसरात जुने बंगले व नवीन क्वार्टर्स मिळून जवळजवळ साठ वास्तू आहेत. तेथे काही कर्मचारी राहतात. वृक्ष व टेकड्यांमुळे तो परिसर माथेरान व महाबळेश्वर या ठिकाणांची आठवण करून देतो.

पुरुषोत्तम लिमये (वय वर्षे पंच्याऐंशी) हे त्या पॉवर हाउसमध्ये ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर पदावर नोकरीला १९५२ साली लागले. ते निवृत्त १९८७ च्या एप्रिल महिन्यात झाले. ते बावन्न चाळीत १९५५ ते १९८७ या काळात राहत होते. त्या ठिकाणाशी त्यांचे अर्थातच भावबंध जोडले गेलेले आहेत. त्यांचे मन चाळीची वर्तमान विजनावस्था बघून अस्वस्थ होते, पण लिमये गप्प बसलेले नाहीत. ते रेल्वेबोर्डाशी, सरकार दरबारी, रेल्वे मंत्रालय यांच्याशी त्या बावन्न चाळींच्या डागडुजीबाबत १९९२ सालापासून सतत पत्रव्यवहार करत असतात. त्यांच्या परीने ते वृत्तपत्रांतून त्या संदर्भात जनजागृतीचे प्रयत्न करतात. ते वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षीही तेच कार्य नेटाने करत आहेत.

माधवराव शिंदे यांच्यासारख्या एखाद्या मंत्र्याला जसे हे पॉवर स्टेशन बंद करावे असे वाटते, तसे आजच्या एखाद्या मंत्र्याला ते वीजनिर्मितीचे केंद्र पुन्हा सुरू करावे असे का वाटत नाही?

पुरुषोत्तम लिमये यांच्याप्रमाणे आपणही थोडेफार प्रयत्न करू शकतो. निदान महिन्यातून एकदा एक पोस्टकार्ड रेल्वे मंत्रालयात जरूर पाठवू शकतो.

महाराष्ट्राला वीजटंचाईचे संकट टाळायचे असेल तर नवीन वीजकेंद्रे उभारणे ही काळाची गरज ठरते. त्याकरता ‘चोळा’सारखी रेडिमेड वीजकेंद्रे पुन्हा कार्यान्वित होणे आवश्यक आहे.

- श्रीकांत पेटकर

वाचकांच्या प्रतिक्रीया..

Near Kalyan 'there is a Chola

Near Kalyan 'there is a Chola power station. I was not familiar with this. What a Surprise...

Good information.Old

Good information. Old factories, offices which are related to development of man, should be known to all. TATA POWER AT BHIRA ALSO VERY OLD. SOMEONE SHOULD WRITE ON TATA's contribution for Indians.

Very good writeup

Very good writeup

नमस्कार, 'थिंक महाराष्ट्र डॉट

नमस्कार, 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'वर प्रसिद्ध झालेल्या लेखातून एक मोठी शक्यता असलेली गोष्ट घडून येण्याचा संभव आहे. ती घटना तुमच्यासोबत शेअर करत आहोत. 'थिंक महाराष्ट्र'चे कार्यकर्ते श्रीकांत पेटकर यांनी लिहिलेल्‍या 'ऐतिहासिक चोळा पावर हाऊस' या लेखात सध्याच्या वीजटंचाईच्या काळात चोळा येथील पावरहाऊस पुन्हा कार्यान्वित करणे आवश्यक असल्याची गरज पेटकर यांनी नमूद केली होती. तो लेख वाचून कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पी.ए.चा श्रीकांत पेटकर यांना फोन आला. खासदार शिंदे यांना चोळा पावर हाऊसचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असून त्यांनी तो प्रश्न संसदेत रेल्वे मंत्र्यांसमोर मांडण्याचा विचार चालवला असल्याचे पेटकर यांना कळवण्यात आले. त्याा प्रश्नांची मांडणी कशापद्धतीने करता येईल यासंदर्भात पेटकर यांच्याशी संवाद साधला गेला. जर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि चोळा पावर हाऊस पुन्हा सुरू होऊ शकले तर ते पेटकर यांच्या लेखाचे आणि 'थिंक महाराष्ट्र'च्या व्यासपिठाचे मोठे यश म्हणता येऊ शकेल. तथापी त्या लेखामुळे एक प्रश्न संसदेत मांडला जात आहे ही घटनाही तेवढीच महत्‍त्‍वाची आहे. श्रीकांत पेटकर यांचे अभिनंदन आणि खासदार शिंदे यांना शुभेच्छा‍!

शिंदे यांनी खुप महत्वाच्या

शिंदे यांनी खूप महत्‍त्‍वाच्या मुद्द्यास हात लावलेला आहे. तसेच पेटकरांनी त्याची फार सुरेख मांडणी करुन ह्या मुद्द्यास वाचा फोडली आहे.

आपला अभिप्राय नोंदवा