अडकित्ता - पानाच्‍या तबकाचा साज


अडकित्ता हे दुहेरी तरफेचा वापर असलेले, सुपारी कातरण्याचे वा फोडण्याचे हत्यार. खानदानी घराण्याचे गौरवचिन्ह म्हणून अडकित्त्याकडे प्राचीन काळापासून पाहिले जाते. तांबूल सेवन करणा-या साहित्यातील अडकित्ता हा महत्त्वाचा भाग असून सुपारी कातरण्यासाठी अडकित्त्याचा वापर होतो. ग्रामीण भागात बैठकीमध्ये पाहुण्यांसाठी पानपुडा ठेवला जातो. त्यामध्ये पान, बडिशेप, लवंगा, सुपारी, कात यांबरोबर सुपारी कातरण्यासाठी अडकित्तादेखील असतो.

लातूर तालुक्यातील मौजे तांदुळजा येथील कारागिरांचे अडकित्ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. तेथील अडकित्ता भारताची राजधानी दिल्लीसह विदेशातही पोचला आहे.

अडकित्त्याचा वापर केवळ सुपारी कातरण्यापुरता मर्यादित नाही. त्याच्या रचना-गुणधर्माचा भाषेच्या प्रांतात वावर असल्याचे दिसून येते. वडिलधाऱ्यांचा अडकित्ता असावा असा वाक्प्रचार पूर्वी प्रचलित होता. त्याचा अर्थ, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा आदर राखणे असा होतो. खुद्द अडकित्ता या शब्दाचा अर्थ ताब्यात किंवा प्रतिबंधात ठेवणारी व्यक्ती असा सांगितला गेला आहे. त्याशिवाय अडचणीत किंवा पेचात सापडणे या अर्थाने अडकित्त्यात सापडणे, अडकित्त्यात धरणे, अडकित्त्यात घालणे असे वाक्प्रचारही वापरात आहेत.

लोखंडी पोलाद, कठीण धातू, हवाई पोलाद, निकामी कानस यांपासून निरनिराळ्या प्रकारचे अडकित्ते तयार केले जातात. त्यासाठी लोहाराचा भाता, ऐरण यांसह मुंडशी, कानस, सांडस, छन्नी, हातोडा, घण, ठसा इत्यादी साहित्यांचा वापर केला जातो.

अडकित्ता हा शब्द ‘अडकोत्तु’ या कानडी शब्दाचे मराठी रूप असावे. अडकी म्हणजे सुपारी, ओतू म्हणजे  कापणे, फोडणे किंवा तासणे. ज्येष्‍ठ अभ्यासक गोडे यांच्या मतानुसार अडकित्ता हा शब्‍द सहा-सातशे वर्षे जुना आहे. अडकित्ता या शब्दाचा प्रथम उल्लेख रघुनाथ पंडित यांच्या राजव्यवहारकोशात (१६७६) सापडतो. त्यापूर्वी महानुभावांच्या लीळाचरित्रात (तेरावे शतक) ‘पोफळफोडणा’ हा शब्द आढळतो. पतंजलीच्या महाभाष्यातील (इसवी सन पूर्व दुसरे शतक) ‘शंड़क़ुलया खंडःशंड़कुलाखंड’ असे शब्द येतात. त्यापैकी ‘शङ्‌कुलया’ शब्दही त्या अर्थी असावा असे काही विद्वानांचे मत आहे. वासुदेवशरण अग्रवाल या विद्वानाच्या मते, त्याचा अर्थ अडकित्ता असाच आहे. मात्र गोडे यांनी पतंजलीच्या काळात सुपारी होती की नाही असा संशय व्यक्त केला आहे. त्यापेक्षा प्राचीन काळातील भीमकवीच्या 'बसवपुराण' या कन्नड ग्रंथात अडकोतू व अडकेगत्ती असे उल्लेख आलेले आहेत.

जुन्या धोतर-पटकेवाल्या माणसांची शाही बैठकीमध्ये तक्क्याला टेकून गप्पागोष्टी करत अडकित्त्याने सुपारी कातरण्याची लकब तर काही औरच... अडकित्ता कुठे गहाळ होऊ नये म्हणून अडकित्ताप्रेमी माणसे अडकित्त्याला दोरी किंवा साखळी बांधून तो त्यांच्या करदोड्याला बांधून ठेवत असत. ते स्वतःजवळील अडकित्ता दुसऱ्याकडे देण्याचे टाळत. प्रत्येकाला दर्जेदार, धारदार, भक्कम व उत्तम प्रतीचा अडकित्ता हवा असतो.

गुजरातीमध्ये लहान अडकित्त्याला सूडी आणि मोठ्या अडकित्त्याला सूडो म्हणतात. बंगाली, हिंदी, असामी या भाषांमध्ये त्यातला अनुक्रमे यांनी, सरौता व चरोता हे शब्द आहेत. महानुभव पंथाच्या ‘लीळाचरित्रा’मध्ये अडकित्ते सावकाराकडे गहाण टाकल्याचे उल्लेख आढळतात ते पोफळ-फोडणा हा शुद्ध मराठी शब्द वापरून. त्या ग्रंथामधील उल्लेखांवरून यादव काळात मौल्यवान धातूचे अडकित्ते तयार होत असावेत असा अंदाज बांधता येतो.

साधारणतः अडकित्ते हे पितळ, लोखंड, चांदी या धातूपासून बनवले जातात. लोखंड सोडून अन्य धातूंच्या अडकित्यांना पोलादी पाते लावलेले असते. चांदीचे अडकित्ते बनवण्याची पद्धतसुद्धा प्राचीन असावी, कारण पुण्याच्या राजा दिनकर केळकर संग्रहालयात तसे अडकित्ते पाहण्यास मिळतात. अडकित्त्याची निर्मिती इतर उपयुक्त साधनांसारखी मानवी गरजेतून झाली व तशा साधनाला सौंदर्याची जोड देण्याच्या प्रवृत्तीमधून त्यावरील अलंकरण व त्याचे आकारभेद आले. कारागिरांनी अडकित्त्याच्या सपाट पृष्ठावर सोन्याचांदीचा मुलामा चढवून वेलबुट्टी व चित्राकृत्ती कोरल्या. त्यावर आरसे, रंगीबेरंगी काचांचे तुकडे बसवले. त्यास किंकिणी जोडून नादमयता आणली. अडकित्त्याच्या प्रत्यक्ष आकारामध्येही बदल करून त्यास देवदेवतांच्या व पशुपक्ष्यांच्या आकृतींची रूपे दिली. कसबी कारागिरांनी अडकित्ते घोडा, कुत्रा, मोर, गेंडा, पोपट इत्यादी पशु-पक्ष्यांच्या आकारात तयार केले आहेत. स्त्री-पुरुष मिथुन स्वरूपातील आणि भगवान शेषशाही विष्णूच्या स्वरूपाचा अडकित्ते केळकर संग्रहालयात आहेत. त्याबरोबरच ओतीव प्रकारचे अडकित्तेदेखील घडवले जात असत. भारतात करनाळे, जामनगर वगैरे ठिकाणी कलाकुसरींचे सुबक अडकित्ते तयार होतात.

- आशुतोष गोडबोले

संदर्भ - मराठी विश्‍वकोश, दाते-कर्वे महाराष्‍ट्र शब्‍दकोश

Last Updated On - 23rd Jan 2017

लेखी अभिप्राय

Mahiti paripurna.

Trupti sapakal.23/01/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.